Home | Magazine | Rasik | Ramesh Rawalkar article in Rasik

बोंबा मारणा-या मसिहापर्यंत

रमेश रावळकर | Update - Jun 24, 2018, 07:09 AM IST

टिश्यू पेपर... म्हटलं तर हा सारं काही मुकाट्याने शोषून घेतो आणि त्यातच संपतो. हा सोसण्याचा, संपण्याचा, संपून पुन्हा नव्य

 • Ramesh Rawalkar article in Rasik

  टिश्यू पेपर... म्हटलं तर हा सारं काही मुकाट्याने शोषून घेतो आणि त्यातच संपतो. हा सोसण्याचा, संपण्याचा, संपून पुन्हा नव्याने उभारी घेण्याचा प्रवास इथे मी थांबवतोय. या प्रवासात समाजाच्या नजरेला कधीही न दिसलेलं जग पुढे आणता आलं हे सगळ्यांत मोठं समाधान आहे...

  मित्रांनो, वर्षभरापासून "दिव्य मराठी'च्या "रसिक' पुरवणीत ‘टिश्यू पेपर’ हे सदर लिहीत होतो. आजच्या या लेखाने मी सदराचा समारोप करत आहे. दहावी पास झाल्यापासून ते पीएच.डी. या संशोधन शिक्षणापर्यंतचा एक विस्तीर्ण पट या सदरामध्ये मी चितारला. खरं सांगायचं तर या वर्षभराच्या काळात मी माझ्या भूतकाळाशी सतत भांडत होतो.


  मी माझे सगळे शिक्षण हॉटेलमध्ये काम करून पूर्ण केले. त्या वेळी हॉटेल माझ्या जगण्याचं एक भरभक्कम आधार बनलं होतं. त्या अनुषंगाने हॉटेलमध्ये आलेले वेगवेगळे अनुभव न लाजता मी तुमच्याजवळ सांगत गेलो. प्रारंभी या अनुभवविश्वावरच्या काही मोजक्या कविता लिहिल्या होत्या. त्यामधलं वेगळं जग कविमित्र पी. विठ्ठल आणि प्रा. कैलास अंभुरे यांना खूपच भावलं. त्यातल्या काही कविता बी.जी. गायकवाड यांनी त्यांच्या ‘संकल्प’ दिवाळी अंकात आणि जनशक्ती वाचक चळवळीचे श्रीकांत उमरीकर यांनी ‘ग्रंथसखा’त प्रसिद्ध केल्या होत्या. एक दिवस मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यक्रमानिमित्त प्रख्यात कादंबरीकार राजन गवस औरंगाबादला आले होते, तेव्हा कैलास अंभुरे यांनी त्यांची ओळख करून दिली. बोलता बोलता गवस सर म्हणाले, ‘तुझे हे हॉटेलचे अनुभव गद्यात मांडले तर एक वेगळे अनुभव मराठी साहित्याला मिळतील.’ आणि इथून ‘टिश्यू पेपर’ लिहायला सुरुवात केली.

  मोरीवाली बाई, वस्ताद (कुक), हेल्पर, वेटर, कॅप्टन, मॅनेजर, शेठ आणि कस्टमर या सगळ्याच व्यक्तिरेखा मी नव्याने जिवंत केल्या. त्या सगळ्यांविषयी लिहिले म्हणजे त्यांचे दुःख, समस्या कमी होतील, असे मुळीच नाही. पण या निमित्तानं त्यांचं भावविश्व व तो भोवताल मला उजेडात आणता आला, याचे समाधान अधिक आहे. या सगळ्यांना मांडताना मला स्वतःला खोदत न्यावं लागलं. मनातल्या गाठीचे बंध सोडावे लागले. इतकं खोदूनसुद्धा कुठेच थंडगार पाण्याचे झरे सापडले नाहीत. असंख्य वेदना व्हायच्या, त्या वेळेस कधी कधी तर मी पूर्ण ब्लँक होवून जायचो. काही सुचायचं नाही. आठवायचे नाही. एकदा अशाच वेळी कथाकार, पत्रकार आसाराम लोमटे यांचा फोन आला. तुझे लेखन वाचतोय, म्हणाले. वर्षभर कॉलम लिहिणं अवघड असतं, याचीही त्यांनी जाणीव करून दिली. पुन्हा म्हणाले, ‘तू खिशात एक कोरा कागद ठेवत जा. जेव्हा जेव्हा आठवले, ते लिहून काढ. त्या तंद्रीत असल्यावर बरोबर आठवते’ मलाही त्यांचे म्हणणे पटले आणि माझे काम सोपे झाले.

  बारबालांविषयी लिहिताना तर माझ्या अंगावर शहारे यायचे. वेटर, हेल्परपेक्षा किती तरी पटींनी तीव्र वेदना मला बारबालांच्या जगण्यात सापडली. पण प्रांजळपणे सांगायचं तर मोरीवाली बाई आणि बारबाला यांचा जीवनपट मला खऱ्या अर्थानं मांडताच आला नाही. अतिशय ढोबळपणे मी त्यांना न्याय दिला. या दोन्ही व्यक्तिरेखा माझ्यापुढे आल्यावर मी गलितगात्र व्हायचो. माझं कौटुंबिक जीवन, सामाजिक स्थान या बंधनांची माझ्या मनात सतत भीती असायची. वाटायचे सगळे सामाजिक संकेत झुगारून खरेखुरे हॉटेलविश्व मी मांडायला हवे होते. पण जे काही लिहिले ते वाचकांनी भरभरून स्वीकारले. याची पावती मला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ‘रसिक’च्या वाचकांनी फोन, व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि ई-मेलद्वारे दिली.

  खरे तर माझी जी गोष्ट सांगितलीय, ती अधिक नितळ, प्रांजळ व्हावी म्हणून मी आत्मकथनाचा फॉर्म वापरला. प्रथम पुरुषी एकवचनी या निवेदन शैलीचा वापर केल्यामुळे मला वाचकांच्या काळजाजवळ जाता आलं. तशी ही गोष्ट खूप मोठी आहे, पण तिच्यात सोयीनुसार बदल करून प्रत्येक पंधरवड्याला, एकेक गाठोडं मी सोडलं. हॉटेलमधल्या सगळ्या व्यक्तिरेखा मला आवडतात. कारण कित्येक वर्षं ते जगणं मी जगत होतो. त्या सगळ्यांचा खऱ्या दिलानं मी आदर करतो. आतापर्यंत त्यांचं जगणं मराठी वाङ््मयाच्या नकाशावर कोणी आणले नाही...(?) याची मला सतत बोचणी होती. ही सगळी माणसं साहित्याचा विषय व्हावीत, असे मला मनोमन वाटायचे. हॉटेलमधल्या माणसांचं हे जगणं जात, धर्मनिरपेक्ष असतं. इथं अठरा पगड जातीचे कस्टमर येतात. आम्ही सर्व जण कस्टमर नावाच्या माणसात देवत्व शोधतो. हॉटेलवासीय माणूसपणाचं तत्त्व शोधत माणुसकीचं सत्त्व आम्ही आपल्या अंगाखांद्यावर मिरवत असतो.
  हॉटेलमध्ये नोकरी करतो म्हटल्यावर अनेक जण नाकं मुरडतात, हीन नजरेनं बघतात. गोड बोलतात, ते ‘गुड सर्व्हिस’ मिळेपर्यंत. नंतर वेटरशी काही संबंध नसतो. झिंगलेले कस्टमर ऑर्डरला थोडा उशीर झाला, तर मायबहिणी उधडतात. या वेळी वेटर त्यांच्याकडे ‘पिलेलं कस्टमर’ म्हणून दुर्लक्ष करतो. काही मोजके कस्टमर वगळता हेल्पर, वेटरविषयी ग्राहकांच्या मनात कधीच फारशी आस्था नसते. हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केलेल्यांना असे अनुभव मिळत नाहीत. त्यासाठी सामान्य हॉटेलमध्ये नोकरी करावी लागते.

  या सदराच्या निमित्ताने मला असंख्य वाचकांनी प्रतिक्रिया दिल्या. सकाळी सहा वाजेपासून रात्रीपर्यंत प्रतिसादाचे फोन येत. त्या सगळ्यांचा मी ऋणी आहे. कित्येकांना या जगाविषयी माहिती नव्हती, त्यांना नव्याने माहिती मिळाली. बारबालांबद्दल लिहिताना अनेक महिलांना मी कोणी सामाजिक कार्यकर्ता असल्याचे वाटले. यामुळे कित्येक स्त्रियांनी स्वतःच्या समस्या सांगितल्या. मीदेखील माझ्याकडून शक्य तेवढी मदत केली. काही वाचक तर फोनवर रडायचे तेव्हा मला खूप अवघडल्यासारखे व्हायचे. काही शैक्षणिक, सामाजिक संस्थांनी मला निमंत्रित केले. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील धाडच्या जि.प. हायस्कूलच्या मुख्याध्यापकांनी शाळेचा विद्यार्थी असल्यामुळे शाळेत बोलावून सत्कार घडवून आणला. वेगवेगळ्या भागांतून मिळालेल्या वाचक प्रतिसादामुळे मला ऊर्जा मिळाली. त्यात लक्षात राहील, असे नाव म्हणजे, धुळे येथील पेट्रोल पंपावर काम करणारे अशोक सोनार हे होत. नाशिकच्या लता कुमावत, भालेराव दांपत्य यांनी मला खूप जीव लावला. मात्र, दिनांक १० सप्टेंबर २०१७ रोजी लिहिलेल्या ‘दहा वेश्या मेल्यावर एक वेटर जन्म घेतो’ या लेखाविषयी अकोला आणि मनमाड येथून मला अत्यंत कडवट व किळस आणणाऱ्या प्रतिक्रिया मिळाल्या. लेखाचे शीर्षक वाचून मला मारण्याची धमकी दिली गेली. त्या वेळी प्रशांत पवार सर, पी. विठ्ठल, कैलास अंभुरे आणि बालाजी सुतार या मित्रांची मदत व दिलेला धीर कामी आला. लेख प्रसिद्ध झाल्यावर मी तो फेसबुकवर टाकत असे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून लेखमालेचे स्वागत झाले. रा.रं. बोराडे सर, दादा गोरे, सतीश बडवे सर न चुकता फोन करत. बोराडे सर घरी बोलवून घेत. चर्चा करत. या वर्षभराच्या कालखंडात ‘रसिक’ पुरवणीमुळे मी महाराष्ट्रभर जोडला गेलो.

  मी आता औरंगाबाद येथील शासकीय-ज्ञानविज्ञान महाविद्यालयात अध्यापन करतोय. हॉटेल सुटलं, पण त्याविषयी पूर्वीसारखीच आत्मीयता जिवंत आहे. वेटर म्हणून नोकरी करताना मी स्वतः टिप घ्यायचो, आता हॉटेलमध्ये गेल्यावर मी वेटरला टिप दिल्याशिवाय परतत नाही. या सदरामुळेे चित्रपट दिग्दर्शक शंतनू रोडे यांचा वेटर मंडळींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. हे त्यांनी मला फोन करून आवर्जून सांगितले.
  अर्थातच, आज मी हॉटेलमध्ये नसलो ती संघर्ष कायम आहे. तरी नव्या उर्मीनं काम करतोय. दुःख एवढेच वाटते की वेटर, हेल्पर यांच्याबद्दल कोणतीच संस्था विकासाबाबत बोलत नाही. त्यांच्या नशिबात-
  वेटर, हेल्पर इथल्या सगळ्यांच्याच बुडाशी असतो
  दुःखानं डबडब भरलेला भला मोठा एक डोह
  तेव्हा तिन्ही देवांच्या नावानं किती लावली उदबत्ती,
  खंडोबाच्या नावानं जागवली सगळी रात
  अथवा पिराच्या नावाचा मागितला गदा
  तरी आमचं गाऱ्हाणं पोहोचलं नाही कधीच
  लोककल्याणाच्या बोंबा मारणाऱ्या मसिहापर्यंत...
  (समाप्त)


  अविरत संघर्षाचे शिक्षण
  आजच्या घडीला हॉटेल सोडून बराच काळ लोटलाय. याचा अर्थ संघर्ष संपला असे नाही. फक्त ते जग सोडून मी अध्यापनाच्या क्षेत्रात स्थिरावलो आहे. एकेकाळी हॉटेलपासून बाजूला झालो खरा; पण चाटे शिक्षण समूहाचे संचालक प्रा. गोपीचंद चाटे आणि मच्छिंद्र चाटे यांनी त्यांच्या समूहात नोकरी देऊन माझ्या जगण्याचे प्रश्न सोडवले. मी कोचिंग क्लासेस व विनाअनुदानित इंंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षकाचीही नोकरी केली. औरंगाबादच्या सेंट जॉन इंग्लिश हायस्कूलमध्ये बरीच वर्षे अध्यापन केलं. तिथं संचालक जेम्स डोंगरदिवे व पल्लवी जेम्स डोंगरदिवे या दांपत्याने माझ्या कलेची खूप कदर केली...

  rameshrawalkar@gmail.com

  लेखकाचा संपर्क :९४०३०६७८२४

Trending