आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोष्‍ट कार्बन हँड प्रिंटची

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पर्यावरणाला हानिकारक ठरेल अशी आपली कृती म्हणजे कार्बन फूटप्रिंट. आणि पर्यावरण रक्षणासाठी समजून -उमजून आपल्या कृतीत केलेला सकारात्मक बदल म्हणजे कार्बन हँडप्रिंट.


जेव्हा आपली पावलं चुकीची पडायला लागतात आणि तोल जायला लागतो तेव्हा सावरण्यासाठी हातांचाच आधार घ्यायला लागतो. मागच्या वेळी आपण पाहिलं की, कार्बन फूटप्रिंट हे आपण पर्यावरणावर करत असलेल्या नकारात्मक गोष्टींचं मापक आहे. त्या नकारात्मक गोष्टींवरचा सकारात्मक उतारा म्हणजे कार्बन हँडप्रिंट.


कार्बन हँडप्रिंटची संकल्पना प्रथम ‘इकॉलॉजिकल इंटेलिजन्स’ या पुस्तकाचे लेखक डॅनियल गोलमन यांनी मांडली. त्यांच्या मते निव्वळ हवामान बदलाची भयावह स्थिती सांगून लोकांना घाबरवण्यापेक्षा कार्बन हँडप्रिंटची कल्पना मांडून त्यांचा कार्बन फूटप्रिंट कमी करण्यास प्रेरित करायला हवं. आपलं उद्दिष्ट हे आपल्या कार्बन फूटप्रिंटपेक्षा कार्बन हँडप्रिंट कसा मोठा होऊ शकेल हे असायला हवं. 


आपण आपल्या कार्बन फूटप्रिंटचा प्रभाव कमी करण्यासाठी ज्या ज्या सकारात्मक गोष्टी करतो त्या त्या सगळ्या गोष्टी कार्बन हँडप्रिंटमध्ये मोडतात. 
मागच्या लेखात आपण पाहिलं की, बदलाचा पहिला टप्पा म्हणजे जाणीव. दुसरा महत्त्वाचा टप्पा म्हणजे स्वतःपासून सुरुवात. आता हेच बघा, मागचा लेख लिहिताना मी तो आधी शिस्तीत वहीत लिहिला, मग त्यात खाडाखोड/सुधारणा, परत एकदा नीट लिहून, टाइप करून पाठवला. दुसरा लिहायला घेतल्यावर लक्षात आलं की अरे! आपण यातसुद्धा कागद वाया घालवतोय की! तेसुद्धा डायरेक्ट लॅपटॉप/फोनवर टाइप करण्याचा पर्याय असताना. आता पुढचं सगळं लिखाण कागदाचा वापर न करता. हाच माझा छोटासा कार्बन हँडप्रिंट. 


कधी कधी आपण सुरुवात केलेली गोष्ट आपल्यापुरती मर्यादित न राहता दुसऱ्यातही बदल घडवून आणू शकते. माझ्या एका काकांनी नुकताच याचा छान अनुभव सांगितला. त्यांच्या ऑफिसमध्ये चहा/कॉफीचं मशीन आहे. ऑफिसमधले सगळे लोक त्यासाठी प्लास्टिक/थर्माकोलचे कप वापरत असत. ते आरोग्याला तर हानिकारक असतातच शिवाय दर वेळी नवीन कचरा निर्माण होतो. काकांनी स्वतःच्या घरचा कप न्यायला सुरुवात तर केलीच पण त्याही पुढे जाऊन जाता येता जो दिसेल त्याला ते पटवून देऊ लागले. याचा परिणाम असा झाला की, या वर्षी संक्रांतीला त्यांच्या ऑफिसमध्ये सगळ्यांना कप वाटण्यात आले आणि प्लास्टिकच्या कपचा वापर कायमचा बंद झाला. यामुळे पुढे होणारी पर्यावरणाची हानी कितीतरी प्रमाणात वाचली.


आज इंटरनेटवर सहज पर्यावरणाचा ऱ्हास कमी करण्यासाठी काय काय उपाय आहेत याची यादी मिळते. ते सगळं आपण पुढील लेखांमध्ये विस्तारित रूपात बघूच. परंतु बदल हा अंगभूत हवा. या गोष्टीचं गांभीर्य लक्षात आलं, ते एकदा डोक्यात भिनलं की, त्रास व्हायला लागतो. आपल्याच सवयी चुकीच्या वाटू लागतात आणि तशा तशा क्रिया आपसूक घडायला लागतात. बऱ्याच गोष्टी अनावश्यक वाटायला लागतात. उदा. बाहेरून पार्सल आणताना आपण आपला डबा न्यायला लागतो, बरोबर कापडी पिशवी ठेवायला लागतो, बाहेर पडताना उगाच सुरू असलेले दिवे, पंखे बंद व्हायला लागतात, ताटात अन्न उरणं कमी होऊ लागतं आणि आपल्याही नकळत आपल्या या छोट्या छोट्या हँडप्रिंट्स आपला कार्बन फूटप्रिंटचा प्रभाव पुसट करायला लागतात.


- ऋचा अभ्यंकर, अकोला
rucha.abhyankar15@gmail.com

बातम्या आणखी आहेत...