आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चुलीची जागा गॅस घेतो तेव्‍हा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खेड्यांमध्ये अनेक पिढ्यांपासून अन्न शिजवण्यासाठी लाकडाचा इंधन म्हणून वापर करण्यात येत होता. मात्र प्रधानमंत्री उज्ज्वला योजना राबवल्यापासून ग्रामीण महिलांचं दैनंदिन जीवन बदललं. या वेळच्या लेखात याच बदललेल्या जीवनपद्धतीबद्दल...


चालू वर्षीच्या अर्थसंकल्पात विविध प्रकारच्या योजना जाहीर करताना अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आत्तापर्यंत ३ कोटी ४७ लाख आर्थिक दुर्बल गटातील घरांत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत एलपीजी गॅसचे कनेक्शन देण्यात आल्याचे सांगितले. ही योजना १ मे २०१६ रोजी सुरू करण्यात आली आहे. भारतात सरकारी आकडेवारीनुसार २४ कोटी घरं असून त्यातील सुमारे १० कोटी कुटुंबांकडे स्वच्छ इंधन (एलपीजी) आत्तापर्यंत पोहोचले नव्हते. त्यामुळे ही कुटुंबं पारंपरिक इंधनाचे स्रोत म्हणजे लाकडावर अवलंबून होती. परंतु जंगलांच्या ऱ्हासामुळे लाकूड मिळणेही कठीण होत चालले आहे. तसेच लाकूड स्वच्छ इंधन नसल्यामुळे त्याच्या ज्वलनातून मोठ्या प्रमाणावर धूर बाहेर पडतो तो घरातील सदस्यांच्या श्वसनावाटे शरीरात जातो. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालावरून एक महिला जेव्हा एक तास लाकूड जाळून स्वयंपाक करते तेव्हा तिच्या शरीरात ४०० सिगारेट ओडल्यावर जेवढा धूर जातो तेवढाच धूर त्या एका तासात जातो. त्यामुळे या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी देशातील उर्वरित ७ कोटीपेक्षा अधिक घरांना गॅसचे कनेक्शन (स्वच्छ इंधन) देणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे चुलीपासून महिलांची मुक्तता व्हायची शक्यता आहे. 


महिला म्हणजे चूल आणि मूल अशी म्हण आपल्याकडे प्रचलीत आहे. ‘जाळ झाला ह्या चुलीचा तरी पेटंना, फुकून फुकून आताडी पाक गळ्याला आली.’ चुलीतील लाकडं विझल्यामुळे घरभर पसरलेला धूर आणि परातीतील भाकरी मळतानाच पीठ लागलेल्या एका हातात फुकणी घेऊन धूर विझवून व्यवस्थित जाळ करतानाची होणारी बायकांची तगमग, यांतून बाहेर पडलेली यांसारखी अनेक वाक्यं कमी-अधिक प्रमाणात खेड्यातील महिलांच्या तोंडात नेहमी ऐकायला मिळतात.


खेड्यांमध्ये अनेक पिढ्यांपासून अन्न शिजवण्यासाठी लाकडाचा इंधन म्हणून वापर करण्यात येत आहे. मात्र प्रधानमंत्री उज्ज्वला योजना राबवल्यापासून ग्रामीण महिलांच्या दैनंदिन जीवनात झालेले बदल आणि या बदललेल्या जीवनपद्धतीचे काही गमतीदार किस्से पाहू.


“काय त्या गॅसचं भदं आणून ठेवलंय घरात, जेवणाला काडीची चव लागत नाय. अवं भाकरी तर चिकलाच्या लगद्यागत व्हत्याय. तुम्ही कायबी म्हणा, पण चुलीवर गव्हळी गव्हळी भजून त्या भाकरीला खरपूस असा आलेला पापुद्रा असलेली भाकरी लयच गॉड लागती बघा!”


अगदी आता आतापर्यंत घरात स्वयंपाकासाठी गॅस घेणे. हे केवळ नोकरदार वर्ग, आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या लोकांनाच शक्य होते. एखाद्याच्या घरात गॅस असला तरी बायका कुजबुजायच्या, तिचं काय बया गॅसावर सयपाक करतीय, तिला कशाची कमी... यासारखे अनेक आर्थिक निकष हे घरातील गॅसवरून बऱ्याचदा ठरवले जायचे. या सगळ्याला कारणंही तशीच होती. घरातील सगळा पसारा आवरून गावातीला अनेक बायका जळणाच्या शोधात घराच्या बाहेर पडायच्या. वढ्या-वगळीनं, पांदीनं हिंडून जळण गोळा करायच्या. तर कधी वली येडपाटाची काटेरी झुडप तोडून त्याच्या फेसाट्या बांधून मोळ्या घरी आणून टाकयाच्या. या जळणाच्या शोधात महिलांनी किती चपल्या झिजवल्या असतील त्याची गणती नाही. मात्र, आता घरात नुकताच गॅस आलेल्या बायका चुलीविषयी म्हणतात, ‘जळणाची वझी आणून आणून टाळूला केस राहिला नाय बाय आमच्या,आमची अर्धी जिंदगी तर जळण आणण्यात आणि चुलीचा जाळ फुकण्यातच गेली बघ. असं वाटलं व्हतं, वड्याकडं जासतोर (मरेपर्यंत) जळण काय आमचा पिच्छा सोडत नाही.’


या गॅसमुळे जरा तरी जिवाला आराम मिळतोय बघ, अगं गॅसमुळे स्वयंपाक तरी लवकर होतोय. त्यामुळे बाकीची कामे पण पटापटा व्हतात. चुलीवर सयपाक करून रानातली काम बघायची म्हणलं की, आधी लय वढाताण व्हायची. जळणासाठी कधी कधी रानातलं काम करताना जेवनाच्या सुटीत कसं तरी जेवन आटपून उरलेल्या वेळात जळन गोळा करायला लागायचे. कधी कधी वली लाकडं पेटायची कमी आणि धुपायचीच जास्त, नको वाटायचा जीव, असं वाटतं बहुतेक बायांना.


याउलट आता घरात वापरत असलेल्या गॅसविषयी आजीच्या पिढीच्या मंडळींचं वेगळंच मत ऐकायला मिळतं. त्यांच्या म्हणणं असतं, ‘आता काय घरात गॅस आलाय. बटान दाबलं की, दहा मिनिटात झालं काम. मग काय? घरातल्या बायका झाल्याच मोकळ्या गप्पा झोडायला. आमच्या काळात नव्हतं बाई असं, आम्ही घरचं-दारचं सगळं आवरून जळणाची वझी आणून टाकायचो. जत्रंसाठी, पावसाळ्यासाठी जळणाची साठवन आधीच करून ठेवायचो. गुरांच्या शेणाच्या गवऱ्या लावून ठेवायचो.’


चुलीवर बनवलेल्या अन्नासारखी चव गॅसवर बनवलेल्या अन्नाला नाही, असं माझ्या आजीला व आजीच्या पिढ्यातील अनेकींना वाटतं. प्रधानमंत्री उज्ज्वल भविष्य योजनेअंतर्गत जेव्हा २०१६मध्ये पहिल्यांदा सुरुवात झाली तेव्हा गावोगावी पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या चुलीचा ताबा गॅसने घेतला आणि हे ऐकू येऊ लागले.


‘बटान दाबलं की, जाळ सुरू, अन्न दहा मिनिटात तर शिजतंय देखील. त्याला काय चव आहे व्हय!’
चुलीवर लोखंडी खोलगट तव्यात केलेले वशाटाचे कालवन तर मंदाळ गोड लागते बघ.


नुसतं त्याच नाही तर सणासुदीला केलेल्या पुराणाच्या पोळ्या किती चव लागती बघ. यासारखी अनेक संवाद ग्रामीण भागत सर्रास ऐकायला मिळतात. गॅस योजनेमुळे अनेक घरात आता गॅस घेतल्यामुळे महिलावर्गात एक समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.


वाखरी गावातील नर्मदा मोहितेआजी या गॅसविषयी म्हणतात, ‘अगं, माझ्यासारख्या सत्तरीकडे झुकलेल्या म्हातारीला गॅस योजनेतून गावाने गॅस दिला ही लय उपकाराची बाब हाय बघ. नायतर मला एकट्या म्हातारीला जळण आणणं, लय अवघड व्हायचं. कधी कधी शेजारच्या बायकाच आणून द्यायच्या जळण. पण या योजनेमुळे मला खूप फायदा झाला.’


या योजनेमुळे आज ग्रामीण भागातील गावं, वाड्यावस्त्यांवर गॅस पोचलेला आहे. घरातील चुलीची जागा गॅस कट्ट्याने घेतली. घरभर होणारा होणारा धूर अन त्यामुळे होणारी डोळ्यांची जळजळ थांबून लहानासह मोठ्यांची होणारी चिडचीडदेखील थांबली आहे.


- प्राजक्ता ढेकळे, पुणे
prajaktadhekale1@gmail.com 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटो...