आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुस्तीतलं वादळी तुफान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुफानी वादळी ठरलेल्या कुस्तीत अभिजित कटके महाराष्ट्र केसरी ठरला. म्हणजेच, कटकेने किरण भगतचा पराभव केला, पण पराभूत होऊनही मीडिया-सोशल मीडियात किरणच्याच नावाचा जयघोष झाला. उपमहाराष्ट्र केसरी किरण  हरूनही अशा तऱ्हेने जिंकला...

 

"माझा किरण फायनला गेला, आन् माझा पाय दुखायचा राहिला. लै दुखत होता. पण कसा राहिला कुणास ठाव? मी पोराच्या कुस्त्या टीवीवर बघायचे, पण त्यादिशी पुण्याला गेले. त्यो फायनल गेल्यापासनं मला आणि त्येच्या वडिलांना झोप लागली न्हाय. मी तर सगळ्या देवाला हात जोडत हुती. किरण महाराष्ट्र केसरी व्हावा म्हणून. माझ्यासमोर माझा वाघ मैदानात उतरला, पुन्हा म्या मोहिच्या महालक्ष्मीला हात जोडलं. पण त्येला यश आलं न्हाय. लै वाईट वाटलं. पण संगती, माझ्या पोराची मेहनत न्हाय वाया जायची. पुढच्या सालात, त्येची खांद्यावर तुम्हासनी गदा दिसल...’ "महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेत पराभूत होऊनही दिलेल्या तुफानी लढतीने चर्चेत असलेल्या किरण भगत याची आई विश्वास व्यक्त करत होती. पोरगा पराभूत झाल्याचं दुःख त्यांच्या बोलण्यातून जाणवत होतं, त्याचसोबत पोराबद्दल विश्वासही जाणवत होता.


महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अभिजित कटके यांच्याकडून पराभूत झालेला, पण या वर्षीच्या हंगामात जोरदार कामगिरी केलेला किरण भगतचे मूळ गाव, माण तालुक्यातील मोही. या भागातील दुष्काळाच्या बातम्या सातत्याने येत असतात. अनेक वर्षे या भागातील दुष्काळ हटला पाहिजे, म्हणून चर्चा होते. निवडणुकाही हाच प्रश्न समोर ठेवून लढवल्या जातात. पण आज अखेर या भागातील दुष्काळ हटवून शाश्वत विकास आणायला राज्यकर्ते यशस्वी झालेले नाहीत. इथली जनता मात्र कष्ट करणारी आहे. घोषणा आणि आश्वासनांकडे लक्ष न देता जगण्याचे वेगवेगळे पर्याय जनतेने शोधून काढले आहेत. त्यामुळे मुंबई-पुण्याला मिळेल ती काम करून पोट भरणारी माणसं या भागातली आहेत. नवी मुंबई, वाशी मार्केटमध्ये हमाली करणारी माणसं याच पट्टयातील असतात, व आहेत. या मार्केटच्या परिसरात फिरताना सातरकडची भाषा सहज कानी पडते. किरणचे वडील नारायण भगतसुद्धा त्यांच्या तरुणपणात मुंबईला कामाच्या शोधात गेले, आणि हमाल बनले. पण, त्यांच्या आयुष्याची शोकांतिका आहे. त्यांना कुस्तीचा नाद होता, त्या काळात काही कुस्त्या केल्या, पण त्यांची कुस्ती बहरली नाही, कारण वर्षानुवर्षे असणारा दुष्काळ आणि त्यातून पाचवीला पुजलेली गरिबी. गरीब कुटुंबातील मुलाने कामधंदा बघायचे सोडून कुस्तीसाठी वेळ देणं म्हणजे, न परवडणारे होते. पोरगा वयात आला की, त्याने चार पैसे घरात आणावेत, हा तिकडचा रिवाज. त्यामुळे कुस्त्या खेळायला जे शरीर कमावलं होतं. ते शरीर हमाली करू लागले. व्यायाम करून मिळवलेली ताकद, अशी कामी आली. ते मुंबईत स्थिरावले, पण कुस्तीच वेड गप्प बसू देत नव्हतं. मग त्यांनी ठरवलं, पोरांना पैलवान करायचं. त्यांच्या घराजवळच्या गार्डनमध्ये ते या मुलांच्या कुस्त्या लावत. गवतावर लागलेली ही छोट्या मुलांची कुस्ती बागेत भेळ-पाणीपुरी खायला आलेले लोक बघत. काहींना त्यांचं कौतुक वाटे. काही चेष्टा करत, पण पोरांना पैलवान करायचं आहे, हा ध्यास घेतलेला बाप त्याकडे लक्ष देत नव्हता. 


याच दरम्यान कधीतरी ते गावाकडे यात्रेत आले. यात्रेत किरणची कुस्ती लागली, पण तो कुस्ती हरला. हरलेला किरण मैदानाच्या बाहेर आला, नि रडायला लागला. वडिलांनी त्याला खूप समजावले. तेव्हा कुठे तो रडायचा थांबला. मग दुसऱ्याच दिवशी किरणच्या वडिलांनी त्याला आटपाडीच्या हनुमान तालीम केंद्रात नेले. नामदेव बडरे या आंतरराष्ट्रीय पैलवानांनी हे कुस्ती केंद्र सुरू केलं आहे. अनेक चांगली पोर या तालमीत घडली आहेत. याच तालमीत किरण कुस्तीचे धडे घेऊ लागला. किरणला बडरे वस्ताद घडवू लागले. किरणची अतिशय लक्षपूर्वक शिकू लागला. तो आटपाडीत रमला. त्यानं सगळं लक्ष कुस्तीवर केंद्रित केलं. त्याला वाटायचं ‘आईवडीलांना भेटायला जावं’, पण हा मोह त्यानं टाळला. वर्षातून एकदा घरी जायचं तेही एक दिवस मुक्काम. पुन्हा लगेच परत फिरायचं. हळूहळू त्यांच्या मैदानात लढती सुरू झाल्या. अनेक मैदान त्यांन गाजवली. आटपाडीत काही काळ राहिल्यावर पुण्यात दाखल झाला. अर्जुनवीर पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय पैलवान काका पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करू लागला. रात्रीचा दिवस करून किरणने जी मेहनत केली, त्याचे चीज व्हायला लागले. तो तुफानी कुस्त्या करायला लागला. या तालमीत आल्यावर त्याला विकी जाधव यांच्यासारखे जीवाला जीव देणारे दोस्त लाभले. त्यांनी किरणला खूप सहकार्य केले. अथक मेहनतीच्या बळावर महाराष्ट्र राज्यात त्याच्या नावाचे वलय तयार झालेच, पण अगदी उत्तर भारतातही त्यांचं नाव पोहोचले. कुस्त्यांच्या मैदानात, किरण भगतच नाव पुकारलं रे पुकारलं की, हजारो डोळे त्याचा शोध घेऊ लागले. त्यांच्या खेळावर आणि तब्बेतीवर लोक फिदा झाले. किरणचा सुवर्णकाळ सुरू झाला. याच कालावधीत त्यानं माऊली जमदाडे, बाला रफिक, भारत मदने, मारुती जाधव यासह उत्तर भारतातील काही नामांकित पैलवानाच्या सोबतच्या कुस्त्या जिंकल्या. यात सगळ्यात महत्त्वाची म्हणजे कुंडलच्या मैदानात झालेली कुस्ती. या मैदानात किरणने ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना हरवलं होतं. या कुस्तीनंतर किरण कुस्ती शौकिनांच्या गळ्यातील ताईत बनला. कुस्तीवर प्रेम करणारा शिवलिंग शिखरे नावाचा विद्यार्थी आहे.तो सांगतो, "मी माझ्या हातातली कामं सोडून किरणच्या कुस्त्या बघायला जातो. आणि जाणारही. किरण म्हणजे, कुस्तीतलं वादळ आहे. आमच्या पिढीचा आयडॉल आहे. एका हमालाचं पोरगं, जर स्वतःच्या ताकदीवर एवढ्या उंचीवर जात असेल, तर त्याचं आयुष्य प्रेरणादायी आहे.’ असे किरणचे हजारो फॅन आहेत.


किरण हिकडं कुस्त्यांच्या फडात तुफानी कुस्त्या करत होता, त्याच समयास त्यांचे वडील हमाली करत होते. ओझी उचलत होते. मिळतील ते पैसे, पोराला पाठवत होते. आई काटकसरीने संसार करत होती. जसं मिळेल तसं खाऊन, दोघे नवरा-बायको दिवस काढत होते. पण पोराला तारखेच्या तारखेला पैसे पाठवत होते. आई म्हणते, "आमच्या बरोबरच्या माणसांनी मुंबईत खोल्या घेतल्या, पण आम्ही सगळे पैसे पोराला पाठवले. आम्हाला इस्टेट नको होती. पोरगा हीच, आमची इस्टेट हाय. बाकीच्यांनी जी इस्टेट कमावली, ती कोणाला माह्यती न्हाय. पण माझी इस्टेट समद्या जगाला ठाव हाय. पोरगा टीवीवर बघितला,तर तहानभूक हरतीया. काळीज सुपावणी हुतया. माझं पोरगं बापाच्या इच्छेसाठी राबल. आन् त्याच्या बापनबी पोरासाठी लै कष्ट केलं. माणसं ईचारत्याती किरण तुमचा पोरगा हाय नव्हं का? तवा उर भरून येतू.’


किरण आता उपमहाराष्ट्र केसरी झाला आहे. म्हणजे, तो पराभूत झाला आहे, तरीही सोशल मीडियावर आणि वृत्तवाहिन्यांवर त्याचीच चर्चा आहे. तो हरल्यानंतर अनेकांनी हळहळ व्यक्त केल्याच्या बातम्या येत होत्या. उपमहाराष्ट्र केसरी पैलवानासोबत असं पहिल्यांदाच घडतंय. एरवी प्रसिद्धीचे सगळे झोत विजेत्यावर असतात, तरीही असं का व्हावं? याचं कारण म्हणजे, त्याची कुस्ती आणि तो ज्या परिस्थितीवर मात करत आलाय, ती परिस्थिती. माणसारख्या दुष्काळी तालुक्यातील तो पहिला पैलवान आहे, त्याचं नाव भारतभर झालंय. त्यात तो गरीब घरातला आहे. एवढी प्रतिकूलता असतानाही, त्यानं घेतलेल्या भरारीच कौतुक होणं साहजिक आहे. ‘कुस्ती गरिबांचा खेळ नाही' असं सातत्यानं बोललं जातं, पण किरणने या सगळ्याला उत्तर देत स्वतःला सिद्ध केलं आहे.


ज्या दिवशी त्याची कुस्ती होती, त्या दिवशी त्याच्या माणदेशी मुलखातील छोट्या गावात सकाळपासून लोक खबरीची वाट पहात होते. काहींनी जाऊन मारुतीच्या पायावर डोकं ठेवलं.काहींनी उपवास धरले. आजचा दिवस खास, त्या गावासाठी उगवला होता. तालुक्याला जाणारी पोरही गावात थांबली. गावात मध्यभागी एक टीव्ही आणून ठेवला. कुस्ती सुरू झाल्यावर सगळे गावकरी बघू लागले. त्यात किरणचे आजोबाही होते. थोड्याच वेळात कुस्ती झाली. किरण हरला. गावकरी निराश झाले. सकाळपासूनचा उत्साह मावळला. काही रडायला लागले. किरणचे म्हातारबाही उठले, आणि आवंढा गिळत वाट चालू लागले. पण उठताना, म्हणाले "पोरानु कुस्ती हाय ही, हरजित हुनारच.’ ते असं बोलल्यावर वातावरण स्तब्ध झालं. माणदेशात साजरा होणारा एक विजयोत्सव होता होता थांबला. मोही गावासाठी एक दिवस आला होता, पण दिमाखाने उगवला नाही. राजेंद्र जगदाळे यांनी त्या दिवसाच्या अनेक गोष्टी सांगितल्या.


किरणचा भाऊ दत्ता भारतीय सैन्यात आहे. त्याचाही किरणच्या जडणघडणीत मोठा वाटा आहे. त्याचा छोटा मुलगा सार्थक त्याला आजीनं सांगितलं होतं, "तुझ्या काकाला गदा मिळणार आहे’ ते पोरगं रोज म्हणत होतं,काकाला गदा मिळणारं... पण गदेने त्याच्या काकाला हुलकावणी दिलीय. ते पोरगं आताही, विचारतंय "माझ्या काकाला गदा कधी मिळणार?’ त्याचं स्वप्न पुढच्या वर्षी त्याचा काका जोमानं उतरून पुरं करेलच. मग काकाला गदा मिळाली नाही, म्हणून रुसलेला सार्थक हसेल! एवढंच नाही, मोही गावातही जल्लोष होईल. आजोबा म्हणतील, "पोरांनो काय सांगत हुतो. हरजित अस्तिया कुस्तीत. काय थोर, तर दम थोर अस्तुय. आरं, उभं का हैसा,  गुलाल उधळा. गावाला साखऱ्या वाटा.’

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, आणखी फोटो...


-  संपत मोरे, (लेखकाचा संपर्क - ९४२२७४२९२५)
sampatmore21@gmail. com

बातम्या आणखी आहेत...