Home | Magazine | Madhurima | Prajakta Dekhale writes about ASHA workers

ग्रामीण आरोग्‍याची 'आशा'

प्राजक्ता ढेकळे, पुणे | Update - Jun 05, 2018, 12:59 AM IST

ग्रामीण आरोग्य सुधारण्यात मोलाचा वाटा असतो तो ‘आशा’ स्वयंसेविकांचा. खासकरून महिला व लहान मुलींच्या आरोग्याची प्रत या आशा

 • Prajakta Dekhale writes about ASHA workers
  सुजाता कोळी.

  ग्रामीण आरोग्य सुधारण्यात मोलाचा वाटा असतो तो ‘आशा’ स्वयंसेविकांचा. खासकरून महिला व लहान मुलींच्या आरोग्याची प्रत या आशा सेविकांमुळे नक्कीच सुधारते आहे.


  यवतमाळ जिल्ह्यात असणाऱ्या झरीजामणी तालुक्यातील आदिवासी पाड्यावरती राहणारी सुनीता (नाव बदलेले आहे) सांगते, ‘गर्भवती राहिल्यानंतर आधी कोणत्याही प्रकारची तपासणी केली जायची नाय. बाळंतपणही घरीच केले जायचे. त्यात गावातल्या एक-दोन बायका दगावल्या. पण करणार काय, आमच्या पाड्यावरून सरकारी दवाखाना लय लांब हाय. डॉक्टरकडे गेलं तरी त्यांची भाषा आम्हाला समजायची नाय. मग लोक म्हणायचे जाऊन तरी काय उपयोग? पण मागच्या काही वर्षांपासून गावात आशा म्हणून काम करणारी बाय आली. ती गरोदर बाईला सगळं सांगती, तपासणीसाठीपण घेऊन जाती. ती आशा स्वत: डॉक्टरशी बोलती, त्यामुळे आम्हाला काही अडचणी नाय येत आता.’ यांसारख्या अनेक महिला आपले अनुभव सांगतात.

  जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या पाहणीनुसार दर तासाला पाच गर्भवती महिलांचा मृत्यू हा केवळ बाळंतपणात येणाऱ्या विविध अडचणींमुळे होतो. गर्भवती महिलांच्या मृत्यूला आळा घालण्याचे काम अलीकडच्या काळात आशा स्वयंसेविका करत आहेत. बालमृत्यू आणि मातामृत्यूचे प्रमाण कमी करणे, जननी सुरक्षा योजना राबवणे यांसारख्या अनेक पायाभूत आरोग्य सुविधा आशा स्वयंसेविका देत आहेत. ग्रामीणा समाजजीवन आणि प्रशासकीय आरोग्यव्यवस्था यांच्यामधील दुवा म्हणून त्या कार्यरत आहेत. जत तालुक्यातील कुडनुर गावच्या आशा स्वयंसेविका सुजाता कोळी सांगतात, ‘आमच्या १८०० लोकसंख्येच्या गावात आशा वर्कर म्हणून काम करत असताना लोकांचा सुरुवातीचा प्रतिसाद हा अत्यंत अल्प होता. बऱ्याचदा आपण त्यांना घरी जाऊन माहिती दिली तरी लोक लक्ष देत नसत. नंतर मात्र महिला त्यांच्या मासिक पाळी, पाळणा लांबवणे यांसारख्या आरोग्यविषयक समस्यांच्या संदर्भात बोलू लागल्या. गर्भपाताच्या संदर्भात नियमित तपासणी करण्यासाठी मार्गदर्शन करत असताना, बऱ्याचदा बाळाची वाढ नीट झाली नसेल तर कायदेशीर गर्भपात करण्याचा सल्लादेखील दिला जातो.

  आशा स्वयंसेविकांमुळे गावातील प्राथमिक आरोग्याच्या सुधारणा होण्यास मदत होत आहे. अनेकदा ग्रामीण भागात संवाद नसतो, स्वत:च्या आरोग्याविषयी खुल्या मनाने बोलले जात नाही. मात्र आशा स्वयंसेविकांमुळे महिला आपल्या समस्या जाणीवपूर्वक त्यांच्यासमोर समस्या मांडत आहेत. याविषयी सांगताना खटाव तालुक्यातील दिडवाघवाडी गावच्या आशा स्वयंसेविका मुक्ता गुटुकडे सांगतात, ‘सुरुवातीला जेव्हा २००९मध्ये आशा स्वयंसेविका म्हणून मी काम करू लागले तेव्हा लोकांचा त्याचे फारसे महत्त्व वाटत नव्हते. मात्र हळूहळू त्यांच्याशी बोलून आरोग्याबद्दल माहिती देऊ लागले. ग्रामीण भागात पूर्वी आणि आताही हव्या तेवढ्या प्रमाणात आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे लहान मुलांना आवश्यक असणाऱ्या लसीकरणाच्या सुविधा त्यांना मिळता नव्हत्या. गर्भवती महिलांची आरोग्य तपसणी वेळच्या वेळी होत नसे, आता आशाच्या कामामुळे त्यांना सरकारी दवाखान्यात तपासणीसाठी नेणे सहज शक्य होत आहे. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने होणारे गर्भपात टाळण्यास मदत होत आहे. मासिक पाळीविषयीच्या समस्यांबाबतही महिला आता खुल्या मनाने बोलू लागल्या आहेत. गावातील लोक आता आरोग्यविषयक समस्या स्वत: येऊन बोलू लागल्यामुळे काम करताना आनंद वाटतो.’

  ग्रामीण भागात असलेल्या अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे बालमृत्यू आणि माता मृत्यूंच्या दराची आकडेवारी आशा स्वयंसेविकांची नियुक्ती करावयाच्या आधी मोठ्या प्रमाणात वाढली होती. मात्र आशांच्या नियुक्तीमुळे सरकारी वा खासगी दवाखान्यात बाळंतपण होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढून मागील काही वर्षांत ते ६४.४ टक्क्यांवरून ९०.३ टक्के इतके वाढल्याचे शासनाच्या पाहणीमधून दिसून आले आहे. तसेच देशातला बालमृत्यूदर हा दर हजार बालकांमागे ३७वरून २४वर आला आहे. यवतामाळमधील कुमारी मातांच्या वाढत्या समस्येला आळा घालण्याचे काम येथे काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांमुळे शक्य होत आहे. याविषयी बोलताना यवतमाळ जिह्यातील महिला व बालकल्याणमध्ये काम करणारे वरिष्ठ अधिकारी सांगतात, ‘आशा स्वयंसेविकांची खूप जास्त मदत कुमारी मातांचा प्रश्न सोडवताना होत आहे. गावोगावी असलेल्या आशांमुळे तिथल्या कुमारी मातांच्या संख्या कळण्यास मदत होते. याबरोबरच कुमारी मातांचे समुपदेशन करताना आशा सहकाऱ्याची भूमिका पार पाडत असतात. स्थानिक लोकांची भाषा आणि समुपदेशन करणाऱ्याच्या भाषेतील अडसर दूर करून एका दुवा साधण्याचे काम त्या करत असतात. अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण होऊ नये, यासाठी देखील येथील आशा जाणीवजागृती करत असतात. बऱ्याचदा गावपातळीवरील आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी स्थानिक लोकांना आशांची खूप मोठी मदत होत असते.

  आशा म्हणजे Accredited Social Health Activist.
  राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियाना अंतर्गत ग्रामस्तरावर सुविधा पुरवण्यासाठी आशांचा उपयोग होत आहे. ग्रामीण जनता व आरोग्य यांच्यामध्ये मध्यस्थी करण्याचे काम आशा स्वयंसेविका करत असतात. बिगर-आदिवासींमध्ये पंधराशे लोकसंख्येमागे एक आशा स्वयंसेविका तर आदिवासी भागांमध्ये एक हजार लोकसंख्येमागे एक आशा नियुक्त करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील लोकांना स्वच्छता, लसीकरण यांचे महत्त्व पटवून देण्यासाठी तसेच ताप, हगवण, लहानमोठ्या जखमा यांवरील प्राथमिक स्वरूपाचे उपचार करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात येते. तसेच DOTS, FOLIC ASID आणि CHLOROQIN सारख्या इतर औषधांचे वाटप करण्याचे काम आशांमार्फत केले जाते. त्याचप्रमाणे आरोग्यविषयक गंभीर परिणाम निर्माण झाल्यास संबंधित यंत्रणेला माहिती देण्याची जबाबदारी आशांवर असते. ग्रामीण भागातील आशा या स्वयंसेवक पद्धतीने जरी काम करीत असल्या तरी त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना प्रोत्साहनपर वेतनभत्ते देण्याची तरतूद करण्यात आली आहे. याद्वारे आशांना एका प्रकारचा रोजगार उपलब्ध करून दिला जातो.

  आशा स्वयंसेविकेची वैशिष्ट्ये
  - आरोग्यविषयक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आशा ओळखल्या जातात.
  - समाजात आरोग्यविषयक कोणतेही प्रश्न निर्माण झाल्यास प्रथम आशाला कळवले जाते.
  - समाजात आरोग्यविषयक जागृकता निर्माण करण्याचे काम आशा करत असतात.
  - आरोग्यविषयक सेवांना चालना देण्याचे काम आशामार्फत केले जाते.
  - राज्यातील १५ आदिवासी व ३१ बिगर आदिवासी जिल्ह्यांमध्ये आशा कार्यरत आहेत.
  - आशाला मिळणारे वेतन/ प्रोत्साहनपर वेतन भत्ते हे तिच्या कार्य (दर्जा ) करण्यावर अवलंबून असते.
  - आदिवासी क्षेत्रामध्ये एका हजार लोकसंख्येमागे एक याप्रमाणे आशाची नियुक्ती केली जाते. त्यांचे शिक्षण आठवीपर्यंत झालेले असते. त्यांचे वय वीस ते पंचेचाळीसपर्यंत असते.

  एक हजार लोकसंख्या असलेल्या डपळापूर गावातील राजश्री वाघमारे म्हणतात, ‘आशा म्हणून काम करायला लागले तेव्हापासून अनेक महिला आपल्या आरोग्यविषयक समस्या सांगू लागल्या. गरोदर मातांना भेटून नियमित तपासणी करावी या संदर्भात महिलांना सांगत असते. याबरोबरच लहान मुलांचे वेळेत लसीकरण मिळावे यासाठी मी नेहमीच आग्रही असते. आरोग्यविषयक पाहण्यादेखील करत असते.’

  prajaktadhekale1@gmail.com

 • Prajakta Dekhale writes about ASHA workers
  राजश्री वाघमारे.

Trending