Home | Magazine | Rasik | Ramesh Rawalkar write about yourself

झोंबणाऱ्या दोन गोष्टी

रमेश रावळकर | Update - Jun 17, 2018, 01:00 AM IST

आयुष्यातली वळणं सांगून येत नसतात. म्हणूनच ती आली की, भांबावून जायला होतं, नैराश्य, संताप, लाज अशा भावना मनात दाटून येता

 • Ramesh Rawalkar write about yourself

  आयुष्यातली वळणं सांगून येत नसतात. म्हणूनच ती आली की, भांबावून जायला होतं, नैराश्य, संताप, लाज अशा भावना मनात दाटून येतात. असंच माझ्याही बाबतीत घडलं. दोन वळणांवरच्या दोन गोष्टी मला सर्द करून गेल्या...


  आषाढाचं आभाळ रोज भरून येत होतं. वाटायचं आज बरसल्याशिवाय राहणार नाही. पण वाट पाहणारे डोळे तरसून गेले होते. पण करंट्या आभाळाला पाझर फुटला नव्हता. दोन दिवसांपूर्वीच गावाकडून दादाचा फोन आला होता. ‘आवंदा काही खरं दिस नाही गड्या. पानं फुटलेल्या पळाट्यासुद्धा आता माना टाकू लागल्यात.’ तिकडं पाणी पडत नाही, म्हणून लोकांच्या तोडाचं पाणी पळालं होतं. आणि इकडं मला नोकरी धुंडाळताना फेस येत होता. या महिन्यात काम मिळालंच पाहिजे. कारण पुढचा महिना श्रावण होता. विचार करत चेतक घोड्यापासून खाली वळलो. पुढे ‘अभिरुची’ हॉटेल होते. गेटजवळ सुनील वस्ताद उभा दिसला. मला पाहताच त्याने आवाज दिला. बाहेर चहा घेऊ म्हणाला. तेवढ्यात किशोर किराणा सामान घेऊन आला. मला पाहून म्हणाला, ‘काय कवी, बऱ्याच दिवसानंतर दिसलात.’ मी फक्त गालातल्या गालात हसलो. त्याला काही तरी आठवलं तसा, तो पटकन म्हणाला, ‘जानकी हॉटेलमध्ये वेटर पाहिजेत. रिकामा आहेस का तू?’


  किशोरनं मनातल्या प्रश्नाला हात घातला होता. आता मला जानकी हॉटेलमध्ये नोकरी मिळाली होती. वर्षभरापूर्वी सुनीताताईचं लग्न झालं होतं. तिला औरंगाबाद सासर मिळालं होतं. दाजी त्या वेळी टाटा फायन्समध्ये नोकरी करायचे. ड्राय डे असला की मी तिच्याकडे जायचो. एक दिवस शनिवारी दाजीनं मला घरी बोलावलं. दाजी म्हणाले, ‘उद्या तुला बघायला पाहुणे येताहेत.’ ध्यानीमनी नसताना माझ्या लग्नाची गोष्ट काढल्यानं मी गोंधळून गेलो. मी ताईकडं बघितलं. ‘ते फक्त बघून जातील. बघायला काय हरकत आहे?’ ती अशी बोलल्यावर मला काहीच बोलता आलं नाही. मला शांत पाहून दाजी म्हणाले ‘मुलगी एलएल.बी. च्या दुसऱ्या वर्षाला आहे, म्हणे. जमलं तर चांगलंच होईल ना. कोर्टात वकिली करेल ना ती.’ दाजीच्या बोलण्याचं मला हसू आलं. त्यांना मध्येच थांबवत म्हणालो ‘ती कोर्टात वकिली करेल अन् मी हॉटेलात वेटरकी! कसं दिसतं ते? मी दाजीला मनातलं सांगितलं. ‘त्याचा एवढा विचार नको करू तू. आपण काही त्यांच्या घरी नाही चाललो, आमच्या घरी मुलगी द्या म्हणून सांगायला.’ ताई दळणातले खडे काढता काढता बोलली...


  दुपारी दोन वाजता चार-पाच पाहुणे घरात गप्पा मारत होते. मी घराच्या मागं चिंचेच्या झाडाखाली बाजेवर बसलो होतो. जेवणंखावणं आटोपल्यावर दाजीनं मला आवाज दिला. पाहुण्यांमध्ये एक जण जास्तच बोलका होता. तो मुलीचा मामा असल्याचं कळलं. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकाची नोकरी करायचा तो! त्यानं मला नाव विचारलं. शिक्षण सांगितल्यावर मुलीच्या बापाला चेहऱ्यावरचा आनंद लपवता आला नाही. सोयऱ्याधायऱ्याच्या बऱ्याच गप्पा मारून ते घराबाहेर पडले. तेवढ्यात मुलीच्या मामानं मला बाजूला बोलावलं. ‘तुम्ही नोकरी करून शिकताय म्हणे. तुमचे दाजी सांगत होते.’ या प्रश्नानं माझ्या चेहऱ्यावर मळभ दाटून आलं. ‘कोणती नोकरी करता तुम्ही?’ मुलीच्या मामानं नको असलेला प्रश्न उपस्थित केला होता. मी आवंढा गिळून शांत उभा राहिलो. उत्तर तर द्यावं लागणार होतं. एकदा दाजीकडं पाहिलं. मग पाहुण्यांना म्हणालो, ‘मी हॉटेल जानकीमध्ये वेटरची नोकरी करतो.’ असे म्हणताच त्यांच्या चेहऱ्यावरचा सगळा रंग खर्रकन उतरला. त्यांनी पाहुण्याचा हात ओढून बाजूला नेलं. ‘तुम्ही एका वेटरला मुलगी द्या म्हणता आम्हाला. घरी जाऊन भाची, बहिणीला काय सांगू मी? ‘मुलगा हॉटेलमध्ये वेटर आहे. अहो, मुलगी एलएल.बी. करती आमची.’ मुलीचा मामा ताण तोडत होता.


  इकडे, ताईच्या आणि दाजीच्या चेहऱ्यावर आनंद फुलला होता. मुलीच्या बापाच्या बोलण्यानं त्या दोघांचं काळीज सुपाएवढं झालं होतं. त्यांच्याकडे पाहून मी इकडे काय घडले, ते सांगितले नाही. मला त्यांचा आनंद कमी करायचा नव्हता. ते दोघेही मला थांब थांब म्हणत होते. पण माझी थांबण्याची इच्छाच मेली होती. ड्यूटीला जाण्याचे कारण सांगून मी तिथून चटकन निघून आलो. माझ्या डोक्यात राहून राहून या पाहुण्यांचे शब्द घुमत होते. वेटरची नोकरी इतकी कमी दर्जाची असते का? तो कुणाकडे भीक मागत नाही अथवा चोरी, छिनालकी करत नाही. स्वतःच्या कष्टानं पोट भरतो. या विचारांचा माझ्या मनात जाळ पेटला होता नुसता...


  माझी एम.ए. ची दोन्ही वर्षे संपली होती. सोबत शिकणारे बाहेर गावचे सोबती आपापल्या गावी निघून गेले होते. फक्त कैलास अंभुरे (हा एम.ए. वर्गमित्र होता) आणि मी औरंगाबाद सोडलं नव्हतं. त्याला महाराष्ट्र उद्योजक केंद्रात कार्यक्रम अधिकाऱ्याचा सहायक म्हणून नोकरी मिळाली होती. औरंगाबादच्या एम.आय.डी.सी. मध्ये एक विनाअनुदानित कॉलेज असल्याचं मला कळलं होतं. तिथे मराठीच्या शिक्षकाची आवश्यकता होती. एक दिवस संस्था संचालकांना भेटलो. तशी जुनी ओळख निघाल्यानं त्यांनी घ्यायचं कबूल केलं. पगार मात्र देणार नव्हते. अनुदान आल्यावर कायम करायचं बोलत होते. पण कोणतीही संस्था डोनेशन घेतल्याशिवाय पर्मनंट करत नाही हे मला माहीत होतं.

  कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून शिकवायला मिळणार. याचा मला खूपच आनंद झाला. हे जरी खरे असले तरी पोटापाण्याचं काय करायचं? मी आठवडाभर सतत विचार करत होतो. मला कॉलेजवर प्राध्यापक म्हणून शिकवायचं होतं, पण पगाराचं घोडं अडल्यानं निर्णय घेता येत नव्हता. शेवटी, एक गोष्ट पक्की ठरवली. काही झालं तरी चालेल पण प्राध्यापकी करायची. रात्री पार्टटाइम वेटरकी करायची, आणि कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून शिकवायचं. मग जानकी हॉटेलमधली ड्यूटी हाफ टाइम करून घ्यायचं ठरलं. टिप मला भाड्याला वापरता येणार होती. शेवटी, एक नाही दोन नाही असे ठरवून, दोनच दिवसांत मी कॉलेजमध्ये रुजू झालो. आता कोणी विचारल्यावर मी प्राध्यापक असल्याचं सांगू लागलो. पुढे काळे आणि भोसले या दोन प्राध्यापकांसोबत बजाजनगरला राहायला गेलो. त्यामुळे जानकी हॉटेलातली नोकरी सोडून कॉलेजपासून काही दूर हॉटेल ‘मृगनयनी’मध्ये रात्रीची नोकरी करू लागलो.


  संध्याकाळ झाली होती. बाहेर गणपती उत्सवाच्या भोंग्यांचा आवाज हॉटेलच्या गार्डनमध्ये येत होता. हळूहळू एकेक टेबल लागत होता. आम्ही तिघे वेटर एक कोपऱ्यात उभे होतो. मी मेनूकार्ड व केव्हटी बुक घेऊन टेबलकडं गेलो. दोघं चौघं तरुण कस्टमर सिगारेटचा धूर हवेत सोडताना दिसले. आपल्याला कोणी बघू नये म्हणून त्यांनी कोपऱ्यातला टेबल निवडला होता. मी त्यांना ऑर्डर विचारताच आम्ही सगळ्यांनी एकमेकांकडं बघितलं. क्षणभर मला आणि त्यांना काय बोलावं काहीच सुचत नव्हतं. त्या कस्टमरलाही मला पाहिल्यावर मेल्याहून मेल्यासारखं झालं. त्या सगळ्यांच्या तोंडातून एकदम ‘सर तुम्ही! आणि इथं!’ असा घाबरा सूर बाहेर पडला. मला तर शब्द गवसेना! खरं बोलावं, तर कॉलेजची बदनामी होणार. लपवावी, तर मी स्वतः वेटरच्या पोशाखात टेबलवर ऑर्डर घ्यायला उभा होतो. स्वतःला शांत ठेवून, मी चटकन बाजूला निघून गेलो, तर ते विद्यार्थी कस्टमर माझ्या मागे पळत आले. ‘सर, सर आमचं चुकलंय, बारमध्ये पहिल्यांदा आलोय आम्ही! आम्ही कधीच येत नाही. पीत नाही. यानंतर आम्ही चुकूनही इथं दिसणार नाही!’ त्यांच्यातला दुसरा विद्यार्थी हिंमत करून म्हणाला, ‘कंपनीत बारा बारा घंटे स्टँडिग ड्यूटी करावी लागती आम्हाला. जीव चिंबून जातो नुसता!’ एकेक करत ते सगळे आपापली सफाई देत होते. पण माझ्या डोक्यात इतकं अंधारून आलं होतं, की मला स्वतःला सफाईच देता येत नव्हती. हॉटेलमधले हेल्पर, वेटर आमच्याकडं बघत होते.


  मी त्यांना पुन्हा टेबलवर बसवलं. न राहवून एका विद्यार्थी कस्टमरनं विचारलं. ‘सर, तुम्ही या हॉटेलात काम करताहेत, हे काय आहे?’ त्यांचं ऐकून घेतल्यावर मी त्यांना समजावत म्हणालो, ‘टिश्यू पेपर’ नावाची माझी एक नवीन कादंबरी येत आहे. ती हॉटेल जीवनानुभवावर आधारित आहे. हेल्पर, वेटर, मोरीवाली बाई, कस्टमर यांचं जगणं मला बघायचं होतं. म्हणून मी इथं काम करण्यासाठी आलोय. खरे तर मी हे सगळं खोटं बोलत होतो. या अपराधाची टोचणी कित्येक दिवस मला सतावत होती. हे कळल्यावर माझ्या विद्यार्थ्यांच्या मनात माझ्याविषयीचा आदर आणखीनच दुणावला होता. पण मी जेव्हा जेव्हा एकटा असायचो, तेव्हा लातूरच्या मुलीच्या मामानं केलेला पाणउतारा आणि मृगनयनी हॉटेलमध्ये विद्यार्थ्यांशी खोटे बोललेलो, या दोन गोष्टी हिरव्या मिरच्यासारख्या रोजच झोंबत राहायच्या..


  - रमेश रावळकर
  rameshrawalkar@gmail.com
  लेखकाचा संपर्क : ९४०३०६७८२४

Trending