आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संघर्ष अटळ आहे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जे प्रश्न पंधरावीस वर्षांपूर्वी मला छळत होते, तेच आज नव्याने लग्न झालेल्या मुलींना विचारले जातात. मुलींचं घराबाहेर पडणं, स्वतंत्र्य असणं, स्वत:च्या जगण्याचे निर्णय लग्नाआधी आणि नंतरही स्वतः घेणं या गोष्टी आजही समाजाला तितक्याच खटकतात जितक्या तेव्हा वर्षांपूर्वी खटकत होत्या. मग आपण प्रगती केली असं म्हणणार   तरी कसं?


पालकांच्या दृष्टीने मी लग्नाच्या वयाची जेव्हा झाले तेव्हा डोक्यात एकच मुद्दा होता, कुठल्याही परिस्थितीत कांदापोह्याचे कार्यक्रम करून लग्न करायचं नाही. अरेंज्ड मॅरेज हा प्रकार माझ्या कधीही डोक्यात शिरलाच नाही. कुणी आयुष्यात भेटलं तर लग्न करायचं, नाही भेटलं तर नाही करायचं, किंवा जोवर भेटत नाही तोवर थांबायचं अशा मानसिकतेत मी होते. यामागे स्वातंत्र्य, लग्नानंतर बायकांवर येणार घरकामाचा ताण, आर्थिक स्वातंत्र्य असे सगळे मुद्दे होते की नव्हते माहीत नाही, पण एक विचार मात्र नक्की होता. दोनचार भेटीत माणूस समजू शकत नाही. जोवर तुम्ही डेटिंग करत नाही तोवर अंदाज येऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याला ज्या माणसाशी लग्न करायचं आहे तो माणूस आपल्याला बऱ्यापैकी माहीत असला पाहिजे. कांदेपोहे कार्यक्रमात हे घडू शकत नाही. त्यामुळे ‘त्या’ लग्नप्रकाराला माझा बऱ्यापैकी विरोध होता. पंधरा वर्षांपूर्वी लग्न झालं तेव्हा नव्या सुनेकडून असणाऱ्या अपेक्षांची यादी मोठी होती. माझ्या नशिबाने माझा नवरा आणि माझ्या सासूबाई दोघंही त्या टिपिकल विचारांचे नसल्याने घरात अडचणी कधीही आल्या नाहीत. पण बाहेर वावरताना जगासाठी मात्र मंगळसूत्र न घालणं, बांगड्या, टिकली न लावणं, आडनाव वगळून फक्त नवऱ्याचं नाव लावणं, ‘मग कधी हलणार पाळणा’ आदी प्रश्नांना काहीच उत्तरं न देणं, मुलगी झाल्यावर तिच्या संगोपनासाठी मस्त ब्रेक घेणं, गाेंधळात टाकणाऱ्या होत्या. "केली पाच वर्षं मंगळागौर तर बिघडलं कुठे'पासून "ती फारच स्त्रीमुक्तीवादी आहे'पर्यंत अनेक गोष्टीत उघड आणि मागून कानावर पडत होत्या. ना कधी मी त्या प्रश्नांची उत्तरं द्यायला गेले ना कधी प्रतिवाद केला. मला त्याची कधी गरजच वाटली नाही. कारण मी कसं आयुष्य जगायचं हा माझा चॉईस आणि निर्णय असला पाहिजे असं मला तेव्हाही वाटायचं, आजही वाटतं.
मध्यंतरी फेसबुकवर एका मैत्रिणीने मंगळसूत्र, जोडवी, पाळणा, लग्नानंतर काय नाव लावायचं यावरून तरुण मुलींना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांविषयी पोस्ट लिहिली होती. ती वाचली आणि वाटलं समाज म्हणून गेल्या पंधरावीस वर्षांत आपण काहीच प्रगती केलेली नाही. जे प्रश्न मला छळत होते, तेच आज नव्याने लग्न झालेल्या मुलींना विचारले जातात. मुलींचं घराबाहेर पडणं, स्वतंत्र्य असणं, स्वतःच्या जगण्याचे निर्णय लग्नाआधी आणि नंतरही स्वतः घेणं या गोष्टी आजही समाजाला तितक्याच खटकतात जितक्या पंधरावीस वर्षांपूर्वी खटकत होत्या. मग आपण प्रगती केली असं म्हणणार तरी कसं?

 

या पार्श्वभूमीवर जेव्हा तरुण मुलींविषयी टिपण्णी लोक करतात तेव्हा आश्चर्य वाटतं. मुली कमवायला लागल्या आहेत त्यामुळे त्या फार शेफारल्या आहेत. आपण पैसे कमावतो म्हणजे आपण कुटुंबावर उपकार करतो असं त्यांना वाटतं, हा शेरा किती सहजपणे मारला जातो. हल्लीच्या मुली बोल्ड आहेत. लग्नाआधी हनिमून हवा असतो अशी आचरट टिप्पणी करायलाही मागेपुढे पाहिलं जात नाही. घरकाम करायला नको, नोकरी करायची, पैसे कमवायचे आणि मग उंडारत बसायचं, आलंगेलं, पाहुणे, सणवार कशाची म्हणून जबाबदारी नको हे किती सहज  म्हटलं जातं. पण ही सगळी टिप्पणी करताना, शेरेबाजी करताना आपल्या समाजातला पुरुष नेहमीच असा वागत आला आहे हे सोयीस्करपणे विसरलं जातं. नोकरी करणाऱ्या, कामाची प्रेशर्स घेणाऱ्या सुनेकडून गृहकृत्यदक्षतेची अपेक्षाच अमानवी आणि क्रूर आहे. स्वतःच्या करिअरवर फोकस असलेल्या मुलीकडून तिने कामधाम सोडून सणवारांना घरात थांबावं, ही अपेक्षा ठार चुकीची आहे. गृहकृत्यदक्ष कॅटेगरीत मोडणाऱ्या गोष्टी करायच्या की नाहीत, हा त्या मुलीचा चॉईस असला पाहिजे. अशा अपेक्षा नुकतंच लग्न झालेल्या मुलाकडून आपण करतो का? मग मुलीकडून करण्याचं कारण काय?

 

फेसबुकवरची स्त्रीपुरुष समानता आणि वास्तव यात पुष्कळ अंतर आहे. मुली कसल्याही तडजोडी करायला तयार नसतात असंही सरसकट विधान करण्याची हल्ली पद्धत आहे. अशा वेळी प्रश्न निर्माण होतो तडजोडी कुणाच्या दृष्टीने. समाज आणि विवाह संस्थेच्या पारंपरिक चौकटींच्या दृष्टिकोनातून? की त्या तरुण जोडप्याच्या दृष्टिकोनातून? आपण बहुतेकदा विधानं करतो तेव्हा ती पारंपरिक विवाहसंस्थेत स्त्रीपुरुषांच्या अपेक्षित भूमिकांमधून करत असतो. पण ती विवाहाची चौकट ओलांडून पलीकडे जाण्याचा प्रयत्न बायकांच्या कितीतरी पिढ्या करत आहे. आपल्याकडे याबाबत संघर्ष आहे कारण स्त्रिया ती टिपिकल चौकट आणि त्यातली अपेक्षांची ओझी बाजूला सारून पलीकडे जाण्याचा प्रयत्न करत आहेत, तर पुरुष आहे ती चौकट टिकवण्याच्या धडपडीत आहे. अर्थात या दोन्ही बाजूंना सन्मानीय अपवाद असले तरी संघर्ष होतो तो बाहेर पडणे आणि आत खेचले जाण्याच्या प्रयत्नांमुळे. आपल्याकडे स्त्रिया ज्या गतीने बदलल्या, नव्या गोष्टी ज्या सहजतेने त्यांनी स्वीकारल्या त्या सहजतेने पुरुष बदलले नाहीयेत. आपल्याकडची विवाहव्यवस्थाही अतिशय किचकट आहे. आयुष्यभर नोकरी केलेली सासू सुनेच्या बाबतीत टोकाची चौकट प्रेमी असू शकते. आपल्याकडे नात्यांमधला पॉवर गेम आणि कुटुंबातलं राजकारण या सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतात, हेही विसरून चालणार नाही.

 

काही दिवसांपूर्वी एक मैत्रिणीने सांगितलेला किस्सा.
मैत्रीण वयाने मोठी आहे. तिची मुलगी आता लग्नाची आहे. तिच्यासाठी स्थळं बघण्याचं काम जोरात चालू आहे. एका मुलाशी बोलणी पुढे गेली. मुलगा आणि मुलगी वरचेवर भेटत होते. एक दिवस तो मुलगा मैत्रिणीच्या मुलीला म्हणाला, दुपारी मी डब्यातलं किंवा कँटीनमध्ये जेवू शकतो, पण रात्रीचं जेवणं मला घरचंच लागतं. तिथे मी तडजोड करणार नाही. नोकरी करणारी, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असलेली मैत्रिणीची मुलगी म्हणाली, बरोबर, मलाही रात्रीचं जेवण घरचंच लागतं. पण ते मीच केलं पाहिजे अशी तुझी अपेक्षा आहे का? कारण तू जसा दमून येणार तशीच मीही. एकतर आपण बाई ठेवू शकतो किंवा दोघं मिळून करू शकतो.
मैत्रिणीच्या मुलीचं उत्तर त्या मुलाला आवडलं नाही. ती फारच करिअरिस्ट आहे, स्त्रीवादी आहे अशी लेबलं लावून लग्नाची चर्चा तिथेच संपली. आता मुलीच्या या उत्तराला जर आपण मुली बिघडल्या आहेत, आणि त्यांना संसाराची कसलीही जबाबदारी घ्यायची नसते असं म्हणणार असू तर दोष समाजाच्या डोक्यात आणि नजरेत आहे. कामाच्या विभागणीबाबत अजूनही आपण मोकळी चर्चा करायला अाणि लग्नाला उभ्या असलेल्या मुलांना त्याविषयी सेन्सटाईज करायला सुरुवात करत नाहीयोत. संसार ही बाईची जबाबदारी आहे आणि तो चालवण्यासाठी लागणारा पैसा उपलब्ध करून देणं ही पुरुषाची या चौकटीतून आपण बाहेर पडायला तयार नाही. बाईने घर, मुलं संभाळावीत, अन्न शिजवावे अाणि पुरुषाने शिकार करून आणावी आणि वेळप्रसंगी बाईचं आणि मुलांचं रक्षण करावं, या आदिमानवाच्या जगण्याच्या चौकटीतून आपण मानसिक पातळीवर अजूनही बाहेर पडलेलो नाही. अशा वेळी मग घरकामात मदत नसेल, समानतेची वागणूक नसेल तर लग्नच करायचं नाही, या टप्प्यात येणाऱ्या मुली समाजाला आगाऊ वाटतात. लग्नाआधी शरीरसंबंधांना संमती देणाऱ्या आणि स्वतःच्या शरीराच्या सुखाचा विचार करणाऱ्या मुली मग वाया गेलेल्या वाटतात. आपल्याकडे स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी सारखे नियम नाहीत, मुलींसाठी आणि सुनेसाठी सारखे नियम नाहीत, अशा वेळी तरुण मुलींनी लग्नच नाकारली तर दोष कुणाचा?

 

मुली झपाट्याने बदलत आहेत. लग्नानंतरच्या रोमँटिक आयुष्यापेक्षा त्यानंतरच्या व्यवहारी जगण्यातल्या अडचणींचा त्या अधिक विचार करत्या झाल्या आहेत. आर्थिक, सामाजिक स्थैर्यासाठी लग्न करण्याची त्यांना गरज उरलेली नाही. वयाच्या एका विशिष्ट टप्प्यात लग्न केलं नाही तर लोक काय म्हणतील, या भीतीतून त्या बाहेर पडायला लागल्या आहेत. त्यांना सगळ्यात जास्त भीती आणि असुरक्षितता वाटतेय ती लग्नानंतरच्या आयुष्याची. आधी जे स्वातंत्र्य त्या उपभोगत होत्या ते नंतर राहील का? त्यांनी घेतलेल्या निर्णयांचा सन्मान होईल का? सेक्शुअल कम्पॅटिबिलिटी असेल का? नोकरी आणि घर यात त्यांच्या आईची जशी तारांबळ आणि प्रसंगी घुसमट झाली तशी त्यांची होणार नाही ना? मूल कधी व्हावं आणि किती व्हावीत याचा निर्णय घेण्याचं त्यांना स्वातंत्र्य मिळेल का? नोकरी करून ‘गृहकृत्यदक्ष’ होण्यात त्यांना इंटरेस्ट नाहीए. ती केविलवाणी धडपड करण्याची त्यांची इच्छा नाहीये. त्यांना वेगळं राहायचं आहे. प्रत्येक पिढीची जगण्याची रीत वेगळी असते,अशा वेळी एकत्र राहून नाती कलुषित करण्यापेक्षा विभक्त राहून नात्यांचा गोडवा टिकवणं कधीही अधिक शहाणपणाचं असतं. पण एखाद्या मुलीने लग्नाआधी विभक्त राहण्याविषयीचे विचार मांडले की मुलगा अाणि त्याच्या घरचे मुलीबद्दल मत बनवून बसतात. लग्नाआधीच घर तोडायला निघालेली मुलगी हवी कशाला, छाप विचार करत तिच्या जडणघडणीवर बोटं उगारतात. मुली चुकत नसतील, टोकाचे आग्रह धरत नसतील असं नाही. पण मुलींच्या वर्तनाला तराजूत तोलताना मुलाच्या वर्तनाला तोलण्याची गरज आपल्याला वाटत नाही हा प्रॉब्लेम आहे. लग्नानंतर मुलींनी स्वतःला कसं बदललं पाहिजे, याचा पाढा वाचताना मुलाने काय बदल केले पाहिजेत, याबाबत आपण बहुतेकदा गप्प असतो.  मुली बदलतायेत, पण त्यांच्या आजूबाजूचा समाज मात्र बदलायला तयार नाहीये.
जोवर हे दोन्ही बदल समान गतीने होणार नाहीत, संघर्ष अटळ आहे.

 

muktaachaitanya@gmail.com

 

बातम्या आणखी आहेत...