आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोली भाषेतले सशक्त कथन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या ही प्रसाद कुमठेकर यांची दुसरी कादंबरी. त्यात आयुष्याची खोल करुणायुक्त समज आहे, बदलता काळ आपल्याबरोबर फरपटत येण्याची सक्ती करतोय, तिला नाकारणे आहे.

 

‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ला कादंबरी म्हटले असले तरी ही सलग काही कथानक असलेली कादंबरी नव्हे. यातल्या अनेक छोट्या गोष्टींच्या गोधडीत अनेक मी आहेत. वेगवेगळ्या तिठ्यांवरून गावाकडे पाहणारे अनेक मी. एका अर्थी हे बदलत्या ग्रामजीवनाचे विश्वरूपदर्शन. या गोधडीत वेगानं बदलत गेलेल्या गतायुष्याबद्दलचा उबदार जिव्हाळा आहे तसेच जाणवलेले, मनात वस्तीला येऊन तिथंच रुतून राहिलेले सल आहेत. किंबहुना ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ हे अशा अनेक सलांचं कोलाज आहे. लहानपणी रडण्यासाठी कसलंही कारण पुरायचं, बाबा म्हणायचे ‘बारकुल्या बारकुल्या गुष्टी धरून का रडायलास? थोडं हसायला काय घेशीन?’ असं लेखक मनोगतात म्हणतो. ‘मोठ्ठ्या’ झालेल्या लेखकाला आता रडता येत नाही, सलणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींच्या गाठी होत जातात. या लिहीलेल्या गोष्टी हे या गाठी मोकळ्या करणं आहे.


या गोष्टी एका गावाच्या, त्यातल्या कालौघात बदलत गेलेल्या, नामशेष झालेल्या तसेच काळाच्या कसोटीवर टिच्चून उभ्या असलेल्याही बाबींच्या आहेत. लेखक सुरुवातीला मनोभावे स्मरण करतो ती गावातले धार्मिक/ सामाजिक लोकव्यवहार, स्मरणात गोठून राहिलेले तिथले भौगोलिक तपशील यांची यादी या दृष्टीनं पाहण्याजोगी आहे. गाव सोडून आधी शिक्षणासाठी न् मग पोटपाण्यासाठी बाहेर पडलेला नायक, शहरात लाखांच्या गर्दीतलं निनावी एक होऊन राहणं, लहानशा गावात असलेल्या काही एक अस्तित्वाच्या, मागे राहिलेल्या कुटुंब/सगेसंबंधी/ मित्रपरिवाराच्या आठवणींवर रेटतो. त्यामुळं दरवेळी गावाचं, तिथल्या उरलेल्या घराचं, किडुकमिडुक जमिनीचं सर्वार्थानं खंगत जाणं त्याला खंतावतं. आठवणींची ही दरवेळी थोडीथोडी रिकामी होत जाणारी ही पोतडी मनात वांझोटी, हतबल करणारी खंत निर्माण करते.
 
 ओसाड गावच्या पाटलाच्या घरात जिरायत, पडीक जमिनीचे सातबारे घेऊन जन्माला आला बाप. पैका वाचिव पैका जोड, हा स्वभाव. त्यामुळं मुळातला का परिस्थितीपोटचा हे सांगता नाही यायचं. कर्ज केलंनी, जमिनीवर टाच यू दिलींनी, वाड्याला वेळींच डिल्डं लावून उभं ठेवलं याचं मोठंच समाधान सतत गिरवायचा, यात भरडली गेलेली आई. ‘या बाबानं कधी मी हाव तुमच्यासाठी म्हून सांगितलंनी, आविष्यात कसलं रिस्क म्हून घेटलंनी, भाऊ सगळे भाईर पडले, कमवीत मोठे झाले, ह्ये बसलं आल्या दीडकीला अधली जोडत...’ काय खरं? (ठेविले अनंते). गावात राहायचं, रोज एकमेकाची तोंडं बघायची तर खोटी प्रतिष्ठाही जपायला हवी तरंच लोक तुमच्याशी सरळ राहतील, अदबीनं वागतील हा जवळपास नियमच. यापायी होणारी ओढाताणही काही गोष्टींतून दिसते.


गाव म्हटलं की राजकारण आलंच, ते ज्याच्या आधारानं फुलतं फळतं त्या सहकारी संस्था, शिक्षण संस्थाही आल्या. खेड्यातल्या, निमशहरी भागातल्या खासगी शाळा, त्यातला कारभार हा वादग्रस्त चर्चेचा विषय. इथे त्याच्याशी संबंधित काही सल बारकाव्यांनिशी येतात. शाळा, त्याचे राजकारणी संस्थाचालक, त्यांच्याभोवती कायम होण्याच्या आशेनं गोंडा घोळणारे शिक्षणसेवक, त्यातून तयार झालेली मध्यस्थ चमच्यांची टोळी. फार स्पर्धा कुठल्याच अर्थानं न परवडणाऱ्यांसाठी बीएड (तेही अशाच खासगी संस्थेतून) करून गावातल्याच शाळेत चिकटणे हाच राजमार्ग असण्याचा काळ.


दर महिन्याला पगाराचा विठ्ठल भेटंल कधी तरी या आशेवर दिवस रेटणारे शिक्षणसेवक. साळुंके क्लार्कनं हे एकदा मनावर घेतलं की ‘अॅप्रुवल’ या शब्दाची चातकासाखी वाट पाहणाऱ्यांना पावसाचा आनंद. त्यासाठी दिलेल्या पार्टीत साळुंक्या बडबडतोय, ‘अहो विद्येचे सेवक तुम्ही, तुमचं अॅप्रुवल न आणून कसं चालंल?’ आठ वर्षं फुकट राबत धिंडवडे निघालेल्या याला कळतच नाही, खरंच बोलतोय का नशेत बरळतोय. (अॅप्रुवल)
ओपनची शंभर टक्के ग्रांट असलेल्या संस्थेतली कन्फर्म सीट. फक्त १५ लाख रोख बाकी दहा पगारातून, मागणं लई न्हाई. निस्तं पोरं पैदा करून भागतंय व्हय? शेट्टींग बी करावं लागतंय. पोराचं जवळपास दरडावणं. जमीन तुकडा विकण्यासाठी बापाचा नाईलाज. चार पावसाळे पाहिलेला मामा बाजूला घेऊन पोराला बजावतोय, ‘लोक इच्चारलं तर बोलायचं, राहताव तथंच दुसरी जिमिन घेताव, दुनिया लई शाणी असती, नडीचा माणूस, भाव पाडंतेत.’ (नडीचा माणूस)
आपण चोख काम करतो, सीनियरही आहोत, मुख्याध्यापक आता आपणच अशा खात्रीत गाफील काटेबाईंची निवृत्तीच्या सहा महिने आधी संस्थेच्या शेजारच्या गावातील शाळेत बदली होते.रोज दोन तासांचा हाडं खिळखिळी करणारा एसटीचा प्रवास. बाई मनानं मोडून पडते, आजारपणात हॉस्पिटलमध्ये आयसीयूतही त्यांना विरुद्ध कटाचे भास होत राहतात. (आयसीयू सायकाॅटिक)

‘भ्रष्टाचारी माणसाच्या बाजूला बसलं तरी विटाळ होतोय, घरी यिऊन घसघस अंघुळ करतांव मी,’ असं म्हणणाराही एखादा असतोच. लोक मनातून मानलं तरी एरवी सर्कीट म्हणतात. गुदमरवणाऱ्या वातावरणातही त्यानं नोकरी, संसार सचोटीनं नीट खेचला. शेवटी एकुलत्या एक मुलीचं लग्न. जावई शाळामास्तरचाच मुलगा, सरकारी नोकरीतला, इन्कम टॅक्समध्ये क्लार्क. लग्न होताच गाडी घेतली, घर बांधलं, थॉमस कुकनं परदेशी सहली केल्या. त्याला यातली गोम कशी लक्षात येत नाही? इतकी वर्षं सत्याचा लढा रेटून सांगणारा हा तोच आहे नं? (ह्येनं)
ब्लर्बवर राजन गवस म्हणतात तसं लहानांपासून थोरांपर्यंत, पोरींपासून म्हाताऱ्या बायांपर्यंत सर्वांनाच सामावून घेणाऱ्या या तीस छोट्या गोष्टी मोठ्या होतात त्या त्याकडे पाहण्याच्या नितळ पारदर्शी नजरेमुळं. यात कुणावरही दोषारोप करणं, न्याय करणं नाही, फक्त मनातल्या गाठी मोकळ्या करणं आहे. लोक असं का वागतात याबाबतची आतून करुणेनं भरलेली, जग पाहूनही काहीशा पापभीरू राहिलेल्या मनातली जिज्ञासा आहे.


शेवटी दोन बाबींबद्दल लिहायला हवे. प्रत्येक गोष्टीच्या शीर्षस्थानी असलेले कथार्थ चित्रांतून व्यक्त करणारे मजकुरासारखेच मितव्ययी रेखाटन, आणि मुखपृष्ठावर असलेले त्यांचेच कोलाज (मुखपृष्ठ पार पब्लिकेशन्सचेच आहे) हे स्वतंत्रपणे अनुभवण्याजोगे. संपूर्ण पुस्तकाची भाषा ही उदगिरी बोलीतली. मराठीवरच्या कानडी संस्कारांतून तयार झालेली ही बोली मोठी गोड, जिव्हाळ आहे. तिची पार्श्वभूमी, तिच्यातले वेगळेपण आणि ती अट्टहासानं वापरण्यामागची भूमिका यावर सुरुवातीला सविस्तार लिहिण्याबरोबरच शेवटी या तीस गोष्टींतल्या १८२ शब्दांचे अर्थ आणि संदर्भही लेखकाने दिले आहेत.
‘आजकाल उदगिऱ्यांना आपली बोली कमअस्सल वाटू लागली आहे. शाळकरी पुस्तकांतल्या अतिशुद्ध भाषेमुळे बोलीचा न्यूनगंड पूर्वीही होताच, पण आता आम्ही आमच्या अस्सल बोलीचं वाण कोरड्या आडात टाकून हायब्रीड होण्याचा चंग बांधला आहे.’ ही खंत फक्त लेखकाची नाही, देशातल्या बहुतांश बोली याच टप्प्यावर आहेत. त्यामुळे बोलीतून व्यक्त होणे ठीकच. तरी काही बाबी ध्यानात घ्याव्यात, असे वाटते.


आपण लिहितोय ते बोलीचं, त्यापाठीमागच्या लोकव्यवहाराचं दस्तऐवजीकरण आहे का लेखक म्हणून आपली अभिव्यक्ती हे ठरवायला हवे.
भाषेचा जन्म बोलण्यासाठी, तेव्हा ती प्रथम बोली हे ठीक, पण बोली समभाषींपुरती असते, त्यापलिकडे तिला लिपीतून पोचावे लागते. या प्रवासात वेगळ्या परिघात जाताना काही सुटून जाणे अपरिहार्य असते. गोड, जिव्हाळ्यानं भरलेली ही बोली तिच्यातल्या हेलांमुळे सलग वेगात वाचता येत नाही, अडखळत शब्दार्थाचा अवकाश भरून घेत वाचावे लागते. संवाद बोलीतच ठेवून मधले निवेदन (नाही तरी निवेदन हा लेखकांनं वाचकाशी केलेला संवादच असतो) हे लेखक, वाचक दोघांनाही सांधणाऱ्या भाषेत (प्रमाण भाषा म्हणजे विशिष्ट प्रदेश, जातीची भाषा हा गैरसमज काढून टाकला तर हे सोपे होईल) ठेवले तर अभिव्यक्ती बोलीच्या वेगळेपणासह पोहोचेल. 


अशा पुस्तकांचे अन्य भाषेत भाषांतर कसे होईल हाही प्रश्न आहेच. असो. राजन गवस म्हणतात तसे हे नवे, सशक्त कथन ‘पोहोचावे,’ इतकेच.

 

- नीतीन वैद्य, सोलापूर
vaidyaneeteen@gmail.com

बातम्या आणखी आहेत...