Home | Magazine | Rasik | narendra bandbe write on actor Pankaj Tripathi

जबरा फनकार

नरेंद्र बंडबे | Update - May 27, 2018, 01:00 AM IST

काही व्यक्तिमत्त्वं नेहमीच वडिलधारी भासतात. म्हणजे, त्यांच्या वागण्या-बोलण्यात, दिसण्या-असण्यात एकप्रकारची प्रगल्भता झळक

  • narendra bandbe write on  actor Pankaj Tripathi

    काही व्यक्तिमत्त्वं नेहमीच वडिलधारी भासतात. म्हणजे, त्यांच्या वागण्या-बोलण्यात, दिसण्या-असण्यात एकप्रकारची प्रगल्भता झळकत असते. त्यांनी काहीही केलं तरीही हे प्रगल्भतेचं वलय काही हटत नाही. वैविध्यपूर्ण भूमिका जगणारा पंकज त्रिपाठी हा अभिनेता या वर्गात मोडतो. तो जी भूमिका साकरतो, त्यात अस्सल प्रगल्भता झळकते. हे सारं दैवी नसतं, तर परिस्थितीच्या माऱ्यातून आकारास आलेलं असतं. माणसाने माणूस होण्याची प्रक्रिया साधीसरळ नसते, महत्प्रयासाने साध्य होत असते. वलयाआडचा पंकज त्रिपाठी नेमकं याचंच दर्शन घडवतो...

    बिहारमधल्या गोपालगंज इथल्या बेलसंड गावात उन्हाळ्यात पाण्याची फार मोठी समस्या असायची. मग जवळच्या धरणातून या भागासाठी पाणी सोडलं जायचं. शेतात घर होतं. या घराला एक मोठी खिडकी होती. त्या खिडकीतून धरणाचं पाणी येताना दिसायचं. हळूहळू पाण्यानं पूर्ण कालवा भरून जायचा. मृदगंध हवेत पसरायचा. दर उन्हाळ्यात हे असंच घडायचं. पाण्याची वाट पाहण्यात एक वेगळी मजा यायची. पाणी आलं की, गावात उत्सवासारखा माहोल असायचा. लोकांचे चेहरे फुलायचे. जो तो कालव्याच्या दिशेने अक्षरश: पळत सुटायचा. त्याक्षणी धडपडत, खाचखळग्यांतून धावताना भारी वाटायचं.


    आता मुंबईतल्या दहाव्या मजल्यावर असलेल्या घरातही मोठी खिडकी आहे. त्या खिडकीतून दिसतात, समोरच्या इमारती. इथं एक छोटसं मैदान आहे. हे मैदान शिफ्टमध्ये उघडतं. त्या विशिष्ट वेळेतच मुलं इथं येतात, खेळतात. वेळ झाली, की रखवालदार शिट्टी वाजवतो. मुलं निघून जातात. हे सर्व कसं अगदी यांत्रिक आहे. अस्वस्थ करणारं आहे. मूलत: हा दोन जीवनशैलीतला फरक आहे. एकीकडे अगदी मनमुक्त जगता येतं. दुसरीकडे सगळं कसं शिस्तबद्ध! नियमात बसणारं. ‘न्यूटन’ सिनेमासाठी विशेष राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला पंकज त्रिपाठी हा अनुभव सांगताना थोडासा भावूक होतो. मुंबई शहरात येऊन त्याला १२-१३ वर्षे झालीत. प्रचंड स्ट्रगलनंतर या शहरानं आधी नाव, आता पैसा ही येऊ लागलाय. पण तरीही या शहरात मन थोडंसं कमीच रमतं. पंकज सांगतो, ‘मुंबई माझ्यासाठी एक शोरूम आहे. इथं खूप पाहतो, अभिनय करतो, माझ्याकडे जे काही आहे ते देतो आणि काही दिवसांनंतर एकटाच निघतो. नव्या प्रदेशात पुन्हा अनुभवसंपन्न होण्यासाठी! शहरातही अनुभव मिळतोच, पण माणसं फारच घड्याळ्याच्या काट्यासारखी धावतात. ग्रामीण भागात अजूनही निवांतपणा आहे. जगण्याला आवश्यक ठहराव आहे. तिथं वेळ थांबलेली आहे. तिथं गोष्टी आपसूक होत असतात. त्यासाठी निश्चित वेळ नसतो. म्हणून या मुंबईतल्या ‘शोरूम’मधून वेळ मिळाला की मी ही अनुभवाची वाट धरतो...’


    बॉलीवूडचा ‘गॉडफादर’ ठरलेल्या ‘गँग्स ऑफ वासेपूर’नंतर पंकज त्रिपाठी हे नाव चर्चेत आलं. त्याने साकारलेला सुलतान लोकांना आवडला. सुलतान क्रूर होता, त्यानं सरदार खानच्या संपूर्ण कुटुंबाला संपवण्याचा विडा उचलला होता. आपण जे काही करत आहोत, ते योग्यच आहे, आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी असा समज असलेला सुलतान साकारणाऱ्या पंकजला बॉलीवूडचे दरवाजे खुले झाले. तो प्रसिद्धीच्या झोतात आला त्याच्या बेलसंड या गावात २०१०च्या आसपास वीज आली. म्हणजे किती दुर्गम भागातून पंकज आलाय, याची कल्पना येऊ शकते. तिथंपासून मुंबईपर्यंतचा हा प्रवास सोपा नव्हता.

    पण आता तो आपल्या अभिनयामुळे मुंबईसारख्या शहरात स्थिर झालाय. लोक ओळखायला लागलेत. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर अभिनेता म्हणून समृद्ध झाल्याची भावना आहेच. पण त्यापेक्षा ज्या सिनेमासाठी हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला त्या सिनेमाचं जागतिक स्तरावर कौतुक झालं, याचं पंकजला वाटणारं समाधान जास्त आहे.


    ‘न्यूटन’च्या विषयावर पंकज भरभरून बोलतो. त्याचं हे बोलणं फक्त सिनेमापुरतं नाही. देशाच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक स्थितीबद्दल तो परखड मतं मांडतो. तो म्हणतो, ‘मी साकारलेला आत्मासिंग हा व्यवस्थेचा भाग आहे. ही व्यवस्था प्रचंड क्लिष्ट आहे. तेवढीच सर्वसामान्य माणसावर प्रभुत्व गाजवणारी. ही परिस्थिती फक्त भारतातच नाही, तर ती जगातल्या सर्वच देशांमध्ये अशीच आहे. सर्वसामान्य नागरिक या व्यवस्थेचा भाग आहेत. पण त्यांचं म्हणणं हे राज्यकर्त्यांच्या दृष्टीनं नगण्य आहे.

    आता आत्मासिंगसारखी माणसं जेव्हा नक्षली भागात काम करत असतात, तेव्हा त्यांच्यात एक आतला आणि बाहेरचा संघर्ष सुरू असतो. व्यवस्था त्याच्यावर भारी पडते. बाहेरून अगदी विशिष्ट शिस्तीत काम करणारा आत्मासिंग आतून तर सर्वसामान्य आहे. त्यामुळं त्याची होत असलेली घुसमट ही ‘न्यूटन’पेक्षा वेगळी आहे. तो ती बोलूनही दाखवतो, पण तो असहाय्य आहे. व्यवस्थेत असताना त्याला विचार करण्याचा अधिकार नाही. त्याला फक्त आदेशाचं पालन करायचंय. व्यवस्थेचे आदेश हे सर्वसामान्यांच्या भावनांपेक्षा जास्त महत्त्वाचे असतात. आत्मासिंग हा व्यवस्थेचं प्रतिनिधित्व करताना, तो त्याचा शिकारही आहे हे आपल्याला समजायला हवं...’


    परफेक्ट. पंकज सटिक म्हणता येईल, असं विवेचन करतो. त्याच्यातल्या विचारी नटाचं दर्शनही घडवतो.सुरुवातीच्या काळात पंकजवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार झाले. तो शाखेत नियमित जायचा. नकळत्या वयात, स्वत:ला शिस्त लागण्यासाठी याचा फायदा झाला. पुढे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम करताना राजकीय जाण अधिक पक्की होऊ लागली. पण नाटकाशी संपर्क आल्यानंतर त्याची सर्व विचारसारणी बदलत गेली.

    बेलसंड गावातून तो पाटण्यात डॉक्टर बनण्यासाठी आला होता. पण कॉलेजमध्ये परिषदेचं काम करताना, तो नाटकाकडे जास्त ओढला गेला. विद्यार्थी नेता असल्यानं अनेक लोकांसमोर बोलण्याची सवय होतीय. पण आता त्यापलीकडे जाऊन अभिनयाची ओढ जास्त लागली. यातूनच सर्व रूढी-परंपरेचं ओझं कमी झालं.


    पंकज सांगतो, ‘मी आधी ब्राह्मण होतो, रंगमंचानं मला माणूस बनवलं. ही प्रक्रिया तेवढी सोपी नव्हती. कारण लहानपणापासून झालेले संस्कार, ज्या सामाजिक व्यवस्थेत तुम्ही मोठे झालेले असतात, त्यातून इतक्या लवकर बाहेर पडणं सोप नव्हतं. तुमची विचार करण्याची, वागण्याची पद्धत त्या व्यवस्थेनुसार असते. पण नाटकानं मला त्यापलीकडे पाहायला शिकवलं. त्यासाठी दोन गोष्टी फार महत्त्वाच्या ठरल्या. एक तर नाटकाच्या निमित्तानं होणारं अवांतर वाचन, त्याद्वारे आलेला जागतिक साहित्याचा संदर्भ, जागतिक दृष्टिकोन. यामुळं मनातली कवाडं खुली झाली. मी अधिकाधिक समृद्ध होत गेलो.’


    अनुराग कश्यपचा ‘गँग्स ऑफ वासेपूर’ हा वेगळ्या धाटणीचा सिनेमा होता. वर-वर हा सिनेमा रिव्हेंज ड्रामा वाटत असला, तरी त्याची मांडणी ही राजकीय होती. सामाजिक बदलाची पूर्ण प्रक्रिया, या सिनेमात दाखवली होती. पंकजला तीच जास्त आवडली. त्यानंतर पंकजच्या वाट्याला आलेली पात्र, ही भारतीय सिनेमा क्षेत्रात होत असलेल्या बदलाची जाणीव करुन देतात. निल बटे सन्नाटा, न्यूटन, अनारकली ऑफ आरा, मसान, फुकरे, बरेली की बर्फी, अंग्रेजी में कहते है, फेमस असे अनेक अप्रतिम सिनेमे पंकजला मिळाले. प्रत्येक सिनेमातलं पात्र वेगळं होतं. ते सिनेमात किती वेळ आहे यानं फरक पडत नव्हता, पण ते पात्र सिनेमात असणं हेच पंकजसाठी महत्त्वाचं होतं. याच छोट्या शहरांतली पात्र पंकजच्या वाट्याला खूप आली.


    पंकज सांगतो "बाजारवाद सर्वत्रच आहे. आम्हीही त्याचा भाग आहोत. प्रेक्षकांची आवड आणि सिनेमाचं एकूण गणित हे एकमेकांना पुरक असलेल्या गोष्टी आहेत. एकमेकांवर अवलंबून असलेलं एक समीकरण आहे. त्यामुळं समाजातल्या छोट्या पात्रांवरही सिनेमा येतोय, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकं ते पाहताहेत. ही गोष्ट मला फार अजब वाटतेय. मला छोट्या शहरातली पात्र मिळाली ती लोकांना आवडली. संजय मिश्रा, नवाजुद्दीन, बिजेंद्र काला, सौरभ शुक्ला, पीयूष मिश्रा, रघुवीर यादव, दीपक डोबियाल यांसारख्या कलाकारांनी अशा अनेक सर्वसामान्य पात्रांना मोठं केलं. लोक त्याच्याशी कनेक्ट होतात, हेच महत्वाचं आहे. मल्टिप्लेक्स संस्कृतीचा चांगला फायदा झालाय. आता लोकांना मोठ्या हीरोबरोबरच छोटी पात्रं पाहायला आवडायला लागलीत. यामुळं त्यांची मागणी वाढलीय. यामुळं माझ्यासारख्या कलाकारांना काम मिळतंय.’ अभिनय हेच जगण्याचं आणि पैसा कमावण्याचं साधन असल्यानं पंकज त्रिपाठी सध्या त्यात व्यग्र आहे. बॉलीवूडच्या स्पर्धेत टिकून राहण्याचा प्रयत्न करतोय. पण पंकजला गोष्टी सांगायला खूप आवडतं. याचं कनेक्शन कुठंतरी गावात कधी काळी केलेल्या छोट्या नाटकांमध्ये आहे, असं तो म्हणतो. म्हणूनच जेव्हा वेळ मिळतो, तेव्हा किस्सागोई करायला त्याला आवडतं.’ मी गप्पीष्ट नाही. अगदी शांत आहे.

    पण गोष्टी सांगणं मला आवडतं. नाटकात अभिनयाच्या माध्यमातून किती चांगल्या पद्धतीनं सादर करता येऊ शकतात, याची प्रचिती आली. त्यामुळं मी स्वत:च्या गोष्टी तयार करतो आणि किस्सागोई कार्यक्रमात सादर करतो. मी जे पाहतो, अनुभवतो त्याच्या या गोष्टी असतात. त्यातली पात्र माझ्या आजूबाजूलाच असतात. मला त्यांच्या गोष्टी सांगायला आवडतात.’
    पंकज सांगतो, ‘सध्या सतत शूटिंग असल्यानं स्वत:साठी थोडासा वेळ कमी मिळतो. जेव्हा थोडीशी उसंत मिळते, तेव्हा मी या शहरापासून दूर पळून जातो. जंगलात, छोट्या गावांमध्ये राहायला फार आवडतं. तिथली माणसं आवडतात, आपली वाटतात.

    त्यांना पाहण्याची, त्यांच्याशी गप्पा मारण्याची मजा फार वेगळी असते. तिथून एक ऊर्जा मिळत असते. म्हणून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा, या ऊर्जेच्या शोधात मी निघतो आणि पुन्हा अनुभवसंपन्न होऊन नव्यानं कामाला लागतो. माझ्यातल्या अभिनेत्याला जिवंत ठेवण्यासाठी हा अनुभव इंधनाचं काम करतो...’

    - नरेंद्र बंडबे

    narendrabandabe@gmail.com

  • narendra bandbe write on  actor Pankaj Tripathi
  • narendra bandbe write on  actor Pankaj Tripathi
  • narendra bandbe write on  actor Pankaj Tripathi

Trending