Home | Magazine | Rasik | sampat more article in Rasik

राजुरी? दगड आप्‍पांची का?

संपत मोरे | Update - Jul 01, 2018, 07:47 AM IST

शुद्ध मन आणि परोपकारी वृत्ती म्हणजे दगडूअप्पा. कोणे एकेकाळी गरिबांची दैनावस्था दूर करण्यासाठी त्यांनी श्रीमंतांच्या घरी

 • sampat more article in Rasik

  शुद्ध मन आणि परोपकारी वृत्ती म्हणजे दगडूअप्पा. कोणे एकेकाळी गरिबांची दैनावस्था दूर करण्यासाठी त्यांनी श्रीमंतांच्या घरी दरोडे घातले, पुढे जाऊन पाणी पंचायतीचंही काम जीव झोकून केलं आणि विनोबांच्या आश्रमात जाऊन आदराने डोकंही टेकवलं...

  पुरंदर तालुक्यातील राजुरी गाव. या गावच्या दगडूअप्पा चव्हाण यांना भेटायला मी आलेलो आहे. तसं दगडूअप्पा हे नाव अवघ्या पंचक्रोशीला माहिती असणार आहे. कारण इथल्या लोकांना दगडूअप्पा आणि त्याचं कलंदर जगणं माहिती आहे, याच जगण्यामुळं अप्पांच्या नावाभोवती एक वलय आहे. काही जण राजुरी म्हटलं की "दगडूअप्पाची का?’ असं विचारतात, यावरून दगडू चव्हाण या एका निरक्षर माणसाचा परिसरात असलेला बोलबाला लक्षात येतो.
  दगडूअप्पांबद्दल मी खूप ऐकलेलं होतं. अप्पांच्याच गावचे ज्ञानेश्वर शेंडगे यांच्यासोबत त्यांच्या घरी गेलो. त्यांच्या अंगणात पोहोचलो, तेव्हा साक्षात अप्पा समोर बसलेले दिसले. आम्हाला बघून उभे राहिले. काठी टेकत आमच्याकडे आले. या अवलियाबद्दल शेंडगे यांच्याकडूनही समजलं होतं. त्यामुळे बोलत करायला वेळ लागला नाही. अप्पा म्हणाले,"तुम्ही मला विचारताय,पण सुरुवात कुठनं करू? "सगळं आयुष्य समोर दिसतंय.’
  "अप्पा कुठनंही सांगा.’
  मग त्यांनी प्रामाणिकपणे त्याच्या आयुष्याचा सगळा पट आमच्यासमोर उलगडला...

  दगडूअप्पा हा पैलवान गडी. कोणावरही अन्याय झाला, तर तो त्यांना कदापि सहन होईना. मग गावातील प्रस्थापित पुढारी जेव्हा गावाला वेठीस धरत, गरीब लोकांना शेतात फुकट राबवून घेत, त्या शोषणाविरोधात अप्पा कडाक्यात आवाज उठवत. मग प्रस्थापित पुढाऱ्यांसोबत त्यांचा उभा दावा सुरू होई. अप्पा गावातील लोकांना घरोघरी जाऊन शोषणाची जाणीव करून देत, पण पुढाऱ्यांच्या दहशतीपायी लोक उघडपणे सोबत यायला घाबरत. इतकं कशाला, जो माणूस अप्पाला भेटेल त्याच्याकडून पाच रुपये दंड वसूल करण्याचा ठराव त्या काळी एका पुढाऱ्याने केला. त्यामुळे ज्यांचा गाढ विश्वास होता, ते लोक अप्पांना रात्री भेटायचे. आपली गाऱ्हाणी मांडायचे. मग अप्पा लोकांचे प्रश्न सोडवायचे. कोणी गावटग्या जर गरिबांच्या वाट्याला गेला, तर अप्पा त्याला रस्त्यात अडवून आपल्या शैलीत जाब विचारायचे. अप्पांकडून हे सगळं ऐकत असताना मनात प्रश्न पडला की, ‘अप्पा हे सगळं करत असताना गावातील पुढारी अप्पांचे हे समाजकार्य सहन कसे करत होते? त्याच्याकडेही माणूसबळ असेल? मग?’ मी हा प्रश्न अप्पांना विचारला, तेव्हा अप्पांच्याएेवजी ज्ञानेश्वर शेंडगे म्हणाले, "ते अप्पांच्या वाट्याला जातीलच कसे? अहो, अप्पांची टोळी होती. अप्पा चक्क दरोडे घालत होते. अप्पांचा पंचक्रोशीत दबदबा होता.’ हे ऐकून अप्पा हसायला लागले. मला ही माहिती ऐकून "रॉबिनहूड'अप्पांच्या जीवनातील एक वेगळीच गोष्ट समजली होती. मग मी अप्पांना त्याच्या दरोडेखोरीबाबत विचारलं. ते सहज सांगायला लागले, "व्हय. म्या दरुडं घात्लं. पण कोणाव अन्याय न्हाय केला. आपल्या भागात तसलं काय करायचं न्हाय, आनि गरिबाच्या वाट्याला जायचा न्हाय. ही दोन तत्त्वं पाळली. गरिबाच्या घरात काय असतंय चोरी करायला? ज्येंनी व्याजाचा पैसा लुबाडला, त्यासनी लुटलं आम्ही. गरिबांना लुटणाऱ्यांना सोडलं न्हाय. अगदी लांबपातूर दरोडा घालायला गेलो. आमची टोळी तयार झाली. आमच्या या टोळीचा धसका बाकीच्या टोळीवाल्यांनीही घेतला आणि पुढाऱ्यांनीबी! येक-दोन सालाचा थोडाच काळ होता त्यो, पण गाजला. कोणीही आमच्या नादाला लागायचं बंद झालं. आमची हवा झाली सगळीकडं. आणि दुसरी एक गोष्ट झाली. आम्ही जवा दरूडं घालत नव्हतो, तवा आमच्या गावाच्या पंचक्रोशीत चोऱ्या हुयाच्या. पण आमी सुरू केल्यावं दुसऱ्या टोळीवाल्यांचं धाडस हुईना, आमच्या भागात चोऱ्या करायचं. आमच्या भागात दरुडा घातला, तर दगड अप्पांचा मार मिळंल, असं भ्या त्यांना वाटत हुतं, एवढी आमची वाढल्याली.’ अप्पा सांगायला लागले. जरा वेळ थांबून अप्पा म्हणाले, "तुम्हाला सांगतो, कुठं तालुक्यात कुठंबी आडरस्त्यात जर आमच्या गावच्या माणसाला चोरांनी अडवलं, त्येनं जर मी ‘राजुरीचा हाय' एवढं सांगितलं तरी त्याची सुटका हुयाची. त्याला ती लोक सांगायची, "जा बाबा. तू अप्पांच्या गावचा हैस.’
  शेंडगे म्हणाले, "खरं हाय अप्पांचं. आमच्या गावातील अनेकांनी हा अनुभव घेतलाय. आजही नुसतं राजुरीचं नाव सांगितलं, तरी कोण खोकत न्हाय.’
  "बघा’ अप्पा हसत म्हणाले.

  पण,काही दिवसांतच अप्पांनी दरोडेखोरीचा मार्ग सोडला, मग ते शेती व्यवसाय करू लागले. पण गावातील गोरगरीब आणि त्यांच्यासोबतचे सहकारी यांच्याकडे शेती नव्हती. त्याची उपासमार व्हायला लागली. याच दरम्यान त्याचे एक चुलतमामा या गावात राहायला आले. त्यांना हातभट्टीची दारू काढता येत होती. त्यानं अप्पाला आणि त्याच्या सहकाऱ्यांना दारू काढायला शिकवली. मग चुकीचं असलं तरीही उपासमार होऊ नये म्हणून, या लोकांनी दारूच्या भट्ट्या लावल्या. दारू विकायला लागले. भाकरतुकडा मिळायला लागला. राजुरीची दारू यवत, दौंड भागात जायला लागली. मग एक दिवस पोलिसांनी राजुरीत धाड टाकली. दारूवाल्यांना पकडून नेलं. मग पोलिसांना भेटायला दगडूअप्पाच सामोरे गेले, अप्पा त्यांना म्हणाले, "साहेब, दरोडं घालण्यापेक्षा दारू इकनं वाईट हाय का? पोरासनी जगायचं कसलंच, साधन न्हाय. काही तरी करून पॉट भरत्याती. भरू द्या. न्हाय तर पुन्हा दरोड्याच्या वाटला जात्याली. त्यापेक्षा बरं हाय ही.’ अप्पांनी असं म्हटल्यावर काय बोलावं, हे साहेबाला कळंना. कारण, त्याचा युक्तिवाद अजब होता. पोलिसांनी कारवाई केल्यानंतरही अप्पा आणि त्यांचे सहकारी बरीच वर्षे उत्पन्नाची चांगली साधने मिळेपर्यंत केवळ नाइलाजाने दारूचा धंदा करत राहिले. दरोडा आणि दारू इथंच अप्पांचा प्रवास थांबत नाही. पुढे जाऊन तो नवे वळणही घेतो. अप्पा गावच्या राजकारणात भाग घेतात. गावातील गरीब माणसं एकत्र करून स्वतःचा गट तयार करतात. सरपंच, उपसरपंच होतातच, पण वीस वर्षे ग्रामपंचायत सदस्यही होतात. गावातील अनेक निवडणुका अप्पाला वगळून होत नाहीत. अप्पा या निवडणुकीचे केंद्र असतात. सत्ता मिळाल्यावर सगळ्यांना सोबत घेऊन कारभार करावा, हा अप्पांचा विचार. हे तशीच सत्ता राबवतात. अप्पांच्या काळात गावात अनेक विकासकामे झाली. त्यात एक काम अप्पा आवर्जून सांगतात, "आमच्या गावाला हायस्कूल नव्हतं. गावातील पोरींना शेजारच्या गावात जावं लागत होतं. मग कैक आयबा पोरींना दुसऱ्या गावाला शाळंला पाठवत नव्हतं. पोर कुठंबी जाऊन शिकत्याली,पण पोरी? मला सारखं वाटायचं हायस्कूल निघावं. मग म्या काकाला (माजी आमदार चंदूकाका जगताप) हात जोडलं. काका कायबी करा, पण माझ्या पोरींसाठी हायस्कूल काढा. आमी तुम्हाला जमीन देतो. पण शाळा निघाली पाहिजे. मग काकांनी माझा आन्् माझ्या जोडीदारांचा शब्द मानला. गावात हायस्कूल निघालं. आता जुनियर कालेज निघालंय. पोरी शिकत्याती बघून मन भरून येतंय, बघा.’
  एकेकाळी कायद्याने निषिद्ध मानलेल्या गोष्टी केलेले, अप्पा गावचे नेते झाले. गावात त्याच्या शब्दाला मान दिला जाऊ लागला. गावातलं कोणतंही काम अप्पांशिवाय होत नव्हतं. आणि अप्पाही गावातील लोकांसाठी, त्याचे प्रश्न समजून घेण्यासाठी चावडीवर जाऊन बसू लागले. आपल्या आयुष्यातील अनमोल वेळ गावाला देऊ लागले. गावातील भांडणतंटा सोडवू लागले. याच दरम्यान पाणी पंचायतचे विलासराव साळुंखे राजुरी गावात आले. त्यांनी पुरंदर तालुक्यातील नायगाव येथून पाणी पंचायतीचे काम सुरू केले होते. त्यांची आणि अप्पांची गाठ पडली. त्यानंतर अप्पा पाणी पंचायतीचे सक्रिय कार्यकर्ते बनले. साळुंखे यांच्यासोबत गावोगावी जाऊन लोकांना पाणी पंचायतीचा विचार सांगू लागले. भाषणे करू लागले. अप्पा आणि पाणी पंचायत असं समीकरण बनलं. अप्पा म्हणतात, "साहेबांनी मला लांब नेलं. ‘आनंदवन’ दाखिवला. विनोबांचा आश्रम दाखिवला. मी साहेबाच्या लै जवळचा हुतो. पाणी सगळ्यांचं हाय. प्रत्येकाचा हक्क हाय. हा त्यांचा विचार आम्हाला पटला हुता. म्हणून साहेबासंग आम्ही राहिलो.’आता अप्पा ९४ वर्षांचे आहेत. गावातच असतात. सकाळी उठतात. जवळपास फिरून येतात. मग राहिलेला वेळ नातवंडांत घालवतात. त्यांनी आता राजकारण सोडलं आहे, पण तरीही एकादं जोडपं येतं. स्त्री अप्पांच्या समोर आल्यावर पदर घेते. अप्पांच्या पाया पडते. तिचा नवराही पाया पडतो.
  "औक्षवंत व्हा’
  "अप्पा, निवडणुकीला अर्ज भरलाय. आशीर्वाद द्या.’
  "जावा पोरानु, गुलाल आपलाच’ अप्पा सांगतात, आणि त्या जोडप्याच्या चेहऱ्यावर हसू फुटतं. अप्पांच्या तोंडातून आलेला शब्द खोटा ठरणार नाही, याची ठाम खात्री त्यांना असते. मीही अप्पांच्या घरातून बाहेर पडतो. रातीचे आठ वाजलेले असतात. आभाळात चांदण्यांचा अद्याप पत्ता नसतो. मी गाडीला किक मारतो. गावाच्या बाहेर आल्यावर मनात धडकी भरते, वाटेत कोणी अडवलं तर? पण दुसऱ्याच क्षणाला मनात विचार येतो. अडवलं तर सांगायचं "आताच दगडूअप्पांना भेटून आलोय.’ मग काय बिशाद आहे मला कोणी थांब म्हणायची. माझी गाडी त्या खडकाळ रस्त्यानं निघालीय. हा मुलुख आहे, दगडूअप्पांचा. काळाच्या ओघात इतर माणसं दगडूअप्पाला विसरतील, पण मी विसरणार नाही...
  संपली बरं का दगडूअप्पांची स्टोरी...

  sampatmore21@gmail.com

  लेखकाचा संपर्क : ९४२२७४२९२५

Trending