आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेंढपाळ कन्‍या खेळतेय बेसबॉल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुढच्याच महिन्यात भारतीय बेसबॉल संघाच्या निवडीसाठी स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेतून निवडलेल्या खेळाडूंना ऑस्ट्रेलियात होणाऱ्या महिला बेसबॉल विश्वचषक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. या स्पर्धेत पात्र ठरण्यासाठी प्रयत्न करतेय महाराष्ट्रातल्या एका दुर्गम खेड्यातली, मेंढपाळ कुटुंबातली एक मुलगी...

 

एका संध्याकाळी आमचे नातेवाईक शिवाजी देवकाते यांच्या मोबाइलवर एक फोन आला. फोनवर बोलणारा माणूस त्यांना सांगत होता, ‘सर, आपल्या भागातील एक गरीब पोरगी बेसबॉल खेळण्यासाठी हाँगकाँगला राष्ट्रीय स्तरावरील मॅच खेळण्यासाठी निघालीय. पण तिला तिकिटासाठी पैसे कमी पडत आहेत. तुम्ही काय मदत केली तर बरं होईल.’ यावर देवकातेकाकांनी तिचा खाते नंबर घेऊन ‘उद्या पैसे पाठवतो,’ अशी हमी देत फोन ठेवला. यानंतर काकांनी तिला पैसे पाठवले, पण माझ्या मनात मात्र विचारांचे चक्र सुरू झाले. कोण असेल ही खेळाडू जी आपल्या भागातील आहे, जिल्हा व राष्ट्रीय स्तरावर बेसबॉल खेळते? पण आपल्याला तिच्याबद्दल माहितीच नाही. तिच्या शोधातूनच उलगडली बेसबॉलपटू रेश्मा पुणेकरची गोष्ट.

 

बारामतीपासून साधारण ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या तरोडील गावात रेश्माचा जन्म झाला. आई-वडील शेतकरी. खेड्यातील इतर मुलांप्रमाणेच रेश्माही गावातील प्राथमिक शाळेतील शिक्षण घेत होती. गावात असणाऱ्या सातवीपर्यंतच्या शाळेत शिक्षण घेऊन, पुढच्या शिक्षणासाठी पाचसात किलोमीटरवर असलेल्या लोणी-भापकर शाळेत प्रवेश घेतला. इतर विद्यार्थ्यांबरोबर शिकत असताना रेश्मामधील खेळाची चुणूक शाळेतील क्रीडा शिक्षक हेमंत जगताप यांनी ओळखली. अन येथूनच रेश्माच्या बेसबॉल खेळाचा श्रीगणेश झाला.

 

सुरुवातीच्या काळात केवळ खेळायला मिळते आहे, नेहमीच्या खेळापेक्षा वेगळा खेळ आहे, असे म्हणून रेश्मा खेळू लागली. मात्र दिवसेंदिवस या खेळात तिची गती वाढू लगाली. सहज म्हणून खेळला जाणारा हाचा खेळा तिची आज पॅशन बनला आहे. आठवी ते दहावीच्या माध्यमिक शिक्षणाच्या काळातच तिने जिल्हा, राज्यच नव्हेत तर राष्ट्रीय पातळीवरीलही तेरा स्पर्धा जिंकल्या. पुढे दहावीनंतर अकरावीला माळेगाव येथील शारदाबाई पवार महाविद्यालयात कला शाखेत प्रवेश घेतला. आज बीएच्या प्रथम वर्षात रेश्मा आपले शिक्षण पूर्ण करत आहे. शिक्षणाबरोबरच रेश्माने खेळाचा आलेखदेखील उंचवता ठेवला आहे. मात्र तरडोली गावासारख्या कायम दुष्काळाच्या छायेत राहत असलेल्या रेश्माच्या आईवडलांना आजही रेश्मा नेमके काय खेळते, हे माहीत नाही. रेश्माबद्दल तिचे वडील शिवाजी पुणेकर म्हणतात, ‘आम्हाला त्यातलं काय कळत नाय बघा. पन आजपोतर पोरगी कवाच फेल गेली नाही. त्यामुळं आम्हीपण माग हाटत नाय. जिथं पण खेळली तितनं मोकळ्या हातांनी मागारी आली नाही. तिच्या खेळासाठी मेंढराचं खांड व्हतं ते इकलं. आमच्या जमिनी चांगल्या हायत्या पण पाण्याची साथ नाय बघा. त्यामुळं काय इलाज चालत नाही. तरीबी पोरीला काय कमी पडू देत नाही बघा, उधार उसनावारी करून ऐपतीपरमाणं पैसं देतू. गावातील लोक, पैपावणी सुरुवातीला म्हणायची, अरं काय यडा झालाय का? कशाला एवढं रीन करतूय, शेवटी ती पोरीची जात हाय, ती कायम आपल्यापाशी राहणार हाय व्हय? आपलं बघा एकादी चांगली जागा आणि टाक उरकून. मात्र मी त्यांच्यावर कधी ध्यान नाही दिलं. अवं खेळतं लेकरू. मला माहीत आहे माझी पोरगी किती पुढं जाणार आहे ते.’

 

पाचसहा एकर रानवडी जमीन, बैल हीच काय ती घरची संपत्ती. घरात कोणी शाळा शिकले नाही. शाळेत जाणारी रेश्मा आणि तिच्या भावाची पहिलीच पिढी. रानवडीच्या रानातच उजाड माळरानावर रेश्माचे चारी बाजूंनी स्टीलचे पत्रे ठोकून तयार केलेले घर, त्या घरात एका खाट, चूल, भांड्याचे कपाट आणि गोधड्या एवढेच काय ते फर्निचर. घरात आजही टीव्ही, पंखा यांसारखी कोणतीही आधुनिक उपकरणे नाहीत. दररोज रानात काम करूनच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवला जातो.

 

खेळातील प्रगती उंंचावत असताना योग्य मार्गदर्शन, पोषक आहार, आणि आर्थिक पाठबळाची गरज असते. मात्र रेश्माला यातील आर्थिक विषयांची गणिते जुळवणे खूपच कठीण जात आहे. बारावीला असताना पंजाबात भरलेल्या फेडरेशन कप स्पर्धेसाठी ती गेली. तिथून पुन्हा उदिशातल्या स्पर्धेतून भारतीय बेसबॉलच्या संघासाठीच्या वीस खेळाडूंची निवड होणार होती. यासाठी देशातून सातशेपेक्षा अधिक खेळाडू आल्या होत्या. ‘मात्र या मुलींमधून केवळ वीस मुलींची निवड भारतीय बेसबॉल संघामध्ये केली जाणार होती. पण त्याही ठिकाणी मी उत्कृष्ट खेळले वा माझी निवड झाली, तेव्हा माझे नाव सातव्या क्रमांकाला होते. या निवड प्रक्रियेनंतर आमची फायनल मॅच दिल्लीला होती.’ दिल्लीला मॅचचा अनुभव सांगताना रेश्मा म्हणते, ‘दिल्लीला जाण्यासाठी पुण्यातून ट्रेन मला पकडायची होती. रेल्वेचे रिझर्व्हेशन मात्र कन्फर्म नव्हते. शिवाय माझ्याबरोबर जोडीलाही कोणी नव्हते. पावसाचे दिवस असल्यामुळे पाऊस पडत होता. मात्र घरून पुण्याला येण्यासाठी एसटीशिवाय पर्याय नव्हता. एसटी पकडायला म्हणून तरडोली फाट्यावर येऊन थांबले होते. तेवढ्यात गावातील कोणीतरी स्वत:च्या खासगी गाडीने पुण्याला निघाले होते. त्यांनी मला पुण्यापर्यंत मार्केटयार्डपर्यंत सोडण्याचे आश्वासन दिले. माझ्यापुढे दुसरा पर्याय नसल्यामुळे मी त्यांच्याबरोबर आले. मार्केटयार्डपासून मी रिक्षा करून पुणे स्टेशन व तिथून रेल्वेने दिल्ली गाठली. दिल्लीतील मॅचनंतर हाँगकाँग येथे झालेल्या महिला एशियन कप २०१७च्या स्पर्धेसाठी भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मला मिळाली. या स्पर्धेत आमच्या संघाने पाकिस्तानच्या संघाला हरवले. त्या वेळी मला खूप समाधान वाटले. खेळातील प्रगती साधत असतना माझ्या कॉलेजनेदेखील मला खूप मदत केली. शारदाबाई पवार महिला महाविद्यालयात प्रवेश घेतल्यामुळे खेळायला योग्य प्रकारचे मैदान असल्यामुळे सरावही व्यवस्थित होतो.

 

रेश्माच्या खेळाबद्दल तिचे प्रशिक्षक राजकुमार देशमुख सर म्हणतात, ‘रेश्माला या खेळात गती चांगली आहे. इतर खेळांडूपेक्षा रेश्मा एकदम व्यावसायिक खेळाडूसारखी खेळते. त्यामुळे बेसबॉलसारख्या सांघिक खेळातही तिचा वेगळेपणा बघणाऱ्यांच्या लक्षात येतो. महाविद्यालयात तिचा सरावही चांगला होतो. संस्था, महाविद्यालयाकडूनही तिला मोठ्या प्रमाणात पाठिंबाही मिळतो. खेळातील तिचे सातत्य तिला अधिक प्रगती करण्यास मदत करते. रेश्माबरोबरच बेसबॉल खेळणाऱ्या मुलींसाठी आम्ही नेहमी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रशिक्षकांचे सेमिनार आयोजित करतो. त्यामुळे मुलींना अचूक मार्गदर्शन मिळण्यास मदत होते.’
रेश्माच्या घरची आर्थिक परिस्थिती बिकट असली तरी घरातील लोक तिला पाठिंबा देतात. पुढच्याच महिन्यात  भारतीय बेसबॉलच्या संघाच्या निवडीसाठी स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेतून निवडलेल्या खेळाडूंना ऑस्ट्रेलियात होणाऱ्या महिला बेसबॉल विश्वचषक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. रेश्मा या स्पर्धेसाठी जोरदार तयारी करत आहे.
ग्रामीण भागातील जिरायत मेंढपाळ शेतकऱ्याची मुलगी असलेल्या रेश्मा  पुणेकरने आतपर्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत खेळातून आपली प्रगती साधली आहे. तिच्या या प्रगतीला मदतीचा हातभार लावू इच्छिणारे वाचक तिच्याशी ९५०३८९८१५२ या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

 

prajaktadhekale1@gmail.com

 

बातम्या आणखी आहेत...