आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिया ऐसो जिया में समाय गयो रे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नटून, मुरडून आपल्या प्रिय व्यक्तीला आकर्षून घेण्यात गैर काहीच नाही. पण केवळ दागदागिने, मेकअपच्या मदतीनं नटणं मुरडणं हेच सौंदर्य होऊ शकत नाही. आपल्याला प्रसन्न वाटेल, आनंदी वाटेल अशा गोष्टी केल्यानं खुलून येतं ते खरं सौंदर्य. अशा सौंदर्यामुळे आत्मविश्वासालाही वेगळीच चकाकी येते.  

 

लेकाच्या वेळी दिवस गेले तेव्हा चुलत सासूबाई मुद्दाम गोव्याहून आला होत्या. माझ्या आवडीचा खास नाचणीचा हलवा घेऊन. अशा दिवसात कोणी आवड पुरवली नं की, आपले, परके असे राहत नाही. दुपारी गप्पा मारत बसलो होतो. न राहवून मी त्यांच्या गालावरून हात फिरवला. रंग तर केतकी होताच पण त्वचा या वयातही मऊसूत. अगदी सावरीच्या कापसासारखी.
“असणार का नाही? अजून काळजी घेतात. बदाम काय, संत्र्याची साल काय.” सासूबाई बोलल्या.
आपल्या घरातसुद्धा असते की पडून. माझ्या उगीच मनात आले.


माझी आजी ऐंशीच्या घरात असताना गेली पण तेव्हाही तिची त्वचा एवढीच सुंदर होती. खूप गरिबीतून सुखवस्तू घरात पडली खरी पण कष्ट पाचवीला पूजले होते. भरलेले घर आणि पाहुण्यांचा राबता. शेगडीसमोर सतत बसून लालबुंद झालेला तिचा चेहरा मला अजूनही आठवतो. या सर्व कामातसुद्धा ती उटणे घरी करायची. डाळीचे खरबरीत पीठ दळायची. आठवड्यातून एकदा त्यानेच अंग धुवायची आमच्यावरही सक्ती असायची. “हे बघ, उन्हात हुंदडता, भटकता, त्याने कातडी करपते. माहीत आहे? थोडेफार लक्ष द्यावे स्वतःकडे.” तेच तीही लावत असेल.

 

बायका ब्युटीपार्लरला जात नव्हत्या तेव्हा पण घराघरातून अशी ब्युटी पार्लर्स होती. रंग उन्हाने करपला की टोमॅटोचा रस लावणे, अभ्यास करून, रात्री जागून डोळ्याखाली काळी वर्तुळे आली की काकडीची चकती ठेवणे, केसांना नारळाचे दूध लावणे, असे अनेक प्रकार माहीत होते.


बायका का नटतात? या प्रश्नाची अनेक उत्तरे आहेत.
१. सगळ्यांत उठून दिसावे.
२. वेगळे दिसावे.
३. दुसऱ्यांसाठी नाही तरी स्वतः व्यवस्थित असेल तर आत्मविश्वाससुद्धा वाढतो. जगाला तोंड देणे सोप्पे जाते. 
आणि कधीतरी 
४. अनेक गोष्टी लपवण्यासाठीसुद्धा. काळी वर्तुळे, सुजलेला चेहरा, न सांडलेले अश्रू, वेदना, स्वतःची खरी ओळख लपविणे.


तरीही मुख्य हेतू आहे तो आपल्या प्रियकराला, नवऱ्याला आकर्षित करून घेणे. एकमेकांना प्रेमाने आणि सौंदर्यानेसुद्धा आकर्षित करून घेण्यात वाईट काय आहे? अगदी कामावरून दमून घरी येणाऱ्या नवऱ्याला चहाचा कप हवा असतो पण तो देणारीसुद्धा छान, नीटनेटकी असेल तर त्यात अयोग्य काय आहे?


‘स्पर्श’ या सिनेमात एक दृश्य आहे. अंध नसरुद्दीन जेव्हा शबानाला भेटायला येतो तेव्हा ती प्रथम आरशासमोर उभी राहून स्वत:ला निरखते, नंतर स्वतःवर त्याच्या आवडीचे परफ्युम मारून ती दार उघडते. त्यात एकच उद्धिष्ट असते, ते आपल्या प्रियकराला आनंदी करणे.


खरेतर प्रियकराच्या/ प्रेयसीच्या नजरेने दिलेला कौतुकाचा नजराणा ही सौंदर्याची उचित व्याख्या आहे.


पिया ऐसो जिया में समाय गयो रे
की, मैं तन मन की सुध-बुध गवाँ बैठी
हर आहट पे समझी वो आय गयो रे,
झट घूँघट में मुखड़ा छुपा बैठी


साहिब, बीबी और गुलाम या सिनेमातील हे गीत. सिनेमातील नायिका एका सामान्य घरातील आहे. तिचा नवरा श्रीमंत जमीनदार. उत्पनापेक्षा अनेक पटीने खर्च करणारे, कर्जबाजारी, बाजारू स्त्रियांत रमून घरातील बायकांकडे दुर्लक्ष करणारे हे जमीनदार. नायिकेला मात्र तिच्या आईची शिकवण आहे “पतीची सेवा हाच धर्म.” पतीचे लक्ष मात्र बाहेर. पती आपल्याजवळ येत नाही याचे तिला दुःख आहे. आपणच त्याला आकर्षून घेण्यासाठी कमी पडलो याचे वैषम्यही. त्याला मोहवण्यासाठी ती शृंगाराचा आसरा घेते. मोहिनी सिंदूर लावला तर पती आकर्षित होतो हे तिच्या कानावर जाते. तो सिंदूर आणून देण्यासाठी ती भूतनाथाला गळ घालते. पतीसाठी सजताना ती गाते,

 

मैने सेंदूर से माँग अपनी भरी
रूप सैयाँ के कारण सजाया
इस डर से के पी की नजर ना लगे
झट नैनन में कजरा लगा बैठी


भल्यामोठी आरशासमोर बसून स्वतःचे रूप निरखणारी छोटी बहू मीनाकुमारीने जिवंत केली आहे या सिनेमात.
सजणाच्या प्रतीक्षेत मन गुंतलेले आहे, कान त्याच्या पावलांची चाहूल घेत आहेत आणि हात मात्र स्वतःला सजवण्यात मग्न आहेत. प्रेमात असलेल्या स्त्रीची अस्वस्थता, आपल्या प्रियकराच्या आगमनाची आतुरता, आणि ती लपविण्यासाठी घेतलेले लज्जेचे आवरण. भारतीय स्त्रियांच्या परंपरागत विचारांचे आणि स्वतःकडे कमीपणा घेण्याच्या वृत्तीचेही दर्शन या गीतात दिसते. आपल्या आवडत्या पुरुषासाठी स्वतःचे सर्वस्व पणाला लावणाऱ्या स्त्रिया अजूनही समाजात दिसतात.


स्वतःच्या इच्छेने आपल्या माणसासाठी नटणे, सजणे यात काही वावगे नाही पण जी व्यक्ती, भले तो नवराही असू दे, तिच्या “ती’ असण्याचा आदर करत नसेल तर त्या नटण्याचा काहीही फायदा नाही. केवळ रिझवणे हा सौंदर्याचा हेतू नाही. सर्वांना जन्मजात सौंदर्य नसते. शेवटी माणसाला प्रसन्न वाटेल, तेच जेव्हा तो करतो तेव्हा आपोआप छान दिसतो. ती प्रसन्नता, समाधान आणि आत्मविश्वास माणसाला देखणे बनवतो. जी स्त्री स्वतःवर प्रेम करते, स्वतःचा आदर करते, स्वतःला आहे तशी स्वीकारते तेव्हाच दुसऱ्याच्या गुणदोषांसकट त्यालाही आपला बनविते.


नात्यात पती आणि पत्नीचे स्थान समान आहे. दोघांचेही स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे. त्यांना विचारस्वातंत्र्य आहे. एकत्र राहण्यात एकमेकांचा विचार करावा लागतोच पण केवळ एकालाच वाकावे लागू नये. असे नाते परिपूर्ण नसते.
‘साहिब, बीबी और गुलाम’मधल्या साहिबला हेच तर समजत नाही आणि या नात्याची शोकांतिका होते. 


- प्रिया प्रभुदेसाई, मुंबई
nanimau91@gmail.com

बातम्या आणखी आहेत...