आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाही पायंडा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हे लिहिताना ब्रिटनच्या राजघराण्यातली राजपुत्र हॅरी आणि अमेरिकी अभिनेत्री मेघन यांचा विवाहसोहळा सुरू आहे. ब्रिटिश वृत्तपत्रं अाणि प्रसिद्धीमाध्यमांमध्ये या विवाहसोहळ्याच्या क्षणाक्षणाचं वार्तांकन सुरू आहे. यात एक मुद्दा विशेष वाटला. मेघनचे वडील आजारी असल्याने ते उपस्थित राहून तिला विवाहवेदीपर्यंत नेऊ शकणार नसल्याने हॅरीचे वडील, राजपुत्र चार्ल्स ही जबाबदारी घेणार आहेत. मेघनची आई सोहळ्याला उपस्थित होती.

 

ख्रिस्ती विवाहविधींनुसार वधूला तिचे वडील चर्चमध्ये धर्मगुरूंपर्यंत घेऊन येतात. जसं आपल्याकडे काही धर्मांत ही जबाबदारी मामाची असते. मेघनची आई हे का करू शकली नाही, हे आलंच डोक्यात पहिल्याप्रथम. तसं झालं असतं तर थेट राजघराण्याकडून एक चांगला संदेश गेला असता. भारतात आता अनेक लग्नसोहळ्यांमध्ये वडील नसतील तर आई त्यांची जागा घेताना दिसते.

 

त्याचबरोबर, राजपुत्र चार्ल्स तिच्या सोबत चालणार आहेत, हेही खूप सकारात्मक आहे. त्यांना मुलगी नाही, त्यामुळे त्यांना असं करण्याची संधी एरवी मिळालीच नसती, तीही या निमित्ताने मिळाली. मेघन त्यांची सून म्हणून येण्याआधीच त्यांची लेक झाली. राजघराण्यात कसली आलीय सून, सासू, सासरे, जावई वगैरे असं आपल्याला वाटू शकतं. पण ज्या देशात राणी आहे, तिला मान आहे, तिच्याबद्दल प्रेम आहे, अशा देशात राजपुत्राच्या अशा एका कृतीने चांगला पायंडा पडू शकतो. लग्न हा व्यवहार होत असला तरी जे साग्रसंगीत वा विधिवत विवाह करतात त्यांना त्यात भावनिक मूल्यही दिसत असतं. त्यामुळे हातात हात धरून सोबत चालण्यासाठी वडील नसले तर काय, नवऱ्याचे वडील आहेत ना, असा एक विचार रुजू शकतो.


यावरनं गेल्या वर्षी वाचलेली एक बातमी आठवली. अमेरिकेतली. एका माणसाच्या मृत्यूनंतर त्याचं हृदय दुसऱ्या माणसावर प्रत्यारोपित करण्यात आलं. यानंतर या दोन कुटुंबांमध्ये मैत्रीपूर्ण नातं निर्माण झालं. पण मंडळी एकमेकांना भेटली नव्हती. पहिल्या माणसाच्या मुलीच्या लग्नात हा दुसरा माणूस, ज्याच्यात तिच्या वडलांचं हृदय धडधडत होतं, तिला हातात हात धरून चालला. यासाठी तो खूप लांबचा प्रवास करून गेला होता.  

ऐन उन्हाळ्यात असं काही जिवाला थंडावा देतं.

 

मृण्मयी रानडे, मुंबई
mrinmayee.r@dbcorp.in