एक मुरळीने मांडलाय / एक मुरळीने मांडलाय जागर

कधी संबळ, तर कधी दिमडीच्या वाद्यावर आपला हात चालवत आपल्या वाघ्याच्या सहकार्याने जागरण गोंधळाचा पारंपरिक कार्यक्रम पार पाडत आपल्या सांस्कृतिक कलेचा वारसा जपण्याचे कार्य मथुरा मुरळी करत आहे.

Jun 19,2018 03:00:00 AM IST

कधी संबळ, तर कधी दिमडीच्या वाद्यावर आपला हात चालवत आपल्या वाघ्याच्या सहकार्याने जागरण गोंधळाचा पारंपरिक कार्यक्रम पार पाडत आपल्या सांस्कृतिक कलेचा वारसा जपण्याचे कार्य मथुरा मुरळी करत आहे.

जागर मांडला जागराला यावे...
जेजुरीच्या खंडेराया जागरणाला यावे...’
पुण्यापासून साधारण ५१ किमी अंतरावर असलेल्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीत ही मथुरा मुरळी आपली कला सादर करते. दर दिवशी येणाऱ्या अनेक भाविकांच्या वतीने जागरण गोंधळाचा कार्यक्रम करण्याचे काम ही मथुरा मुरळी आपल्या सहकाऱ्यांसोबत करतेय.
महाराष्ट्राच्या आराध्य दैवतांपैकी जेजुरीचा खंडोबा हे एक दैवत. या देवस्थानच्या ठिकाणी परंपरागत चालत आलेली जागर-गोंधळाची प्रथा आजही पूर्वीच्याच उत्साहात चालवली जाते. मात्र मथुरा मुरळी इतर वाघ्या-मुरळी कथा आणि व्यथा इतरांपेक्षा वेगळी आहे. या मुरळीने परंपरेने चालत आलेली प्रथा मोडत केवळ हातामध्ये घाटी घेऊन जागरण गोंधळ न करता तिने त्याला संबळ आणि खर्चीची जोड देत आपल्या कर्तबगारीचा ठसा उमटवला आहे.


जागरण गोंधळाच्या कार्यक्रमात संबळ आणि खर्ची ही मर्दानी वाद्यं असल्याचा अलिखित नियम मोडून काढण्याचे काम या मथुरा मुरळीने हे वाद्य वाजवून केले आहे. जेजुरीतच जन्मलेल्या मथुराचे बालपण जेजुरी गडाच्या सान्निध्यातच गेले. आईवडिलांबरोबर वयाच्या सातव्या वर्षापासूनच ती खंडोबाची मुरळी म्हणून काम करू लागली. मात्र, लहान वयात हे काम करत असताना तिने वडिलांची संबळ व खर्ची वाजवण्याची कला आत्मसात केली. गायनाबरोबरच हळूहळू या वाद्यावरही तिने हातोटी निर्माण केली. आज ती ही वाद्यं वाजवण्यात निष्णात आहे. मथुरा सांगते, ‘जेव्हा मी ही वाद्यं वाजवायला शिकत होते तेव्हा माझ्या आईवडिलांनी मला प्रोत्साहित केले. आजूबाजूचे लोकही एखाद्यालाच असं जमतं, पोरीचा हात चांगला आहे, असं म्हणत वाजवण्यासाठी मला प्रेरित करायचे. त्यातूनच अत्यंत चांगल्या पद्धतीने वाजवायला शिकले. याशिवाय जेजुरी गडावरील स्व. मुरळी पारूबाई सातपुते यांच्याकडूनही मी ही वाद्यं वाजवण्यासाठीचा हात पक्का केला. जेजुरी गडावर पूर्वी पारूबाई अशा प्रकारचे वाद्याचे वादन करायच्या, त्यांच्याच वारसा पुढे चालवण्याचे काम मी आज करत आहे याचा आनंद वाटतो.


आज जेजुरी गडावर असलेल्या पन्नास ते साठ वाघ्या-मुरळीच्या जोड्यांमधील मथुरा ही एकमेव मुरळी आहे, जी आजपर्यंत केवळ पुरुषाकडून (वाघ्या) वाजवली जाणारी वाद्यं अत्यंत दिमाखात वाजवत असते. मथुरा सांगते, ‘पूर्वी जागरण गोंधळाच्या कार्यक्रमात मुरळी केवळ हातात घाटी घेऊन सादरीकरण करायची, मात्र जेव्हा मी गळ्यात संबळ अडकवून वाजवायला सुरुवात केली तेव्हा लोक माझ्याकडे कौतुकाने बघायचे. कधी टाळ्या वाजवून, तर कधी बक्षीस देऊन माझे कौतुक करायचे. मात्र, तो काळ आता राहिला नाही.’ समाजाच्या सध्याच्या वर्तनावर अत्यंत कडक आणि बोचऱ्या शब्दांत ती बोलते. पूर्वी जागरण गोंधळाचा कार्यक्रम सादर करत असताना लोकांना आम्हा कलावंताच्या प्रती एक आदरभाव होता. आज मात्र तो दिसत नाही. बऱ्याचदा कार्यक्रम सादर करताना लोक बारमध्ये असल्यासारखे पैसे उधळतात, तोंडात पैसे देऊन नाचायला लावतात. दिवसेंदिवस जागरण–गोंधळाच्या कार्यक्रमाला तमाशाचे स्वरूप येत चालले आहे. यामुळे या धार्मिक आणि परंपरागत चालत आलेल्या कार्यक्रमाचा लोकांनी एक इव्हेंट आणि मनोरंजनाचं साधन करून टाकलं आहे. यामुळे याचा संस्कृतीशी संबंध तुटत चालला आहे. पूर्वीसारखा कलावंत म्हणून मिळणारा मानसन्मानही आता कुठे तरी हरवत चालला आहे असे वाटते, अशी खंत तिने व्यक्त केली.


मथुरा म्हणते, लोकांच्या अशा विचित्र वागण्यामुळे मी बाहेरगावी कार्यक्रम सादरीकरण आता फारशी करत नाही. जो सन्मान मला मिळायला हवा आहे, तो मिळत नसेल, तर मी माझ्या कलेचे सादरीकरण करून कलेचा अनादर का करू, असा सवाल तिने केला.
कलावंत म्हणून आपली कला सादर करत असताना मुरळी कलावंतावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचे कामदेखील मथुरा करत असते. मुरळी कलावंत म्हणून आयुष्य घालवल्यानंतर उतरत्या वयात अत्यंत हालअपेष्टा मुरळीच्या वाट्याला येतात, असं ती म्हणते. मुरळी म्हणून जेव्हा तुम्हाला देवाला अर्पण केले जाते, त्यानंतर तुमचे कुटुंब आणि तुमचा समाजही तुम्हाला स्वीकारत नाही. तरुणपणात कला सादर करून तुम्ही तुमचा उदरनिर्वाह करू शकता. मात्र, वार्धक्यात अत्यंत हलाखीत जीवन जगावे लागते. या अनुभवाविषयी ती सांगते, ‘आतापर्यंत दोन-तीन मुरळ्यांचा वार्धक्यामुळे मृत्यू झाल्यानंतर त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी ना कुटुंबीय ना समाज ना प्रशासन कुणीच पुढे आले नाही. बेवारस पडलेल्या त्या मृतदेहांना अग्नी देण्याचे काम मी केले आहे.’


आयुष्यभर लोकांसाठी कलावंत म्हणून कलेचे सादरीकरण केल्यानंतर उतरत्या काळातही त्यांचा योग्य तो सन्मान व्हावा, असे वाटते. यासाठी राज्य सरकारने त्यांच्या निवासाची सोय करावी, मानधन द्यावं, जेणेकरून त्यांना उदरनिर्वाह करणे शक्य होईल, असं तिने आवर्जून सांगितलं.
मुरळीच्या प्रथेविषयी थोडेसे : देवाला मुरळी सोडण्याची प्रथा पूर्वीपासून चालत आलेली होती. मात्र १९९६-९७ पासून देवाला मुरळ्या अर्पण करण्याची प्रथा तत्कालीन सरकारने बंद केली आहे. यापूर्वीपासून ज्या मुरळ्या कलावंत आपली कला सादर करतात त्यांच्या पुनर्वसनासाठी सरकारने योग्य ती पावले उचलायला हवीत, अशी मागणी केली जात आहे. जेणेकरून त्यांची अवहेलना होणार नाही.

- प्राजक्ता ढेकळे, पुणे
[email protected]

X