Home | Magazine | Rasik | ramesh rawalkar write on ladies bar worker

आत्महत्येच्या दारापर्यंत...

रमेश रावळकर | Update - Jun 03, 2018, 01:00 AM IST

इथून पुढे लेडीज बारमध्ये नोकरी करायची नाही. हा निश्चय मी मनात पक्का केला होता. या हॉटेलमध्ये एक दीड वर्षे काम केल्यानं,

 • ramesh rawalkar write on ladies bar worker

  इथून पुढे लेडीज बारमध्ये नोकरी करायची नाही. हा निश्चय मी मनात पक्का केला होता. या हॉटेलमध्ये एक दीड वर्षे काम केल्यानं, जगातल्या कित्येक नैतिक-अनैतिक गोष्टी मला कळल्या होत्या. जगानं ज्यांच्याकडं पाहून नाकं मुरडली, त्यांच्या आयुष्याचा पाढा पाठ झाला होता. दुःखानं काठोकाठ भरलेल्या डोहातल्या बारबालांकडं पाहून मी डोळ्यांवर कातडं ओढलं आणि स्वतःला त्यातून बाहेर काढलं. पण काही काळापुरतंच...

  एकीकडं ‘मधुबन’ हॉटेलातली नवी नोकरी सुरु होती; आणि दुसरीकडं मी विवेकानंद कॉलेजला एम.ए. मराठीसाठी प्रवेश घेतला होता. दुपारी साडे तीन वाजता कॉलेज भरायचं. माझी ड्युटी सकाळी अकरा ते तीन व रात्री सात ते हॉटेल बंद होईपर्यत असायची. मधल्या वेळेत मला कॉलेजचे पिरियड करता यायचे. तीन वाजता कामावरुन सुटल्यावर घाईघाईत मी पिरियडला पळायचो. कधीमधी पोहोचायला उशीर व्हायचा. हॉटेलमध्ये नोकरी करुन शिकतो म्हटल्यावर गोरेसरांनी मला वेळेची सूट दिली होती...


  दुपारचे बारा वाजले होते. आम्ही सगळे वेटर डिनर प्लेट पुसत होतो. तेवढ्यात सगळ्या वेटरला काऊन्टरवर बोलवणं आलं. हातातलं काम टाकून, आम्ही सगळे काऊन्टरवर गेलो. आगोदरच तिथं सर्व कॅप्टन हजर होते. काऊन्टरजवळ चटयांची थप्पी लागली होती. गेल्या गेल्या कॅप्टननं सगळ्यांना चटया दाखवणं सुरु केलं. हॉटेलमध्ये एवढ्या सगळ्या चटया बघून मला जरा अचंबाच वाटला. म्हटलं, मिटिंग हॉलमध्ये टाकायला आणल्या असतील; पण मिटिंग हॉलमध्ये खुर्च्या टाकलेल्या होत्या. चटया पाहिल्यावर कॅशिअर वेटरला म्हणाला, ‘हॉटेलकडून वेटरसाठी अत्यंत कमी किमतीत या चटया उपलब्ध करुन दिल्या आहेत. सगळ्यांनी एकेक चटई विकत घ्यायची आहे.’ हे ऐकून वेटरच्या कपाळावर आट्या उमटल्या. इच्छा नसताना कॅशिअर, कॅप्टन वेटरच्या माथी या चटया मारत होते. चाळीस पन्नास लोकांचा सगळा स्टाप होता. गरज नसताना मला चटई विकत घ्यायची नव्हती. नाही कसं म्हणावं, हे कळत नव्हतं. मी विजय नावाच्या वेटरशी बोललो.

  तो माझ्या आगोदर या हॉटेलमध्ये लागलेला होता. त्याने मला बाजूला नेऊन सांगितले, ‘चटई नाही घेतली तर मॅनेजर चक्रवर्तीजवळ तक्रार करतात हे लोक! कॅप्टनची गोष्ट कधीच नजरेआड होत नाही इथं! मी विजयचं म्हणणं ऐकून घेतलं. सरळ सरळ हा अन्याय होता, थोड्या वेळानं कॅप्टनला, मी स्पष्ट सांगितलं, ‘माझ्या खोलीवर एक चटई व दोन जाडजूड गोधड्या आहेत तेव्हा मला चटई नकोय.’ माझ्या बोलण्याचा कॅप्टननं विचार केला आणि उसनं हसू चेहऱ्यावर दाखवत म्हणाला, ‘नगदी पेसे देण्याची गरज नाही. सगळ्यांचे पैसे पगारातून कापणार आहोत.’ ‘पगारातून जरी पैसे कापले, तरी देणं चुकतं का?’ या माझ्या प्रश्नानं कॅप्टन निरुत्तर झाला. तो माझ्याकडं संशयी नजरेनं बघू लागला. ‘हा आता चटई घेणार नाही.’ हे त्याला कळून चुकलं होतं.

  मी कॅप्टनला बोलल्याची साऱ्या हॉटेलमध्ये चर्चा झाली होती. ज्याच्या त्याच्या तोंडी मला कामावरुन काढून टाकतील, हेच वाक्य होतं. मनातून मी घाबरलो होतो. पण स्वभावाला औषध नसतं. केव्हा केव्हा वाटायचं जे झालं ते चांगल्यासाठी झालं. खऱ्याची काय माय मेली! असाही विचार मनात येई.


  दुसऱ्या दिवशी चक्रवर्तीनं मला बोलावलं. ‘आपके टेबलपर कस्टमरकी बहुत कंम्पलेट है। आप ऑर्डर देने मे बहुत लेट करते हो। कस्टमर बोलता एक और आप सुनते दुसरा। कॅप्टनसे भी आपको बात करना नहीं आती। कुछ समझाने पर ऑर्ग्युमेंट जादा करते हो।’ मॅनेजरनं असं म्हणताच, नेमकी माशी कुठं शिंकली, ते मला लगेच कळलं. चक्रवर्तीचं बोलणं मी नीट ऐकून घेतलं. तो थांबल्यावर म्हणालो, ‘क्या है साहब, मैने मॅट नहीं ली ना, इसलिये हर टेबलपर मेरा ऑर्डर लेट जाता है।’ माझ्या अशा बोलण्यानं त्याला राग आला. तो माझ्याशी मोठमोठ्यानं बोलू लागला. अगले महिने से आने कि जरुरत नही। और ये मॅट का क्या लोचा है?’ असे बोलत मॅनेजरनं कॅप्टनला आवाज दिला. ‘कॅप्टन, ये मॅट कि क्या बात है?’ असे विचारल्यावर कॅप्टनला घाम फुटला होता. कॅप्टन, कॅशिअरनं संगनमत करुन वेटरला चटया विकल्या होत्या. या गोष्टीचा मात्र सगळ्याच वेटरला उलगडा झाला. त्यावेळी कॅप्टन, कॅशिअरनं चक्रवर्तीला गोड बोलून प्रकरण दाबलं. पण यापुढे असे काही करता येणार नाही, याची त्यांच्या मनात चांगलीच जरब बसली होती.


  मी आणि गणेश वेटर गार्डनमधले कलर बल्ब चेक करत होतो. दोन चार ठिकाणचे दिवे शॉट झाले होते. ते काढून त्याठिकाणी आम्ही नवे दुधाळ बल्ब बसवत होतो. तेवढ्यात एक उंचपुरा माणूस अगदी मोठा अधिकारी शोभावा, असा गार्डनमध्ये येताना दिसला. त्याच्यासोबत चक्रवर्ती मॅनेजरसुद्धा होता. आम्ही त्याच्याकडं पाहिलं. मॅनेजर त्याला हात लांबून माहिती सांगत होता. गणेश म्हणाला ‘हा हॉटेलचा मालक आहे.’ आम्ही परत लाईट तपासण्याच्या कामात स्वतःला गुंतवून घेतलं. एक दोन स्टँडवर बल्ब लावले असतील, तोच एक हेल्पर पळत आला. म्हणाला ‘मोठ्या सरांना सगळ्या स्टाफची मिटिंग घ्यायची आहे. तुम्हाला मिटिंग हॉलमध्ये बोलावलंय.’ त्याचा निरोप ऐकल्यावर आम्ही हातातलं काम सोडून दिलं.


  संपूर्ण स्टाप मिटिंग हॉलमध्ये जमला होता. आम्ही दोघांनी मागच्या रांगेतल्या रिकाम्या खुर्च्यांमध्ये बसून घेतलं. सुरुवातीला मॅनेजरनं हॉटेल, स्टाफ आणि रोजचे कस्टमर याबद्दलची माहिती सांगितली. त्यानंतर मोठे सर बोलायला उठले. स्वतःच्या परिस्थितीबद्दल सांगत त्यांनी हळूहळू मी मोठा माणूस कसा झालो? यावर बरंच काही सांगितलं. हॉटेल विकासाचे सगळे श्रेय त्यांनी स्टापला दिलं. बसण्याआगोदर कोण्यातरी वेटरनं बोलावं, अशी त्यांची इच्छा होती. त्यावेळी सगळेजण एकमेकांच्या तोडाकडं पाहत होते. पुढच्या महिन्यापासून चक्रवर्तीनं मला यायला सांगितलं नव्हतं. माझ्या मनात खूप काही खदखदत होतं. मी स्वतःला रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला; पण थांबवता आलं नाही. कोणीच उठत नाही म्हटल्यावर मी पटकन उभा राहिलो. तसा मॅनेजर माझ्याकडं पाहू लागला. त्याच्याकडं न बघता, मी बोलणं सुरु केलं. ‘तुम्ही खूप कष्टातून हे हॉटेल उभं केलं. दिवसेंदिवस बिझनेस वाढतो आहे. हे सगळं सांघिक काम आहे. असे तुम्हाला वाटते तेव्हा इथल्या प्रत्येक वेटर, हेल्परला चांगली वागणूक मिळायला पाहिजे. पण तसे होत नाही. इथं अनेक गोष्टी वेटरवर लादल्या जातात. त्यांच्या विरुद्ध बोलल्यावर ऑर्ग्युमेंटचा शिक्का मारला जातो. मॅनेजरच्या पुढे पुढे लाळघोटेपणा करणाऱ्याला ‘गुड वेटर’ आणि नाही, करणाऱ्याला कामावरुन काढलं जातं.’ मनात साचलेलं मी बोललो होतो.


  मोठ्या सरांनी माझं बोलणं ऐकून घेतलं. सगळ्यासमक्ष बोलण्याची हिंमत दाखवली म्हणून कौतुक केलं. पण ‘दोन दिवसानी मी परत येतो आहे. तुम्ही मला नक्की भेटा. यावर आपण आवश्य बोलू’ असे सांगून ते निघून गेले. काही तरी वेगळं केल्याचा मला खूप आनंद झाला होता. एकेक वेटर मला भेटून माझं अभिनंदन करत होता. कॅप्टन मला एका शब्दानं सुद्धा बोलला नाही. उलट कोणकोणते वेटर माझ्याशी बोलतात, त्यांच्यावर लक्ष ठेवत होता.


  माझा शेवटचा टेबल चालू होता. तेवढा टेबल आऊट झाल्यावर जेवण करुन निघायचं होतं. दुसऱ्या दिवशी सोमवार असल्यानं वेटर आपापला युनिफॉर्म घरी धुवायला घेऊन जायचे. टेबलनं बील पेड केलं. मी स्टाफ रुममध्ये जाऊन ड्रेस बदलला. एका मोठ्या कॅरीबॅगमध्ये युनिफॉर्म ठेवला आणि जेवण करायला गार्डनमध्ये निघून गेलो. थोड्यावेळाने जेवण संपवून परतलो. स्टाफ रुममधली युनिफॉर्मची बॅग उचलली नि घाईघाईनं निघालो. गेटवर वॉचमनने मला वरुन खालपर्यंत चेक केलं. मग कॅरीबॅग घेतली. त्यातला युनिफॉर्म बाहेर काढला, तर बॅगच्या तळाशी पाच तंदूर रोट्या होत्या. हे काय आहे? वॉचमनने विचारलं. त्यानं असे विचारताच माझं डोकं सुन्न झालं. तो मला धरून काऊन्टरवर घेऊन गेला. तंदूर रोट्या पाहताचा चक्रवर्तीनं मला झापायला सुरुवात केली. माझ्या कॅरीबॅगमध्ये रोट्या कशा आल्या? याचं उत्तर त्याक्षणी माझ्याकडं नव्हतं. ‘मी चोरी केली नाही.’ एवढंच मी मॅनेजरला जीव तोडून सांगितलं. तो मात्र ऐकण्याच्या बेतात नव्हता. त्यानं ‘कलसे कामपर आने की कोई जरुरत नही.’ असं मला ठणकावून सांगितलं. माझ्या हातातून कॅरीबॅग हिसकावून बाजूला फेकून दिली.


  मी तसाच खाली मान घालून हॉटेलच्या बाहेर पडलो. काऊन्टरवरील सगळे माझ्याकडं बघत होते. त्यावेळी मला आत्महत्या करावी वाटत होती. पण माझ्यातल्या लेखकानं मला तसं करु दिलं नाही. पुन्हा वॉचमनजवळ उभा राहिलो. चेक करणार का? म्हणून विचारलं. तो नाही, म्हणाला. त्यावेळी बाजूला उभा असलेला कॅप्टन मिशीवर ताव देत, गालातल्या गालात हसत होता. हा अपमान मनातल्या मनात दाबत मी खोलीकडं जाणारा रस्ता धरला...


  "विवेकानंद'मधले साहित्यसंस्कार
  विवेकानंद कॉलेजात डॉ. दादा गोरे हे विभाग प्रमुख होते. लेखक व समीक्षक म्हणून दादा गोरेंना अख्खा महाराष्ट्र ओळखायचा आणि आजही ओळखतो. डॉ. गंगाधर पाथ्रीकर हे महाविद्यालयाचे प्राचार्य होते. गोरेसरांमुळे गंगाधर पानतावणे, सुधीर रसाळ, एस.एस. भोसले, रा.रं. बोराडे, बाळकृष्ण कवठेकर, वासुदेव मुलाटे, दिलीप महालिंगे आणि मंगला वैष्णव ही नामवंत लेखक मंडळी एम.ए.च्या वर्गांना शिकवायला येत. त्या काळी पी. विठ्ठल, कैलास अंभुरे, गेणू शिंदे, विष्णू सुरासे, समाधान इंगळे, गणेश मोहिते, शशिकांत पाटील, अनिरुद्ध मोरे, राजेश दांडगे, बालाजी भंडारे, रवी कोरडे, स्वाती निकम, सविता खोकले, हेमा राणे, विद्या कुलकर्णी व दीपाली महाजन अशा कित्येक विद्यार्थ्यांना दादा गोरे यांनी वाङ््मयासोबत जगण्याचेही धडे दिले. त्यातल्या कवी पी. विठ्ठल याने सह्याद्री साहित्य प्रतिष्ठानची स्थापना केली होती. आम्ही सर्वजण त्या बॅनरखाली एकत्र यायचो. ‘कविता महोत्सव’ हे त्या काळातले प्रचंड नावाजलेले एक दिवसीय राज्यस्तरीय साहित्य संमेलन आम्ही भरवायचो आणि ते गाजवायचोसुद्धा...

  - रमेश रावळकर

  rameshrawalkar@gmail.com

  लेखकाचा संपर्क : ९४०३०६७८२४

Trending