आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शून्य कचरा शक्य आहे का?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शून्य कचरा जीवनशैलीकडे वाटचाल म्हणजे वस्तूंचा त्याग करून संन्याशाचं जीवन जगणं नसून आपल्या जीवनशैलीकडे डोळसपणे बघून आवश्यक त्याच आणि आवश्यक तशाच गोष्टी करणं हे आपलं ध्येय असायला हवं. हे साध्य होणं कठीण असलं तरी जगभर बऱ्याच ठिकाणी तसे प्रयत्न सुरू झाले आहेत. 

 

रोज आपण नको असलेल्या, आपल्याला निरुपयोगी वाटणाऱ्या किंवा वापर करून झालेल्या वस्तू सर्रास कचरापेटीत टाकत असतो. एकदा ती वस्तू कचऱ्यात टाकली की तिचा-आपला संबंध संपला. परंतु पर्यावरणाची सगळ्यात जास्त हानी आपण या कचऱ्याच्या माध्यमातून करत आहोत. आपण टाकलेल्या कचऱ्यापैकी किती कचरा डम्पिंग ग्राउंडमध्ये जातो, किती कचऱ्याचा पुनर्वापर होतो किंवा काही वस्तू या मुळात ‘कचरा’ या वर्गात मोडतात का याचा आपण विचार करत नाही.


सतत निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे नियोजन आणि त्याची विल्हेवाट लावणं हे खूप मोठं आव्हान आहे. मग यावर उपाय काय? हे सगळे प्रश्न निर्माण होतात कचरा तयार झाल्यानंतर. जर आपण कचरा निर्माणच होऊ दिला नाही तर? शून्य कचरा ही एक आदर्श संकल्पना आहे. अगदी शून्य कचरा म्हणजेच अजिबात कचरा निर्माण न करणारी जीवनशैली आचरणात आणणं खूप कठीण असलं तरी त्या दिशेने वाटचाल आपण नक्की करू शकतो. कमीत कमी कचरा निर्माण करेल अशी जीवनशैली आपलीशी करणं शक्य आहे. गणितात लिमिटची संकल्पना आहे तसंच. निसर्ग हे शून्य कचऱ्याचं आदर्श उदाहरण आहे. कुठल्याही पूर्णपणे नैसर्गिक घटनेत किंवा क्रियेत एक कणही वाया जात नाही.


सध्याचं आपलं जग हे विविध उत्पादनांनी इतकं काबीज केलं आहे की, आपल्याला सतत नव्या वस्तू विकत घेण्याची कायम ‘गरज’च असते. ग्राहकाची जीवनशैली, उद्योग, आणि अर्थव्यवस्था यांचं फार जवळचं नातं आहे. आपण आपल्या जीवनशैलीत बदल केले तर त्याचा परिणाम फार मोठा होऊ शकतो. अर्थव्यवस्थांचं मुख्य दोन प्रकारात वर्गीकरण होतं.


१. लीनियर इकॉनॉमी (रेखीय अर्थव्यवस्था)
२. सर्क्युलर इकॉनॉमी (परिपत्रक अर्थव्यवस्था)
लीनियर इकॉनॉमीमधील उत्पादनं वापरानंतर सरळ कचरापेटीत जातात. (एकदा वापरून फेकून द्यायच्या वस्तू, वस्तूंची वेष्टनं, इ.) तर सर्क्युलर इकॉनॉमीमध्ये उत्पादनं अशा पद्धतीने तयार केली जातात की, एकदा वापरानंतरही त्याचा पुनर्वापर (रिसायकलिंग) होऊ शकेल आणि त्यानंतरही ती कचरापेटीत न जाता परत परत वापर होऊन ती चक्र पूर्ण करतील.

 

या दोन प्रकारांशिवाय रियूज इकॉनॉमी हा मधला एक प्रकार आहे. यात एकदा वापरलेली उत्पादनं परत वापरली जातात (सेकंड हँड वस्तू). परंतु त्यानंतर ती कचरापेटीतच जातात. म्हणजे एक प्रकारे लीनियर इकॉनॉमीसारखीच. फक्त वस्तूचं उत्पादन ते कचरापेटी याच्या मधला वेळ वाढवला जातो.


आपली वाटचाल लीनियर इकॉनॉमीकडून सर्क्युलर इकॉनॉमीकडे जसजशी होत जाईल तसे आपण शून्य कचरा जीवनशैलीच्या जवळ जाऊ. याची सुरुवात कशी करायची? सगळ्यात आधी कुठलीही उत्पादनं घेताना/वापरताना आपला प्राधान्यक्रम ठरवायचा. तो सर्क्युलर इकॉनॉमी-रियूज इकॉनॉमी-लीनियर इकॉनॉमी असा असायला हवा. आपल्या रोजच्या कचऱ्याचं निरीक्षण/परीक्षण करून त्यातला किती कचरा हा खरोखरीचा कचरा आहे हे ठरवून सुरुवात करता येईल. त्याप्रमाणे आपल्या सवयी बदलता येतील. छोट्या छोट्या गोष्टींनी सुरुवात करता येते. दुकानातून वस्तू आणताना वस्तू शक्यतो मोठ्या प्रमाणात खरेदी करणं, स्वतःच्या पिशव्या/बाटल्या/डबे नेणं, ते शक्य नसेल तर काचेच्या/धातूच्या बरण्यांमध्ये असलेल्या वस्तू विकत घेण्यास प्राधान्य देणं, इ. 
नवीन वस्तूची खरेदी करताना स्वतःला खालील प्रश्न विचारून निर्णय घेता येऊ शकेल.


१. ती वस्तू विकत घेणं खरंच आवश्यक आहे का?
२. त्या वस्तूचा दुसरा पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहे का?
३. वस्तू तात्पुरती हवी असल्यास कुणाकडून भाड्याने मिळेल का?
५. सेकंड हँड वस्तू वापरून आपली गरज भागणार आहे का?
६. आणि अगदी खरेदी करण्यावाचून पर्यायच नसेल तर तिचा कसा पुनर्वापर करता येईल? 
वास्तवात काय करता येईल, उदाहरणार्थ, ते पाहू.
शँपू आणायचा तर छोटे प्लॅस्टिकचे सॅशे न आणता मोठी बाटली आणायची. बाटली प्लॅस्टिक रिसायकलमध्ये जाऊ शकते वा रद्दीवाला घेऊन जातो. सॅशे कचरापेटीत जातो.


अनेकदा आजारी व्यक्तीसाठी लागणाऱ्या वस्तू भाड्याने आणणं शक्य असतं. त्या विकत घेऊ नयेत. वापरलेले परंतु सुस्थितीत असलेले कपडे/पादत्राणं/पिशव्या/पर्स विकणं/खरेदी करणं आता सहज शक्य आहे, ते कचऱ्यात टाकून नये.


शून्य कचरा जीवनशैलीकडे वाटचाल म्हणजे वस्तूंचा त्याग करून संन्याशाचं जीवन जगणं नसून आपल्या जीवनशैलीकडे डोळसपणे बघून आवश्यक त्याच आणि आवश्यक तशाच गोष्टी करणं. हे साध्य होणं कठीण असलं तरी जगभर बऱ्याच ठिकाणी तसे प्रयत्न सुरू झाले आहेत. युरोपमध्ये काही ठिकाणी चक्क शून्य कचरा सुपर मार्केट आहेत. अमेरिकेसारख्या देशातसुद्धा इलेक्ट्रॉनिक वस्तू शक्य तितक्या दुरुस्त करून त्याच वस्तू वापरण्यावर लोक भर देत आहेत. शून्य कचरा जीवनशैली ही निव्वळ संकल्पना राहिलेली नसून एक चळवळ होऊ घातली आहे. (संदर्भासाठी या वेबसाइटवर अधिक माहिती मिळू शकेल.
www.onegreenplanet.org, www.going zerowaste.com, jane and simple हा ब्लाॅग.)

 

ऋचा अभ्यंकर, पुणे
rucha.abhyankar15@gmail.com

बातम्या आणखी आहेत...