आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रमाई माई ... !

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाच्या पूर्वार्धात रमाईंचा तर त्यांच्या निधनानंतर बाबासाहेबांच्या उत्तरार्धात माईंचा सहभाग तितकाच मोलाचा होता. या दोघीही बाबासाहेबांच्या सहचारिणी. पण जो सर्वोच्च सन्मान रमाईंच्या वाट्याला भरभरून आला त्यापासून माईसाहेब मात्र अखेरपर्यंत विन्मुख राहिल्या...

 

नुकतंच सोलापूर येथे रमाई चळवळीचं सातवं साहित्य संमेलन पार पडलं. माझी आई - हिरा पवार ही या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होती. आंबेडकरी साहित्य चळवळीत महत्वाचं योगदान दिलेल्या महिलांची निवड या संमेलनाचे आयोजक करीत आले आहेत ही अत्यंत स्तुत्य अशी बाब आहे. संयोजकांनी आईला केवळ ती सोलापूरची माहेरवाशीण आहे म्हणून अध्यक्षपदी बसवलं नसणार. तिच्यातलं लेखिकापण, कवीपण, कार्यकर्तीपण आणि एकूणच तिच्या व्यक्तिमत्वात असलेलं हरहुन्नरीपण याच अधिक जमेच्या बाजू ठरल्या असणार. सोलापूरच्या बोर्डिंगमध्ये गेलेलं तिचं विलक्षण एकाकी बालपण, दारिद्र्याचे चटके सोसत तिने सगळ्याच बिकट परिस्थितीशी केलेले दोन हात ते नंतर दया पवार नावाच्या क्षितिजावर नव्यानेच उगवू पाहणाऱ्या कवीशी विवाह झाला तिथपासून तिच्या आयुष्याच्या संघर्षाचा उभा-आडवा धांडोळा ‘सांगायची गोष्ट म्हणजे' या तिच्या आत्मकथनातून तिने घेतला आहे. समष्टीशी, चळवळीशी अत्यंत जैव नातं राखत तिने जी स्वतःची वैशिष्ट्यपूर्ण नाममुद्रा उभी करत नेली त्यामुळेच तिला हा बहुमान प्राप्त झाला असं मी मानते. 


छापायला जाण्याआधी आईने तिचं अध्यक्षीय भाषण मला वाचून दाखवलं. उत्तमच झालं होतं! पण माझ्या लक्षात राहिलं ते माता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्याविषयीचं तिचं मनोगत. रमाईंच्या व्यक्तिमत्वाबद्दल, त्यांच्या त्यागाबद्दल, कष्टांबद्दल, रमाईंच्या मनात बाबासाहेबांप्रती असलेल्या आदरयुक्त प्रेमभावाबद्दल, समर्पणाबद्दल, त्यांच्या सोशिक, कनवाळू स्वभावाबद्दल आईने भरभरून लिहिलं होतं तिच्या भाषणात. जवळपास सहा-सात पाने भरतील एवढा मजकूर होता तो. मजकूर कसला? खरं तर श्रद्धेचा ओसंडून वाहणारा प्रपातच जणू!


माझ्या स्मृतींच्या खिडक्या खटाखट उघडू लागल्या. मला लख्ख जाणवून गेलं की, आपल्याकडे एकही आंबेडकरवादी कवी-कवयित्री असे नसतील ज्यांनी रमाईंवर कविता लिहिलेली नाही! नामदेव ढसाळ, यशवंत मनोहर, हिरा बनसोडे यांच्यापासून ते आज नव्या दमाने लिहिणाऱ्यांपर्यंत अनेकजण रमाईंच्या  प्रतिमेपासून स्वतःला लांब ठेवू शकलेले नाहीत. एका साध्यासुध्या हाडामासाच्या संसारी बाईने ज्या धैर्याने, निष्ठेने अतिशय हलाखीच्या काळात आपल्या जगावेगळ्या नवऱ्यासाठी त्यांच्या उत्तुंग कामाचं मोल जाणून जिवाची कुरवंडी केली त्याने माझ्यासह अनेक कवींना आतूनच हलवलं आहे. 


एकीकडे रमाईंच्या युगपुरुषाची फक्त सावली नसलेल्या प्रतिमेने भारावून जाणारी मी ‘शारदा कबीर' ऊर्फ ‘सविता भीमराव आंबेडकर' ऊर्फ ‘माईसाहेब आंबेडकर' या तितक्याच ऐतिहासिक आणि वंदनीय प्रतिमेकडे पाहते तेव्हा मात्र माझ्या काळजात कायम एक कळ उठते. दुखत राहतं मन पश्चातापदग्ध भावनेनं. माईसाहेबांवर खरोखरच खूप मोठा अन्याय झालेला आहे, त्यांची योग्य बूज आपल्या समाजाने राखली नाही, कायम परकं मानलं आणि बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर तर सतत संशयाच्या काळोख्या पिंजऱ्यात त्यांना बंदिस्त करून टाकलं याची मला खरोखर लाज वाटते.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाच्या पूर्वार्धात रमाईंचा तर त्यांच्या निधनानंतर बाबासाहेबांच्या उत्तरार्धात माईंचा सहभाग तितकाच मोलाचा होता. या दोघीही बाबासाहेबांच्या सहचारिणी. पण जो सर्वोच्च सन्मान रमाईंच्या वाट्याला भरभरून आला त्यापासून माईसाहेब मात्र अखेरपर्यंत विन्मुख राहिल्या. 


खरं तर दोघींची तुलना होण्याचा प्रश्नच उदभवू नये. दोघींचंही बाबासाहेबांच्या आयुष्यातील स्थान तितकंच तोलामोलाचं होतं. दोघींच्याही आयुष्याचं प्रयोजनच मुळी ‘बाबासाहेब'! पण सारस्वत ब्राह्मण जातीत जन्मलेल्या, उच्चविद्याविभूषित, पेशाने डॉक्टर असलेल्या आणि डॉक्टर असल्यामुळेच बाबासाहेबांच्या लग्नाच्या प्रस्तावाला होकार देणाऱ्या शारदा कबीर यांना समजून घेण्यात आपण कायमच गल्लत केली.


आपल्याला लग्नाचा प्रस्ताव पाठवणाऱ्या भीमराव आंबेडकरांवर भारताच्या राज्यघटना निर्मिर्तीची  युगप्रवर्तक अशी ऐतिहासिक जबाबदारी आहे, हजारो वर्षे अन्यायाच्या गर्तेत गलितगात्र होऊन पडलेल्या दलित-वंचित समाजाला आयडेंटीटी मिळवून देण्याचं ज्या माणसाचं स्वप्न अद्याप अधुरं राहिलेलं आहे, भारताच्याच नव्हे तर जगाच्या विचारविश्वात ललामभूत ठरतील अशी ग्रंथनिर्मिती ज्यांच्या हातून निर्माण होते आहे, ‘मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही' अशी घोषणा करून समतावादी बौद्ध धम्माच्या दिशेने ज्यांची पावलं वळत आहेत अशा प्रज्ञावंत माणसाला खरोखरच एका एकमय नात्याची गरज आहे हे शारदा कबीर यांनी मनोमन जाणलं होतं. त्या त्यांच्या डॉक्टर होत्या आणि जेव्हा बाबासाहेबांनी त्यांना लग्नाची मागणी घातली तेव्हा बाबासाहेबांचा देह मधुमेह, संधिवात, रक्तदाब, न्युरायटीस अशा अनेक व्याधींनी ग्रासला होता. आयुष्यभर विक्राळ परिस्थितीशी झुंज देऊन स्वतःच्या दीनदुबळ्या समूहासाठी अहर्निश झगडत असताना त्यांनी स्वतःच्या प्रकृतीची कधीही तमा बाळगलेली नव्हती. अशा अटीतटीच्या निर्णायक टप्प्यावर शारदा कबीर यांचं बाबासाहेबांसोबत असलेलं डॉक्टर- पेशंट हे नातं त्यांच्या विवाहानंतर पती-पत्नीमध्ये पर्यवसित झालं. त्यावेळी बाबासाहेबांचं वय ५४ होतं आणि वय, प्रकृती सामाजिक-आर्थिक स्तर, जात या सर्व बाबतीत शारदा कबीर आणि त्यांच्यात खूपच अंतर होतं. परंतु बाबासाहेबांसारख्या प्रकांड तत्ववेत्त्याने त्यांना वरलं होतं आणि शारदा कबीर यांनीही उभयतांमध्ये असलेल्या सर्व प्रकारच्या असमानतेचं अंतर तोडून त्यांना मनोमन प्रतिसाद दिला होता. 


बाबासाहेबांच्या शब्दांतच सांगायचं झाल्यास ‘एका जीवात्म्याने दुसऱ्या जीवात्म्यास पाहिले, समान शील ओळखले...’ असे आमचे मनोमिलन झाले. ‘आपला विवाह हा आत्मैक्य योग आहे', अशी भावना बाबासाहेबांनी शारदा कबीर यांना पत्रातून कळवली होती.
त्या दोघांचा पत्रव्यवहार मोठा मनोज्ञ आणि बाबासाहेबांच्या चिर-परिचित रुपांपेक्षा भिन्न रूपे प्रकट करणारा आहे. किती उत्कटपणे ते भावी पत्नीला पत्रं लिहित असत, किती उत्कट आर्जवे करीत असत, किती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये रस घेत असत, पत्नीने नेमकी कोणती वस्त्रप्रावरणे ल्यावीत याची नमुनाचित्रंही कशी धाडत असत हे वाचलं की बाबासाहेबांमधला प्रियकर, पती किती श्रेष्ठ पातळीवर पोहोचला होता हे उमगतं. ही सगळी पत्रं ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासात' या डॉ. सविता आंबेडकर यांच्या आत्मचरित्रपर ग्रंथात प्रसिद्ध झालेली आहेत. आपल्या प्रत्येक पत्राची सुरुवात ‘My dearest sharu'  या मायन्याने करून ‘with fondest love from - Raja' असा पत्राचा शेवट करणारी बाबासाहेबांची कितीतरी पत्रं या पुस्तकात समाविष्ट केलेली आहेत. नीती, शील, चारित्र्य, प्रेमभाव याविषयीची त्यांची जी काही मतं व्यक्त झालेली आहेत ती मुळापासूनच वाचण्याजोगी आहेत. स्त्री-सन्मानाविषयी, तिच्या स्वतंत्र अस्तित्वाविषयी, तिच्या देहावर असलेल्या तिच्याच हक्कासंबंधी बाबासाहेब किती जागरूक होते हे या पत्रांमधून सतत ध्वनित होत राहतं. त्या दोघांमधलं प्रेम, अनुनय, ओढ, बौद्धिक वितंडा, रसिकता, अदब, परस्पर-साहचर्य, एकमेकांप्रती असलेला आदर, सन्मान अशा अनेक रंगांनी ही पत्रं रंगलेली आहेत. बाबासाहेबांनी नंतर संसदेत भारतीय स्त्रियांच्या हक्कासंदर्भात ज्या ‘हिंदू कोड बिला'ची मांडणी केली त्याच्या कितीतरी खुणा या पुस्तकात आढळतात. मात्र दुर्दैवाची गोष्ट ही, की ज्या बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलाची निर्मिती करून स्त्रीहक्काचा ओनामा केला त्यांच्याच सुविद्य पत्नीला मात्र बाबासाहेबांची पत्नी असल्याच्या सर्व हक्कांना मुकावं लागलं. 


डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर माईसाहेबांकडेच सगळा झोत वळेल, राजकीय नेतृत्वाच्या दावेदार त्याच होऊ शकतील या भीतीपोटी, असुरक्षिततेपोटी राजकीय महत्त्वाकांक्षेने  पछाडलेल्या काही दलित नेत्यांनी माईंविरुद्ध पद्धतशीर जनमत भडकवायला, बाबासाहेबांवर विषप्रयोग झाला अशी हाकाटी पिटायला सुरुवात केली. त्यांची मजल इथवर पोहचली की, बाबासाहेबांच्या  मृत्यूची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. माईसाहेबांविरुद्ध वादळ उठवून त्यांना आपल्या समाजापासून अलग पाडण्याचा त्यांचा डाव सत्तेच्या भुकेची हीन पातळी दर्शवणारा तर आहेच शिवाय पत्नी या नात्याने बाबासाहेबांना अखेरपर्यंत सक्रीय साथ देणाऱ्या, त्यांची अक्षरशः सेवा करणाऱ्या आणि हिमालयाएवढी उत्तुंग काम त्यांच्या हातून पार पडावीत म्हणून निरंतर दक्ष राहणाऱ्या स्त्रीवर अन्याय करणारा आहे. अर्थात सरकारने चौकशी केली आणि तत्कालीन गृहमंत्री पं. गोविंद वल्लभ पंत यांनी बाबासाहेबांचा मृत्यू सर्वसामान्य स्थितीत आणि नैसर्गिकरित्या झाला असं लोकसभेत एका निवेदनाद्वारे जाहीर केलं ही बाब अलाहिदा. 


२७ मे रोजी रमाईंचा स्मृतिदिन असतो. सर्व बौद्ध समाज या दिवशी विविध स्वरूपाचे उपक्रम करून त्यांना आदरांजली वाहतो. शारदा कबीर ते माईसाहेब आंबेडकर असा यातायातीचा प्रवास करणाऱ्या माईंचा स्मृतिदिन त्यानंतर दोनच दिवसांनी म्हणजे २९ मे रोजी असतो. त्यांच्यासाठीही आपले हात जोडले जातील तेव्हा समतेची, जातिअंताची चळवळ चार पावलं पुढे सरकेल असं मी मानते. त्या दिवसाची मी डोळ्यांत प्राण आणून वाट पाहते आहे!

 

- प्रज्ञा दया पवार

pradnyadpawar@yahoo.com

बातम्या आणखी आहेत...