आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...आणि आम्‍ही आई गमावली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'दे ह चंदनापरी झिजला' या वाक्याप्रमाणे खरंच ज्यांनी आपले जीवन व्यतीत केले होते, अशा रजनी लिमये मॅडमचं निधन झालं यावर विश्वास बसत नाहीय. गेले कित्येक दिवस त्या कॅन्सरशी लढा देत होत्या. खूप सुन्न करून टाकणारी ही घटना होती. बातमी समजल्यावर माझ्या मनात पहिला प्रश्न आला तो त्यांचा मुलगा गौतम याचा. मुलं कितीही मोठी झाली तरी आपल्या आईच्या कुशीत शिरून मिळणाऱ्या उबेचं मोल या जगात कुठेही आढळणार नाही. आपली आई आपल्याला सोडून कायमची दूर गेली म्हटल्यावर तो आता कसा जगेल, या प्रश्नाने माझं मन फार व्याकुळ होऊन गेलं आहे.


एका विशेष मुलाला सांभाळण्यापेक्षा कठीण काम आयुष्यात नाही. कारण, हाच अनुभव माझी आईदेखील घेत आहे. लिमये मॅडम अशा कितीतरी पालकांच्यादेखील आई होऊन गेल्या आहेत. जेव्हा त्यांना आपला एकुलता एक मुलगा मतिमंद असल्याचं समजलं, तेव्हा त्या परिस्थितीत खचून न जाता त्यांनी गौतमबरोबर आणखी चार अशीच मुलं घेऊन मानसिक अपंग मुलांची पहिली शाळा सुरू केली. दोन आडवे बाक, थोडी खेळणी, सतरंजीच्या पट्ट्या असे जुजबी सामान घेऊन १ जानेवारी १९७७ रोजी शाळेचा श्रीगणेशा केला. हे रोपटं गेल्या ४० वर्षात एक महावृक्ष करण्यात त्यांनी प्रचंड कष्ट घेतले. केवळ या मुलांकरिता त्यांनी आपले आयुष्य वेचले. या कामात त्यांना घरच्यांची साथदेखील तेवढीच मिळाली. आपल्याकडे म्हणतात की, एखाद्या यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. पण, एखादी स्त्री जेव्हा वेगळे क्षेत्र निवडून आपल्या मुलांसोबत, मुलांसाठी काहीतरी करायला तयार होते तेव्हा घरच्यांकडून मिळालेली साथ खूप अनमोल असते. त्यामुळे ती स्त्री हवी असलेली झेप सहज साध्य करू शकते. आणि त्याप्रमाणे त्या या विकलांग मुलांसाठी काहीतरी करायचे हे ठरवून कामाला लागल्या होत्या. या क्षेत्रात काम करताना मुलांचे अनुभव, त्यांचे अनुभव विविध पुस्तकांतून त्यांनी मांडले. ते प्रत्येक पुस्तक वाचताना डोळ्यांत पाणी तरळतं. मॅडमना या मुलांसाठी केलेल्या कार्यानिमित्त अनेक पुरस्कार मिळालेले असले तरीसुद्धा गर्व, अहंकार यांचा त्यांच्याशी कुठेही संबंध नव्हता. हा आपल्याला मिळालेला देवाचा वसा आहे, हेच समजून त्यांनी संपूर्ण आयुष्य फक्त मतिमंद मुलांसाठी खर्ची घातलं. त्या मुलांच्या अंधाऱ्या जीवनात आशेचा प्रकाश बनून राहिल्या. ‘जे करायचे ते माझ्या शाळेतील मुलांसाठी  करा,’ एवढंच म्हणणं त्याचं असायचं. त्या एक श्रेष्ठ कर्मयोगी होत्या. उत्तम समाजसेविका होत्या. आणि स्वतःच्या मुलांच्या केवळ आई होऊन न राहता अशा कितीतरी मुलांच्या आई झाल्या. त्यांच्याबद्दल जितकं लिहू तितकं कमी आहे. मॅडमना पहिल्यापासून कशाचाही मोह नव्हता त्यामुळे जातानासुद्धा देहदान व नेत्रदान करून दुसऱ्याचा विचार करूनच गेल्या.


त्यांच्याकरिता ओठांवर इतकंच येतं, ‘आज हजारो मुलांची आई गेली आणि खरंच पोरं पोरकी झाली.’ व त्यांच्याबरोबर आम्ही पालक मंडळीसुद्धा पोरके झालो. मॅडमना श्रद्धांजली.


- प्रिया निकुम, नाशिक

बातम्या आणखी आहेत...