Home | Magazine | Rasik | piyush nashikkar write on Actress-director Anjali Patil

रंग माझा वेगळा ...

पीयूष नाशिककर | Update - May 27, 2018, 01:00 AM IST

विचारांत प्रगल्भता असूनही कुठे तरी रितेपणाची बाेच तिला अाहे. याच रितेपणाचा ती सतत अर्थ लावत असते. माणसं वाचत असते, वेळ अ

 • piyush nashikkar write on Actress-director Anjali Patil

  विचारांत प्रगल्भता असूनही कुठे तरी रितेपणाची बाेच तिला अाहे. याच रितेपणाचा ती सतत अर्थ लावत असते. माणसं वाचत असते, वेळ अाली तर बंडखाेरी करते अाणि जे याेग्य अाहे, त्याच पारड्यात वजन टाकते. रंग, वर्ण, जात, धर्म यासह शाेषण, स्त्री-पुरुष भेद यावर ठामपणे व्यक्त होत राहते. तिने साकारलेल्या छाेट्या-छाेट्या भूमिकाही तिच्या समृद्ध जगण्याची छटा सहज दाखवून जातात. तिचे सिनेमा आंतरराष्ट्रीय महोत्सवात गाजतात. तिच्या जगण्यात अभिनय महत्त्वाचा ठरताेच. पण त्याही पलीकडचं जगणं तिच्यालेखी मोलाचं असतं. म्हणून तिला, अर्थातच चतुरस्र अभिनेत्री-दिग्दर्शिका अंजली पाटीलला समजून घेणं लाखमोलाचं ठरतं...

  अंजली पाटील. राहणार नाशिक. शाळा र. ज. चव्हाण बिटकाे. कॉलेज-केटीएचएम. हे वर्णन फारसं कुतूहल चाळवत नाही. पण, याच वातावरणात विचारांनी स्वतंत्र आणि ठाम असलेली अंजली ठरवून आयुष्यात धाडसी वळण घेते आणि सुरू होतो, एक निरंतर प्रवास. या प्रवासात ती स्वत:ला शोधते. त्यात आधी ललित कला केंद्र. मग एनएसडी. तिथे दिग्दर्शन. त्यानंतर अभिनय आणि मग अभिनयात चढता आलेख. थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल. तरीही परंपराशरणता नाही. व्यवस्थेपुढे नतमस्तक होणं नाही. हे सारं आत्मशोधाचंच फळ असतं...


  अभिनय करायचा हे जेव्हा मनाशी निश्चित झालं, वर्णानं सावळी दिसणाऱ्या अंजलीला तेव्हापासूनच काेणी-काेणी सांगत गेलं. अभिनेत्री व्हायचं म्हणजे, गाेरं असलंच पाहिजे, केस लांबसडक असलेच पाहिजेत, पण नसेना का. लोकांच्या बोलण्याने अंजली कधी डगमगली नाही. या बाबतीत अंजली म्हणते की, मला जेव्हा अापण अभिनय क्षेत्रात करिअर करावं याची जाण अाली,तेव्हा तसं पाठीशी उभं राहणारं काेणीही नव्हतं. उलट रंग, वर्ण, जात, प्रांत, धर्म याविषयी बाेलणारेच अधिक हाेते. पण, लहानपणापासून माझी एक सवय होती. मी खूप प्रश्न विचारायचे. माझ्या अासपासची मंडळी भंडावून जायची. पण, माझं जाेपर्यंत समाधान हाेत नाही, तोपर्यंत मी त्या प्रश्नाचा छडा लावणं काही साेडायचे नाही.


  मग, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं न मिळूनही अभिनयाच्या अज्ञात समुद्रात बुडी घेण्याचं बळ कुठून आणि कसं मिळवलंस, हा प्रश्न अपरिहार्य असतो. त्यावर अंजली म्हणते, मी डाॅक्टर व्हावं अशी घरच्यांची इच्छा हाेती. पण मला त्यात अजिबातच रस नव्हता. ललित कला केंद्रात जायचं तर तिथे ग्रॅज्युएशन पूर्ण असावं लागतं. मग शिक्षण पूर्ण केलं.पण,घरी स्पष्ट सांगितलं की, जाऊ द्या,मला ललित कला केंद्रात. घरून हाेकार नव्हताच. जवळ असलेले २००-३०० रुपये घेऊन सरळ पुण्याचे ललित कलाकेंद्र गाठलं. संचालक असलेल्या सतीश अाळेकर सरांना भेटले. माझं सिलेक्शन झालं. पण पैशांची चणचण भासू लागली. वडापाव खायचा अाणि अापलं काम करायचं. खायचे पैसेही नाटक बघण्यात घालवायचे अाणि चहा पिऊन झाेपायचं, असं मी केलं. खूप वेगळी माणसं मला या ठिकाणी भेटली. मी खूप वाचलं, लाेकांना अाेळखायला शिकले अाणि स्वत:ला समृद्ध करत राहिले. पण, पुण्यात फार रमले नाही. जे माझं नाशिकमध्ये झालं ते पुण्यातही झालं. प्रांत, रंग, भाषेचा न्यूनगंड, पुणेकर जसं बाेलतात तीच प्रमाण भाषा, इतर जे बाेलतात ती मराठी नाहीच. असं एक सारखं काेणी तरी टाेचत असायचं. पण, मी एक विचार केला की, ही अापल्यासाठी पाठशाळा अाहे. मी त्या वेळी समग्र कर्नाड, तेंडुलकर वाचत गेले. चांगली व्याख्यानं, चांगल्या कार्यशाळांना जात राहिले. ‘पिफ’ने (पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल) मला खूप शिकवलं. पण, तिथेही मला डबक्यासारखं वाटू लागलं. मी एनएसडीचा रस्ता पकडायचं ठरवलं...


  पण, एनएसडीतही तुझा संघर्ष सुरूच राहिला. हा संघर्ष नेमका कशा स्वरूपाचा होता? यावर अंजली सांगते, अामच्या डिरेक्टर हाेत्या अनुराधा कपूर. हेल्थ केअर, फूड या विषयावर मी त्यांच्याशी वाद घालायचे. प्रसंगी भांडायचे. कारण, मला खूप प्रश्न पडायचे आणि त्याची उत्तरं हवी असायची. दुसऱ्या वर्षी मी डिरेक्शन अाणि डिझाइन हे विषय घेतले. तेव्हा बरेच जण असंही म्हणाले, हे ठीकच आहे, कारण तू दिसायला सुंदर नाहीस, तेव्हाही माझं डाेकं फिरलंच. लाेक कसं बाेलू शकतात? मी माझ्या निर्णयावरून हलले नाही. जागतिक साहित्य, संगीत इतर भाषांमधील चित्रपट असं सगळं बघत राहिले, खरं तर अक्षरश: खात राहिले. मी जी काही अाता अाहे, त्यात या सहा वर्षांचा खूप माेठा वाटा अाहे.


  अंजलीचा इथवरचा प्रवास म्हटला तर बंडखोरीचा प्रवास आहे. पण पुढचा प्रवासही कमी बंडखोरीचा नाही. विशेषत: दिग्दर्शनाचं प्रशिक्षण घेत असताना अभिनयाकडे वळणं वगैरे. यावर अंजली म्हणते, अॅक्टिंग करायचं असं ठरलेलंच नव्हतं.एनएसडीच्या शेवटच्या वर्षाला नाटक डिरेक्ट करत हाेते. तेव्हा प्रशांत नायर अाॅडिशन्स घेत हाेते. त्यांना माझा पंकज त्रिपाठींनी रेफरन्स दिला. मी स्पष्ट सांगितलं की, बाबा रे, मी डिरेक्शनची विद्यार्थिनी अाहे. मला काही ते जमणार नाही. ताे म्हणाला की, तू अाॅडिशन्स तर दे. मग बघू. मी अाॅडिशन दिली अाणि ताे राेल मिळाला मला. पुढे मी विसरूनही गेले की, अापण अशी काही फिल्म केली अाहे. दरम्यान, मी वर्कशाॅप सुरू केले. त्यानिमित्ताने फिरत हाेते. पण वर्षभरात ती फिल्म वेगवेगळ्या महोत्सवांत फिरायला लागली. त्याच निमित्ताने मामी फेस्टिव्हलसाठी मी मुंबईत अाले. तेव्हा वाटलं की, अाता अापण मुंबईत काही तरी करूया. ताेपर्यंत मी ज्या फिल्ममध्ये काम केलं हाेतं ते मी काही लाेकांना पाठवलं हाेतं. ‘दिल्ली इन अ डे’चं असं झालं की, एका कामातून दुसरं काम मिळणं सुरू झालं. मग तेलगू फिल्म अाली, प्रकाश झा यांची ‘चक्रव्यूह’ मिळाली.


  तुझ्या फिल्म एक समाजभान ठेवून असतात, उगीच काही तरी राेमँटिक, काॅमेडी अशा नसतात, तशा भूमिका तू स्वीकारल्याच नाहीत की तुझ्याकडे अाल्याच नाहीत? यावर अंजली म्हणते की, माझ्या आतल्या आवाजावर (इंट्यूशन्सवर) मी खूप अवलंबून असते. मला राेमँटिक फिल्म करायला काही अडचण नाही. पण, मी एक ‘अार्टिस्ट’ अाहे निव्वळ अॅक्टर नाही. मला असं नेहमी वाटतं की, मी कितीही स्वतंत्र असले तरी मी जे काही करते त्याचा खूप परिणाम हाेताे समाजावर,हे अापल्याला कळलं पाहिजे. ही बांधिलकी (हा शब्द खरं तर तिला चरबट वाटताे) असावीच. मी ज्या पद्धतीने माझं अायुष्य जगते अाहे ते एक ‘केपेबल अार्ट’अाहे. ते मी क्रिएट करते अाहे.


  पण अाता काही दिग्दर्शकांना असं कळलंय का, अंजली वेगळ्या धाटणीचे चित्रपट करते. यावर ती पटकन म्हणते की, हाे बऱ्याच लाेकांपर्यंत पाेहाेचलं अाहे अाणि त्याचं मला फार काही विशेष काैतुक नाही. कारण, माझ्याकडे अाहे काही तरी टॅलेंट, पण गरजेचं नाही की, त्याचं काहीतरी फळ मिळालंच पाहिजे. असेल मी ताकदीची अभिनेत्री. पण, हे सूत्र काही माझ्या विचारात बसत नाही. मी तशीही लोकांना फारशी उपलब्ध नसते. साेशल मीडियातही फार नसते. मी भटकत मात्र खूप असते, पर्वतांमध्ये, निसर्गात. पण, ज्या लाेकांना जेन्युअनली माझ्याबराेबर काम करायचं अाहे, ते लाेक वाट बघतात. ‘न्यूटन’च्या वेळी मी भारतात महिनाभर नव्हते. दिग्दर्शक अमित मसूरकरने मेसेज केला. महिनाभराने मी त्याला रिप्लाय केला, तर ताे थांबलेला हाेता, माझ्यासाठी. राकेश अाेमप्रकाश मेहरा यांच्या बाबतीतही तेच अाहे. अाम्ही ‘मिर्झिया’ केल्यानंतर अामची जी काही मैत्री झाली, ती अायुष्यभराची मैत्री झाली. ज्या दिवशी ‘मिर्झिया’तील माझं काम संपलं त्या दिवशी ते म्हणाले की, अापल्याला खूप काम बराेबर करायचं अाहे. मी ते काही फार गांभीर्याने घेतलं नाही. पण लगेच दुसऱ्याच वर्षी ‘मेरे प्यारे प्राइम मिनिस्टर’चे स्क्रिप्ट दिलं.


  रंग, वर्ण यावर तू खूप पोटतिडिकीने बाेलत असतेस, का? यावर अंजली म्हणते, हाे मी नेहमीच याबद्दल बोलत असते. कारण त्याचे चटके मी स्वत:अनुभवले आहेत. पण रंग रूपासोबत जात, प्रांत हेही अडथळे आहेतच की. एक गंमत सांगते, मी एनएसडीत असताना अापल्याकडे मराठी अाणि बिहारी वाद झाले होते. अाम्ही हसायचाे त्यावर. पण, बघता-बघता अामच्यातही मराठी-बिहारी अशी भांडणं सुरू झाली. तेव्हा जातीयवाद, रंग, वर्ण, प्रांत यात जे काही भेदभाव आहेत, ते खूप डिपली रुटेड अाहेत, हे आपल्याला विसरता येत नाही.


  अंजली तू खूप काळ एक प्रकारचं काम नाही करू शकत असं एकुणात तुझ्या व्यक्तिमत्त्वातून दिसतं. हे खरं अाहे का? या प्रश्नावर ती म्हणते की, हाे अगदीच खरं अाहे. मी एक अॅक्टर म्हणून जेव्हा अभ्यास करते, तेव्हा ती माझी साधना असते. मी माेल्ड हाेण्याचा, कन्व्हिन्स हाेण्याचा प्रयत्न करत असते. प्रत्येक साधनेचा काही एक विचार असताे, मर्यादा असतात. त्या अापण अाेळखल्या पाहिजे.


  अाता तू ‘काला’ नावाच्या बिग बजेट सिनेमात काम केलं. ते फक्त रजनीकांत त्यात अाहेत म्हणून केलं,अशी चर्चा हाेती. पण तुझं मत काही तरी वेगळं हाेतं. ते काय अाहे? याबद्दल अंजली म्हणते, मी रजनीकांतना जे काही अाेळखते, त्यांच्याशी कुठे तरी अापले विचार जुळताहेत. काही तरी वेगळं म्हणणं त्याला मांडायचंय, त्यांची काही तरी बांधिलकी अाहे समाजाशी, त्यामुळे अशा व्यक्तीसाेबत काम करूयात, हा पहिला विचार हाेता. दुसरं म्हणजे, एक कलाकार म्हणून रजनीकांतविषयी मी जे काही एेकलंय, बघितलंय ते अनुभवणं मला गरजेचं होतं. त्या व्यक्तीसाेबत काम करताना जाे काही माझा अभ्यास हाेणार होता, ताे खूप महत्त्वाचा असणार होता. मी काही काेणाची फार माेठी फॅन नाही. पण माझ्या दृष्टीने प्रत्येक व्यक्ती ही शिकण्याचं माध्यम अाहे. मग ते बसमध्ये भेटलेले कुणी असू शकतात, माझ्या शेजारी बसलेले किंवा रजनीकांत सरही असू शकतात.


  ‘न्यूटन’च्या निमित्ताने तू अादिवासी जगणं अनुभवलं. काय सांगशील त्या जगण्याबद्दल? यावर अंजली म्हणते, अादिवासी अापल्याकडे जे बघतात ते थेट बघतात. जे निसर्गात राहतात त्यांचे डाेळे खूप काेरे असतात. स्वच्छ असतात. भीती त्यांच्यात नाही. नैसर्गिक भीती असतेच. पण अापल्या भ्रष्ट गाेष्टींशी ते खूप अनभिज्ञ असतात.


  तुला खूप पुरस्कार मिळतात, काही जणं तर खास प्रयत्न करतात पुरस्कार मिळवण्यासाठी. तुझ्या अायुष्यात पुरस्कारांचे स्थान काय अाहे? यावर अंजलीचं उत्तर असतं- मला खूप लहान वयात नॅशनल अवाॅर्ड मिळाल्यामुळेही असेल कदाचित पण, त्याविषयी हे खूप काही भारी आहे, ही भावना राहिली नाही. अर्थात,जेव्हा ‘इफ्फी’चं अवाॅर्ड मिळालं मला तात्कालिक मदत झाली. कारण, माझ्याकडे पैसे नव्हते. नॅशनल अवाॅर्डमुळे मात्र मी डिप्रेशनमध्ये गेले. बराच काळ माझ्याकडे काम नव्हतं. म्हणून डिप्रेशन हे सगळ्यात माेठं अवाॅर्ड हाेतं माझ्यासाठी असं अजूनही मानते.


  या सगळ्या बोलण्यातून एक गोष्ट जाणवत राहते की, तू सतत काही तरी शोधत असते, असमाधानी असते, हा कशाचा शोध आहे? यावर अंजली म्हणते, या प्रवासात मला हे कळलं की कोणत्याही गोष्टीवर प्रेम करणं, समजून घेणं महत्त्वाचं असतं. जेव्हा तुम्हाला यापासून अडवलं जातं, ती जी काही परिस्थिती उद््भवते, तुमचा जाे नैसर्गिक भाव अाहे प्रेम करण्याचा, त्याचा अडसर निर्माण हाेताे घुसमट हाेत जाते. अापल्याला अापलं काम प्रेम करून स्वच्छपणे, निखळपणे कसं करता येईल त्याचा मी शाेध घेते अाहे. शाेध घेत असते...

  - पीयूष नाशिककर
  piyushnashikkar@gmail.com

 • piyush nashikkar write on Actress-director Anjali Patil
 • piyush nashikkar write on Actress-director Anjali Patil

  शोध प्रेमाचा...


  मी एक डाॅक्युमेंट्री करते अाहे. ज्यातला काही भाग मला नाशिकमध्ये सेंट्रल जेलमध्ये शूट करण्याची इच्छा अाहे.त्याचा विषय प्रेम हाच अाहे. सर्वसामान्य माणसांच्या अायुष्यातील प्रेम काय असतं. मग त्यात काहीही असू देत अापलं करिअर असतं अापण त्यातून प्रेम शाेधताे, अापल्या विठ्ठलाची भक्ती करायची त्यात अापण प्रेमाची अनुभूती घेत असताे. गृहिप्रणी असते ती तर किती गाेष्टींत प्रेम शाेधत असते. हा प्रेमाचा शाेध अापल्या अायुष्यात, अापल्या अाजूबाजूच्या लाेकांमध्ये कसा हाेताे. सर्वसामान्य जरी असतील तरी मला ते सुपर हीराेज वाटतात. अशा गाेष्टींवर हा सिनेमा अाहे.

 • piyush nashikkar write on Actress-director Anjali Patil

Trending