आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हमरी अटरिया पे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पूर्वी संयुक्त कुटुंबं होती. त्यामुळे प्रेम बंद डोळ्याआड केले जायचे. एकमेकांची नजर चुकवून मित्र-मैत्रिणींच्या साहाय्याने भेटी घेतल्या जायच्या, चिठ्या पोहोचत्या केल्या जायच्या. नजरेची भाषा बोलली जायची त्या वेळी या अटरियाचे, बाल्कनीचे महत्त्व होते. आता सारा मामला खुल्लम खुल्ला. त्यामुळे अटरिया हा शब्दच भाषेतून, काव्यातून नाहीसा झाला आहे.


रोमिओ आणि ज्युलिएटची अजरामर प्रेमकहाणी, ज्या कहाणीने अनेक प्रेमिकांना जन्म दिला, ती इटलीतील वेरोना या शहरात लिहिली गेली. या वेरोना शहरातले मुख्य आकर्षण आहे ज्युलिएटचे घर आणि त्या घराची बाल्कनी; ज्याच्या खाली उभे राहून रोमिओने आपल्या प्रेमाचा प्रथमच इजहार केला.


खरे तर ही दोन्ही पात्रे काल्पनिक. अर्थात ते घरसुद्धा कोणा दुसऱ्याचेच आहे, पण याचा पगडा प्रेमिकांच्या मनावर इतका आहे की प्रत्येक दिवशी असंख्य लोक या घराच्या अंगणात येतात आणि या बाल्कनीखाली उभे राहून आयुष्यभर एकत्र राहण्याची शपथ घेतात. प्रेमाला सर्वोच्च पातळीवर नेणाऱ्या या नाटकात या बाल्कनीचा महत्त्वाचा वाटा आहेच.


बाल्कनी हा घराच्या बाहेरचा भाग आणि तरीही जर लोकमताचा कौल घेतला तर अनेक लोकांच्या आवडीचा भाग असेल. माझ्या माहेरच्या घराला बाल्कनी नव्हती. छोटेसे घर आणि सगळ्या बाजूने बंदिस्त. घराची खिडकी दुसऱ्या घराच्या खिडकीत डोकावायची. त्या काळी सर्व फ्लॅट्सना मिळून एक सामायिक बाल्कनी असायची, पण त्यातून दिसणारे आकाशसुद्धा सामायिक. आपल्या मालकीचा एक छोटासा तरी चतकोर असावा आकाशाचा, असे लहानपणापासून वाटायचे. त्यामुळे नवीन घर घेताना घरापेक्षा, त्यात असलेल्या दोन मोठ्या बाल्कनी पाहूनच हरखले. संध्याकाळचा चहा कोणी नसेल तर इथेच होतो. झोपाळ्यावर झुलत, छोट्याशा बागेतल्या फुलांशी बोलत काळोखाच्या सावल्या गडद झाल्या की मनाची हुरहूर इथेच लपवली जाते आणि मैत्रिणीशी पोटभर गप्पा झाल्या तरी निरोप घेऊच नये, असा क्षण निरोपाचा हात हलवताना इथेच अनुभवता येतो.
सुटीच्या दिवशी हातात कॉफीचा वाफाळणारा कप घेऊन बाल्कनीतून बाहेरील गर्दी पाहणे हा आवडता छंद आहे.


आता मोठ्या शहरात स्क्वेअर फूटचा भाव हजारांत पोहोचला आहे तिथे बाल्कनीचे महत्त्व कसे राहणार? इंच न इंच लढवूया, सॉरी वापरू याच्या जमान्यात बाल्कनी ग्रिल आणि काचा लावून आता बंद केली जाते. त्याचा खोली म्हणूनसुद्धा उपयोग होऊ लागला आहे. पुढच्या काही वर्षात मध्यमवर्गीयांच्या आयुष्यातून हा शब्दच हद्दपार होईल अशी चिन्हे दिसत आहेत. काल रेडिओवर बेगम अख्तर भान हरपून गात होती आणि बाल्कनीची ही उपयुक्तता प्रकर्षाने जाणवली.


हमरी अटरियां पे आयो सावरिया
देखादेखी बलम हुई जाये


अटरियां म्हणजे साधारण बाल्कनीसारखी जागा. व्हरंडा म्हणूया. जिथे नायिका आईवडिलांच्या नजरेपासून लांब राहून आपल्या प्रियकराची वाट पाहायची. तो काळोखाच्या काळ्या रंगात मिसळून तिच्याशी संवाद साधायचा किंवा अगदीच गबरू असेल तर दोरी किंवा पाइप कशाचा तरी आधार घेऊन तिच्यापर्यंत पोहोचायचा. कवी जयदेव जेव्हा आपल्या पत्नीला भेटायला गेला तेव्हा प्रेमाच्या नशेत बाल्कनीतून लोंबकळणाऱ्या सर्पाचा आधार घेऊन तो तिच्या खोलीत गेला, अशीही आख्यायिका सांगितली जाते. अर्थात ही भेट फक्त देखादेखीपुरतीच होती. स्त्रियांच्या मर्यादा आखलेल्या होत्या. अगदी भारतात कशाला? इटलीमध्येसुद्धा.


हमरी अटरिया पे आयो सावरिया
जोराजोरी तनिक हुई जाये.
या गीताची मोहिनी एवढी होती की, हे गीत ‘डेढ इश्किया’मध्ये गुलझारजींनीही वापरले आहे. आजच्या काळात मात्र ही मर्यादा देखादेखीवरून जोराजोरीवर पोहोचली आहे.


पडोसन के घरवा जई हो
ना सांवरिया
सौतन सापियां मोरी काटी जहरीया
जहरी नजरिया
आजा अटरिया पे पिलादे अंगूरी
जोराजोरी तनिक हुई जाये


सवतीच्या घरी जाणाऱ्या नायकाला नायिका सांगते, ‘तिची नजर तर सोड, पण तिचे रूपसुद्धा विषारी आहे. तिथे जाऊ नकोस. माझ्या घरी ये. त्या विषाचा परिणाम माझ्या आणि मद्याच्या सहवासात कमी होईल.’
रेखा भारद्वाज यांनी आपल्या स्वरांनी आणि माधुरी दीक्षित हिने आपल्या नृत्याने या गीताला पुरेपूर न्याय दिला आहे.
अटरिया ही दोन प्रेमिकांना एकत्र आणण्याची जागा होती, पण जिथे एकत्र मिलनाचे क्षण घालवले असतील तीच जागा नंतर विरहाच्या वेदना देण्यास कारणीभूत होते.


अब सुनी भरी रे अटरिया हमार
कैसे जियरा को आये करार
सुरैया आणि सी एच आत्माचे हे अप्रतिम गीत आहे. एखादी मात्र बेधडक आमंत्रण देऊन मोकळी व्हायची.
आना आना अटरिया पे आना
देख ले चाहे सारा जमाना


कल्पना सिनेमातील आशा भोसले यांच्या आवाजातील थोडेसे लावणीच्या अंगाने जाणारे हे गीत आहे. आमंत्रित करणारे. पूर्वी घरे उघडी असतील, एकाच सामायिक बाल्कनीने जोडली गेली असतील पण प्रेम मात्र बंद डोळ्याआड केले जायचे. एकमेकांची नजर चुकवून मित्रमैत्रिणींच्या साहाय्याने भेटी घेतल्या जायच्या, चिठ्ठ्या पोहोचत्या केल्या जायच्या. नजरेची भाषा बोलली जायची त्या वेळी या अटरियाचे, बाल्कनीचे महत्त्व होते. आता सारा मामला खुल्लमखुल्ला. त्यामुळे अटरिया हा शब्दच भाषेतून, काव्यातून नाहीसा झाला आहे.


- प्रिया प्रभुदेसाई, मुंबई
nanimau91@gmail.com

बातम्या आणखी आहेत...