आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेंदूला मुंग्या आणणारी गोष्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुखी माणसं एकसारखीच असतात, पण प्रत्येक दु:खी माणसाचं दु:ख वेगळं असतं...बारबाला म्हणून औरंगाबादमध्ये खितपत पडलेल्या टिनाच्या वाट्याला आलेलं दु:खही असंच हादरवून 
टाकणारं होतं...


र्धावर्धा वैशाख संपत आला होता. या महिन्यात लग्नाच्या तिथी खूपच दाट होत्या. गावात रोज पंगती उठायच्या. पण काही काम नसल्यानं गावात थांबूनही उपयोग नव्हता. आपला कामधंदा पाहणं गरजेचं होतं. म्हणून मी दुसऱ्या दिवशी औरंगाबादची गाडी धरली. पण रेश्मा व सुमन मुंबईला गेल्यानं तिथं जाण्याची   इच्छा होत नव्हती. लेडीज बारमधील नोकरी करताना बारबालांसोबत जवळून संबंध आला होता. त्यांच्या दुःखापुढं मला इतरांचं दुःख बोथट वाटू लागलं होतं. मनात यायचं, दुःख कसं टोकदार आणि धारदार असलं पाहिजे. तरच ते दुसऱ्याची छाती चिरून आत शिरतं...


संध्याकाळ झाली होती. कुठं तरी एक फेरफटका मारावा म्हणून खोलीबाहेर पडलो. चालत चालत बराच लांबवर आलो. आणि अचानक माझे पाय बारबालांच्या फ्लॅटकडे वळले.  पाहतो ते काय, फ्लॅटपुढच्या गल्लीत टिना नजरेस आली. तिला भेटावं की नाही, भेटावं या विचारात असताना आम्हा दोघांची नजरानजर झाली. आता तिला टाळणं शक्य नव्हतं. खूप दिवसांनंतर आम्ही भेटत होतो. ‘आज तू हॉटेल पर नही गयी?’ मी असे विचारल्यावर ती खळ्ळकन हसली. मग म्हणाली, ‘आज तू इधर कैसा आया रे?’ ‘घुमने निकला था। सोचा फ्लॅट के तरफ एक चक्कर मारू।’ मी बोललो. बोलता बोलता ती फ्लॅटवर चल म्हणाली. मीदेखील आढेवेढे न घेता तिच्यासोबत फ्लॅटवर गेलो. सगळ्या बारबाला हॉटेलवर गेल्या होत्या. टिनाच्या अंगात थोडी कणकण होती. त्यामुळे ती ड्यूटीवर गेली नव्हती.


इकडचं तिकडचं बोलणं झाल्यावर टिनानं आंब्याची कॅरीबॅग आणली. खा म्हणाली. आम्ही दोघांनी एकेक आंबा घेतला. तोच फोनची बेल वाजली. फोनवर बबली होती. म्हणाली, ‘तू जेवायला येणार आहेस की पार्सल आणायचं?’ टिनानं माझ्याकडं बघितलं आणि नाही असं सांगून फोन ठेवला. मी म्हणालो ‘आज तू खाना नहीं खायेगी क्या?’ माझा प्रश्न ऐकून तिच्या भुवया उंचावल्या. ‘तुझे किसने बोला, कि मैं खाना नही खाऊंगी?’ तिनं मला उलट प्रश्न केला. आता मीच बुचकळ्यात पडलो. तिचं फोनवरचं बोलणं आठवून म्हणालो, ‘फिर तुने फोन पर खाना लाने को नहीं क्यूं बोला?’ माझा प्रश्न ऐकून ती सांगू लागली. ‘आज दिनभर मेरा मन नही लग रहा था। बाहर घुमने का मन कर रहा था।  अब तू आया है। तो साथ मे बाहर खाना खायेंगे।’ तिनं मनातलं सांगितलं, पण माझ्या खिशात  पैसे नव्हते. टिनानं माझी अडचण ओळखली. ‘तू बिल का टेन्शन मत ले।’ आणि लगेच ती आवरू लागली.


आम्ही पायी चाललो होतो. रोडच्या बाजूला जॉगिंग पार्क होतं. तिथे एका कोपऱ्यात आम्ही बसलो. वरून ट्यूबलाइटचा उजेड सांडला होता. पटांगणात मुलं फुटबॉल खेळत होती. बोलता बोलता मी टिनाला विचारलं, ‘तुने कभी बताया नही कि तू कहाँ से है?’ टिनानं एक नजर माझ्याकडं बघितलं. ‘क्यू जानना चाहता है तू? हमदर्दी है हम लोगों से तुझे? रेश्मा को भी तुने ऐसाही परेशान किया था।’ तिच्या बोलण्यातला कडकपणा मनाला लागला. बारबालांचं बोलणं नेहमी कडक असायचं. कधी तरीच त्या सॉफ्ट कॉर्नर दाखवायच्या. अन्यथा, कापल्या करंगळीवर त्या कधी चिंधी बांधणाऱ्या नव्हत्या. तिचं बोलणं ऐकल्यावर मीही आवाज वाढवला ‘तुझे बताना है तो बता। नही तो कोई बात नही।  जिनके साथ कुछ महिने मैं रहा, उनके लिए मन में कुछ जगह बनती है।’ मी असं बोलल्यावर पुन्हा आम्हा दोघांत थोडा वेळ शांतता पसरली.


जॉगिंग पार्कमधली माणसं पांगली होती. फुटबॉल खेळणारी मुलं केव्हाची निघून गेली होती. आता आम्ही मुख्य रस्त्यावर आलो. मी टिनाला औरंगाबादच्या पवन चक्की, बीबी का मकबरा, बुद्ध लेणीची माहिती सांगू लागलो. बोलताना मला तिने मध्येच थांबवलं आणि म्हणाली ‘मैं बांगलादेश से हूँ।’ मी एकदम शांत झालो. पुढे थांबवून तिनं जे सांगितलं ते ऐकल्यावर सत्य किती भयंकर असतं, याचा प्रत्यय मला आला.


टिना हीदेखील रेश्माच्याच देशातली. तिचे वडील टेलर काम करायचे. त्यांच्या मिळकतीवर घर चालवणं अवघड व्हायचं. टिनाची आई वीटभट्टीवर काम करायची. तिला आणखी एक छोटी बहीण व छोटा भाऊ होता. भावंडांमध्ये ती थोरली होती. ते सगळे जण सरकारी शाळेत शिकायचे. एकदा तिच्या आईला खूप ताप आला. तिनं तो अंगावर काढला. टिना सांगते, आईच्या मेंदूत ताप शिरला आणि ती आम्हाला कायमची सोडून गेली. घरावर आभाळ कोसळलं. बापाचा आधार, पोरांची माया गेली. घरातली सगळी कामं आता टिनाच्या अंगावर पडली. लहानपणातच तिला तिच्या भावंडांची ताई नि आई व्हावं लागलं.


टिना उंचपुरी, कुणाचंही लक्ष अगदी सहज जावं, इतकं लावण्य तिच्या वाट्याला आलं. घसरात अठराविश्वे दारिद्र्य! तिच्या सोबतच्या मुली लग्न करून सासरी गेल्या. हे बघून बाप रोज डोळ्यांतून पाणी गाळायचा. पोरगी पुढं आली की, पटकन पुसून घ्यायचा. एक दिवस वरच्या मोहल्ल्यातला सय्यद टिनाच्या बापाजवळ तिच्या लग्नाबद्दल बोलला. ‘बॉर्डरच्या पलीकडं माझ्या ओळखतली माणसं राहतात. आपल्यापैकीच आहेत ते लोकं! त्यांच्या मुलाला मुलगी मिळत नाहीये. मी त्यांना टिनाबद्दल बोललो आहे. तुम्ही पैशांची चिंता करू नका. लग्नाचा खर्च तेच करतील. वर तुम्हालाही पैसे देतील. तुम्ही तयारी दाखवली, तर पोरीचं जन्माचं कल्याण होईल. जीवाचं सोनं होईल तिच्या!’ पोरगी सुखात नांदेल, म्हणून टिनाच्या बापानं होकार दिला. एक महिन्यानं सय्यदनं टिनाला मुंबईत आणलं ते कधी न परतण्यासाठी...


मुंबईत टिनाला ना नवरा भेटला, ना सासर. आल्या आल्या ठेकेदारानं तिच्याकडचा पासपोर्ट आणि व्हिसा काढून घेतला. कित्येक दिवस तिनं स्वतःवर होणारा अत्याचार निमूटपणे सहन केला. कारण तिला माहीत होती, आपण विरोध केल्यावर दुसऱ्या देशात घुसखोरी केली, म्हणून पोलिसांच्या हवाली करतील. तिथून टिनाला हॉटेल लाइनमध्ये टाकलं. मुंबईत तिनं दहा वर्षे काढली. आणि एक दिवस ती औरंगाबादला आली.


टिनाची गोष्ट ऐकून माझ्या मेंदूला मुंग्या आल्या होत्या. ओठातून एकही शब्द फुटत नव्हता. वाटलं रेश्मा, टिनाची अशी कहाणी आहे, तर बाकीच्या बारबालांची गोष्ट काय? तिनं जेवायला जाण्यासाठी रिक्षाला आवाज दिला; पण मला जेवण्याची इच्छाच उरली नव्हती. मी रिक्षावाल्याला जाण्यास सांगितलं. एवढं सगळं सांगूनसुद्धा टिनाचा चेहरा निर्विकार होता. तिनं जेवायला जाण्याचा हट्ट धरला. अशा मन:स्थितीत जेवायला जाणं, मला योग्य वाटत नव्हतं. बाजूला पाणीपुरी आणि भेळची हातगाडी होती. मग म्हणाली, ‘जेवायचं नाही तर पाणीपुरी व भेळ खाऊया.’ तिच्या या हट्टाला मी मोडता घातला नाही. न जेवता घरी जाण्यापेक्षा आम्ही दोघांनी पाणीपुरी आणि एकेक भेळ खाल्ली. तिनं पाणीपुरी व दोन भेळ पार्सल घेतल्या.


टिनाला फ्लॅटवर सोडलं. बारबाला अजून हॉटेलवरून आल्या नव्हत्या. तिचा निरोप घेतला आणि पुढे निघालो. तोच तिनं आवाज दिला. परत माघारी फिरलो. टिनानं हातात एक कॅरीबॅग दिली. घरी घेऊन जा, म्हणाली. अजून औरंगाबाद झोपलं नव्हतं. वर्दळ मात्र कमी झाली होती. घरी पोहोचलो तेव्हा कैलास वहीत महिन्याचा खर्च मांडत होता. मला पाहताच म्हणाला, ‘केव्हाचा शोधतोय तुला. कुठं गेला हाता तू?’ मी त्याच्याशी एकही शब्द बोललो नाही. त्यानं पुन्हा विचारलं. तेव्हा म्हणालो ‘देवळात गेलो होतो.’ ‘कोणत्या देवळात?’ कैलासनं विचारलं. ‘देवीच्या देवळात.’ ‘ते हातात काय आहे?’ देवीचा प्रसाद. असे म्हटल्यावर त्यानं लगेच हातातली कॅरीबॅग घेतली...


...कैलास एकेक पाणीपुरी खात होता. मी मात्र अस्वस्थ मनाने भिंतीला पाठ लावून होतो. काही केल्या एक प्रश्न माझा पिच्छा सोडत नव्हता. आपलं घरदार, कुटुंब सोडून या बारबाला इतक्या लांबच्या परदेशात कशा राहत असतील?

 

- रमेश रावळकर 
rameshrawalkar@gmail.com
लेखकाचा संपर्क :  ९४०३०६७८२४

बातम्या आणखी आहेत...