आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छत्‍तीस रोट्या खाल्‍याची अफवा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चार नंबरवर मी सावकाश जेवत होतो. एका वेटरनं माझ्याकडं चक्कर मारली. काउंटरवर त्यानं मी हंडीभर भाजी आणि छत्तीस रोट्या घेतल्याचं सांगितलं. खरं- खोटं तपासण्यासाठी एकेक वेटर माझ्याकडे बघू लागला. मला काहीच कळेना. जेवण झालं आणि सगळा प्रकार लक्षात आला... 


मी,मुस्कटात मारलेलं कस्टमर धर्मानं मुस्लिम होतं. हॉटेलमधल्या एका वेटरनं त्याला हिंदू-मुस्लिम रंग दिला. त्यामुळे तो कस्टमर लोकं घेऊन येईल, उद्या भांडणं होतील, याची चोपडाचापडी वेटरमध्ये चालली होती. माझ्या मनात भीती पेरण्याचं काम मोठ्या चलाखीनं सुरू होतं. अण्णाच्या कानावर ही गोष्ट अजून गेली नव्हती.  खरं तर मी कोणत्याच जाती-धर्माच्या माणसाला मारलं नव्हतं. कारण, हॉटेलमध्ये येणाऱ्याला  जात-धर्म नसतो. तो फक्त एक कस्टमर असतो, असे मानणाऱ्यांपैकी मी एक होतो. त्या कस्टमरनं चुकी नसताना माझ्यावर जो अन्याय केला, त्याचाच मी प्रतिकार केला होता. बस्स एवढंच. मग इतर वेटर याला एवढं गडद का करत होते? या गोष्टीचा छडा लावण्याचं मी पक्कं ठरवलं... 


हॉटेलचं गेट बंद झालं. हळूहळू आतले कस्टमर बाहेर पडले. वेटरची जेवणं उरकली. काऊन्टरवर बसणारा वेटर माझ्याजवळ आला. ‘चल बाहर से पान खाकर आयेंगे.’  त्या दिवशी मी त्या वेटरला पान खाऊ घातलं. बोलता बोलता म्हणालो, ‘यहाँ पर अब जी नहीं लगता.’ त्यावर तो म्हणाला, ‘क्यों? वेटर लोग जो कुछ बोल रहे है, उससे डर लगने लगा क्या?’ मी त्याच्याकडं पाहत होकारार्थी मान हालवली. तो लगेच बोलला, ‘मतलब तुम शिकार हो गये। वो सब तुमको डरा रहे है। ताकी तुम छोडकर जाये। तुम आने से पहले हॉल में टेबल हर एक को मिलते थे। अब तुम करते हो। उनकी रोज की टिप कम हो गई। डरो मत। कुछ नहीं होगा। वों कस्टमर अब नहीं आयेगा।’ त्याच्या म्हणण्यात तथ्य होतं. कोण कस्टमर हॉटेलमध्ये मार खाल्ल्याचं बाहेर सांगेल? खरं तर मी वैशाली हॉटेल सोडावं म्हणून वेटरनं आखलेला तो एक डाव होता. 


पण कधी कधी भीती वाटायची की ते कस्टमर खरंच परत येईल का? तसा मी कधीच सुटी घ्यायचो नाही. आता मात्र दोन दिवसाआड दांड्या मारू लागलो. हॉटेलमध्ये शिरताच माझी नजर चौफेर फिरू लागली. मध्यरात्री खोलीवर परतताना गजानन मंदिरापासून कोकणेच्या वाड्यापर्यंत पळत सुटायचो. या भीतीपोटी अण्णाला न सांगता, मी वैशाली हॉटेलमधलं काम थांबवलं. वरच्या दहा दिवसांच्या पगारावरही पाणी सोडलं...  


काम सोडल्यामुळे खाण्यापिण्याची हेळसांड होऊ लागली होती.  प्रयत्न करूनही  काम मिळत नव्हतं. माझा एक मित्र भरत हा तांदळे मॅडमकडं राहायचा. मॅडमचा तो पुतण्या होता. तांदळेसाहेब कोर्टात वकिली करायचे. त्यांनी एके दिवशी मला विचारले, ‘यशोदीपमध्ये काम करतोस का?’ त्यावर  ‘पण त्यांनी घेतलं पाहिजे.’ असं मी म्हणताच तांदळेसाहेबांनी मॅनेजर असलेल्या सुधाकरभाऊंना फोन लावला.  यशोदीप हे बांधकाम कॉन्ट्रॅक्टर घुगे यांचं हॉटेल. ते कधी तरी एखादी चक्कर मारायचे. यशोदीप त्यांचा मुलगा. सकाळ-संध्याकाळ न चुकता यायचा. काउंटरला भास्करभाऊ थांबायचे. तिथं शेठ म्हणण्याची प्रथा नव्हती. सगळा स्टाप ‘भाऊ’ असेच म्हणायचा. 


माझ्यासोबत कैलासलाही मी यशोदीप जॉइन करायला भाग पाडलं. लॉजिंग, थाळी, व्हेज-नॉनव्हेज रेस्टॉरंट आणि बारनं सुसज्ज असं हे हॉटेल होतं. अनेक ट्रॅव्हल्सच्या बसेस तिथं थांबायच्या. शिर्डी, बालाजीला जाणारे प्रवासी त्यात असत. कितीतरी कस्टमर लुंगीवरच हॉटेलमध्ये शिरत, दारू पित. जेवणं करत. ड्रायव्हरनं हॉर्न वावला की एकच गोंधळ उडे. इतर वेळी मुख्य रोडवर हे हॉटेल असूनही फारशी वर्दळ इथं नसायची. मनासारखी टिपही मिळायची नाही. यामुळे  पूर्वीची नोकरी सोडल्याचा पश्चात्ताप होऊ लागला होता. पण तांदळेसाहेबांमुळे हॉटेल सोडता येत नव्हतं.  


इकडे बारावीचा निकाल लागला होता. मी पास झालो. कैलास एका विषयात नापास झाला.   याची माझ्या मनाला खूप टोचणी लागली होती. मात्र तो हळूहळू त्यातून सावरला. मी  वसंतराव नाईक महाविद्यालयात बी.ए.ला अॅडमिशन घेतली. तिथं बापूराव जगताप, शीला विप्र, अजित दळवी आणि अनुया दळवी ही नामवंत मंडळी विद्यार्थ्यांना शिकवायची. बापूराव जगताप स्वतः कवी होते. अजित दळवी नाटककार, तर अनुया दळवींचा अभिनेत्री म्हणून बोलबाला होता. या सगळ्यांविषयी मलाच काय? अनेकांना आकर्षण होतं. त्या वेळी औरंगाबादला ‘बिनधास्त’ चित्रपटाचं शूटिंग चालू होतं. कॉलेजमधली बहुतेक मुलं-मुली पीरियड बुडवून शूटिंग बघायला जायचे. त्यांच्यात  मीसुद्धा एक होतो... 


यशोदीपमध्ये धंदा कमी आणि स्टाफ जास्त अशी गत होती. एक दिवस स्टाफ कमी करण्याचं फर्मान आलं. त्यातच माझा व कैलासचा बळी गेला. नोकरी सुटली म्हणून मला आनंद नव्हता आणि दुःखसुद्धा नव्हतं. सेव्हन हिल्स रोडवर भंडारी यांचा ‘शीतल बार’होता. वय झाल्यानं त्यांना एवढा पसारा बघणं शक्य नव्हतं तेव्हा व्यंकटेश मालखरे यांनी ते हॉटेल चालवायला घेतलं. अभिरुची हॉटेल मालकाचे ते चुलत भाऊ होते.  मी अभिरुचीत असताना त्यांची चक्कर नेहमी असायची. ओळखही होती. एक दिवस मालखरे यांना भेटलो. त्यांच्याकडं पार्टटाइममध्ये व्हॅकन्सी होती. काहीच नाही म्हणून पार्टटाइम जाऊ लागलो. राजू वस्ताद शीतलचा हेड कुक होता. मात्र तो कधीच हेडकुकचा आव आणायचा नाही. टेबल संपल्यावर सगळ्या वेटर, हेल्परला जेवण करून घ्या म्हणायचा.  कॉलेजमध्ये अभिजित पंडित सरांनी गॅदरिंगसाठी पांडवांवर एक नाटक बसवलं होतं. त्यात मी कृष्णाची भूमिका करत होतो. गॅदरिंगचा दिवस आला. कवी इंद्रजित भालेराव यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं होतं. शेठकडून मी तीन दिवसांची सुटी घेतली. पहिला दिवस नाटकाचा. पंडित सरांनी तालमींची मस्त भट्टी जमवली होती. पण नाटकात कृष्ण जेवताना एका दृश्यानं माझी फजिती केली. कृष्ण द्रौपदीला पोळी दे म्हणतो, पण ऐनवेळेला मी द्रौपदीला पोळीऐवजी ‘तंदूर रोटी दे गं मला.’ असे म्हणालो. तेव्हा द्रौपदीनं मला लगेच सावरलं. ‘दादा, तू हॉटेलामध्ये जेवत नाहीस.’ हे संवाद ऐकताच विद्यार्थी प्रेक्षकांत एकाच हशा पिकला. शिट्यांचा आवाजही घुमत राहिला. 


या तीन दिवसांत माझ्या पोटाची आबाळ झाली होती. मी ड्यूटीवर हजर झालो होतो. रात्री साडेदहानंतरसुद्धा टेबल लागलं. त्यात कस्टमरला मी चुकीची बिअर दिल्याने हंगामा झाला. सगळं आटोपलं तेव्हा इतर वेटर लोकांचं जेवणं चालू होतं. त्यांना पाहिल्यावर माझ्यात थांबण्याची शक्ती उरली नव्हती. त्याच धुंदीत रोजच्यापेक्षा आज दोन-तीन रोट्या शिल्लक घेतल्या. वस्तादनं भाजी दिली. चार नंबरवर मी सावकाश जेवत होतो. एका वेटरनं माझ्याकडं चक्कर मारली. काउंटरवर त्यानं मी हंडीभर भाजी आणि छत्तीस रोट्या घेतल्याचं सांगितलं. खरं-खोटं तपासण्यासाठी एकेक वेटर माझ्याकडे बघू लागला. मला काहीच कळेना.  जेवण झालं आणि सगळा प्रकार लक्षात आला... 


‘तीन दिवस सुटीवर होता. काय भेटलं असेल खायला? भुकेपोटी बसलाय गिळायला. पण कितीही भूक लागली म्हणून एवढी भाजी अन् इतक्या रोट्या खातात का? सगळ्या हॉटेलमध्ये माझीच चर्चा रंगली होती. गेटमधून बाहेर पडताना वाचमननं मला  थांबवलं. ‘तू हंडीभर भाजी आणि छत्तीस रोट्या खाल्ल्या म्हणे?’ हे ऐकताच मला वेटरमधल्या चर्चेचा थांग लागला. एकही शब्द न बोलता मी गेटच्या बाहेर पडलो. चालता चालता मनात विचार आला खरंच मी छत्तीस रोट्या खाल्ल्या का? की वेटरनं नुस्तीच अफवा पसरवली. माझं डोकं सुन्नं झालं होतं...


- रमेश रावळकर 
rameshrawalkar@gmail.com 
लेखकाचा संपर्क - ९४०३०६७८२४

बातम्या आणखी आहेत...