आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुष्‍याबद्दल सहानुभवी भान देणा-या कथा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धर्म, धार्मिक चालीरीती, इतर धर्मांच्याही अस्तित्वामुळे येणारे थोडे ताणतणाव पार्श्वभूमीला येतात. बहुतेक कथांमधून गरिबी, त्यामुळे उपासमार, एक वेळचं जेवण मिळवताना होणारी दमछाक, सामाजिक अवहेलना, त्यामुळं मिटून जाणं वा उद्रेक होणं हेच केंद्रस्थानी आहे...


धर्माचे मूलभूत तत्त्वज्ञान आणि प्रत्यक्षातले धार्मिक वर्तन यातली वाढती तफावत - सर्वच धर्मांच्या बाबतीत - हा आपल्या चिंतेचा, आस्थेचा आणि अभ्यासाचा विषय आहे असं म्हणणाऱ्या प्रख्यात कानडी साहित्यिक फकीर मुहम्मद कटपाडींचे सर्व साहित्य हा अशा प्रयत्नांचा, अभ्यासाचा भाग आहे.


‘व्रत आणि इतर कथा’ या त्यांच्या निवडक तेरा कथांच्या उमा कुलकर्णींनी केलेल्या मराठी अनुवादात याचा थेट प्रत्यय येतो. या संग्रहातल्या बहुतांश कथा साहजिक मुस्लिम पार्श्वभूमीवरच्या असल्या तरी त्यापलीकडे एकंदर मानवी आयुष्याबद्दल सहानुभवी भान देणाऱ्या आहेत. कटपाडी कर्नाटकाच्या दक्षिण किनारपट्टी भागातल्या ब्यारी मुस्लिम समाजातले. बोली तुळू आणि कोकणीबरोबरच उर्दूशी नव्हे तर कानडीशी साधर्म्य असणारी, प्रदेशाचा संस्कार असणारी ब्यारी. कुराणाला पाचवा वेद मानणारा, स्वतःचं स्वतंत्र रामायण असणारा मातीत विरघळलेला हा समाज. त्यात कटपाडींचे वडील उडपीजवळील कटपाडी इथल्याच मशिदीत मौलवी (वा खतीब). त्यामुळे अशी राहणी, त्यातले - वेगवेगळ्या वेळच्या नमाजांची नावं वगैरे - धार्मिक तपशील, आर्थिक ताण तरी समाजात असलेला आदरभाव (त्याचा वेगळा दबाव) हे सगळं बहुतांश कथांच्या केंद्रस्थानी. कथावस्तू त्यामुळं विश्वासार्ह होते तरी त्यात त्यापलीकडचे आयुष्यातले छोटे सल आहेत तशी व्यापक पातळीवरची दारिद्र्यं, गतानुगतिकेसारखी सामाजिक दुखणीही आहेत.


१९७०च्या दशकानंतर कानडीतही दलित आणि ख्रिश्चन, मुस्लिम संवेदनांना साहित्यातून वाट मिळाली, त्यात कटपाडींचे लेखन येते. उमा कुलकर्णी त्यांना मानवतावादी आधुनिक बंडाय लेखक म्हणतात, तरी कटपाडींच्या लेखनात रूढ अर्थाने विद्रोह नाही तर व्यापक स्तरावरचे भान देणे आहे.


या संग्रहातल्या एकूण तेरा कथांपैकी व्रत, अवस्था, अक्काचं लग्न आणि मेंढरू, हत्या, अप्पा, घुसमट आणि पूर (लांबीनं ही एकमेव दीर्घकथा) या सुरुवातीच्या सलग सात कथांमध्ये पौगंडावस्थेतील मुलांच्या निरागस, उत्सुक, चौकस नजरेतून (त्यातून पडणाऱ्या प्रश्नांमधून) मुस्लिम जीवनशैलीतले बरेचसे वेगळे, एरवी माहीत नसलेले तपशील येतात. कथेत मुलांचं वाढत्या कुतूहलांनी, घरी वा आसपास न्याहाळताना पडणाऱ्या प्रश्नांनी भरलेलं भावविश्व येतं. अर्थात हा विषय कथांच्या केंद्रस्थानी नाही. संभाव्य वाचकाची सोय म्हणून ही योजना असावी. तरी हे खूप लोभस वाटते खरे. (शाळेत असतानाचा एक अनुभव त्यांनी एका मुलाखतीत सांगितला आहे. वर्गात शिक्षकांनी एकदा विचारले, ‘मशीद आतून किती जणांनी पाहिली आहे? काय असते आत?’ बहुतेक मुलांनी खोटी, ऐकीव उत्तरे दिली. शेवटी गप्प बसलेल्या फकीरकडे पाहून सर म्हणाले, ‘उद्या मला मशीद दाखवशील आतून?’


‘दुसऱ्या दिवशी स्वच्छ पाय धुऊन आम्ही मशिदीत गेलो, माझ्या मौलवी वडिलांशी त्यांनी बराच वेळ चर्चा केली. नंतर हा अनुभव सर्वांचे गैरसमज खोडून काढत वर्गात सांगितला. त्या दिवशी नकळत्या वयात मला धडा मिळाला. जोवर आम्ही स्वतःला उघडे करून सर्व सांगत नाही तोवर अशा गोष्टी होणार, मुस्लिम क्वचित बोलतात तेही कुराण आणि शरियतबद्दल असते. पण त्यापलीकडचं आमचं आयुष्य, आमच्या भावना, आमची गाणी? मीही लिहीन, माझा धर्म आणि माझं आयुष्य याबद्दल, तेही सामान्यांच्या कानडीत.’)


‘व्रत’ कथेतला नकळत्या वयातला अद्दू.(मूळ कथा नोंबू. तिला राष्ट्रीय कथा सन्मान मिळाला आहे. दक्षिणेत हिंदू लोक अनंताचं व्रत करतात, त्याला नोंपू म्हणतात. कटपाडी रमजानच्या उपवासासासाठी हाच शब्द वापरतात.) त्याचे वडील मशिदीत कादरी आहेत, आई पहाटपासून विड्या वळते, हातावर पोट असलेलं पापभीरू घर. आसपासचं रमजानचं उत्सवी वातावरण पाहून अद्दूला वाटतं, आपणही उपवास करून स्वर्गात जावं. तिथं रोज पोटभर मांसाचं जेवण, फळं, घालायला रेशमी कपडे. हट्टानं तो एक दिवस उपवास करतो. संध्याकाळी अम्मा मायेनं विचारते, कसा होता रे उपवास? अद्दूला वाटतं, संपला? एवढाच असतो? तो म्हणतो, ‘असे तर आपण किती वेळा असतो अम्मा. अप्पा दवाखान्यात होते, तू विड्या वळत होतीस. भात केलाच नव्हतास, त्या दिवशी असाच होता की उपवास...’


धर्म, धार्मिक चालीरीती, इतर धर्मांच्याही अस्तित्वामुळे (सर्वसाधारण सहानुभाव आहे तरी) येणारे थोडे ताणतणाव. हे सगळं तपशिलांनिशी येते पण ते पार्श्वभूमीला. बहुतेक कथांमधून गरिबी, त्यामुळे उपासमार, हातातोंडाशी घासाची मिळवणी करताकरता होणारी दमछाक, यामुळं होणारी सामाजिक अवहेलना, त्यामुळं मिटून जाणं वा उद्रेक होणं हेच केंद्रस्थानी आहे, ज्याचा संबंध असलाच तर कुठल्याही धर्मापलीकडच्या मानवतेशी आहे. ‘घुसमट’मध्ये मौलवी असलेले वडील मैमुनाला बुरखा घालायची सक्ती करतात. पायघोळ बुरख्यात आईनं वळलेल्या विड्या जमा करायला रोजच्या रस्त्यानं जाताना आपली रोजची ओळख हरवली आहे या जाणिवेतून तिची होणारी घुसमट येते. ‘व्यक्तिगत’मध्ये मौलाना बद्रुद्दीन ख्वाजा वृद्धावस्थेतही धार्मिक कर्तव्य म्हणून शरियत रक्षण यात्रेवर जातात, तोवर इकडे त्यांची लाडकी लेक तोंडी तलाकची बाधा होऊन नेसत्या वस्त्रांनिशी घरी येते. ‘द्वीप’मध्ये शहरात शिकून नवा विचार घेऊन गावी परतणाऱ्या इस्मालीला स्थितीवादी समाजाच्या विरोधाचा सामना करावा लागतो त्याचे चित्र येते. ‘क्रिया’ आणि ‘देणगी’मध्ये अपार दारिद्र्यातही धर्मानं केलेली कोंडी येते. असे असले तरी यांत रूढ अर्थानं विद्रोह नाही. किंबहुना ही कथा व्यवस्थेचे, तिच्या साचलेपणाचे, त्यातून येणाऱ्या दबावाचे भान देते. उमा कुलकर्णी यांचा हा अनुवाद ओघवता आहे, मूळ मराठीच वाटावे इतकी सहजता त्यात आहे. खाताना भातात मध्येच खडा लागावा तसा एखादा ग्रांथिक शब्द खटकतो, क्वचित एखादा संदर्भ लागत नाही, त्यासाठी पुन्हा थोडे मागे वळावे लागते हा एरवीचा अनुभव या संग्रहात अपवादानेही येत नाही. कथांत आईवडिलांसाठी अम्मा - अप्पा ही खास कानडी संबोधनंच वापरली आहेत. मूळ कानडीत प्रथम ती तशी दिसल्यावर उमाताईंनी कटपाडींशी बोलून त्याची खात्री करून घेतली. कटपाडी मुस्लिम, त्यात वडील मशिदीत मौलवी, धार्मिक संस्कार पक्के. तरी ते म्हणाले, ‘अम्मी, अब्बा ही खास मुस्लिम संबोधनं उर्दू मातृभाषा असणारे मुस्लिम वापरतात, आम्ही ब्यारी बोलतो, त्यात अम्मा, अप्पा अशीच संबोधनं आहेत.’


प्रत्येक अनुवादाला उमाताई प्रस्तावना लिहितात, त्यात त्या साहित्यिकाचं कानडी साहित्यप्रवाहातलं स्थान अधोरेखित करत त्याच्या बलस्थानांविषयी सांगतात. हा संग्रहही त्याला अपवाद नाही. त्यातून लेखक त्याच्या पार्श्वभूमीसह समजून घ्यायला मदत होते. अनुवाद हा एका भाषेतून दुसऱ्या भाषेसाठी आणलेला निरोप, असे एके ठिकाणी वाचले. उमाताई हा निरोप जसाच्या तसा आणतात, त्याची कानगोष्ट होऊ देत नाहीत.


पुस्तकाचे नाव - व्रत आणि इतर कथा
फकीर मुहम्मद कटपाडी (मूळ कानडी) मराठी अनुवाद उमा कुलकर्णी
प्रकाशक : शब्द पब्लिकेशन्स
पृष्ठ - १३२
किंमत - १५० रुपये


- नीतीन वैद्य, सोलापूर
vaidyaneeteen@gmail.com 

बातम्या आणखी आहेत...