Home | Magazine | Rasik | Pradnya Daya Pawar write on south cinemas Villains prakash raj

अंधेरे मे एक 'प्रकाश'

प्रज्ञा दया पवार | Update - May 13, 2018, 02:00 AM IST

‘मॅचो हीरों’चा भरणा असलेल्या बॉलीवूडला सत्ताधारी व्यवस्थेने सहज खिशात घातलं आहे. मराठी चित्रसृष्टी ‘तळ्यात-मळ्यात’ करतेय

 • Pradnya Daya Pawar write on south cinemas Villains prakash raj

  ‘मॅचो हीरों’चा भरणा असलेल्या बॉलीवूडला सत्ताधारी व्यवस्थेने सहज खिशात घातलं आहे. मराठी चित्रसृष्टी ‘तळ्यात-मळ्यात’ करतेय. पण तिकडे दक्षिणेत पडद्यावरचा खलनायक, पण वास्तवातला ‘नायक’ शोभणाऱ्या प्रकाश राजने प्रश्न विचारू न देणाऱ्या सत्तेला मोठ्या हिमतीने शिंगावर घेतलंय...

  म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात...’ कवी कुसुमाग्रजांनी रचलेल्या ख्यातनाम गीतातील या ओळी. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी या गीताला स्वर दिला. महाराष्ट्राच्या गल्लीबोळात होणाऱ्या सार्वजनिक उत्सवांच्या वेळी हे गाणं हमखास ऐकायला मिळतं. एका अर्थाने ते महाराष्ट्राचं औपचारिक स्फूर्तीगीतच म्हटलं पाहिजे. पण आज देशात अघोषित आणीबाणीची अटीतटीची स्थिती आलेली असताना, आपल्या सार्वजनिक जीवनातून-जाणीवेतून हे गाणं पूर्णपणे गायब झालं आहे. विशेषतः मराठी सिनेसृष्टीबद्दल तर काय बोलावे! त्यांच्यासाठी जणू ‘अच्छे दिन’च साकारले आहेत. त्यामुळे चित्रपटामागून चित्रपटाचे उत्सव मांडले जात आहेत. परवाचा ‘दशक्रिया’ असो, कालचा ‘गुलाबजाम’ असो की आजचा ‘न्यूड (चित्र)’ असो. एकूणच आनंदाचं वातावरण आहे!


  रोचक बाब म्हणजे, याच ‘न्यूड’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर गोवा चित्रपट महोत्सवात केंद्र शासनाने बंदी घातली होती. त्यावेळी ‘न्यूड’च्या निर्मात्यांना चित्रपटावर बंदी घालणाऱ्या सरकारला न्यायालयात खेचावंसं मात्र वाटलं नाही. जे धाडस ‘एस दुर्गा’ या मल्याळी चित्रपट-निर्मात्यांनी दाखवलं.


  अलीकडेच दिल्लीमध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचं वितरण झालं. देशभरातल्या १३७ चित्रपटकर्मींना या वेळी पुरस्कार मिळणार होते. हे पुरस्कार वर्षानुवर्षे राष्ट्रपतींच्या हस्ते दिले जातात. थेट १९५४पासून! हा पुरस्कार विजेत्यांसाठी चिरस्मरणीय ठरलेला प्रदीर्घ पायंडा गौण ठरून विद्यमान राष्ट्रपतींनी कुठल्याही पुरस्कार वितरण कार्यक्रमाला केवळ एक तास उपस्थित राहण्याचा पाडलेला, नवा पायंडा प्रधान ठरला. परिणामी, केवळ ११ जणांना त्यांच्या हस्ते पुरस्कार देण्याचं ठरवण्यात आलं. तेही ऐनवेळी. वस्तुतः सर्व विजेत्या कलावंतांना जी निमंत्रणपत्रं गेली होती, त्यात राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळेल असं सांगण्यात आलं होतं. तर ‘राष्ट्रपती भवना’च्या म्हणण्यानुसार ही बाब त्यांनी माहिती प्रसारणमंत्रालयाला आधीच कळवली होती, पण जे काही घडलं, त्याने आपली फसवणूक झाल्याचं व १३७मधील ११ जणांनाच, ज्यात ‘सैराट’कारांचाही समावेश होता, त्या निवडकांनाच विशेष वागणूक मिळणार हे लक्षात आल्यावर बहुसंख्य पुरस्कारर्थींनी निषेध म्हणून पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहण्याचं ठरवलं.


  राष्ट्रपतींच्या हस्तेच पुरस्कार घेण्याचा त्यांचा आग्रह रास्त होता, कारण राष्ट्रपतीपद हे कोणत्याही राजकीय पक्षाच्या पलीकडचं असतं. राष्ट्रपतींना जर कार्यक्रमाला उपस्थित राहणं खरोखरच शक्य नसेल तर (जसं एका वर्षी झालंही होतं) त्यांच्याऐवजी उपराष्ट्रपतींनी हे पुरस्कार द्यायला हवे, असा शिष्टाचार आहे आणि तो योग्यही आहे. पण गेल्या चार वर्षात संसदीय परंपरांची पुरेपूर मोडतोड सुरूच आहे, शिवाय योग्यायोग्यतेचं भानही समूळ नष्ट झालेलं आहे. ‘हम करे सो’चा कायदा देशात लागू आहे. आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा वेळ येते तेव्हा, तरी चित्रपटकर्मींनी आपला असंतोष दाखवून देणं अपेक्षित असतं. पण झालं ते भलतंच. सुरुवातीला देशभरातील (विशेषत: दक्षिणेतील) चित्रपटकर्मींच्या बंडाच्या सुरामध्ये सूर मिसळणारे मराठी कलावंत आयत्यावेळी बाजू बदलून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि जयवर्धन राठोड यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारते झाले! एकूण मराठी चित्रपटसृष्टीत आणि ती ज्या बॉलिवूडच्या छायेत वावरत असते, त्या बॉलिवूडमध्ये सध्या तरी या बाबतीत मिट्ट काळोख पसरलेला आहे.


  या पार्श्वभूमीवर, आपल्या शेजारच्या राज्यातील कन्नड अभिनेते ‘प्रकाश’ राज नावाच्या एकांड्या शिलेदाराची घोडदौड जाणून घेणं क्रमप्राप्त ठरावं. २९ जानेवारी २०१८ रोजी मी वर्ध्याला सेवाग्राम आश्रमात होते. कर्नाटकातील ज्येष्ठ पत्रकार व कार्यकर्त्या दिवंगत गौरी लंकेश यांच्या जन्मदिनानिमित्त ‘दक्षिणायन’ आयोजित स्मृतिसभेत एक वक्ता म्हणून. त्या सभेची सांगता एका कन्नड घोषणेने झाली. ‘नानू गौरी, निनू गौरी, नावेल्य गौरी’. म्हणजे ‘मी गौरी, तू गौरी, आम्ही सारेच गौरी’ ही ती घोषणा. अशाच घोषणा डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या झाल्यानंतरही देण्यात आल्या होत्या. अलीकडच्या काळात वेळोवेळी अशा भावनिक घोषणा दिल्या जाताना आपण पाहतो, पण त्या घोषणांवर अंमल होणं तितकंच दुर्लभ असतं. ‘नानू गौरी, निनू गौरी, नावेल्य गौरी’ ही घोषणा देणारे प्रकाश राज यांनी ही अवघड कामगिरी साक्षात केली आहे. ‘कन्नड अभिनेते’ ही त्यांची ओळखही अतिशय सीमित वाटावी अशी आहे. कन्नडसोबतच मल्याळम, तमिळ, तेलगु आणि हिंदी अशा बहुभाषिक चित्रपटांमधून ते दीर्घ काळ वावरत आहेत. ‘खलनायका’च्या भूमिकेत जरी ते बव्हंशी दिसत असले, तरी वास्तव जीवनात ते एकमेव ‘नायक’ या पदावर पोहोचलेले आहेत. म्हणून ही त्यांची विशेष दखल!


  आज गौरीच्या कर्नाटकात विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे. प्रकाश राजही तिथलेच. नेमकी काय आहे त्यांची मोहीम? ती भाजपच्या विरोधात आहे हे नक्की. पण कोणत्याही एका विशिष्ट पक्षाच्या बाजूने नाही. त्याचं कारण म्हणजे, आज देशात ‘वेगळ्या आवाजांना’ स्थानच राहिलेलं नसल्याचं त्यांचं मत आहे. ‘गोदीमीडिया’ (रविशकुमार यांनी लोकप्रिय केलेला शब्द) आणि उच्चजातवर्गीय समर्थक सोडले, तर देशातील प्रत्येक विवेकी माणूस त्यांचं हे म्हणणं मान्य करेल. प्रकाश राज यांच्या प्रचाराचा एकमेव मुद्दा आहे – ‘प्रश्न विचारायचा हक्क हवा!’ त्यासाठी त्यांनी आधी ‘जस्ट आस्किंग’ ही घोषणा दिली. आता याच नावाने एक फाउंडेशन कार्यरत आहे. प्रत्येक जिल्ह्यात त्याच्या शाखा आहेत. प्रकाश राज यांच्या सर्व सभांचे नियोजन या शाखांद्वारे करण्यात येतं. आज त्यांच्यासोबत नामवंत वकील, डॉक्टर,निवृत्त प्रशासकीय अधिकारी, विद्यार्थी, प्राध्यापक, लेखक-कलावंत मोठ्या संख्येने जोडलेले आहेत. भाजपच्या जमातवादी, धर्मवादी राजकारणातून केवळ भारतीय राज्यघटनेलाच धोका पोहचत नाही, तर देशाचा सामाजिक पायाच खचत चालला आहे, यावर या सगळ्यांचं एकमत आहे. विकास आणि सुशासन या ऐरणीच्या मुद्द्यांमध्ये भाजपला काडीचाही रस नाही, असा त्यांचा थेट आरोप आहे.


  प्रकाश राज यांची ही मोहीम कर्नाटकातच नव्हे, तर देशातच आगळी ठरावी अशी आहे. इतर चित्रपट-कलावंताप्रमाणे ते मित्र-उमेदवारांच्या प्रचारात उतरलेले नाहीत (प्राय: बॉलीवूडमधील) किंवा ते स्वतःही निवडणूक लढवत नाहीयेत (प्राय: दक्षिणेतील). तर आपल्या ‘प्रश्नकर्त्या’ मैत्रिणीच्या ‘सनातनी’ हत्येमुळे व्यथित होऊन ते ही वाट चालू लागले आहेत.


  ही वाट अर्थातच सोपी नाही. या वाटेत काटे अधिक आणि हारतुरे कमी. रोजची निंदा-नालस्ती, शिव्याशाप, व्यक्तिगत चारित्र्यावर शिंतोडे, शारीरिक हल्ल्याची सततची टांगती तलवार हे त्यांचं रोजचं वास्तव आहे. या वर्षीच्या जानेवारीमध्ये किनारपट्टीतल्या शिरसी गावातील राघवेंद्र मठामध्ये प्रकाश राज यांनी एका परिषदेत सहभाग घेतला. परिषदेचा विषय होता, ‘आमचे संविधान, आमचा अभिमान’. त्यावेळी उत्तर कन्नडाचे खासदार अनंत हेगडे यांनी केलेल्या ‘हिंदुत्व म्हणजेच राष्ट्रीयत्व’ या विधानावर प्रकाश राज यांनी टीका केली. ‘जन्माच्या आधारावर वंशश्रेष्ठत्वाचा दावा करणाऱ्या हिटलरचे तुम्ही अवतार आहात’, असं ते त्यांना म्हणाले. झालं, भाजपचे कार्यकर्ते भयंकर चिडले. अर्थात, लोकशाहीने बहाल केलेला तो त्यांचा अधिकार होताच म्हणा. पण प्रकाश राज यांचे आरोप सार्वजनिक मंचांवरून खोडून लोकशाहीची वाट सुकर करतील तर ते भाजपचे कार्यकर्ते कसे? उलट त्यांनी ज्या राघवेंद्र मठात संविधान परिषद झाली होती, तो मठ चक्क गोमूत्राने शुद्ध करून टाकला! पण या कृतीनेही त्यांचं समाधान झालं नाही. आख्खे शिरसी गाव गोमूत्राने शुद्ध करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. पण हे अवघड काम आहे असं लक्षात आल्यावर त्यांनी तो बेत गुंडाळून ठेवला. त्यावर प्रतिक्रिया देताना प्रकाश राज म्हणाले, ‘आता मी जिथं जिथं जाईन, तिथं तिथं तुम्ही गोमूत्राचा वापर करणार आहात काय? जस्ट आस्किंग!’


  ‘जेव्हापासून मी मोदी सरकारवर टीकात्मक बोलणं सुरु केलं तेव्हापासून बॉलिवूडमधून मला कामं मिळेनाशी झाली आहेत’, असं त्याचं अलीकडचं विधान बॉलिवूडलाही सवाल करणारं आहे.
  लेखाच्या सुरुवातीला मराठी चित्रपटसृष्टी व बॉलिवूडबद्दल जे मी लिहिलंय, ते अजिबात नवं नाही. अमृत नहाटा यांच्या ‘किस्सा कुर्सी का’ या चित्रपटाचा अपवाद सोडला तर बॉलिवूडने पहिल्या आणीबाणीच्या वेळीही कायमच सत्ताधारी पक्षाच्या वळचणीला राहण्यात समाधान मानलेलं आहे. अर्थात, नहाटा हे स्वतः खासदार होते. खुद्द कलावंतांबद्दल काय बोलावं! आणीबाणीच्या काळात नर्गिसने लंडनच्या दुकानात केलेली ‘उचलेगिरी’ भारतीय लोकांसमोर उघड न करण्यात शिस्तशीर आणीबाणी प्रशासनाने पुरेपूर भूमिका बजावली होती. आणीबाणीचा असा उपयोग करून घेणारे महाभाग आणीबाणीविरोधात ब्र काढतील? सलमान खानची ‘बीइंग ह्युमन’, आमीर खानचे ‘पाणी फाउंडेशन’ आणि नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांचे ‘नाम फाउंडेशन’ ही चित्रपट-कलावंतांच्या सार्वजनिक जीवनातल्या हस्तक्षेपाची हद्द ठरते आहे. जी झळाळी ‘नानू गौरी, निनू गौरी, नावेल्य गौरी’ या घोषणेला प्रकाश राज यांनी प्राप्त करून दिली तशी ‘वेडात दौडले’ या स्फूर्तिगीताच्या वाट्याला कधी काळी येईल का? शक्यता कमीच आहे.

  -प्रज्ञा दया पवार
  pradnyadpawar@gmail.com

 • Pradnya Daya Pawar write on south cinemas Villains prakash raj

Trending