आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दर्दी ‘रसिक’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दर रविवारी ‘रसिक’ पुरवणी प्रकाशित झाली की एक घटना न चुकता घडते. आडवळणावरच्या गावाचे अशोक सोनार नावाचे चोखंदळ वाचक सगळी पुरवणी लक्षपूर्वक वाचून काढतात. काय भावलं, काय खटकलं याची मनोमन नोंद करतात आणि न कंटाळता प्रत्येक सदर लेखकाला प्रतिसादाचा फोन करतात. त्यांचं हे प्रतिसाद देणं,   गेली सात वर्षे अव्याहत सुरू आहे. त्यांनी आजवर प्रकाशित झालेली प्रत्येक ‘रसिक’ पुरवणी जपून ठेवली आहे... 

 

‘दिव्य मराठी’च्या रसिक पुरवणीत ‘मुलुख माती' सदर लिहायला लागल्यापासून अनेक वाचकांचे फोन येतात. त्यात एका रविवारी फोन आल्यावर एक वाचक लेखाबद्दल प्रतिक्रिया द्यायला लागले. मी सहज विचारले, "कुठून बोलताय तुम्ही?’


"काय संपतराव, मी तुम्हाला दर रविवारी फोन करतो, आणि माझा मोबाइल नंबर तुमच्याकडे सेव्ह नाही. हे बरोबर नाही राव’ ते म्हणाले. मी त्यांना सॉरी म्हणालो. त्यादिवशीच त्याचा मोबाइल नंबर सेव्ह केला. त्यानंतर ‘रसिक’मध्ये प्रसिद्ध होऊ लागला त्या रविवारी त्यांचा फोन वाजला, की मीच त्यांना म्हणायचो, "बोला काका’त्यानंतर ते त्या लेखाबद्दल सविस्तर चर्चा करायचे.

 

लेखातली व्यक्ती, तिचा परिसर, तिची जिद्द याबद्दल आपलं निरीक्षण नोंदवायचं. केवळ माझ्याच नव्हे, इतर सदर लेखकांच्या लेखनातली वैशिष्ट्ये उलगडून सांगायचे. त्यातून त्यांची अनुभवसंपन्नता डोकवायचीच, पण त्यांची साहित्यलेखनाबद्दलची जाणही लक्ष वेधून घ्यायची. पण एका टप्प्यानंतर ते रविवार सोडून अधूनमधूनही फोन करायला लागले. एक दिवस त्यांचा मला फोन आला. म्हणाले, "तुम्हाला मला बघू वाटतंय संपतराव. माझ्या गरिबाच्या घरी या. तुम्हाला मी मांडे खाऊ घालतो.’ त्यांचं ते बोलणं ऐकून हा वाचक चांगलाच प्रेमात पडलाय, असं मला वाटलं आणि मग मीसुद्धा त्यांना आठवण झाली, की फोन करू  लागलो. आमची जणू घट्ट मैत्री जमली.

 


मी ज्यांच्याबद्दल सांगतोय, त्याचं नाव अशोक सोनार. वयाची साठी उलटलेली. वाचनाची बेहद्द आवड. ते लहान असताना कोणतीही सोयीसुविधा नसताना त्यांच्या आईने त्यांच्या  वाचनाची आवड निर्माण केली. आई अडाणी होती, पण मुलांनी वाचलं पाहिजे असं तिचं मत. ही आई वर्तमानपत्र आणि पुस्तकातील चित्रावर बोट ठेवायची, आणि मुलांना अक्षरं शिकवायची. त्यातूनच अशोकरावांना वाचण्याची ओढ लागली. पुढे परिस्थितीमुळं त्याना शिकता आलं नाही, पण पुस्तकं कायमच सोबत राहिली. बाबा कदम, वि. स. खांडेकर, व्यंकटेश माडगूळकर या लेखकांची पुस्तकं प्रारंभी त्यांच्या हाती लागली. ती त्यांनी अधाशासारखी वाचून काढली. मग असं झालं की मिळेल ते वाचण्याची सवय जडली. वृत्तपत्रांची तर चातकासारखी वाट बघत बसू लागला, हा माणूस. वर्तमानपत्र हातात पडताच पहिल्या बातमीपासून अगदी शेवटच्या बातमीपर्यंत अशोकराव पडशा पाडू लागले. हे सगळं कुठे घडत होते, तर धुळ्यानजीकच्या खेड्यात. जे खेडं नकाशावरही सापडू नये. पण वाचनानंदी टाळी लागलेल्या अशोक सोनार यांना त्या वाचनाचा असा परिणाम झाला ,की त्याच्याकडे माहितीचा खजिना तयार झाला, ते ‘ज्ञानी’ बनले हे त्याचंच मत!  अर्थात, उदरनिर्वाहासाठी अनेक उद्योग करावे लागले.

 

गवंडीकाम करावं लागलं, कुल्फी विकावी लागली, पण या काळातही या माणसाचं वाचनाचं वेड कमी झालं नाही. काम करून थकवा यायचा, पण त्यावर मात करत, रात्री उशिरापर्यंत हे वाचत बसायचे. सकाळी लवकर उठून पुन्हा कामावर हजर रहायचे.


"वाचनाने मला तारलं. माझ्यावर अनेकदा निराश व्हायची वेळ आली, पण वाचल्यामुळे निराशा गेली. निराशा घालवण्याचा एक नवा मार्ग, मला वाचनातून मिळाला आहे. दिव्य मराठीच्या ‘रसिक’ पुरवणीने तर मला इतकं दिलंय, ते इतर ठिकाणी मिळालं नसतं. मला वाटतं ‘रसिक’ पुरवणी रोज निघावी. ‘रसिक’ वाचणं म्हणजे एक अनमोल ग्रंथ वाचल्यासारखं आहे.आमच्या भागात ‘दिव्य मराठी’ आल्यापासून मी ‘रसिक’ पुरवणीसाठीच रविवार कधी येईल याची वाट बघतो. शनिवार संध्याकाळी झोपताना, मला आनंद असतो की, उद्या सकाळी ‘रसिक’ वाचायला मिळणार आहे. जगातल्या आणि देशातल्या खूप गोष्टी ‘रसिक’मुळे समजल्या आणि समजतील.’ अशोकराव वाचनप्रेमाची जणू कबुलीच देत असतात.


अशोक सोनार ‘रसिक’मध्ये सदर लिहिणाऱ्या मला एकट्यालाच प्रतिसाद देत नाहीत, तर झाडून सगळ्या लेखकांना ते दर रविवारी आवर्जून फोन करतात. आम्ही लेखक एकमेकांना ओळखत नाही, पण अशोकराव या सगळ्यांना ओळखतात. कधीकधी लेखकांची खबरबात आमच्यातील लोकांना कळवतात. कधी कामात व्यग्र असल्याने कोणी फोन उचलला, नाही तर मग सांगतात, ‘अहो, मी त्या रमेश रावळकरांना फोन केला होता, बहुतेक ते कामात असावेत. त्यांना सांगा मी आठवण काढली होती म्हणून.’ कधी रमेश यांच्याकडे माझी तक्रार करतात, तशीच. ‘रसिक’ पुरवणीत प्रसिद्ध होणाऱ्या सर्व सदर लेखकांना कॉल करणे आणि त्यांच्याशी गप्पा मारणे, अशोकरावांचा छंद बनला आहे. त्यांना त्यातून समाधान मिळतं, आनंद मिळतो, हे आमच्या पुरतं लक्षात आलंय. 


काही दिवसांपूर्वी त्यांच्या मुलाचं लग्न होतं, तर त्यांनी आम्हा सगळ्या लेखक-लेखिकांना लग्नाच्या पत्रिका पाठवल्या होत्या. ‘रसिक’ने जोडलंय आम्हा सगळ्यांना. मी सांगली जिल्ह्यातील एका आडवळणी खेड्यातून लिहितोय, अशोकराव धुळ्याजवळील बाळापूर साजने गावचे, रमेश औरंगाबाद येथील, ‘रसिक’ टीम असते मुंबईला... आम्हा सगळ्यांची गाठ ‘रसिक’ने बांधली आहे. यातून एक जिव्हाळा निर्माण झालाय. उदाहरण द्यायचं म्हटलं, तर मी जानेवारी महिन्यात धुळे जिल्ह्यात गेलेलो. मी तिकडून आल्यावर अशोक सोनार यांना फोन केला तर ते माझ्यावर भडकले.


"काय संपतराव मला न भेटता गेलात. हे बरोबर नाही.’
"मी फोन केला होता पण तुमचा फोन बंद होता’
"नाही नाही, तुम्ही असं नको होतं करायला’ त्याचा राग गेलेला नव्हता. पण मी त्यांना फोन केला होता, त्यांना ती गोष्ट पटत नव्हती. मग त्या रविवारी सोनार यांनी मला फोन केला नाही. गोष्ट माझ्या लक्षात आली. त्यांचा फोन आला नाही, असा पहिलाच रविवार होता. मी उदास झालो. रात्री त्यांना फोन केला,
"काका, अहो राग गेला का नाही?’
"अहो, आपल्याच माणसांचा राग येतो. लोकांवर कशाला रागवायचे? आजचा लेख आवडला, म्हटलं तुमचा फोन येतोय का बघूया.’ मी हसायला लागलो आणि तेही... असे आहेत अशोक सोनार!
हा संवेदनशील माणूस आहे. मन त्याचं हळवं आहे. ‘जातीनं लोळवलेला तुफानी मल्ल' हा उपेक्षित पैलवान बापू बेलदार त्यांच्यावरचा लेख वाचून हा माणूस रडला होता. आजवरच्या आयुष्यात त्यांनी खूप वाचलं आहे. त्यातून एक हे संवेदनशील मन तयार झालंय. चांगलं लिहिणाऱ्या लेखकांची आपली दोस्ती आहे,याचा या माणसाला अभिमान वाटतो, ही महाराष्ट्राच्या साहित्य व्यवहारातली केवढी मोठी गोष्ट आहे.

 

अशोक सोनार यांच्यासारखे वाचक भेटले की, आम्हालाही हत्तीचं बळ येतं, कितीही प्रवास करायला लागला तरी थकवा जाणवत नाही. कारण आम्ही लिहितो, ते अशा अवलिया वाचकांचा प्रतिसाद लाभावा म्हणूनच. ते ‘रसिक’ची वाट पहातात आणि आम्ही त्यांच्या फोनची वाट पाहतो. त्यांचा फोन आला, की मी सुखावतो. कारण लेखासाठी घेतलेल्या कष्टाची ती पोचपावती असते, तो मोठा पुरस्कार असतो!

 

संपत मोरे
sampatmore21@gmail. com

बातम्या आणखी आहेत...