आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापत्री सरकारचे शक्तिस्थळ म्हणजे तुफान सेना आणि या सेनेचे भाऊ कॅप्टन. त्यांचा इंग्रज सरकारला आणि त्या सरकारने हाताशी धरलेल्या दरोडेखोरांना जितका दरारा वाटत होता त्यांच्याबद्दल तितकंच प्रेम आणि जिव्हाळा कुस्तीगीरांना तसंच लोकचळवळीतल्या कार्यकर्त्यांना वाटत आलं आहे...
मी, आलोय भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मोलाची कामगिरी केलेल्या कुंडल या गावात. ज्या गावातील शूरांनी इंग्रजी राजवटीच्या विरोधात मोठी झुंज दिली ते हे गाव. इंग्रजी राजवट नाकारलेल्या आणि जनतेच राज्य तयार केलेल्या पत्री सरकारची राजधानी असलेले. देशभर इंग्रजी राजवट होती, तेव्हा सातारा जिल्ह्यातील साडेसहाशे गावांत मात्र याच पत्री सरकारचे राज्य होते. ‘पेटलेले पारतंत्र्य धुमसते स्वातंत्र्य’ हे पुस्तक लिहिणारे स्वातंत्र्ययोद्धे क्रांतीअग्रणी जी. डी. बापू लाड याच गावचे...
आता कॅप्टन रामभाऊ लाड या त्या काळातील एका शूरवीराच्या भेटीला मी आलोय. स्वातंत्र्यचळवळीत स्वतःला झोकून दिलेले रामभाऊ. वयाची ९७ वर्षे पूर्ण केलेले. ते ज्या खोलीत बसलेत तिथल्या भिंतीवर केवळ स्वातंत्र्यसैनिकांचे फोटो आहेत. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यापासून ते सावळाराम एडके यांच्यापर्यंत सगळ्या सहकाऱ्यांचे फोटो त्यात आहेत. फोटोच्या खाली त्या त्या सैनिकांचे नाव आणि त्यांची कामगिरी स्वतःच्या अक्षरात भाऊंनी दोन -चार ओळीत लिहून ठेवली आहे. भाऊंच्या खोलीत गेल्यावर ते काही बोलण्याअगोदर त्यांच्या खोलीतील फोटोच आपल्याला इतिहास सांगतात.या फोटोतील भाऊंचे सगळे सहकारी काळाच्या पडद्याआड गेले आहेत. त्या मंतरलेल्या दिवसाचे एकमेव साक्षीदार म्हणजे हे कॅप्टनभाऊ. ते पत्री सरकारच्या तुफान सेनेचे कॅप्टन होते. पत्री सरकारचे शक्तिस्थळ म्हणजे तुफान सेना आणि या सेनेचे भाऊ कॅप्टन. त्यांनी स्वातंत्र्यचळवळीत मोलाची कामगिरी केली आहेच, पण त्याशिवाय त्यांच्या अनेक गोष्टी आणि पैलू आहेत, ते अजून समोर आलेले नाहीत.
मी भाऊंसोबत गप्पा मारत बसलो असताना एक गोष्ट आठवली. कराडमध्ये एक कुस्त्यांचं मैदान होतं. शंकर पुजारी त्या मैदानाचे निवेदक होते. त्या मैदानावर कुस्त्या बघायला कॅप्टनभाऊ आले तेव्हा पुजारींनी, ‘आली आली कुंडलची सिंहगर्जना आली. कुंडलच्या कुस्ती मैदानात ज्यांचा आवाज ऐकून आसपासच्या वनातील श्वापदंसुद्धा लपून बसायची. असा भाऊंच्या आवाजाचा दरारा होता. तेच पहाडी आवाजाचे भाऊ पहिलवानांना शाबासकी द्यायला उपस्थित आहेत...’ असा पुकारा केला आणि कुस्ती बघायला जमलेली माणसं टाळ्यांच्या गजरात भाऊंचे स्वागत करायला उभी राहिली.
खरं तर भाऊ आणि कुस्ती यांचं नातं बालपणापासून आहे. ते स्वतः पहिलवान होते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला गती आल्याच्या काळात कुंडलला १९५७ मध्ये जे कुस्ती मैदान झालं, त्या मैदानाच नाव ‘महाराष्ट्र कुस्ती मैदान’असं ठेवण्यात आले. यामागे ‘संयुक्त महाराष्ट्र’लढ्याची प्रेरणा होती. याचाच दुसरा अर्थ ही माणसं एवढी या लढ्याशी जोडली गेली होती. नंतरच्या काळात या मैदानाची कीर्ती संपूर्ण देशभर गेली. पंजाब, लाहोर हरियाणापासून या मैदानात मल्लांनी हजेरी लावली. जिथं सह्याद्रीची एक डोंगररांग संपते तिथं डोंगराच्या पायथ्याला हे मैदान भरते. याच मैदानात राज्यात पहिल्यांदा कुस्तीचं निवेदन सुरू झालं. पहिले कुस्ती निवेदक आहेत कॅप्टन भाऊ. १९६० पासून ते २०१० अशी पन्नास वर्षे त्यांनी कुस्तीच्या लढतींचं निवेदन केलंय. आज प्रसिद्धीच्या झोतात असलेले सगळे कुस्ती निवेदक भाऊंना निवेदनातील गुरू मानतात.भाऊंच्या निवेदनामुळे अनेकदा पराभूत होणारे पहिलवान जिंकल्याची उदाहरणे घडली आहेत. त्यांची शैलीच अशी,‘ही लागली बघा वाघ -सिंहाची कुस्ती. वाघ सिंहाची कुस्ती कोणी जंगलात जाऊन बघितली नसलं,पण कुंडलच्या मैदानात आपण बघताय. ही लढाई बघायला काळीजबी वाघाचं असायला लागतं. ते बघा वा ..शाब्बास. वाघानं बाजी मारली बघा.’ कुंडलच्या कुस्ती मैदानात आलेले अनेक पहिलवान पुढं महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी, भारत केसरी झाले. यातील अनेक पहिलवान भाऊंना भारतात कोठेही भेटले तरी लांबूनच त्यांच्याकडे धाव घेऊन त्यांच्या पाया पडतात.
‘इतिहास घडवणाऱ्यांनी इतिहास लिहिला नाही’ हे वाक्य जाहीर सभातून हमखास ऐकायला मिळते, अनेकांच्या भाषणात हे वाक्य असतेच. पण भाऊ मात्र असे कधी बोलले नाहीत. कारण भाऊंनी इतिहास घडवला आहे तसेच तो लिहिलाही आहे. ‘सातारचा रोमहर्षक इतिहास’, ‘असे आम्ही लढलो’ या दोन पुस्तकांतून त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घडवलेला इतिहास सगळ्यांच्या समोर आणला आहे. या पुस्तकात त्यंानी स्वातंत्र्यचळवळीत सहभागी असलेल्या सहकाऱ्यांच्या व्यक्तिरेखा लिहिल्या आहेत. मराठी भाषेतला हा महत्त्वाचा व्यक्तिरेखा संग्रह आहे. पण त्यांची आजवर फारशी दखल घेतली गेलेली नाही. भाऊंची पुस्तके वाचल्यावर त्यांचं शिक्षण फक्त दुसरी झालं असेल, हे कोणालाही पटणार नाही. ‘आमच्या पिढीनं घडवलेला इतिहास तुमच्या पिढीला समजावा म्हणून लिहिलंय’ भाऊ सांगतात. पुस्तके लिहिताना या पुस्तकांना पुरस्कार मिळावे, नाव मिळावे हा त्यांचा हेतू नव्हता. जे घडलं आणि कसं घडवलं, चळवळ कशी उभा राहिली याची गोष्ट ते या लिखाणातून सांगत राहतात. मुळात आजोबांनी नातवाला मांडीवर बसवून जुन्या आठवणी सांगाव्यात इतकं सहज भाऊंचे हे लिखाण आहे. जो वाचेल तो त्यांना हमखास भेटायला येईल इतक सामर्थ्य त्यांच्या लेखणीत आहे. भाऊनी स्वातंत्र्यचळवळीच्या लढाईनंतर हैदराबाद मुक्तिसंग्रामात भाग घेतला. लोकनेते उद्धवरावदादा पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून त्यानी रझाकारांचा बंदोबस्त केला. मराठवाड्यात त्यानी रझाकारांच्या विरोधात लढणाऱ्या सैनिकांच्यासाठी शस्त्र प्रशिक्षण केंद्रे सुरू केली. त्यानंतर गोवा मुक्ती आंदोलनातही सहभाग घेतला. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात तर भाऊंचे गाव अग्रभागी होते.त्यांचे ज्येष्ठ सहकारी जी डी बापू लाड या लढ्यात एक महत्त्वाचे नेते होते.या चळवळीत भाऊंनी खड्या आवाजात ‘बेळगाव, निपाणी, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ ही घोषणा अजूनही लोकांच्या लक्षातून गेलेली नाही.
संपूर्ण आयुष्य वेगवेगळ्या लढाईत घालवलेला कॅप्टनभाऊ नावाचा माणूस जन्माला आला तो गरीब कुटुंबात.मोठे झाल्यावर जवळपास असलेल्या किर्लोस्कर कारखान्यात ते नोकरीला लागले. पण त्याचदरम्यान चळवळ सुरू झाली मग क्षणाचाही पर्वा न करता नोकरी सोडली.चळवळीत अनेक अवघड मोहिमा फत्ते केल्या. तुफान सेनेचे कॅप्टनपद कर्तृत्वाने सिद्ध केले. इंग्रजी राजवटीच्या बळावर गोरगरीब लोकांना छळणाऱ्या गावगुंडांना अद्दल घडवली. त्या वेळी या क्रांतिकारकांचा बंदोबस्त करण्यासाठी इंग्रजी सरकारने दरोडेखोरांना हाताशी धरले होते.पोलिसांची साथ मिळाल्यामुळे दरोडेखोर मातले होते. अपसिंगेचा म्हातारबा आणि हिवतडचा दत्त्या हे दोन दरोडेखोर असेच होते. या दोघांचा भाऊंनी असा बंदोबस्त केला की कोणत्याही दरोडेखोराने भाऊंचे नाव ऐकले तरी ते थरथर कापत.
अर्थात, दरोडेखोरांना कापरे भरवणारे भाऊ मनाने अतिशय हळवे आहेत. क्रांतीअग्रणी जी. डी. बापू वारले त्यादिवशी भाऊंनी केलेला आक्रोश पाहिल्यावर हजारो लोकांना भडभडून आलं होतं. पण भाऊंचं हे हळवेपण अनेकदा दिसलं आहे.‘त्यांचं रडं लै जवळ हाय. त्यास्नी सहन होत नाही’ भाऊंच्या घरातील लोक सांगतात. एखादी नांदायला निघालेली लेक भाऊंना भेटायला आली तरी भाऊ डोळे पुसतात. कधी काळी थेट युद्धभूमीवर लढलेल्या या माणसाचं हळवेपणा पाहून मग सगळेच थक्क होतात. भाऊंचं वय झालं आहे, पण लढण्याचा उत्साह तोच आहे. काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात शेतकऱ्याचा संप झाला, तेव्हा भाऊंनी गावातून घोषणा देत एक फेरी काढली . संप करणाऱ्या महेश खराडेसारख्या तरुण कार्यकर्त्याना ‘तुम्ही लढा, मी सोबत आहे’ असा निरोप पोहोचवत त्यांचं मनोबळ वाढवलं. त्या निरोपामुळं लढणारी पोरांची ताकद वाढली. एरवीसुद्धा ते लढणाऱ्या लोकांची माहिती घेतात. बळ देतात, कौतुक करतात.कधी पत्रही पाठवतात. जेव्हा भाऊंसारख्या योध्याचे आशीर्वादपर पत्र कार्यकर्त्याच्या हाती पडते तेव्हा त्या कार्यकर्त्याला पत्रातील अक्षरही दिसत नाहीत. कारण ते वाचताना त्याचे डोळे पाण्याने डबडबले असतात...
- संपत मोरे
sampatmore21@gmail. com
लेखकाचा संपर्क - ९४२२७४२९२५
पुढील स्लाइडवर पाहा, फोटो...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.