आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉलिंग आलिया !

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ती प्रत्यक्षात दिसते, एवढीशी, पण पडद्यावर जेव्हा अवरते, तेव्हा लार्जर दॅन लाइफ होऊन जाते. या ज्या दोन टोकाच्या अवस्था आहेत, दोन अवस्थांमधला जो अवकाश आहे, त्यात आलिया भट्ट नावाच्या अभिनेत्रीच्या असण्याचं सगळं सार सामावलेलं आहे. अर्थातच आलिया आजच्या गुणवान पण बेधडक, बेपर्वा, अलिप्त आणि अगोचर   पिढीची प्रतिनिधी आहे. तिचं चुकणं, त्यातून सावरणं, धडपडणं, यश मिळवणं, त्या यशाचा अर्थ लावणं आजच्या पिढीशी जवळचं नातं सांगणारं आहे. म्हणूनच तिचा आजवरचा प्रगल्भ होण्याकडे सुरू झालेला प्रवास समजून घेणं अनेक अर्थांनी प्रतीकात्मक आहे. काळाचा सांगावा टिपणारं आहे...


काही माणसं सतत स्वतःचे परीघ ओलांडताना दिसतात. सतत स्वतःच्या क्षमता विस्तारताना दिसतात. त्यामुळेच ते जसे काल होते तसे ते आज नसतात. उद्याही कदाचित आजच्यापेक्षा वेगळे असू शकतात. हे सतत स्वतःला ‘इव्हॉल्व्ह’ करत नेणं-उत्क्रांत होत जाणं त्या व्यक्तीसाठी कितीही पिळवटून काढणारं असलं तरी स्वतःच्या बदलांच्या प्रक्रियेकडे बघताना  मनस्वी समाधान देणारं असतं. अशा यशाचीच नव्हे, जीवनानुभवाची एकेक पायरी वर चढत गेलेल्यांना बघणं, त्यांचा प्रवास आपल्या डोळ्यांनी अनुभवणं हाही तितकाच आनंददायी प्रवास असतो. अशी माणसं मोजकीच असतात, पण ठळक असतात. त्यातलीच एक आलिया भट्ट!


‘स्टुडंट ऑफ द इयर’मधून तिने चित्रपटसृष्टीत प्रवेश केला, तेव्हा महेश भट्ट यांची मुलगी यापलीकडे तिची ओळख नव्हती. काहीही अस्तित्व नव्हतं. एक लाडावलेली "स्टार किड' जिला करण जोहरने संधी दिली. त्याही सिनेमात ती दिसली छानच होती, पण हिला पुढे जाऊन स्वतःसाठी जागा निर्माण करता येईल की नाही याबद्दल अनेकांच्या मनात शंकाच होती. ती त्या वेळी रास्तही होती. अनेक सेलिब्रिटी किड्ससारखी हीसुद्धा नुसतीच हवा करून मग त्यातच विरून जाईल, असंही अनेकांना तेव्हा वाटलं होतं. त्यातच तिने टॉक शोमध्ये घातलेला घोळ शंकांना बळकटी देणारा होता. तिनेे विचारलेल्या प्रश्नाला भलतंच उत्तरं दिलेलं आणि लोकांनी तिला मूर्ख ठरवलं. "नुसतीच दिसायला चांगली आहे, सेलिब्रिटी आईबापामुळे चान्स मिळाला आहे, बाकी डोकं नाहीच हिला', अशी सरसकट टीका त्या वेळी झाली होती. "नॅशनल न्यूज' ठरला होता तिचा तो मूर्खपणा. 


पण, वयानं आणि अनुभवानं लहान असलेली आलिया तेव्हाही तिने घातलेल्या ‘त्या’ घोळाकडे जग बघत होतं, तसं बघत नव्हती. एरवी, तिच्या जागी दुसरी कुणी असती, तर  तिला नैराश्याने घेरलं असतं.  इंडस्ट्रीत राहायचं की नाही इथवर तिने विचार केला असता, कारण आलियाविषयी त्या वेळी जे काही चाललं होतं ते सगळंच भयानक होतं. तिच्या जीके (जनरल नॉलेज) आणि एकूण बुद्धिमत्तेवरच प्रच्छन्न टीका होत होती. खिजवणारे जोक्स चालू होते. काही वेळा ते पातळी सोडूनही  झाले होते. "श्रीमंत बापाची मूर्ख मुलगी’- जगाने तिच्यावर शिक्कामोर्तब करून टाकलं होतं. 


पण ही जगाने "मूर्ख' ठरवलेली मुलगी  स्वत:ची खिल्ली उडवणारा व्हिडिओ करण्यात मग्न होती. एआयबीने केलेला ‘ब्रेन में आयक्यू’चा ‘जिनियस ऑफ द इयर’ हा तो व्हिडिओ होता.  मी मूर्खपणा केला आणि मला तो मान्य आहे... हेच जणू तिला जगाला सांगायचं होतं. एक मिनिटासाठी तो मार्केटिंग आणि डॅमेज कंट्रोलसाठी केलेला व्हिडिओ होता,

असं मानलं तरीही स्वतःच्या मूर्खपणाचा वापर स्वतःच्या इमेज बिल्डिंगसाठी करण्यासाठीही हिंमत लागते, एक अॅटिट्यूड लागतो, हे त्यातून बघणाऱ्यांच्या नजरेतून सुटलं नव्हतं. आलियाचा तो आउट ऑफ बॉक्स विचार, तिने तिच्या चुकांवर केलेलं ते मार्मिक भाष्य, ती जशी आहे ती अशी स्वीकारण्याची तिची तयारी, हे सगळंच नवीन होतं. सुखद धक्का देणारं होतं.


एका टप्प्यावर नायकांच्या अवतीभोवती घुटमळणारी, केवळ सुंदर दिसणारी बाहुली ही इमेज तिने जाणीवपूर्वक पुसून टाकली . पुढे जावून ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’ सारखे टिपिकल मसाला सिनेमे केले, तरीही त्यात ती नायकांच्या आजूबाजूने बागेतून नाच करत फिरणारी नायिका दिसली नाही. या मसाला सिनेमांमध्येही तिने तिचा स्वतःचा ठसा उमटवला. या चकचकीत सिनेमांमध्ये ती अजिबात हरवून गेली नाही. पण तोवरही ती एक सशक्त अभिनेत्री आहे हे म्हणायला लोक तयार नव्हते. ती वाटते तितकी मूर्ख नाहीये इतकंच लोकांचं मत होतं. इम्तियाज अलीचा ‘हायवे’ आला आणि ते मत एका रात्रीत बदललं. लहानपणी लैेंगिक शोषण अनुभवलेली आणि नंतर स्वतःचं अवकाश शोधणारी, झालेल्या त्रासाबद्दल उघड बोलण्याची हिंमत कमावलेली तरुणी हा प्रवास तिने फार सुंदर साकारला. त्यानंतर जेव्हा जेव्हा ती पडद्यावर आली, एखाद्या योध्यासारखी भासली. तिच्या वाट्याला आलेल्या भूमिकेत ती आरपार शिरली. “उडता पंजाब’ आणि “डिअर जिंदगी’ने या गोष्टीवर शिक्कामोर्तब केलं आणि लोकांचं बदलेलं मत पक्कं झालं. ही सेलेब्रिटी पालकांची पोरगी ताकदीची अभिनेत्री देखील आहे हे मान्य करण्यापर्यंत प्रेक्षक पोहोचले. 


कौतुक आहे ते म्हणूनच! आलियाचा प्रवास, तिने निवडलेले सिनेमे सगळंच चौकटीबाहेरचं आहे. आपण मुख्य प्रवाहातली अभिनेत्री म्हणून स्वतःला प्रस्थापित करायचं असेल,तर एका विशिष्ट ढाच्यातले सिनेमेच निवडले पाहिजेत,या बंधनात तिने कधीही स्वतःला अडकवून घेतलं नाही. सुंदर दिसलं पाहिजे हे खरंच,पण भूमिकेची गरज मारून स्वतःच्या सौंदर्याचा टेंभा मिरवण्याची गरज तिला वाटली नाही. सुंदर दिसायचं, फॅशन आयकॉन व्हायचं ते ऑफ स्क्रीन. ऑनस्क्रीन व्यक्तिरेखा महत्वाची हे भान तिच्याकडे आलं. याचमुळे कदाचित ती तिच्या भावना आता मोकळेपणाने मांडते. आपण चुकलो हे जसं ती मान्य करू शकते,तसंच इतर २५ वर्षांच्या तरुणींसारखं आपलं आयुष्य नाहीये हेही ती मान्य करायचा कचरत नाही. प्रचंड ताण तणाव निर्माण करणाऱ्या कामात ध्यानधारणेसाठी वेळ दिला नाही,तर हे शेड्युल हाताळणं अवघड होऊन बसेल, हे म्हणायला ती संकोचत नाही. रणबीर कपूरवर आपला क्रश आहे हे ती खुलेपणाने मान्य करू शकते. कारण पडद्यावरच, लोकांच्या डोक्यातली इमेज बनलेलं आयुष्य आणि प्रत्यक्ष आयुष्य वेगवेगळं आहे हे तिला पूर्ण ठावूक आहे, त्यात गल्लत करण्याची गरज तिला वाटत नाही. 

 

सर्व वयोगटातल्या प्रेक्षकांना ती भावते यामुळेच. स्टारडमपाठोपाठ येणाऱ्या अडचणींपासून ते कास्टिंग काऊचपर्यंत सर्व विषयांवर ती मनापासून बोलत असते. स्वतःचं मत आणि विचार मांडत असते. तिची दृष्टी सजग आणि जाणती आहे. म्हणूनही ती लोकांना आवडते. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या “राझी’ने पुन्हा एकदा तिच्या क्षमता अधोरेखित केल्या आहेत. मेघना गुलझार आणि आलिया या दोघींनी समर्थपणे गेले काही आठवडे स्वतःच्या खांद्यावर तोलून धरले आहेत. मेनस्ट्रीम मसाला नसलेला सिनेमा, स्त्री व्यक्तिरेखा केंद्रित सिनेमाला दणदणीत ओपनिंग मिळवून देणं, पुरुषप्रधान व्यवस्थेला धरून चालणाऱ्या इंडस्ट्रीत हे वाटतं तितकं सोपं नाही. अर्थात सिनेमा हे टीमवर्क असलं तरी प्रमुख व्यक्तिरेखा कमी पडली आणि आजूबाजूचे तोलून धरणारे कितीही कमाल असले तरीही त्याचा म्हणावा तितका उपयोग होत नाही. आलियाने तिच्या भूमिकेचं सोनं केलं आहे. खरंतर तिच्या वाट्याला येणाऱ्या प्रत्येक भूमिकेचं ती सोनं करत आली आहे. त्या प्रत्येक भूमिकेबरोबर ती अभिनेत्री म्हणून प्रगल्भ होत गेली आहे. तिच्या प्रगतीचा आलेख तिनं प्रयत्नपूर्वक चढता ठेवला आहे. 


स्वतःच्या जगण्याचं, स्टारडमचं, ग्लॅमर आणि प्रसिद्धी पाठोपाठ येणाऱ्या जबाबदारीचं भान तिच्याठायी  बघायला मिळतंय. म्हणूनच ती इतरांपेक्षा वेगळी दिसते आहे. इतर कुणाचीतरी जागा घेण्यासाठी जीवघेणी चढाओढ न करता तिने स्वतःसाठी स्वतंत्र जागा तयार केली आहे. अशी जागा निर्माण करण्याचा विचार मनात असणं, त्यासाठी सिनेमांच्या निवडीपासून मुलाखतींपर्यंत प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करावी लागते. ‘कॉलिंग सेहमत’ वाचल्यानंतर डोळ्यासमोर फक्त आणि फक्त आलिया उभी राहिली असं सिनेमाची दिग्दर्शिका मेघना गुलझार का म्हणते,हे राझी बघितल्यावर लगेच लक्षात येतं. एखाद्या भूमिकेत शिरणं म्हणजे, फक्त त्या व्यक्तिरेखेचे कपडे, दिसणं, त्या व्यक्तिरेखेबरोबर येणाऱ्या भरताड गोष्टी नसतात, एखाद्या भूमिकेत शिरणं म्हणजे त्या व्यक्तिरेखेच्या मनाचा तळ गाठणं तिथं काय चालू असू शकतं. हे हुडकून काढत पडद्यावर मांडणं, हे अवघड काम फक्त लेखकाचं नसतं तर ते लेखकाइतकंच कलाकाराचंही आहे. आलियाने उभ्या केलेल्या भूमिका आपल्याला भावतात कारण ती त्या व्यक्तिरेखेच्या मनाचा तळ गाठते. तिथं खोलवर दडलेलं सुख-दुःख, आनंद भीती, काळ्या कडव्या बाजूही ती उकरून वर काढते. व्यक्तिरेखांचे अगणित पदर उलगडण्याचा ताकद तिच्यात आहे.  म्हणूनच ती वेगळी आहे!

 

लोकांना काय जातं बोलायला
‘तरुण मुलींना मी आदर्श वाटते, मी काय बोलते, काय कपडे घालते, माझी मतं काय आहेत, ती मी कशी मांडते याकडे सगळ्यांचं लक्ष असतं. एक चूक आणि तुम्ही मोठं तुफान ओढवून घेऊ शकता. याचा अनुभव करिअरच्या अगदी सुरुवातीलाच मी घेतला आहे. सतत या सगळ्याचा विचार करून वावरणं ताण आणणारं असतं. मी सतत आनंदी, गोड, सुंदर, नटखट असावं, अशी अपेक्षा लोकांची असते. हे कसं शक्य आहे? कुणीही असू शकत नाही. आपापले भावनिक चढउतार असतात. मूड्स असतात. मी किती खुश आहे असं मी सतत दाखवू शकत नाही. पण दुसरीकडे लोकांसमोर येताना आलिया भट्ट म्हणून माझी काही प्रतिमा आहे, माझ्या काही जबाबदाऱ्या आहेत आणि त्यापासून माझी सुटका नाही याची जाणीवही मला आहे. पंचविसाव्या वर्षी याचा तोल साधण्याचा प्रयत्न म्हणजे तारेवरची कसरत आहे. पण मी ती करतेय.’


माझ्यासारखी मूर्ख मीच
‘घाईगडबडीत उत्तर दिलं आणि तेही चुकीचं. चूक झालीच, मान्य आहे. लोक हसताहेत, मीही हसतेय. मी इतकी बावळटासारखी कशी काय वागू शकते?’ ज्यांनी तिला आधी मोडीत काढलं ते सगळे आलियाचं हे उत्तर ऐकून चाट. स्वतःच्या चुकांना बावळटपणा म्हणण्याचं धारिष्ट्य या मुलीत आहे, ही गोष्ट लोकांना आवडून गेली. मेकअपचे थर चढवून प्लास्टिक कोटेड हसणाऱ्या-दिसणाऱ्या नट्यांपेक्षा हे प्रकरण वेगळं आहे, हे लक्षात यायला लागलं आणि तिचा स्वतःचा म्हणून एक चाहता वर्ग तयार झाला...

 

- मुक्ता चैतन्य
muktaachaitanya@gmail.com

 

बातम्या आणखी आहेत...