आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरण संरक्षणासाठी उर्जा संवर्धन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजची आपली जीवनशैली मुख्यत्वे कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू इत्यादी पारंपरिक ऊर्जास्रोतांवर आधारलेली आहे. परंतु याचे आपल्या पर्यावरणावर होणारे घातक परिणाम आणि उपलब्ध मर्यादित साठे यांमुळे मोठ्या बदलाची आवश्यकता निर्माण झाली आहे. यावर ऊर्जा संवर्धन हा एकमेव उपाय आपल्यापुढे आहे.


ऊर्जा हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी आपण ऊर्जेचे विविध स्रोत, प्रकार वापरत असतो. सुरुवातीच्या काळात माणसाची ऊर्जेची गरज केवळ अन्नाच्या रूपात भागत असे. आगीचा शोध लागला आणि त्याला ऊर्जेचा एक प्रकार सापडला. चाकाचा शोध लागला आणि विकासालाही गती मिळाली. माणूस आपल्या सगळ्या गरजा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे केवळ सूर्य, हवा, पाणी अशा अपारंपरिक ऊर्जास्रोतांपासून भागवत होता. जशी औद्योगिक क्रांती झाली तसतसा विकासाचा दर आणि परिणामी ऊर्जेची गरज झपाट्याने वाढली. परिणामी कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू इत्यादी अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर मोठ्या प्रमाणात व्हायला लागला. ऊर्जेची कितीतरी रूपं आपण अगदी सहज वापरतो. उदा. विद्युत ऊर्जा. विजेशिवाय आधुनिक जीवनशैलीची कल्पनाही करू शकत नाही. नवनवीन तंत्रज्ञान, सुखसोयीची साधनं रोजच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनली आहेत. परंतु हे सगळं वापरताना, त्यांची निर्मिती करताना ऊर्जेची कोणती आणि किती संसाधनं वापरली जातात, त्याचे पर्यावरणावर किती घातक परिणाम होत असतात हे आपल्या गणतीतही नसतं. आपली जीवनशैली मुख्यत्वे कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू इत्यादी पारंपरिक ऊर्जास्रोतांवर आधारलेली आहे. परंतु याचे पर्यावरणावर होणारे घातक परिणाम,उपलब्ध मर्यादित साठ्यांमुळे मोठ्या बदलाची आवश्यकता निर्माण झालीए. यावर ऊर्जा संवर्धन हा एकमेव उपाय आपल्यापुढे आहे. ऊर्जा संवर्धनाचे दोन मुख्य मार्ग आहेत.


१. उपलब्ध असलेल्या संसाधनाचा कार्यक्षम वापर (ऊर्जा बचत).
२. अपारंपरिक ऊर्जास्रोतांकडे वळणे. (उदा. सौरऊर्जा, पवनऊर्जा)


त्यातला पहिला मार्ग आधी बघू. माझ्या रोजच्या ऑफिसच्या रस्त्याला मला एक पाटी दिसते. ‘Manage unavoidable. Avoid unmanageable.’ या दोन वाक्यांतच सगळं आलं. जे अटळ आहे त्यांचं योग्य नियोजन करा आणि जे तुमच्या आवाक्यात नाही ते टाळा. ऊर्जा बचतीचा आपल्या सगळ्यांना माहीत असलेला सुप्रसिद्ध मंत्र म्हणजे 3 R. हाच मंत्र वेस्ट मॅनेजमेंटसाठीसुद्धा प्रचलित आहे. ‘Reduce, Reuse and Recycle.’ ऊर्जेच्या कार्यक्षम वापरासाठी याचा अर्थ लक्षात घेऊ. मुळात ऊर्जेचा वापर कमी करणे, वस्तूंचा शक्य तितका पुनर्वापर आणि पुनर्प्रक्रिया करून वस्तू पुन्हा उपयोगात आणणे. आज या तीन Rच्या पलीकडे जाऊन त्यात अजून 2 R ची भर आवश्यक झाली आहे. ते म्हणजे Refuse आणि Reject. पर्यावरणाला हानिकारक गोष्टींना नकार द्या. हे अमलात आणण्यात सद्य:परिस्थितीत सगळ्यात कठीण आणि सगळ्यात महत्त्वाचे आहेत. रिसायकलिंग शक्य नसणाऱ्या, फक्त कचऱ्यातच भर टाकणाऱ्या गोष्टींना सरळ नाही म्हणा. कितीतरी अनावश्यक गोष्टी पर्याय न शोधता आपण करत असतो. मागच्याच महिन्यात माझं लग्न झालं. आजच्या व्हाॅट्सअॅप आणि ईमेलच्या जगात मला निमंत्रणासाठी कागदी पत्रिकांची गरज वाटली नाही. आम्ही एकही पत्रिका न छापता सगळी निमंत्रण ईमेल, व्हाॅट्सअॅप आणि फोन करून केली. अक्षतांसाठी वापरलेला तांदूळ निव्वळ पायाखाली जाऊन वाया जातो म्हणून त्याही सगळ्यांना न वाटता मर्यादित ठेवल्या. अन्नाच्या नासाडीला नकार दिल्यानं विनाकारण जी ऊर्जा वापरली जाणार होती त्याची बचत झाली. रोजच्या जीवनात किती तरी ठिकाणी हा नकाराचा अधिकार आपण वापरू शकतो. ऊर्जेचा कार्यक्षम वापर करू शकतो.


जवळच्या अंतरासाठी गाडीचा वापर टाळणे, अोळखीचं कोणी भेटल्यास आपल्या वाहनातून लिफ्ट देणे, रिक्षा शेअर करणे, दुकानात प्लास्टिकच्या पिशव्यांना नकार देणे, गरज नसल्यास लहानसहान गोष्टींसाठी कागदी बिलं नाकारणे, अत्यावश्यक असल्याशिवाय कुठलीही वस्तू विकत न घेणे, डिस्पोजेबल / युज अँड थ्रो वस्तू नाकारून त्या जागी पर्यावरणस्नेही पर्यायाची मागणी करणे इत्यादी अशा अनेक गोष्टी आहेत. एटीएममधून पैसे काढल्यानंतर पावती न घेणं. वरकरणी या छोट्या वाटत असल्या तरी सगळ्यांनी थोड्या थोड्या प्रमाणात सुरुवात केली तर त्याचा परिणाम मोठा असेल.


पुढील भागात ऊर्जा संवर्धनाबद्दल अजून सविस्तर बघू. तोपर्यंत या 5 R चा वापर करायला सुरुवात करूया आणि ऊर्जा संवर्धनासाठी आपला हातभार लावूया.


- ऋचा अभ्यंकर, पुणे
rucha.abhyankar15@gmail.com

बातम्या आणखी आहेत...