आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाभी आणि बारबाला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


कुणी कितीही मोठाल्या गप्पा मारल्या तरीही सारेच थोड्याफार फरकाने परिस्थितीचे गुलाम     असतात. प्रश्न हा अवस्था समजून घेऊन माणसाची माणूस म्हणून किंमत करण्याचा असतो. अनाहूतपणे खोलीत आलेल्या भाभी आणि कामानिमित्त अपरिहार्यपणे भेटणाऱ्या बारबालांमध्ये ती प्रगल्भता होती...


दुपार टळली होती. मी गच्चीवर वाचत बसलो होतो. कैलास आला. त्याच्यासोबत दोन तरुण- तरुणी होत्या. कोणी पाहुणे असावेत, म्हणून मी पटकन खाली गेलो. त्याचे आईबाबा, भाऊ, वहिनी माझ्या ओळखीचे होते. आजचे पाहुणे यापूर्वी मी कधीच बघितले नव्हते. कैलास म्हणाला, ‘हे वाहिद, मेहबूबभैया आणि या भाभी आहेत.’ मी त्यांच्याकडे पाहिलं. त्या दोघींच्या चेहऱ्यावर भीती दाटलेली होती. गळ्यात काळी पोत नव्हती. भाभी कसं म्हणावं? कैलास काही तरी लपवतोय, असं वाटलं मला. भाभी तर काहीच बोलत नव्हत्या. कुणी तरी धरून आणावं तशा अंग चोरून खोलीत बसल्या होत्या. त्या दोघींना पाहून वाहिद म्हणाला, ‘अब डरने की बात नही। यह दोनो बच्चे अपने है। हॉटेल में काम करके पढाई करते है।’ मेहबूबनं कैलासला शंभर रुपये दिले. तो बाहेरून फळं आणि चिवडा घेऊन आला. सगळ्यांना भुका लागल्या होत्या. त्यांनी आम्हाला किराणा भरून दिला.  पण, हे सगळं काय चाललंय, माझ्या डोक्यात काहीच शिरत नव्हतं. ते चौघं गप्पा मारत असताना कैलास मला गच्चीवर घेऊन आला. मी त्याला ‘हे काय प्रकरण आहे?’ याबद्दल विचारलं. तेव्हा कैलासनं सगळा जांगडगुत्ता सांगितला. त्या दोघी गोंदियाच्या होत्या. वाहिद व मेहबूबनं त्यांना पळवून आणलं होतं. म्हणजेच हे धोकादायक प्रकरण होतं. पोलिसांना कळलं तर तुरुंगातसुद्धा जावं लागलं असतं. शिवाय कोकणे मामांनी विचारल्यावर त्यांना काय सांगावं? वाड्यात आम्ही दोघं वगळता सगळे फॅमिली भाडेकरू होते. घरात बाई माणूस दिसल्यावर शेजारची बाई येणारच होती. विचारपूस होणारच होती. कैलासला मी त्या दोघींच्या गळ्यात मंगळसूत्र आणि पायात जोडवी नसल्याचं सांगितलं. त्यालाही पटलं. वाहिद, मेहबूबनं त्यांना काळी पोत, जोडवी दिली. भाभींना आमच्या भरवशावर सोडून ते दोघं निघून गेले.


दुसऱ्या दिवशी कैलास, मी भाभींना सोबत घेऊन त्यांच्यासाठी खोली शोधू लागलो. दोन-तीन ठिकाणी खोल्या होत्या; पण दोघींना पाहिल्यावर घर मालक नाही म्हणायचे. गजानन कॉलनीत प्लॉटिंग व्यावसायिक गाडेकर राहायचे. आम्ही फिरत फिरत त्यांच्या गल्लीत गेलो. घरावर ‘रूम किरायाने देणे आहे’ असे खडूने लिहिले होते. कैलासला बाहेर थांबवून मी वाड्यात गेलो. घरमालक गाडेकर म्हणताच, मी अंबादास गाडेकरची ओळख सांगितली. धागा जुळला. ओळख पटली. खोली मिळाली. कैलासनं त्याच दिवशी मला न विचारता सगळी भांडी नव्या खोलीत टाकली. नव्या खोलीत भाभी स्वयंपाक करायच्या. आम्ही दोघं दुपारचं जेवण त्यांच्याकडेच करायचो. वाहिद, मेहबूब दिवसभर कामधंदा करायचे, संध्याकाळी खोलीवर यायचे. या झमेल्यात आठवडाभर ड्यूटीवर गेलो नाही. शीतल हॉटेल मालकानं माझी वाट पाहिली नाही. दुसरा वेटर ठेवला. आता माझ्या हातात नोकरी नव्हती. ज्ञानेश्वर सपकाळ संगीत लेडीज बारमध्ये वेटर होता. अधून मधून मी त्याला भेटायला जायचो. एक दिवस तो म्हणाला, ‘डिंगडाँग लेडीज बारमध्ये वेटर पाहिजे.’ मी त्याचं म्हणणं ऐकून घेतलं. मला काय उत्तर द्यावं, सुचत नव्हतं. ज्ञानेश्वर म्हणाला, ‘एवढा विचार करायचा नसतो, कधी. नाही तर उपाशी मरशील. काय होतं, लेडीज बारमध्ये काम केल्यानं? बारबाला वाईट नसतात. त्यासुद्धा पोटासाठीच काम करतात. वेटर, हेल्परला कधीच त्रास देत नाहीत त्या. आपल्यासारख्याच असतात त्या. आपण जेंट्स जसे एकत्र काम करतो, अगदी तसे काम करायचं त्यांच्यासंगं.’ ज्ञानेश्वरचं म्हणणं डोक्यात शिरत होतं. त्याचं तर लग्न झालं होतं. तो बारबालांसोबत काम करतो, हे त्याच्या बायकोलाही माहीत होतं. ती ज्ञानेश्वरला काहीच बोलायची नाही.


मोठी हिंमत एकवटून मी ‘डिंगडाँग बार’पुढं उभा होतो. गेटच्या आत पाऊल टाकायची छाती होत नव्हती. काउंटरवर पन्नाशीतला माणूस बसलेला होता. त्याला ज्ञानेश्वरचं नाव सांगितलं. ‘उपर सेठ है। जाकर मिलो।’ म्हणाला तो. खाली साधा बार आणि वरच्या मजल्यावर लेडीज सर्व्हिस होती. मी जिना चढून वर गेलो. सगळे टेबल फुल्ल होते. तंग जिन्स पँट घातलेल्या पाच- सहा तरुण मुली भडक मेकअप करून उभ्या होत्या. मला पाहताच त्यांना हसू आलं. मीदेखील संकोचलो. त्यांच्यातली एक जण म्हणाली ‘छोटा पॅक है। दस नंबर पर बिठा उसको।’ मी ऐकून न ऐकल्यासारखं केलं. मोठा हॉल होता. सतरा-अठरा टेबल. सगळीकडं ‘काँटा लगा’ या जुन्या गाण्याचं रिमिक्स वाजत होतं. दोन बारबाला टेबलवर कस्टमरचा पेग बनवत होत्या. एक कस्टमरचा हात हातात घेऊन त्याच्याजवळ उभी होती. काउंटरजवळ धष्टपुष्ट दोन बॉडीगार्ड उभे होते. इथल्या काउंटरवर दुहेरी हाडाचा उंचपुरा शेठ बसलेला होता. त्याच्या दोन्ही हातांत चार- चार सोन्याच्या अंगठ्या चमकत होत्या. मी काउंटरवर स्वतःची ओळख दिली. त्याने बरेच प्रश्न विचारले. शेवटी म्हणाला, दोन दिवस खालच्या बारमध्ये काम कर. त्यानंतर वरच्या सर्व्हिसला पार्टटाइम घेतो तुला. मी काउंटरजवळून खाली जायला लागलो. तोच एक बारबाला जवळ आली. ‘वेटर में आना चाहता है?’ मी मानेनंच होकार दिला. ‘हमने तेरे को कस्टमर समझा था।’ असे बोलून ती हसू लागली. दुसरी लगेच म्हणाली, ‘कितना छोटा है बेचारा? लेकिन अपनी बिरादारी का है। क्या बोला सेठ तेरे को? कल से बुलाया ना? आ जा, हम है इधर। संभाल लेंगे तेरे को।’ त्या दोघींचं संपल्यावर मी तिथून पटकन खाली उतरलो. त्यांच्याशी बोलल्यानं मला धीर आला होता.


आम्ही जेवत होतो. ‘आपको जॉब मिला?’ भाभी पोळी वाढता वाढता म्हणाली. त्यांनी जॉबचं विचारताच मला जोराचा ठसका लागला. नोकरीचं भाभीला कसं सांगावं? हा माझ्यापुढे मोठा पेच होता. सांगणं तर भाग होतं. एक वेळ भाभीकडे पाहिलं अन् सांगितलं, ‘मुझे जॉब मिल गया भाभी।’ हे ऐकताच तिच्या चेहऱ्यावरचा नूर बदलला. ‘कौन से हॉटेल में?’ भाभीनं मोठ्या खुशीनं विचारलं. मी खाली पाहत म्हणालो, ‘मुझे लेडीज बार में जॉब मिला है।’


हे ऐकताच कैलास मोठमोठ्याने हसू लागला. दोन मिनिटं भाभीसुद्धा काहीच बोलली नाही. मग माझ्याकडे पाहत म्हणाली, ‘कौन सा भी काम बुरा नहीं होता। बुरी होती है अपनी सोच। तुम कहाँ पर काम करते हो, इससे अच्छा है, कितना अच्छा करते हो, यह ध्यान में रखो। रही बात लेडीज बार की, तो वहाँ पर लेडीज नहीं काम करती। बल्की उनकी गरिबी वहाँ काम करती है।’ भाभीचं बोलणं ऐकून मी, कैलास अवाक् झालो.


रात्री अंथरुणावर अंगं टाकलं. काही केल्या झोप येत नव्हती. भाभीनं बारबालांबद्दल किती साधं, सोपं पण गहन सांगितलं होतं. एका बाईला बाईच समजू शकते. यासाठी आभाळाएवढं मन लागतं. माणूस काम करत नाही, त्याची परिस्थिती त्याच्याकडून काम करून घेते. मी बारबालांविषयी नाहक खोटा नाटा समज करून घेतला होता. उलट तीच बारबाला शेठला हॉटेलचा गल्ला जमवून देते. साक्षात लक्ष्मी आहे ती! मन असो वा नसो हसत खेळत कस्टमरचं स्वागत करते. कस्टमर काहीही बोललं तरी काळीज कुप्पीत बंद करते.


आता बारबालाबद्दलची माझ्या मनातली सगळी जळमटं साफ झाली होती. एक नितळ, स्वच्छ बारबाला माझ्या डोळ्यांत तराळत होती...


- रमेश रावळकर
rameshrawalkar@gmail.com
लेखकाचा संपर्क : ९४०३०६७८२४

बातम्या आणखी आहेत...