आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हसतेस काय?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हसण्याचे खूप प्रकार आपल्याला माहीत अाहेत. खुदुखुुदु, गडगडाटी, खोखो, विकट, कसनुसं, आसू आणि हासू एकत्र, निरागस, राक्षसी, हास्याची खसखस, स्मितहास्य, पोट धरून, पोट दुखेपर्यंत, गडाबडा लोळून, वगैरे वगैरे. या प्रकारांचं वर्गीकरण बायकांचं आणि पुरुषांचं हास्य असं करता येऊ शकतं बरं. कोणतं हसू पुरुषांचं नि कोणतं बायकांचं ते तुम्हाला समजलं असेलच. जे पुरुषी हास्य असतं ते ना फक्त पुरुषांनीच हसायचं असतं. मुळात बायकांनी कमीच हसायचं, तेही अगदी दिसेल न दिसेल, म्हणजे पदरात तोंड दडवून वगैरे. त्या हसण्याचा आवाज मुळ्ळीच येता कामा नये. समोरच्याने म्हणजे अर्थात घरातल्या एखाद्या पुरुषाने, काही विनोद केला किंवा काहीही विनोद केला तरच हसायचं. इतकंच की त्याला लक्षात आलं पाहिजे फक्त. बाकी जगाला कळण्याची काहीएक गरज नाही. त्यामुळे ते स्मितहास्य की काय, तेवढं शिकून घ्यायचं आयाबायालेकीसुनांनी. मनमोकळं हसलं, त्याचा आवाज बाहेरच्या कुणाला ऐकू गेला, तर आभाळ नाही का कोसळणार? ती काळजी नको का घ्यायला आपणच? 


सुहास्य तुझे मनास मोही, हसले गं बाई हसले, लाजून हासणे अन् हासून ते पाहणे वगैरे गाणी ऐकायला ठीक. आणि त्यातनंही तेच सांगितलंय नाही का? सुहास्य, हसले अन् कायमची फसले, लाजून हासणे, इत्यादी इत्यादी. बायांनी कसं सगळं मर्यादेत करावं. आपल्या मापात राहावं. उगी मोठ्ठा आवाज करून, बत्तिशी दाखवून हसू नये. कुटुंबाच्या इभ्रतीचा प्रश्न असतो. त्यांच्या स्त्रीत्वावरच त्यामुळे प्रश्नचिन्ह उठतं ते वेगळंच. 


स्त्रीत्वावर सोडा, माणूसपणावरच प्रश्नचिन्ह उठलं गेल्या आठवड्यात मोठ्याने हसल्यामुळे एका स्त्रीच्या. तिला थेट राक्षसगणात टाकून देण्यात आलं. बरोबरच आहे, साक्षात संसदेत असं हसायचं म्हणजे काय? कोणी माणूस असं करणारच नाही, राक्षसच असेल ना अशी व्यक्ती? आणि एका खासदारावर ही वेळ आलीय, त्यातनं आपण सर्वसामान्य आयाबायांनी तर जपूनच हसलं पाहिजे ना?


- मृण्मयी रानडे, मुंबई
mrinmayee.r@dbcorp.in

बातम्या आणखी आहेत...