आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्‍याचं प्रेशर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विज्ञानाच्या गोष्टी स्वतःच्या रोजच्या जगण्याशी जोडल्या की मुलांना लवकर समजतात.  हे शिक्षकांनी एकदा लक्षात घेतलं तर विषय शिकवणं सोपं जातं. 


दुसरं प्रॅक्टिकल असतं आमचं चिकटपणा (viscosity) काढण्याचं/मोजण्याचं. एका मोठ्या जारमध्ये पाणी थोडंस उंचावर ठेवून पाइपने ते खाली येतं आणि दोन ठिकाणी विभागतं. एक एका स्केलशेजारी उभ्या म्हणजे व्हर्टिकल टेस्ट ट्यूबसारख्या काचेच्या नळीतून वरती तर दुसऱ्या एका कॅपिलरीतून पुढं जाऊन आणखी दोन ठिकाणी विभागतं. त्याच स्केलच्या दुसऱ्या बाजूला तशीच काचेची नळी लावलेली असते तिथं आणि दुसरं एका बीकरमध्ये उघडणाऱ्या पाइपला. आम्हाला त्या स्केलच्या मदतीने दोन्ही उभ्या असणाऱ्या काचेच्या नळ्यांमधल्या पाण्याच्या उंचीमधला फरक मोजायचा असतो आणि त्या बीकर म्हणजेच काचेच्या पात्रात पडणारं ठरावीक वेळेतलं पाणीही. त्या दोन्ही उभ्या नळ्यांमध्ये चढणाऱ्या पाण्याची उंची सेट करण्यासाठी दोन चिमटे असतात जे प्रेशर कंट्रोल करतात. पहिला चिमटा पहिल्या विभाजनापूर्वी आणि दुसरा दुसऱ्या विभाजनानंतर. 


मी विद्यार्थ्यांना त्या सगळ्या सेटअपसमोर आणते आणि पहिला प्रश्न विचारते, ‘मला फक्त एवढंच सांगायचं की, या सेटअपकडे बघून तुम्हाला काय वाटतंय? आज आपण काय करणार आहोत?’ 
मुलं गोंधळतात. 
‘बरं, हा सेटअप ओळखीचा वाटतोय का?’ 
‘नाही.’
‘नीट निरीक्षण करा. बघा यात तुम्हाला काय काय दिलंय, यांची मांडणी कशी केलीय आणि आज हे सगळं वापरून काय काय करायचंय?’
मग एक एक उत्तरं यायला लागतात. 
‘तिथं बीकर ठेवलंय म्हणजे पाणी गोळा करायचंय.’
‘हे प्रेशर adjust करायचंय या चिमट्यांनी.’
‘या नळ्यांमध्ये पाणी चढवायचंय. त्यासाठी दुसरा चिमटा बंद ठेवायचा आणि पहिला सैल करायचा.’
‘गुरुत्वाकर्षणामुळं या जारमधलं पाणी खाली येईल.’
‘अच्छा, जर पाणी चढवायचं असेल तर मग गोळा कसं होणार? सगळं पाणी तर त्या नळ्यांमध्येच चढेल. आणि गुरुत्वाकर्षणामुळं पाणी जारमधून खाली येईल तर नळ्यांमध्ये चढेल कसं?’
मग डोकी खाजवायला लागताता पोरं. आपापसात चर्चा घडतात. तेवढा वेळ देते मी. मग हळूच विचारते, ‘घरात पाण्याची टाकी कुठं असते? किंवा शहरात पाण्याची टाकी कुठं असते?’
‘घरात छतावर आणि शहरात उंचावरच.’


‘मग सकाळी महानगरपालिका ज्या वेळी पाणी सोडते तेव्हा ते जवळ असणाऱ्या घरांमध्येही जातं आणि लांब अंतरावरच्या घरांमध्येही जातं. आणि पाण्याचं प्रेशर आमच्याकडे कमी होतं, आमच्याकडे फुल्ल होतं हे घरी आई/काकूंकडून ऐकतो ना आपण?’ ‘हां मॅडम, कळलं.’


युरेका युरेकासारखा आवाज असतो तो. पुढची पाच मिनिटं हे विद्यार्थी मलाच प्रॅक्टिकल समजावून सांगतात. छोट्याछोट्या राहिलेल्या त्रुटी सांगून त्यांना प्रॅक्टिकल सांगून जाते मी. पुढच्या दहाच मिनिटांत प्रेशर, हाइट्स अॅडजस्ट करून माझ्या टेबलवर पहिलं रीडिंग हजर असतं. क्वचितच चुकतं तेव्हा तेच आपलं कुठं चुकलंय हे शोधून दुरुस्त करून येतात. गोष्टी स्वतःच्या रोजच्या जगण्याशी जोडल्या की लवकर समजतात, हेच पुन्हापुन्हा शिक्षकांना समजून तसं शिकवावं लागतं.


-  प्रियांका पाटील, सोलापूर
pppatilpriyanka@gmail.com

बातम्या आणखी आहेत...