Home | Magazine | Rasik | Prof. Abhijit Deshpande article in rasik

दृश्‍यसंस्‍कृती म्‍हणजे काय?

प्रा. अभिजित देशपांडे | Update - Jul 01, 2018, 07:51 AM IST

प्रत्येक समाजाचा नैसर्गिक दृश्यभोवताल वेगळा असतो, तसाच प्रत्येक समाजाचा मानवनिर्मित/सांस्कृतिक दृश्यभोवतालदेखील वेगळा अ

 • Prof. Abhijit Deshpande article in rasik
  प्रत्येक समाजाचा नैसर्गिक दृश्यभोवताल वेगळा असतो, तसाच प्रत्येक समाजाचा मानवनिर्मित/सांस्कृतिक दृश्यभोवतालदेखील वेगळा असतो. यांकडे पाहण्याची, त्याचा अर्थ लावण्याची प्रत्येक समाजाची एक स्वतंत्र दृष्टी असते. स्वतंत्र संवेदना व अर्थधारणा असतात. यांतूनच त्या त्या समाजाची दृश्यसंस्कृती घडत असते...

  आपला दृश्यभोवताल हा अनेकविध-अक्षरशः कोट्यवधी घटकांपासून बनलेला असतो. सोयीसाठी आपण त्याचे पुढीलप्रकारे वर्गीकरण करूया - १. नैसर्गिक २. मानवनिर्मित/सांस्कृतिक.
  आपल्या आसमंतातील आकाश, सूर्य,चंद्र, तारे, डोंगर, दऱ्या, झाडे, वन्यजीवसंपदा, पशू-पक्षी,दगड, माती,नदी, समुद्र... या सर्वांचे आपल्याला दृश्यमान असणारे विश्व म्हणजे आपला नैसर्गिक दृश्यभोवताल. भौगोलिक परिसरानुसार त्यात उघडच विविधता असणार. महाराष्ट्रापुरते उदाहरणादाखल बोलायचे, तर कोकणातला नैसर्गिक दृश्यभोवताल आणि विदर्भ किंवा मराठवाड्यातला नैसर्गिक दृश्यभोवताल यांत स्वाभाविकपणेच वैविध्य आणि फरक असणार.
  परंतु, सर्वाधिक विविधता असते, ती मानवनिर्मित अथवा सांस्कृतिक दृश्यभोवतालात. संस्कृती ही मानवनिर्मित गोष्ट आहे. हा मानवनिर्मित दृश्यभोवताल म्हणजे, त्या संस्कृतीचे दृश्यरूप. म्हणजेच त्याआधी संस्कृतीचे स्वरूप जाणून घ्यायला हवे -

  संस्कृती ही एक अमूर्त गोष्ट आहे. प्रत्येक समाजाच्या भौगोलिक पर्यावरणानुसार व इतिहासक्रमातून काही श्रद्धा आणि मूल्ये विकसित झालेली असतात, तीच त्या समाजाची जणू मार्गदर्शक तत्त्वे बनून जातात. ही मार्गदर्शक तत्त्वेच पुढे उत्क्रांत होत व्यवस्थेचे रूप धारण करतात आणि समाजाच्या विचार-व्यवहारांना सुनिश्चित आणि सुनियंत्रित करू लागतात. समाजाच्या या श्रद्धा आणि मूल्यव्यवस्थेलाच संस्कृती, असे म्हणता येईल. समाजाचे विचार आणि वर्तन, समाजाचे स्व-स्वेतर आणि सभोवतालाचा अर्थ याच धारणांतून सिद्ध होत असतात. संस्कृती ही अमूर्त गोष्ट असली तरी, पेहराव, खानपान पद्घती, संस्थात्मक व्यवहार, सामाजिक रीतिरिवाज, कला... या सर्वांतून ती मूर्त होत असते. पेहराव, घर-नगर व परिसराची रचना व सजावट, विविध दृककला, धार्मिक व अन्य सामाजिक व्यवहारातील प्रतीक व प्रतिमा.. याला त्या समाजाचा मानवनिर्मित/सांस्कृतिक दृश्यभोवताल असे म्हणता येईल.
  आपला हा नैसर्गिक दृश्यभोवताल आणि मानवनिर्मित/सांस्कृतिक दृश्यभोवताल यांकडे पाहण्याची, त्याचा अर्थ लावण्याची प्रत्येक समाजाची एक स्वतंत्र दृष्टी असते. स्वतंत्र संवेदना व अर्थधारणा असतात. यांतूनच त्या त्या समाजाची दृश्यसंस्कृती घडत असते. गणितीय पद्धतीने असे म्हणता येईल की-समाजाची दृश्यसंस्कृती = त्याचा नैसर्गिक दृश्यभोवताल + मानवनिर्मित/सांस्कृतिक दृश्यभोवताल + त्याबद्दलचे त्या समाजाचे संवेदन व अर्थान्वयन. थोडक्यात, दृश्यभोवताल आणि त्याबद्दलची दृष्टी असे दृश्यसंस्कृतीचे दोन मूलभूत घटक असतात.

  नमनाला एवढे सगळे घडाभर तेल झाल्यानंतर, आपण एका गृहितकाशी येऊ - प्रत्येक समाजाची स्वतंत्र अशी एक दृश्यसंस्कृती असते. याला गृहितक यासाठी म्हणायचे, कारण आता तसे म्हणण्याजोगी परिस्थिती दिवसेंदिवस नष्ट होते आहे. (म्हणजे नक्की काय होते आहे याचे विवेचन पुढील ओघात येईलच.)
  समाज जेवढा छोटा, एकजिनसी, एकात्म, एकजीव, मूल्यांनी व इतिहास-रूढी-परंपरांनी बांधलेला , छोट्या भूभागात वसलेला अथवा भौगोलिकदृष्ट्या बराचसा सलग व एकसंध, तेवढी त्या समाजाची दृश्यसंस्कृती एकमेव आणि विशिष्ट. या उलट समाज जेवढा मोठा, खुला, इतर समाज-संस्कृतींशी सतत आदान-प्रदान करणारा, अनेकविध मूल्यदिशांचा, भौगोलिकदृष्ट्या विस्तारलेला अथवा विखुरलेला-तेवढी त्या समाजाची दृश्यसंस्कृती गुंतागुंतीची, अविशिष्ट, अनेकदिशीय. इथे हे स्पष्ट करायला हवे की, दृश्यसंस्कृती म्हणजे समाजाची वेगळी काही संस्कृती नव्हे, तर एकूण संस्कृतीचेच ते दृश्य-मूर्त रूप असते. एकूण संस्कृतीचेच ते उपांग असते. संस्कृती ही मूर्त-अमूर्त अशा दोन्ही घटकांनी बनलेली असते, त्यापैकी केवळ मूर्त-दृश्यमान घटक म्हणजे, दृश्यसंस्कृती. प्रत्येक समाजाची ही दृश्यसंस्कृती त्या त्या समाजानेच घडवलेली असते आणि त्या त्या समाजासाठी व समाजापुरतीच ती अर्थयुक्त असते. (वास्तविक अर्थ हेच एक सामाजिक रचित असते.) आपले पाहणे, हे त्या दृश्यसंस्कृतीतूनच सिद्ध होत असते.

  वरील विवेचनाच्या आधारे दृश्यसंस्कृतीचे दुहेरी स्वरूप स्पष्ट करता येईल - Visual culture is a Social Construction of Visuals/Vision. दृश्यसंस्कृती ही आपल्या पाहण्याच्या क्रियेला/दृष्टीला आकार देणारी, अर्थ बहाल करणारी बाब असते. त्या दृश्यसंस्कृतीतील सर्व दृश्यमान घटक आणि आपले त्याकडे पाहणे हे एक सामाजिक रचित आहे. म्हणजेच आपल्या समाजानेच तो अर्थ रचला आहे.
  Visual culture is a Visual Construction of Social.
  दुसऱ्या बाजूला, याच दृश्यसंस्कृतीतून आपण आपल्या सामाजिकतेच्या कल्पनाही रचत असतो. वर उल्लेख केल्यााप्रमाणे, दृश्यसंस्कृती हे एकूण संस्कृतीचेच म्हणजेच समाजाच्या श्रद्धा आणि मूल्यव्यवस्थेचेच दृश्यरूप/मूर्तरूप असते, असे म्हणता येईल. वेगळ्या शब्दांत, आपली सामाजिक धारणाच (अमूर्त गोष्टींबरोबरच) या दृश्यसंस्कृतीतून घडलेली असते. थोडक्यात, सामाजिकता आपल्या पाहण्याला, तर पाहणे आपल्या सामाजिकतेला आकार आणि अर्थ देत असते, हे स्पष्ट होईल. दृश्यसंस्कृतीचा इत्यर्थ तो हाच. दृश्यसंप्रेषण म्हणजे,दृश्यघटकांतून अर्थ व्यक्त होणे अर्थात visual communication.
  Visual Communication : Images with messages. आपल्या विवेचनातला हा एक मूलभूत मुद्दा आहे, तेव्हा पुढे जाण्यापूर्वी या संकल्पनेचा जरा थबकून विचार करुया.

  अर्थ आणि निरर्थ या खास मानवी रचना आहेत. त्याला त्या-त्या समाजाची भाषिक-सांस्कृतिक चौकट असते. माणूस हा एक अर्थ रचणारा (आणि अर्थातून स्वतःला रचणारा) प्राणी आहे. आदीम काळापासून मानवाची ही अर्थ रचण्याची प्रक्रिया अव्याहतपणे चालत आली आहे. आपल्या अर्थांकनाला (अर्थ देण्याच्या क्रियेला), वर उल्लेख केल्याप्रमाणे संस्कृतीची चौकट लाभलेली असते. एका संस्कृतीत जे अर्थपूर्ण ते दुसऱ्या संस्कृतीत पूर्णतः निरर्थक असू शकते.
  बहुतांशपणे प्राणीज पातळीवर असणाऱ्या आदिमानवाची कल्पना करून बघा. आजुबाजूला जे भौतिक विश्व त्याला वेढून होते, त्याला, त्यातील घटकांना त्याने शब्द बहाल केला. शब्द म्हणजेच अर्थपूर्ण ध्वनी. या शब्दांतूनच भाषा उमलली आणि मानवाला संकल्पनांचे एक अथांग विश्व खुले झाले. शब्द म्हणजे, त्या वस्तू नव्हेत. शब्द ही त्या वस्तूची केवळ एक मानसप्रतिमा (आणि पर्यायाने चिन्ह) असते. दगड हा शब्द म्हणजे, प्रत्यक्षातला दगड नव्हे, तर दगड या विशिष्ट वस्तूची ती मानसप्रतिमा आहे. तसेच दगड या शब्दातून एक वस्तूगट आणि पर्यायाने एक संकल्पनादेखील व्यक्त होते. शिवाय, या संकल्पनेला सामाजिक-सांस्कृतिक नि व्यक्तिगत अशा एकाहून अधिक अर्थाचे पदरही असतात. म्हणजेच, आपण जे पाहतो, अनुभवतो अशा दृश्यघटकांचे मानवाने केवळ नामकरणच नाही, तर अर्थांकन केलेले असते. आपल्या आजुबाजूच्या गोष्टींपैकी ज्या ज्या गोष्टी आपल्या अनुभवविश्वाचा भाग बनतात, त्या त्या गोष्टींना, त्या समाजाने असे अर्थ बहाल केलेले आहेत. तेव्हा आपण (उदाहरणार्थ) एखादा दगड पाहतो, तेव्हा तो नुसता दगड नसतो, तर दगड या समाजरचित मानसप्रतिमेसह आपण त्याकडे पाहत असतो. म्हणजेच, आपले पाहणे कोरे असत नाही. समाजरचित अर्थसृष्टीतूनच ते पाहणे असते.
  Most of our seeing is predetermined /preloaded with meaning. तेव्हा आपल्या पाहण्यात हे सामाजिक अर्थ आपल्याही नकळत आपोआपच मिसळलेले असतात. कुठलेही पाहणे विशुद्ध असे नसतेच. त्यात सांस्कृतिक सापेक्षता तर असतेच, पण शिवाय त्यात व्यक्तिगत सापेक्षताही मिसळलेली असते. (अर्थात, ही व्यक्तिगत सापेक्षता सांस्कृतिक सापेक्षतेला अनुरुप अशीच असते.) थोडक्यात, पाहणं ही गोष्ट संस्कृतिसापेक्ष, इतिहाससापेक्ष, व्यक्तिसापेक्ष, परिस्थितीसापेक्ष... अशीच असते. पाहण्यातला अर्थ हा त्या वस्तूत नाही, तर त्याच्या पाहण्याच्या चौकटीत दडलेला असतो. याप्रमाणे, अर्थ हे पूर्णतः एक मानवी रचित आहे.

  अर्थ ही बाब एका बाजूला भौतिक/दृश्यभोवतालाशी बांधलेला असतो, तर दुसऱ्या बाजूला सर्वसाधारणीकरणाकडे त्याचा कल असतो. उदाहरणार्थ, ‘दगड’ या शब्दाचा एक अर्थ विशिष्ट वस्तूदर्शक व म्हणून दृश्यभोवतालाशी बांधलेला असतो, तर दुसऱ्या बाजूला त्यातून संकल्पनेचा निर्देश केला जातो, म्हणजेच, सर्वसाधारणीकरण व अमूर्ताकडेही त्याचा कल असतो. थोडक्यात, अर्थ विशिष्टाबरोबरच सर्वसाधारणीकरणाचा नि मूर्ताबरोबरच अमूर्ताचा निर्देश करणारा असतो. अर्थाला असा मूर्त-अमूर्ताचा दुहेरी पदर असतो. पण एक नक्की की, मूर्ताकडूनच हा अमूर्ताचा प्रवास शक्य झाला.
  दृश्यघटकातून हे जे मूर्त-अमूर्त अर्थांचे विश्व माणसाने रचले आहे, ती वास्तविक एक चिन्हांकनाची प्रक्रिया आहे. मानवी भाषा हे या चिन्हांकनाचे एक प्रगत रुप मानता येईल. कारण मानवाचे सर्वाधिक संप्रेषण भाषेतूनच चालते. भाषा हीच मुळात एक चिन्हव्यवस्था आहे. परंतु भाषेखेरीज देखील विविध चिन्हांतून माणूस अर्थाचे संप्रेषण करीत असतो. उदाहरणार्थ, भाषिकव्यस्थेबाहेरचे काही ध्वनी (जशी की शीळ, च्चच्च... इत्यादी) देहबोली (मान डोलावणे, डोळे वटारणे, डोळा मारणे... इत्यादी) रंग,रेषा , आकार, विशिष्ट वस्तू ...आदी दृश्यघटकांना आपल्या सामाजिक-सांस्कृतिक व्यवहारात एक अर्थ असतो. त्या अर्थांसकट नि बरेचदा त्यापलिकडे जाऊन मानवाने याच चिन्हांतून कलासृष्टी रचली आहे. कुठलीही कला ही अशी चिन्हांतून घडलेली असते. त्या चिन्हांना सामाजिक-सांस्कृतिक अर्थ लगडलेले असतातच, परंतु,जेव्हा ही चिन्हे विविध माध्यमांतून व्यक्त होतात, तेव्हा त्याला एक माध्यमविशिष्ट रुपही लाभते. थोडक्यात, कला म्हणजे माध्यमविशिष्ट शैलीयुक्त चिन्हसृष्टी. भाषेप्रमाणेच कला हे देखील एक संप्रेषण आहे.
  आपण अर्थातच इथे दृश्यसंस्कृतीचा नि ओघानेच दृश्यकलेचा विचार करणार आहोत. तेव्हा दृश्यकलेत दृश्यसंप्रेषण महत्त्वाचे असते. आणि त्या संप्रेषणाच्या आकलनासाठी वास्तविक जीवनाबरोबरच त्या माध्यमविशिष्ट शैलीयुक्त चिन्हसृष्टीचेही आकलन महत्त्वाचे असते.


  abhimedh@gmail.com

  लेखकाचा संपर्क : ९८१९५७४०५०

Trending