आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउद्या व्हॅलेंटाइन डे. त्यानिमित्ताने एक आठवडाच प्रेमाला वाहिलेला असतो. त्यातला एक असतो चुंबन दिन. या चुंबन दिनाच्या निमित्ताने ओठांविषयीची गाणी...
“मला अँजेलिना जोली आवडत नाही. पण तिचे ओठ! आहा.” परवाच बसमध्ये ऐकू आलेला संवाद.
सौंदर्याचे मापदंड गेल्या काही दशकात बदलले आहेत. आमच्या वेळी अशा जाड ओठांना ‘हबशी’ ओठ असे हिणवले जाई. खरं तर आमच्या वेळी लांबून दिलेले उडते चुंबनसुद्धा प्रचलित नव्हते. आता सुख आकारमानावर अवलंबून आहे.
बालकवी यांची ‘फुलराणी’ ही कविता आम्हाला अभ्यासाला होती, पण रविकिरण तिचे चुंबन घेतो अशा अर्थाचे एक कडवे होते तेच उडवले होते. कामाच्या सूत्रात हे पहिले सूत्र एवढे दुर्लक्षित का देव जाणे. आपल्या जेवणात असलेला कांदा, लसूण याचा भरमसाट वापर हे कदाचित कारण असावं. एकूणच विचार केला तर भरपूर लोकसंख्या असलेला आपला भारत देश प्रियाराधनेच्या कलेत मागासलेला आहे. ‘कर्म कर, फळाची चिंता करू नको,’ असे असतानाही आपण ‘फळ’ जन्माला घालतो, पण त्याआधीचं ‘कर्म’ मन लावून करत नाही हे खरंच.
ओठ जरी शरीरातील छोटासा भाग असेल, मिशी असेल तर दिसणारा न दिसणारा, तरीही उगाच नाही म्हणत, ‘ओठांचे जे उपयोग आहेत त्यात हसण्याचा नंबर शेवटून दुसरा आहे,’ सुज्ञांच्या लक्षात आले असेलच की पहिला उपयोग कोणता असणार ते. आणि हास्यामधून जवळीक झाली तर फर्स्ट बेस्टपर्यंत पोहोचायला कितीसा वेळ लागतो.
प्रेमावरच टिकाव धरून असलेल्या बॉलीवूडला मात्र इम्रान हाश्मीच्या जन्माची वाट पाहावी लागली. खरं तर ब्रिटिश याबाबतीत सोवळे नव्हते. त्यामुळे १९३३च्या काळात प्रदर्शित झालेल्या सिनेमात देविका राणी आणि हिमांशू रॉय यांचे चुंबनदृश्य आहे. तेसुद्धा चांगले चार मिनिटांचे. नंतर भारत स्वतंत्र झाल्यावर ‘ताकाला जाऊन भांडे लपविणे’ हे जी भारतीयांची प्रवृत्ती आहे ती चुंबनाबाबतही दिसून आली. जवळजवळ चार दशकं बॉलीवूडसाठी, साधी पापू घेण्यासाठी केलेली जवळीक म्हणजे हातात हात किंवा गालावर गाल. पण त्यापुढचं अंतर कापलेलं दाखवण्यासाठी दोन फुलं आणली, लाटांचं नर्तन दाखवलं किंवा भुंगा आणि मिटलेल्या पाकळ्या यांचा उपयोग झाला. चुंबन प्रतीकात्मक दाखवायचे म्हणून काय काय युक्त्या योजल्या गेल्या. एक तर भारीच होती. दोन नारळाच्या झाडांनी एकमेकांना झोडपून काढले असा सीन दाखवला होता. मला तर तो सीन म्हणजे चुंबनानंतरची प्रतिक्रिया वाटली किंवा त्याच्या आधीची धमकी. हिंदी सिनेमातील गीतांतसुद्धा डोळे, केस, हात अगदी कमरेलासुद्धा स्थान दिले आहे पण ओठांचा उल्लेख मात्र जपूनच झाला आहे. १९६७मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ज्वेल थीफ’ या सिनेमात हे गीत आहे.
होठों में ऐसी बात मैं दबा के चली आयी
खुल जाये वही बात तो दुहाई है दुहाई
हाँ रे हाँ, बात जिसमें, प्यार तो है,
ज़हर भी है, हाय
सिनेमाचा क्लायमॅक्स या गीताने आहे. रहस्याचा उलगडा जर झाला तर ते घातक ठरू शकतं, म्हणून ही गोष्ट तू ओठावरच आणू नकोस, अशी भीतीवजा विनंती आहे यात.
ऐंशीच्या दशकात प्रेमगीत या सिनेमात
“होठों से छू लो तुम मेरा गीत अमर कर दो,
बन जाओ मीत मेरे मेरी प्रीत अमर कर दो”
हे नितांतसुंदर गीत ‘किस’शिवाय जन्माला आले. चुम्म्याची मागणी करायला मात्र नव्वदीचे दशक उजाडावे लागले.
‘मैं और मेरी तनहाई, अक्सर ये बाते करते हैं तुम होती तो कैसा होता’ असं काव्यात्म बोलून प्रेमाचा इजहार करणाऱ्या हरिवंशराय बच्चन यांच्या सुपुत्राने टारझन स्टाइलमध्ये लोंबकळून जेनरूपी किमी काटकरकडे खणखणीत मागणी केली,
जुम्मे के दिन किया जुम्मे का वादा
जुम्मे को तोड दिया जुम्मे का वादा .
ले आ गया रे फिर जुम्मा
चुम्मा दे दे
आता मात्र गाडी वयात आली. राजा हिंदुस्तानी आला. नंतर इम्रान हाश्मीचे युग आले. ‘मर्डर’ या सिनेमात तथाकथित संस्कृतीचा मर्डर करत सैद काद्री यांनी गीत लिहिले,
भीगे होंठ तेरे, प्यासा दिल मेरा
लगे अब्र सा, मुझे तन तेरा
जम के बरसा दे, मुझ पर घटायें
तू ही मेरी प्यास, तू ही मेरा जाम
कभी मेरे साथ, कोई रात गुज़ार
तुझे सुबह तक मैं करूँ प्यार
हे तर आलिंगन दिवस, चुंबन दिवस, जेवढे असतील तेवढे सगळेच दिवस एका गाण्यात साजरे झाले. आणि १९३३ मध्येच चुंबन देणाऱ्या देविका राणीला मुक्ती मिळाली.
आता तर एक पूर्ण आठवडा प्रेम दिनाला वाहिलेला आहे. चुंबनालासुद्धा एक दिवस राखून ठेवला असल्याने निदान या दिवशी जागतिक चुंबन दिनाच्या शुभेच्छा द्यायला अधिकृत परवानगी मिळाली आहे.
- प्रिया प्रभुदेसाई, मुंबई
nanimau91@gmail.com
पुढील स्लाइडवर पाहा, आणखी फोटो...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.