आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काव्‍यगत न्‍याय!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वयाची साठहून अधिक वर्षं शंकराचार्य पदावर राहिलेल्या जयेंद्र सरस्वती यांचे अलीकडेच निधन झाले. विधवा महिलांशी संवाद न साधण्याच्या धर्मनियमाला जागून एकेकाळी त्यांनी पंतप्रधान इंदिरा गांधींशी संवाद टाळला, तर हत्येच्या आरोपाखाली जयललिता यांनी त्यांना अटकेत टाकण्याचे आदेश दिले. त्यांचे जाणे तसे दुर्लक्षितच राहिले...

 

र्ष १९८०. स्थळ सातारा. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी व्यक्तिशः कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांच्या खास भेटीसाठी आल्या होत्या. त्या दरम्यान जयेंद्र सरस्वती यांचं साताऱ्यात जवळपास वर्षभर वास्तव्य होतं. इंदिरा गांधींच्या आधीही देशभरातून अनेक मातब्बर मंडळी साताऱ्याला येऊन शंकराचार्यांची आशीर्वादवजा गाठभेट घेऊन गेली होती.


इंदिरा गांधी आणि शंकराचार्य यांच्या भेटीचा प्रसंग हा अफलातूनच म्हणायला हवा. जयेंद्र सरस्वती खोलीत उच्चासनावर बसलेले. खोलीच्या खिडकीच्या बाहेर खाली फरशीवर इंदिरा गांधी बसलेल्या. इंदिरा गांधींच्या शेजारी त्यांचे वरिष्ठ अधिकारी आणि खोलीमध्ये शंकराचार्यांचे सहकारी उभे. त्या पूर्ण वेळेत शंकराचार्य इंदिराजींशी अवाक्षरही बोलले नाहीत. काही वेळाने त्यांनी त्यांचा हात आशीर्वाद देण्यासाठी म्हणून एकदा वर केला. इंदिराजी मठाबाहेर पडल्या. शंकराचार्य इंदिराजींशी बोलले नाहीत, कारण त्यांनी त्या वेळी मौन व्रत धारण केलं होतं म्हणून नव्हे, तर इंदिराजी विधवा होत्या आणि विधवा असलेल्या स्त्रीशी शंकराचार्याने बोलणं टाळावं, या धार्मिक यमनियमाचं ते पालन करत होते. हा सगळा आंखो देखा हाल उघड झाला, तो तिथे उपस्थित असलेल्या स्थानिक पत्रकार विजय मांडके यांच्या जागरूकतेमुळे. त्यांनी स्वतः हे दृश्य पाहिलं म्हणून त्यांचा त्यावर विश्वास बसला! पण जेव्हा इंदिराजींच्या सातारा भेटीचं वृत्तांकन करण्यासाठी पुण्याहून आलेल्या काही पत्रकारांना ते ही गोष्ट सांगू लागले, तेव्हा त्या पत्रकारांचाही त्यावर विश्वास बसेना. अखेर मराठी व इंग्रजी वर्तमानपत्रांत या भेटीच्या तपशिलात बातम्या आल्या आणि राज्यात एकच खळबळ माजली.


इंदिरा गांधींना अशी जालीम वागणूक देणाऱ्या शंकराचार्यांविषयी नकारात्मक चर्चा सुरू झाली ती या प्रसंगानंतर. त्यात भर पडली ती तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी आणि डॉ. आ. ह. साळुंखे यांनी घेतलेल्या त्यांच्या मुलाखतीने. शंकराचार्यांच्या नकळत ही मुलाखत रेकॉर्ड करण्यात आली होती. त्यातून त्यांचे विषमतावादी विचार, विशेषतः जातिव्यवस्थेसंबंधीचे आणि स्त्रियांसंबंधीचे सनातनी विचार जगासमोर उघड झाले. त्यानंतर पुन्हा एकदा ते माध्यमांच्या झोतात आले आणि त्यांचा निषेध होऊ लागला. लवकरच जयेंद्र सरस्वतींना सातारा सोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्या वेळी वयाच्या चाळिशीत असलेले शंकराचार्य हे त्यांच्या गुरूंच्या म्हणजे ‘परमाचार्यांच्या’ - चंद्रशेखरेंद्र यांच्या छत्रछायेखाली होते. पण त्या छत्रछायेतून बाहेर पडण्याची नांदीच एका अर्थाने साताऱ्यात झाली, असं म्हणता येईल. साताऱ्यातल्या या प्रसंगामुळे त्यांची प्रतिमा सनातनी, कडव्या रूपात समोर आलेली असली, तरी ती पुरेशी नव्हती. त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा तो केवळ एक दर्शनी भाग होता.


त्यांचे गुरू व कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य चंद्रशेखरेंद्र यांची धार्मिक वर्तुळात एक अत्यंत ज्ञानी, सर्वार्थाने संत व्यक्तिमत्त्व अशी ओळख होती. बाह्य जगापासून त्यांचं जग स्वतंत्रच होतं. पण जयेंद्र सरस्वती यांची प्रकृती मात्र भिन्न होती. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रातील त्यांचा लीलया वावर आणि हिंदू - वैदिक धर्माला आम बहुजन लोकांमध्ये घेऊन जाण्याची त्यांची आकांक्षा, त्यासाठी ख्रिस्ती धर्मप्रसारकांप्रमाणे मिशनरी कृतिशील भूमिका या सगळ्यामुळे एक हरहुन्नरी व्यवस्थापक अशी त्यांची ओळख दृढ होत गेली. 


१९९४मध्ये झालेल्या परमाचार्यांच्या मृत्यूनंतर शंकराचार्यांचा मुकुट परिधान करणाऱ्या जयेंद्र सरस्वती यांनी अल्पावधीतच मठाचा चौफेर कार्यविस्तार करत मोठी संपत्ती जमा केली. ८०च्या दशकात चेन्नईमधील तांबरम येथे त्यांनी एक हिंदू मिशन हॉस्पिटल सुरू केलं होतं. गेल्या पाव शतकात मठाने सुरू केलेली तब्बल ४४ हॉस्पिटल्स कार्यप्रवण आहेत. याशिवाय शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी काम उभं केलं. केवळ धार्मिक शिक्षणच नव्हे, तर कांचीपुरम येथे अभिमत विद्यापीठ आणि तांबरम येथे सीबीएसई शाळा सुरू करून मठाचा संस्थात्मक विस्तार त्यांनी केला. एकेकाळी आर्थिक वंचनेत असलेल्या आपल्या मठाला समृद्ध स्थितीत आणण्यात जयेंद्र सरस्वती यांची भूमिका कळीची ठरली. 


लवकरच जयेंद्र सरस्वती हे वेगवेगळ्या निमित्ताने आपले विचार जाहीरपणे मांडू लागले. विशेषतः रामजन्मभूमी - बाबरी मशिदीचा पेच सोडवण्यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आणि त्यायोगे ते सातत्याने मीडियासमोर येत राहिले. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असण्याच्या काळात जणू त्यांना हिंदू गटाचे प्रतिनिधी म्हणून अधिमान्यता मिळाल्यासारखीच होती. राम जन्मभूमी - बाबरी मशिदीचा वाद ते मिटवू शकले नाहीत, हे तर खरंच; पण लवकरच त्यांच्या धार्मिक नेतृत्वाला आव्हान उभं राहिलं, तेही त्यांच्या कर्मभूमी कांचीपुरममध्येच.


मठाची ‘अर्थपूर्ण’ व्यवस्थापकीय घडी बसवणाऱ्या जयेंद्र सरस्वती यांना त्याची किंमत चुकवावी लागली, यात काही नवल नाही. त्यांच्यावर आर्थिक अफरातफरीचे आरोप झाले. याबरोबरच खोटेपणा, फसवणूक, स्त्रियांची फसवणूक हे आरोपही कधी निनावी पत्रांद्वारे, तर कधी उघड उघड केले गेले. २००१मध्ये जेव्हा त्यांनी चीनला जायचं ठरवलं तेव्हा धर्मशास्त्र परंपरेनुसार ते विमानाने प्रवास करू शकत नसल्याचं कारण सांगून त्यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली गेली. व्यवस्थापनाच्या नावाखाली ते कांची मठाचं गैरव्यवस्थापन करत असून शासनाने त्यात हस्तक्षेप करावा, अशीही मागणी करण्यात आली.


कांचीपुरममधील वरदराज पेरुमल मंदिराचे व्यवस्थापक शंकररमण, जे पूर्वी जयेंद्र सरस्वतींचे सहायक होते, त्यांचा या विरोधी मोहिमेमध्ये मुख्य हात होता. २००४च्या दिवाळीत शंकररमण यांची मंदिराच्या प्रांगणात काही हल्लेखोरांनी हत्या केली आणि ही हत्या घडवल्याचा आळ थेट जयेंद्र सरस्वतींवर आला. 


त्यांच्याविरुद्ध प्रबळ व ठोस पुरावा असल्याचं पोलिसांनी सांगितलं. द्रविड मुनेत्र कळघमने त्यांना पकडलं जावं यासाठी आंदोलन छेडलं. तामिळनाडूच्या इतिहासात पहिल्यांदाच द्रमुक आणि अण्णाद्रमुक यांचं शंकराचार्यांबाबत एकमत झालं आणि अखेर जयेंद्र सरस्वती यांना तसंच त्यांचे नियुक्त वारसदार विजयेंद्र सरस्वती यांना अटक करण्यात आली. शंकराचार्यांच्या अटकेची बातमी देशभर पसरली. त्या वेळी तामिळनाडूच्या मुख्यमंत्री होत्या जे. जयललिता. जयललितांची प्रतिमा काही धर्मसुधारक, विवेकवादी, नास्तिक अशी अजिबात नव्हती. उलट त्यांनी जयेंद्र सरस्वती यांच्याबरोबर अनेक अर्थपूर्ण व्यवहारही केले होते. त्या व्यवहारात काही व्यावहारिक समस्या निर्माण झाल्यामुळेच त्यांनी हे असं टोकाचं पाऊल उचललं असल्याची बोलवा राज्यात होती. 


कायद्यासमोर सगळे समान असतात, अगदी शंकराचार्य असले तरी त्यांची आम्ही जराही गय करत नाही, असा मेसेज जयललिता यांनी त्या वेळी आपल्या कृतीद्वारे देऊ पाहिला. पुढे हे प्रकरण न्यायालयात गेलं. तामिळनाडूमध्ये ते वस्तुनिष्ठपणे हाताळलं जाणार नाही. म्हणून ते दुसऱ्या राज्यात चालवलं जावं, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात शंकराचार्यांच्या वकिलांनी दाखल केली. कोर्टाने त्यांचं म्हणणं ग्राह्य धरत हा खटला शेजारच्या पुडुचेरी राज्यात चालवण्याचा आदेश दिला. तब्बल दहा वर्षांनी दोघेही शंकराचार्य तसंच अन्य सर्व आरोपी निर्दोष सुटले. १८१ साक्षीदारांपैकी ८४ जणांनी आपल्या साक्षी फिरवल्या आणि निकाल आरोपींच्या बाजूने झुकला. पुडुचेरी सरकारने निर्णयाच्या विरोधात अपील न करण्याचा निर्णय घेऊन आपला कल स्पष्ट केला. नुकतंच २८ फेब्रुवारी रोजी ८२ वर्षांच्या जयेंद्र सरस्वती यांचं निधन झालं. वयाची साठहून अधिक वर्षं शंकराचार्य या पदावर राहिल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. तरीही त्यांच्या जाण्याची विशेष दखल घेतली गेल्याचं दिसत नाही. २८ फेब्रुवारीलाच तामिळनाडूच्याच दुसऱ्या कन्येच्या, अभिनेत्री श्रीदेवीच्या निघालेल्या अंत्ययात्रेमध्ये त्यांची बातमी कुठल्या कुठं लुप्त होऊन गेली, ते कळलंही नाही.
धर्मशास्त्राचे दाखले देत पंतप्रधानपदी असलेल्या ‘लोह-स्त्री’ इंदिरा गांधी यांना स्त्रीसंदर्भातल्या कर्मठ संहितेमुळे  अंतरावर ठेवणाऱ्या शंकराचार्यांना विधीशास्त्राचे दाखले देत दुसऱ्या ‘लोह-स्त्री’च्या म्हणजेच जयललिता यांच्या निर्धारामुळे दोन-अडीच महिन्यांचा कारावास घडावा, हा तसा काव्यगत न्यायच म्हटला पाहिजे! 


- प्रज्ञा दया पवार
pradnyadpawar@yahoo.com

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटो... 

 

बातम्या आणखी आहेत...