आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुटुंब म्‍हणजे नक्‍की काय?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजच्या अनेक टीनेजर मुली बॉयफ्रेंडची गरजच नाही असं म्हणतात, म्हणजे त्यांचा भ्रमनिरास होतो आहे का? याच मुली पुढे लग्नाचीही गरज नाही असं म्हणतील. किंवा जरी पडल्याच लग्नात तर ते मोडतानाही फार विचार करणार नाहीत. ओघाने याचा कुटुंबसंस्थेवर परिणाम होणारच. कारण लग्नंच झाली नाहीत तर ‘कुटुंबं’   कशी तयार होणार?


कुटुंबसंस्था नष्ट होईल म्हणून माणसं एवढी का घाबरतात? ती तर सुरुवातीपासूनच पुरुष सत्तेच्या बळावरच उभी आहे. माझ्या वयाच्या मुलींना लग्न करायचा सतत आग्रह होत असतो. पण लग्न सोडाच, तरुण मुलींना मुलांबरोबर रिलेशनमध्ये तरी राहावंसं वाटतं की, नाही याचा कोणी शोध घेतलाय का? एका संशोधनासाठी ४०-५० टीनेजर मुलींना मी एक प्रश्न विचारला. ‘तुमच्या आसपासच्या मुलांमधल्या दोन वाईट गोष्टी आणि एक चांगली गोष्ट सांगा. गंमत म्हणजे दोन वाईट गोष्टी तुलनेने लगेच मिळाल्या. उदा. ईगो, मुलांचा मूड असेल तेव्हाच आपल्याशी बोलतात, कधी सॉरी म्हणत नाहीत, वगैरे. पण एक चांगली गोष्ट आठवण्यासाठी सगळ्या जणींना बरंच डोकं खाजवावं लागलं. असं का होत असेल, याचा अंदाज लावणारा हा लेख आहे. आणि वाचल्यावर मुलगे चांगलेच अपमानित होणार हे डोक्यात ठेवूनच मी लिहिणार आहे.

 

अर्थात ज्यांच्याशी मी बोलले त्या मुली पारंपरिक मध्यमवर्गीय घरातल्या नाहीत. त्यांना भक्कम बौद्धिक पार्श्वभूमी आहे. चित्रपट, वेगवेगळ्या कला, वेगवेगळे सामाजिक प्रश्न, अशा सगळ्या गोष्टी त्यांनी अनुभवल्या आहेत, त्यात त्या सहभागी झाल्या आहेत. या मुली वेगळा विचार करू शकतात, मतं बनवू शकतात आणि ती ठामपणे मांडूही शकतात. शिकणं, आवडीचं काम मिळवणं, स्वावलंबी होणं हे त्यांचे प्राधान्यक्रम आहेत.
‘बॉयफ्रेंड असावा असं नाही का वाटत?’ असं विचारल्यावर मला ‘नको! कशाला? मित्र (मित्र-मैत्रिणी) आहेत ना.’ असं उत्तर मिळालं. ‘तरीपण, आपला पार्टनर कसा असावा असं वाटतं?’ असं विचारल्यावर ‘प्रामाणिक, समजून घेणारा, स्पेस देणारा, करिअरबद्दल योग्य विचार करणारा’ अशी उत्तरं मिळाली. पण याच मुलींकडून असंही कळलं की, त्यांच्या आजूबाजूला अनेक अशा मुली पण आहेत ज्यांना बॉयफ्रेंड नसेल तर खूप असुरक्षित वाटतं. बॉयफ्रेंडमुळे अशी काय सुरक्षा मिळते, कुणास ठाऊक.

 

दुसरीकडे मुलगे काय मूल्यं बाळगतात तेसुद्धा बघितलं पाहिजे. मुलींचा ‘आदर’ करणे इथपासून सुरुवात करू या. मुलीचा आदर करणं म्हणजे तिचे पैसे भरणं, तिच्यासाठी दरवाजा उघडून धरणं, तिची ‘काळजी’ घेणं अशा मुलांच्या कडू गैरसमजुती असतात. तरुण मुलांना मुळात मानसिकदृष्ट्या स्वावलंबी मुलींशी कसं वागावं हे शिकवलं गेलंय का? की शोधताना आधुनिक बायको शोधायची आणि तिला पारंपरिक साच्यामध्ये कोंबायचं, ही मानसिकता अजूनही आहेच? अनेक मुलांना हेसुद्धा पटत नाही की, मुलींना रोजच्या आयुष्यातसुद्धा मुलांपेक्षा कितीतरी जास्त संघर्ष करावा लागतो. त्याची जाण असणं सोडा, उलट मुलीच कशा मुलांच्या भावनांशी खेळतात, मित्रांपासून तोडतात अशा टाईपच्या जोक्सने इंटरनेट भरून गेलेलं आहे.
या सगळ्याचा अर्थ असा होतो की, स्त्रीत्वाच्या पारंपरिक कल्पना बदलल्या, अमलातसुद्धा आणल्या जाऊ लागल्या. म्हणजे एकट्या राहणाऱ्या मुलींचं प्रमाण वाढलं, घटस्फोटाचं प्रमाण वाढलं, मुलींनी एकल पालकत्व पत्करण्याचं प्रमाण वाढलं, पण पारंपरिक पुरुषत्वाच्या कल्पना तशाच राहिल्या. पुरुष अजूनही बायकोकडून घर सांभाळून नोकरी करण्याची, मुलं वाढवण्याला करिअरपेक्षा वरचढ समजण्याची अपेक्षा करतात. किंवा याचं अगदी दुसरं टोक गाठतात. म्हणजे ‘फक्त एकत्र झोपूया. बाकी मीही काही अपेक्षा ठेवत नाही, तुम्हीही ठेवू नका.’ प्रेम आणि करिअर या दोन्ही गोष्टी एकत्र मिळतील अशी अपेक्षा करायची मुलींना सोयच नाहीये. ही स्वतंत्र झाल्याची शिक्षा समजायची का?

 

आज या टीनेजर मुली बॉयफ्रेंडची गरजच नाही असं म्हणतायत, (त्या जरी बोटावर मोजण्याएवढ्या असल्या तरी हे प्रमाण नक्कीच वाढणार आहे) म्हणजे त्यांचा भ्रमनिरास होतो आहे का? याच मुली पुढे लग्नाचीही गरज नाही असं म्हणतील. किंवा जरी पडल्याच लग्नात तर ते मोडतानाही फार विचार करणार नाहीत. ओघाने याचा कुटुंबसंस्थेवर परिणाम होणारच – कारण लग्नंच झाली नाहीत तर ‘कुटुंबं’ कशी तयार होणार? म्हणजे आता कुटुंबसंस्था मोडल्याची रडगाणी गायला लागायची का? जर आजच्या मुलांची वागणूक मुलींच्या अपेक्षांना अनुसरून बदलली नाही तर काळाच्या ओघात असे बदल होणं साहजिकच असणार आहे. कारण बदल ही एकच गोष्ट कायम असते ना? विवाहसंस्था टिकेल की नाही, कुटुंब संस्था मोडेल का, असल्या बदलांना घाबरणं आपण सोडून द्यायला हवं. आज आपल्याला जी चौकोनी कुटुंबाची घडी दिसतेय तीसुद्धा खूप सारे बदल होत होतच स्थिरावली आहे. एके काळी माणसे टोळीच्या स्वरूपात राहत होती, मग हळूहळू एका बाईला अनेक नवरे, एका पुरुषाला अनेक बायका अशा बदलातून जात जात लग्नसंस्था हल्लीहल्लीच एकपत्नी/पती असण्यापर्यंत आली. तशीच भल्यामोठ्या शंभर माणसांच्या कुटुंबाचे रूपांतर होऊन त्यातल्या माणसांची संख्या हळूहळू चारपर्यंत कमी झाली आहे. काही लोक लिव्ह इन प्रकाराने राहतात. काही ठिकाणी आता फक्त आई आणि मुलं अशीही कुटुंब दिसायला लागलीच आहेत. आता शहरातल्या काही स्वतंत्र व्यक्तिमत्वाच्या मुली नाईलाजाने नव्हे तर आवडीने लग्न न करता राहायला लागल्या आहेत. नोकरीच्या निमित्ताने शहरात मैत्रिणींच्या सोबत राहणाऱ्या मुलीही काही कमी नाहीत. कदाचित अशा मुलींची संख्या वाढत जाईल. कदाचित पुन्हा मुली आणि मुलगे गटाने राहू लागतील. म्हणजे आपण पुन्हा टोळी जीवनाकडे वळायला लागू. हाय काय आणि नाय काय?

 

kharemukta1000@gmail.com

बातम्या आणखी आहेत...