आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुद्धिमत्तेचे नऊ प्रकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे बुद्धिमत्ता की एका विशिष्ट विषयातलं प्रावीण्य म्हणजे बुद्धिमत्ता?  हॉवर्ड ग्रीन नावाच्या अमेरिकन डेव्हलपमेंटल सायकॉलॉजिस्टनं वेगवगळ्या कौशल्यांबद्दलची मांडणी केली आहे. त्याच्या मते बुद्धिमत्ता ही एकच गोष्ट नाही. तिचे नऊ वेगवेगळे प्रकार आहेत. आजच्या लेखात नऊ प्रकारांबद्दल. 


शाळा मुलांना माहिती देते, वेगवेगळी तंत्रं शिकवते, आणि एका विशिष्ट प्रमाणापर्यंत संस्कारही घडवून एक चांगला नागरिक घडवण्याचा प्रयत्न करते. मात्र आपल्या मुलाचा एक व्यक्ती म्हणून सर्वांगीण विकास करणं हे काम पालकांचंच असतं. प्रत्येक मूल वेगळं असतं. वेगवेगळ्या जीन्स आणि जडणघडणीतून साधारण चारपाच वर्षांपर्यंत त्यांच्या स्वभावाचे आणि कौशल्याचे वेगवेगळे कल जाणवायला लागतात. एकाच घरातल्या दोन मुलींपैकी एक पुस्तकी किडा असू शकते तर दुसरी झाडाफुलांत-प्राण्यापक्ष्यांत रमणारी असू शकते.


हॉवर्ड ग्रीन नावाच्या अमेरिकन डेव्हलपमेंटल सायकॉलॉजिस्टने या निरनिराळ्या कौशल्यांबद्दल मांडणी केली आहे. त्याच्या मते बुद्धिमत्ता ही एकच गोष्ट नाही. तिचे नऊ वेगवेगळे प्रकार किंवा मिती आहेत. तुम्हाला जर विचारलं की इजिप्तचे पिरॅमिड मोठे, दुबईमधली बुर्ज खलिफा बिल्डिंग मोठी की, पारसिकचा बोगदा? तर तुमचा गोंधळ होईल. मोठं म्हणजे नक्की काय? लांबी, रुंदी की उंची? आकारमानाच्या या तीन मिती आहेत. त्यामुळे या तीनही मितींचा विचार करावा लागतो. तसंच बुद्धिमत्तेविषयी चर्चा करताना या नऊ वेगवेगळ्या मितींचा किंवा पैलूंचा विचार करावा लागतो. 


१. गणिती-तार्किक : गणितं सोडवणं आणि कुठच्याही विषयाचा तार्किक दृष्टिकोनातून विचार करणं हे गणिती-तार्किक बुद्धिमत्तेत येतं. अमूर्त संकल्पना हाताळणं, एखाद्या घटनेचा, विषयाचा अनेक अंगांनी विचार करणं, कार्यकारणभाव ओळखणं, संकल्पना-घटना यांमधले परस्परसंबंध शोधणं या गोष्टीही या प्रकारच्या बुद्धिमत्तेच्या कक्षेत येतात.


२. भाषिक : भाषिक बुद्धिमत्ता म्हणजे भाषा, शब्द वापरण्याची क्षमता व आवड. वाचनावर प्रेम, शब्दांच्या वेगवेगळ्या छटांची जाण, व्याकरणाची मूलभूत जाण ही भाषिक बुद्धिमत्ता असलेल्यांकडे असते. भाषेचा अभ्यास, कविता-कथांमध्ये गुंगून जाण्याची क्षमता, शब्दकोड्यांची आवड, गोष्टीवेल्हाळपणा हे गुण लहानपणापासून दिसतात.


३. अवकाश-कालात्म : त्रिमितीय विश्वात नक्की कुठला बिंदू कुठे आहे आणि काळाच्या प्रवाहात ते कसे वाहतात याची मनातल्या मनात ज्यांना उत्तम कल्पना करता येते त्यांच्याकडे अवकाश-कालात्म बुद्धिमत्ता आहे असं म्हणता येतं. भूमिती, चित्रकला, शिल्पकला, स्थापत्यकला यांसाठी बुद्धिमत्तेचं हे अंग आवश्यक असतं. 


४. सांगीतिक : संगीताच्या सर्व पैलूंचं ज्ञान आणि त्यांबद्दलचं आकर्षण ही सांगीतिक बुद्धिमत्तेची देणगी आहे. स्वर ओळखणं, सुरात गाता येणं, एखाद्या वाद्यावर लीलया हुकूमत मिळवणं, लयीची उत्तम जाण असणं ही लक्षणं. 


५. शारीरिक : स्वतःच्या शरीरावर, हालचालींवर उत्तम ताबा असणं म्हणजे शारीरिक बुद्धिमत्ता असणं. खेळाडू, नर्तक, अभिनेते आणि अॅथलिट बनण्यासाठी ही आवश्यक असते. काही लोकांच्या साध्या हालचालीही अत्यंत सहजसुंदर आणि डौलदार असतात. नाच करण्याची आवड, खेळांची आवड आणि त्यात प्रावीण्य या शारीरिक बुद्धिमत्तेच्या खुणा.


६. नैसर्गिक : झाडं-पानं-फुलं, आकाश-पाणी-माती, पक्षी-प्राणी-कीटक यांसारख्यांचं आकर्षणं, त्यांच्याशी नातं जोडण्याची क्षमता ही नैसर्गिक बुद्धिमत्तेतून येते. मुलांमध्ये कीटक, फुलं-पानं गोळा करण्याची आवड दिसते ती यामुळेच. जीवशास्त्रज्ञ, पक्षीनिरीक्षक, निसर्गप्रेमी यांना नैसर्गिक बुद्धिमत्ता आवश्यक ठरते.


७. भावनिक-बाह्य : समाजात वावरताना इतर व्यक्तींशी जुळवून घेणं, त्यांच्याशी मैत्री करणं, त्यांच्या भावनांबाबत सहानुभूती बाळगणं ही कला भावनिक-बाह्य प्रकारच्या बुद्धिमत्तेमुळे येते. लोकसंग्रह करणं, दीर्घकालीन नाती निर्माण करणं, टीममध्ये काम करणं यासारखी ‘सॉफ्ट स्किल्स’ भावनिक-बाह्य प्रकारची बुद्धिमत्ता वृद्धिंगत केल्याशिवाय जमत नाहीत.


८. भावनिक- अंतर्गत : स्वतःच्या भावना, विचारप्रक्रिया, क्षमता आणि मर्यादांची योग्य जाण असणं आणि त्याहीपलीकडे आयुष्याचा मार्ग आखण्यासाठी त्यांचा वापर करता येणं हे भावनिक-अंतर्गत बुद्धिमत्तेमुळे जमतं. 


९. अस्तित्वनिष्ठ : आपल्या मानवी अस्तित्वाबद्दल खोलात जाऊन विचार करण्याची क्षमता. 
ही अत्यंत थोडक्यात केलेली मांडणी आहे. मात्र आपण आसपास पाहिलं तर प्रत्येक विभागात खूप प्रगती केलेल्या व्यक्ती दिसतात, भले त्याच विशिष्ट क्षेत्रात त्या काम करत नसेनात का. तसंच हे नऊ कप्पे एकमेकांपासून पूर्णपणे विभक्त आहेत असंही नाही. उदाहरणार्थ गणिताच्या क्षेत्रात पुढे जायचं असेल तर गणितीय-तार्किक स्वरूपाची बुद्धिमत्ता लागतेच, पण अवकाश-कालात्म आणि भाषिक बुद्धिमत्ताही लागते. 


शाळेत शिकवल्या जाणाऱ्या गोष्टींनुसार या बुद्धिमत्तांची उतरत्या भाजणीत मांडणी केलेली आहे. पहिल्या तीनवर - गणित, भाषा, विज्ञान - शाळा मोठ्या प्रमाणावर भर देते. खेळ, चित्रकला, संगीत हे विषयही असतात, पण कमी महत्त्वाचे. आणि शेवटच्या तीनवर अगदीच कमी भर असतो. मनातली अंतर्गत शांती, इतरांशी मैत्री करण्याची क्षमता हे गुण भविष्यकाळात अनेक वेळा तुम्ही काय शिकला आहात यापेक्षा महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे पालकांनीच या गुणांकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.


नक्की कुठच्या प्रकारची बुद्धिमत्ता जोपासावी? या प्रश्नाचं उत्तर सोपं नाही. पिरॅमिड, उंच इमारत, बोगदा - प्रत्येकच आपापल्या परीने उपयुक्त असतात. तसंच या सर्वच क्षमता जन्मतः पूर्णपणे ठरलेल्या नसतात. त्यामुळे अनेक वर्षं शिकत त्या जोपासता येतात. पण आपल्या मुलाचा किंवा मुलीचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर या नऊपैकी किमान सहासातमध्ये तरी किमान प्रगती व्हावी. इथे दिलेली यादी पालकांना आपलं मूल कुठे पुढे आहे आणि कुठे मागे आहे हे समजण्यासाठी संदर्भ म्हणून उपयुक्त ठरावी.


- राजेश घासकडवी, न्यूयॉर्क
ghaski@gmail.com

बातम्या आणखी आहेत...