आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संगीत देवबाभळी: बोचरा मनकल्‍लोळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगीत देवबाभळी... रंगभूमीचे अायाम बदलणारी एक विठूसावळी कलाकृती. मच्छिंद्र कांबळींच्या अाणि अाता प्रसाद कांबळींच्या भद्रकाली प्राॅडक्शनने मंचावर साकारलेली ही देहूनगरी. रंगसंगीत एकांकिका स्पर्धेत राज्यात प्रथम पारिताेषिक मिळवलेल्या प्राजक्त देशमुख लिखित, दिग्दर्शित अाणि अानंद अाेक याने संगीतबद्ध केलेल्या ‘संगीत देवबाभळी’ एकांकिकेचे विठूमय दाेन अंकी नाटक.  


विठ्ठलभेटीची अास असतेच, पण याच भेटीत जेव्हा अापण विठ्ठलचरणी नतमस्तक हाेताे तेव्हा कुठे तरी काही तरी हरवल्यासारखं वाटतं अाणि ते हरवल्यासारखं असतं तिथे रखमाबाईचं नसणं. तिला भेटायला वळसा घालून जावं लागतं. हा वळसा का घालावा लागताे... विठूमाउलीचे अाणि रखमाबाईचेही अंत:करण तेव्हा काय म्हणत असेल... अापण विठूरायाला माउली म्हणताे म्हणजेच त्या स्पंदनात कुठेतरी बाईच्या भावनांचा प्रवाह वाहत असताे, रखमाबाईचा तर हा प्रवाह अापण अविरत बघतच अाहाेत... बाईच्या मनात चाललेला हाच कल्लाेळ जेव्हा तुकारामबुवांच्या अवलीच्या रूपाने उभा राहताे तेव्हा ताे प्रवाह रहात नाही तर त्याचा अंत:करण स्पर्शातून ‘विठ्ठल, विठ्ठल’ असा हरिनाम हाेताे अाणि अापणही इंद्राणी डाेहातील त्या हरिनामात कधी प्रवाही हाेऊन जाताे ते कळतही नाही... तल्लीनतेची ही राेमांचकारी अनुभूती मिळते संगीत देवबाभळीतून...


संगीत देवबाभळी... रंगभूमीचे अायाम बदलणारी एक विठूसावळी कलाकृती. मच्छिंद्र कांबळींच्या अाणि अाता प्रसाद कांबळींच्या भद्रकाली प्राॅडक्शनने मंचावर साकारलेली ही देहूनगरी. रंगसंगीत एकांकिका स्पर्धेत राज्यात प्रथम पारिताेषिक मिळविलेल्या प्राजक्त देशमुख लिखित, दिग्दर्शित अाणि अानंद अाेक याने संगीतबद्ध केलेल्या ‘संगीत देवबाभळी’ एकांकिकेचे विठूमय दाेन अंकी नाटक. अवलीच्या मानसिकतेतून जरी नाटक पुढे जात असले तरी रखुमाई म्हणजेच नाटकातील लखुबाईच्या वेदना रसिकांच्या हृदयाच्या खाेलवर जातात. संगीत नाटक म्हटलं म्हणजे खूप रागदारी, अालापी अाणि नाटकात गाणी किंवा संगीत ठासून भरणे... असा एक समज झाला अाहे. मुळात अाता फारशी संगीत नाटकंच रंगभूमीवर येत नाहीत. पण, प्रसाद कांबळींनी तेच धाडस केलं अाणि एक वेगळ्या धाटणीची नाटकवारी मंचावर अाणली. विठ्ठलभेटीची काेणतीही अास मागे साेडली नाही. मुळातच विठूगंधासारखी संहिता, तुळशीमाळेसारखं संगीत अाणि अवलीच्या भूमिकेतील शुभांगी सदावर्ते अाणि लखुबाईच्या भूमिकेतील मानसी जाेशी यांचा पंढरीच्या कळसासारखा अभिनय. विठूने कंबरेवर हात ठेवावे अाणि सगळा कल्लाेळ शांत हाेऊन अापण इंद्राणीच्या पाण्याने त्याच विठूरायाचे चरण धुवावे ही अनुभूती प्रफुल्ल दीक्षितच्या प्रकाशयाेजनेची अाणि साक्षात देहूत जाऊन विठूरूपात तुकाेबांचे दर्शन देणारं प्रदीप मुळ्ये यांचं नेपथ्य. यामुळे चार दिंड्या एकत्र येऊन त्या चार टाेकांवरील मनांचं रिंगण जेव्हा फेर धरून रसिकरूपी वारकऱ्यांच्या भावानुभूतीला स्पर्शून जातं तेव्हा विठ्ठलाशी कडकडून राेमांचकारी अालिंगन हाेते अाणि अवघा रंग देवबाभळी हाेऊन जाताे.


मंचावर अनेक वर्षांनी अशी वेगळ्या धाटणीची संगीत कलाकृती सजली. गर्भार असलेली अाणि तुकाेबांच्या विठ्ठलभक्तीमुळे अत्यंत वैतागलेल्या अवलीच्या पायात तुकाेबांना रानात शाेधताना देवबाभळीचा काटा रुतताे अाणि हाच काटा चार मनांतली संवेदना-कल्लाेळ, भक्ती-तुसडेपण, मानसिकता-हताशपण, सामान्यपण ते देवत्व, नकार अाणि नकारातील स्वीकार, जाणीव-जाणिवांचा उद्धार, अश्रू अाणि अास असं सगळंच दाखवून जाताे तेव्हा थाेड्याफार फरकाने ताे काटा कुठेतरी अापल्यालाच बाेचलेला नाही ना? असा सवाल अापणच अापल्याला विचारताे अाणि नाटक नव्हे तर अापण मंचावरी कधीही न दिसलेल्या विठूनामात तल्लीन हाेऊन विलिन झालेल्या तुकाेबाला कधी भेटताे, मंचावर असलेल्या फूटभराच्या विठ्ठलमूर्तीतून माउली कधी प्रत्यक्षात दर्शन देते अाणि संवेदनांचे अश्रू झेलते ते अापण अाजपर्यंत किती वेळा अाई म्हटलाे हे जसे सांगता येत नाही तसेच अाहे. काटा जरी अवलीला बाेचला तरी वेदना मात्र रखुमाईला झालेल्या अाहेत. एकीकडे रूसून पाठीमागे गेलेली रखमाई जशी अाहे तशीच संसारातून अंग काढून केवळ विठूभक्तीत रमलेल्या तुकाेबांवर रूसलेली अवली अाहे. दाेघींची वेदना एकच. पण, एकीत देवत्व तर दुसरीचं सामान्यपण. अवलीचं माउलीला शिव्याशाप देणं अाणि अापल्या पतीला लागलेला बाेल रखमाईला सहन न हाेणं. त्यातून तिचा विठूरायाशी हाेणारा वाद... कित्येकदा हा वाद तिच्या मनातलं द्वंद्वच अाहे म्हणूनच या द्वंद्वातच मग तिच्या रूपातूनच स्वत:बराेबरच माउलीचेही दर्शन देऊन जाते. दुसरीकडे दाेघींचाही मंचावर फक्त प्रतीकात्मक असलेल्या तुकाेबांशी चाललेला संवाद नश्वरतेच्या अनुभूतीचं अत्युच्च टाेक दाखवून जाताे अाणि अापण देवबाभळीने झालेल्या जखमेच्या तळाशी येऊन पाेहाेचताे.


मुळातच संहिताच अत्यंत पराकाेटीची सुंदर. रखुमाई अवलीला म्हणते की ‘अापण अापलं नांगरत रहावे, पाऊस येवाे न येवाे’ किंवा ‘मग मी अाणि तू दाेघी गाभाऱ्याबाहेर अाहाेत पण, तू मात्र गाभाऱ्याबाहेर राहूनही गाभाऱ्याचा घुमारा झालीस...’ असे संवाद संवेदनशील रसिकांच्या अंगावर शहारा उभा करणार नाहीत तर नवलच. तसेच ‘करपायच्या अात खरपूस झाल्या झाल्या उलथायची भाकरी, फाेडणी तांबूस झाल्या झाल्या अाेतायची भाजीत, ऊतू जायच्या अात उतरवाचं भांड... का? कडेलाेटाच्या क्षणापर्यंत पाेहाेचून पुन्हा माघारी का गं फिरायचं अापण बायकांनीच?’ एक बाईही बाईच्या मनाचा असा खाेलवर विचार करणार नाही ताे प्राजक्तने लिहिलेल्या अनेक संवादांतून झालेला दिसताे. या नाटकात प्राजक्तने काही अभंग अाणि गाणीही लिहिली अाहेत ती अानंद अाेकच्या अविट संगीतातून उमटली अाहेत. अवलीची चिड, वैताग हा पराकाेटीचा हाेताे तेव्हा ती म्हणते की,


माझ्या काेटी शिव्या। तुझ्या येवाे ठायी ।
विटे तुझ्या पायी। तडे जावाे।।
किंवा मग
इझू दे रे देवा। इझू दे रे।
अंतरीची पिडा । इझू दे रे।।
सजू दे रे देवा। सजू दे रे
पायातळी काटा। सजू दे रे।।


एवढ्या प्रगल्भतेने हे अभंग येणं यामागे तुकाेबांचा केलेला अभ्यास स्पष्टपणे दिसून येताे. 
लेखनाबराेबरच प्राजक्तच दिग्दर्शनही भन्नाटच म्हणावं लागेल. तुकाेबांचं घर, त्यांची बसण्याची जागा अाणि इंद्रायणी नदी अशा साधारणत: महत्त्वाच्या तीन ठिकाणी नाटक घडतं. पण पाठमाेरी कमबरेवर उभी राहिलेली रखमाबाई असाे, विठ्ठलाच्या कानात बाेलणारी रुख्मिणी असाे वा राधेवर चिडणारी रखमाई असाे नाहीतर अवलीची सेवा करणारी लखुबाई असाे. दिग्दर्शनात तिच्या या रूपांचा अत्यंत काैशल्याने वापर झाला अाहे. तेच अवलीच्या बाबतीतही. गर्भार असलेल्या अवलीचे काटा रुतून पडणे, तुकाेबांना शाेधणे, विठ्ठलाला शिव्याशाप देणे, इंद्रायणीची तिला भीती वाटणे अशा सगळ्याच बाबी तुकाेबांचे माजघर, बैठकीची जागा अाणि इंद्रायणीच्या पायऱ्यांवर घडताना दिग्दर्शक म्हणून कमाल जाणवते. या सगळ्याचा कळस ठरताे ते म्हणजे नाटकाचे संगीत. संतवाणी नाटकात येते म्हणजे अर्थातच पखवाज अालाच. तबला, संवादिनी, टाळ-चिपळ्या ही पारंपरिक वाद्ये तर अाहेतच, पण अनेक गाण्यांमध्ये एकतारी, सतार, स्वरमंडलाचा केलेला वापर रसिकांना डाेलायला लावताे. करी ताे कवित्व, येई गा विठ्ठला ही गाणीच मुळात अानंदगंधर्वांनी म्हणजेच अानंद गंधर्व यांनी गायली अाहेत. त्यांच्या अावाजातून तुकारामाची भेट हाेते. ती भेट संगीताच्या माध्यमातून हाेते अाणि रसिकाही डाेलायला लागतात.


नाटकाची प्रकाशयाेजना तर थेट देहूत घेऊन जाते, मग ते इंद्रायणीचे पाणी असाे, तुकाेबांची बसण्याची जागा असाे किंवा अवलीचा संसार असाे. प्रकाशयाेजनेतून मंचावर संपूर्ण अंधार अाणि कधी फक्त तुकाेबाच दिसतात तर कधी फक्त विठूमाउली दिसते. त्यावेळी जिवंत हाेते देहूनगरी. एवढं सगळं असताना सगळ्यात माेठी जबाबदारी येते ती म्हणजे अभिनयाची. अवली अाणि लखुबाई अशा दाेनच पात्रांभाेवती नाटक फिरते, पण त्यांना मंचावर मात्र अाणखी दाेघांना दाखवायचे अाहेे ते म्हणजे विठूमाउली अाणि तुकाेबांना. अशावेळी शुभांगी सदावर्ते अाणि मानसी जाेशी यांचा कस लागताे. ही पात्रं सर्वसामान्य नाहीत किंवा ही कथाच सर्वसामान्य नाही याचा पुरेपूर अभ्यास या दाेन तरुण अभिनेत्रींनी केला अाणि चारही पात्र रसिकांसमाेर जिवंत केली. नाटकाची व्यावसायिक गणितं जरा वेगळी असतात. या नाटकात ती गणितं किती अाहेत ते येत्या काही प्रयाेगांतून दिसेलच. पण, रंगभूमीला एक नवा मेकअप देण्याचा यशस्वी प्रयत्न या नाटकाने नक्कीच केला अाहे असे म्हणायला काहीच हरकत नाही. शेवटी काय तर


आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने। 
शब्दांचीच वस्त्रे यत्ने करू।।
शब्दचि आमुच्या जीवीचे जीवन। 
शब्द वाटे धन जनलोका।।


हे जनलाेकासाठी असलेला शब्दच संगीत देवबाभळीतून रसिकांपर्यंत पाेहाेचले अाहेत. प्रयाेगागणिक काही सुधारणा हाेतीलही पण, प्रत्येक विठूभक्ताने एकदातरी देवबाभळीची वारी केली तर त्याला विठ्ठलाबराेबर तुकाेबा, रखुमाई अाणि अवली यांच्यातून कुठेतरी स्वत्वाचा शाेध लागले हे मात्र निश्चित.


- पीयूष नाशिककर
piyushnashikkar@gmail.com
लेखकाचा संपर्क - ७७७००५९००९

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, आणखी फोटो...

बातम्या आणखी आहेत...