आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'एक अनेक'चा खेळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आॅस्ट्रेलियात गोल्ड कोस्ट नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रांतात राष्ट्रकुल स्पर्धा सुरू आहेत. (या भागातले समुद्रकिनारे सोन्यासारखे पिवळे आहेत म्हणून हे नाव.) यात भारतीय महिलांचा हाॅकीचा संघ पदकाच्या रांगेत आहेच. या संघाचा सराव सुरू होता, तेव्हा तिथली एक बातमी वाचली होती. रानी रामपाल ही आपल्या संघाची कर्णधार, हरियाणातली. संघातली एक सदस्य आहे सुशीला चानू, ती मणिपूरची. सरावादरम्यान या दोघी एका खोलीत राहात होत्या. तशा पूर्वी एकत्र खेळलेल्या, पण एकमेकींविषयी वैयक्तिक माहिती नव्हती त्यांना. जेव्हा एकत्र राहू लागल्या तेव्हा त्यांना एकमेकींविषयींची नव्याने ओळख झाली.


त्यांना या ओळखीने आश्चर्यात पाडलं आणि त्या अधिक जवळ आल्या. रानीला हरियाणातल्या एकूण स्त्रीविषयक जाणिवांमुळे हाॅकी खेळण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागलेला, अपमान झेलावे लागलेले, अनेक अडचणींचा सामना करावा लागलेला. खरं तर हरियाणात हाॅकी हा लोकप्रिय खेळ आहे, राष्ट्रीय संघात अनेक खेळाडू हरियाणातले असतात. त्यामुळे हे ऐकून सुशीला अचंबित झालेली कारण तिच्या समाजात मुलींकडे असं तुच्छतापूर्वक पाहण्याची प्रथाच नाही. तिला हाॅकी खेळण्यासाठी कायम पाठिंबा, समर्थन, उत्तेजनच मिळालेलं. एकाच देशात राहणाऱ्या आपण दोघी, आणि आपली पार्श्वभूमी इतकी वेगळी, दोन टाेकांची, याचं त्या दोघींना आश्चर्य वाटलेलं. रानीबद्दल सुशीलाला कर्णधार म्हणून वाटणारा आदर या तपशीलांनंतर दुणावलेला. इतक्या विपरित परिस्थितीतून येऊन ही मुलगी आज राष्ट्रीय संघाचं नेतृत्व करतेय, याचं कौतुक तिला वाटलेलं.

 

सुशीलासाठी जी गोष्ट सहज घडणारी, तीच रानीसाठी इतकी दुष्प्राप्य होती. भारताचं वर्णन करताना “विविधता में एकता’ असे शब्द नेहमी वापरले जातात. त्यात सहसा नैसर्गिक विविधता, वेगवेगळ्या भाषा, पेहरावाच्या पद्धती, खाण्यापिण्यातलं वेगळेपण हे गृहीत धरलेलं असतं. पण ही जी मानसिकतेतली विविधता आहे, तिचा विचारच आपण केलेला नसतो. भाषा, पेहराव, खाणंपिणं यात चूक बरोबर योग्य अयोग्य असं काही नसतं. पण मानसिकतेबद्दल असं आपण म्हणू शकत नाही. मुलींना कसल्याही संधी नाकारण्याची मानसिकता चुकीचीच म्हणावी लागेल ना? तिच्याबद्दलही बोलायला हवंच.

 

mrinmayee.r@dbcorp.in

 

बातम्या आणखी आहेत...