आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाई माझा कोंबडा....

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कीर्तीच्या शिखरावर जेव्हा हा कोंबडा होता तेव्हा त्याला कन्नड चित्रपटात रोल मिळण्यापासून ते हजारो रुपयांपर्यतच्या ऑफर आल्या होत्या. आता कोंबड्याचं वलय संपलं, लोकांनी पाठ फिरवली पण हौसाबाई आणि लक्ष्मण मोहिते यांचा मात्र कोंबड्यावर तोच जीव आहे जो पूर्वी होता. त्याचं प्रेम कमी झालेल नाही आणि होणार नाही. कारण त्या कोंबड्याला ते स्वतःच्या कुटुंबातील मानतात...

 

 

सांगली जिल्ह्यातलं आळसंद गाव तसं चर्चेत येण्याचं काहीही कारण नव्हतं. महाराष्ट्रात जशी इतर गावं आहेत तसंच हे एक गाव. पण दोन महिन्यांपूर्वी आळसंद गाव अचानक मीडीयात चर्चेत आलं आणि त्याच कारणही तसंच घडलं. या गावाच्या मावळत्या बाजूला उमरकांचन गावाची वस्ती आहे. या वस्तीवर राहणारी माणसं धरणग्रस्त आहेत. गेल्या काही दिवसांपासून आळसंद भाळवणी रोडला हे नवं गाव वसलं आहे. याच गावातील लक्ष्मण मोहिते यांच्या घरातील कोंबडा एका सकाळी खुराड्यातून सोडला आणि बांग द्यायला गेला तर त्याची बांग रोजच्यासारखी नव्हती तर तो “अण्णा अण्णा’ अशी बांग देऊ लागला. मोहिते यांच्या पत्नी हौसाताई आश्चर्याने त्या कोंबड्याकडं पाहू लागल्या. पुन्हा एकदा त्या कोंबड्याने तशीच बांग दिली.


मग मात्र परत त्या आत गेल्या आणि नवऱ्याला म्हणाल्या, “अहो, आपला कोंबडा तुम्हाला हाक मारतुया.’(लक्ष्मण मोहिते यांना शेजारी व नातेवाईक अण्णा म्हणतात.)
“काही तरीच काय?’ म्हणत मोहिते अण्णा बाहेर आले. तर कोंबडा ‘अण्णा अण्णा ‘ म्हणतच होता. दोघाही नवरा बायकोला त्या कोंबड्याचं आक्रीत वाटायला लागलं. हळूहळू सगळ्या वस्तीवर ही गोष्ट समजली. सगळे जमा होऊन अण्णा म्हणणाऱ्या कोंबड्याच्या भोवती उभे राहिले. काही वेळाने आळसंद गावातील एकजण रस्त्यानं चाललेला. तो त्या गर्दीचा भाग झाला. त्यालाही कौतुक वाटलं तो तसाच गावात गेला. गावातील एका मोबाईलवाल्या पोराला सोबत घेऊन आला. मग त्या मोबाईलवाल्या पोरानं कोंबड्याचं शुटिंग केलं. ते फेसबुकवर पोस्ट केलं. तो दिवस तसाच गेला.


दुसरा दिवस उजाडला. त्या दिवशी सकाळी सकाळी गावातली  माणसं कोंबडा बघायला मोहिते यांचं घर शोधत आलेली. दारात येऊन कोंबडा आणि त्याच ते आगळवेगळं ओरडणं बघत होती. थोड्या वेळानं चॅनेलवाले आले. अण्णांची वस्ती, कोंबडा आणि अण्णा व त्यांच्या बायकोचं शुटिंग सुरु झालं. त्यांची बायको कॅमेऱ्यापुढं जाताना म्हणाल्याही,
“ही काय आक्रीत म्हणायचं?’
“उद्या टी व्ही वर दिसणार हाय तुमी. असला कोंबडा तुमच्याकडे हाय म्हणून ही लोक आल्याती. बघा.’ तिथलचं एक पोरगं हौसाबाई यांना सांगायला लागलं. त्यानंतर हौसाबाई बोलायला लागल्या. कोंबडा कसा बोलायला लागला त्यादिवशीचा घटनाक्रम त्या सांगायला लागल्या. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी शुटिंग करून नेलेलं सगळं टीव्हीवर दिसायला लागलं. शेजारच्या घरातलं पोरगं पळतच येऊन सांगायला लागलं.


“हौसा आज्जी चला, तुम्ही टीव्हीवर दिसताय. चला बघायला.’
त्या गेल्या तर खरंच त्या, त्यांचा नवरा आणि बोलणारा कोंबडा टीव्हीवर दिसत होता. ते पाहून त्याना खूप आनंद झाला. त्या म्हणतात, “उभ्या जन्मात असं हुईल असं वाटत नव्हतं. टी व्ही वर आम्ही कशाला दिसू? ते मोठ्या माणसाचं काम. पण मला टीव्हीत बघून मलाच पटत नव्हतं. मी टीव्हीत दिसतेय ती. सपान पडलंय असं वाटत हुतं.’
यानंतर काय घडलं ते हौसाबाई सांगायला लागल्या, “त्या दिवसापासून कोंबडा बघायला लै गर्दी हुयाला लागली. कोल्हापूर, पंढरपूर, पुणं, बीडपासून लोकं बघायला यायला लागली. आसपासच्या गावांतून तर रोज माणसं यायची. जत्रा भरल्यासारखं झालं आमच्या वस्तीवर.माणसं यायची. कुणाची इच्छा झाली तर पाच पन्नास रुपये द्यायची. मी बी एवढ्या लांबून आलेल्या माणसांना चहा करायचे.
 पैसे मिळत होते पण खर्चही होत होते. पैशाचं राहुद्या पण आमच्या वस्तीच नाव आमचं नाव कोंबड्यामुळं झालं होतं.’
“मी गेल्या पन्नास वर्षांपासून कोंबड्या पाळते, या व्यवसायाचा आमच्या कुटुंबाला लै हातभार लागला. आमचा जोडधंदाच आहे ह्यो. पण असलं इरसाल कोंबड कवा बघाय मिळालं नव्हतं. त्येनं आमच नाव पार तिकडं दुबईपातूर पोहोचिवलं.


एक दिवस माझ्या दुबईला नोकरीला हाय त्या नातवाच्या फोन आला
“आजे, कोंबडा घिऊन कुठं फिरतीयास?’
“त्वा, कुठं बघितलंस?’
“हिकडं माझ्या मोबाईलवर दिसलीस तू मला हातात कोंबडा घेऊन उभा आहेस.’
अशी माझ्या कोंबड्याची कीर्ती लांबपातूर गेली.”आजी सांगत होत्या. हा कोंबडा बोलायला लागला म्हटल्यावर परिसरातील काही वयोवृद्ध लोकांना त्याच्या लहानपणी ऐकलेल्या माळावरच्या भुताखेतांच्या गोष्टीआठवू लागल्या. त्या माळावर असं होण्याचं कारण ते त्या गोष्टींशी जोडू लागले.


सोशल मीडियावर तर लोक “अण्णा उठा कोंबडा तुम्हाला बोलवत आहे, जागे व्हा’ असे टोमणे मारू लागले.
हा कोंबडा एवढा गाजला होता आळसंद गावात एकदा नवखा माणूस, एखादं वाहन अडखळल तर चौकात बसलेली माणस त्याना विचारायची.
“कोंबडा बघायला जायाच हाय का?’
“हो’
“सरळ या पुढच्या चौकातून जावा. टेकाला ती घर दिसतंय का न्हाय. तिथं जाऊन विचारा, बारकं प्वारबी सांगल.’
बोलणारा कोंबडा बघायला अशी गर्दी होऊ लागली. माळावर जत्रा भरल्यासारखं माणूस गोळा व्हायचं. सकाळी जी कोंबडा बघायला माणूस यायचं, ती मग गाड्या त्याच माळाच्या दिशेनं जायच्या. कोंबडयाला पाहिलं की मग हौसाबाई मोहिते यांना विनंती केली जायची.कोंबड्याला अण्णा म्हणायला लावा. मग त्यानी कोंबड्याला उचलून धरला की कोंबडा बांग द्यायचा, अण्णा आण्णा. कोंबडा बघायला आलेल्या पर्यटकांचे मोबाईल ते शुटिंग करायला सज्ज असायचे. लोक कोंबडा हातात घेवुन फोटो काढायचे. कोंबडा जर फिरत असेल तर त्याला पकडून फोटो काढले जाऊ लागल. प्रसिद्धीचा सगळा झोत त्या कोंबड्यावर पडला. दिवसेंदिवस गर्दी वाढू लागली त्या गर्दीची मोहिते कुटुंबाला सवय जडली.


महिना गेला. महिन्यानंतर एक दिवस खुराड्यातून बाहेर पडलेला कोंबडा अण्णा न म्हणता पूर्वीसारखी बांग द्यायला लागला. हौसाताईनी त्याला जवळ घेतलं, त्या स्वतः अण्णा अण्णा असं म्हणू लागल्या पण नाही. त्यादिवशी कोंबडा अण्णा म्हणालाच नाही. तो दिवस गेला. त्यांना वाटलं दुसऱ्या दिवशी कोंबडा बोलेलं पण कोंबडा बोललाच नाही. लोक नेहमीप्रमाणे येत होती.

कोंबडा हातात धरून त्याला बोलतं करण्याचा प्रयत्न करत होती पण कोंबडा बोलला नाही. लोक नाराज होऊन परत जाऊ लागले.
“आठ दिवस अगोदर यायला पाहिजे होतं’ अशी हळहळ व्यक्त करत होते.
मग हा कोंबडा बोलत नाही ही घटनाही बातमीचा विषय बनली. त्याचीही बातमी बनली. पुन्हा पत्रकार आले, पुन्हा मुलाखती सुरु झाल्या. एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने विचारलं, “अण्णा, कसं वाटतंय आता?’
अण्णा वैतागून त्याला म्हणाले, “तुम्हाला कसं वाटतंय ते सांगा आधी?’
“कोंबडा बोलत हुता म्हणून माणसं येत हुती. आलेल्या माणसांनी लै हाल केलं कोंबड्याचं. हडबडून गेला. खराब झाला. मला वाटत हुत आता काय जगत न्हाय कोंबडा आपला. पण जगला.’ अण्णा म्हणाले.
मी जेव्हा कोंबड्याला बघायला निघालो तेव्हा भाळवणीमार्गे निघालो होतो. मी उमरकांचन गावात गेलो. माझ्यासोबत आहेत नेहमीचे सहकारी परशुराम माळी. आम्ही आत वळताच एका माणसानं विचारलं, “कोंबडा बघायला आलाय का?’
“हो’ परशुराम म्हणाले.

“पण कोंबडा न्हाय बोलत’ न विचारता त्यानं सांगितलं. म्हणजे ‘कोंबडा’ एवढा त्या वस्तीवरच्या लोकांच्या भावविश्वाचा भाग झाला होता. आम्ही गेलो तर लक्ष्मण मोहिते दारात बसलेले.त्यांनी ओळखलं आम्ही का आलोय.
या बसा पाणी प्या म्हणाले. कोंबडा दारात फिरत होता.


“हे पटांगण दिसतय का? हे सगळं भरून वाहन येत हुती. मायदाळ माणूस. आता कोण न्हाय येत. जसं कळत गेलं तसं माणसं याची बंद झाली. चमत्कार बंद झाला आता कोण नमस्कार करील? त्येच्या तकदिरात जेवढी कीर्ती हुती तेवढी मिळाली. त्येजबी नाव झालं आणि आमचंबी.काही दिवस गमत नव्हतं. माणसं याची बंद झाल्यावर. सवय झालीती माणसांची वाटायचं आली वाटत गाडी. पण बंद झालं सगळं. चालतच असं. मोठमोठ्याला लोक इसारत्याती आणि हा तर कोंबडा.’ अण्णा म्हणाले.


हौसाताई म्हणाल्या, “कोंबडा अण्णा म्हणूदे न्हायतर राहूदे. कोंबड्याला आम्ही सांभाळणार. एकानं कोंबडा वीस हजाराला विकत मागितला होता पण दिला नाही म्या. मरेपर्यंत हा कोंबडा मी सांभाळणार हाय. त्येला कोणाचीतरी नजर लागली म्हणून बिघडलं बघा.’ कीर्तीच्या शिखरावर जेव्हा हा कोंबडा होता तेव्हा त्याला कन्नड चित्रपटात रोल मिळण्यापासून ते हजारो रुपयांपर्यतच्या ऑफर आल्या होत्या. आता कोंबड्याचं वलय संपलं, लोकांनी पाठ फिरवली पण हौसाबाई आणि लक्ष्मण मोहिते यांचा मात्र कोंबड्यावर तोच जीव आहे जो पूर्वी होता. 


त्याचं प्रेम कमी झालेल नाही आणि होणार नाही. कारण त्या कोंबड्याला ते स्वतःच्या कुटुंबातील मानतात. आम्ही निघालो. ज्या कोंबड्यानं कधीकाळी याच भकास माळावर माणसाची जत्रा भरवली, त्याच्यामुळं शेकडो लोक हिकडं 
आले तो अंगणात फिरत होता. अण्णा हातातील कळकाच्या काठीवर भार देऊन उभा होते. साडेसहा वाजले. सूर्य मावळतीला गेला. हौसाताई झोपडीत गेल्या. चूल पेटवली. चुलीचा धूर वर जाऊ लागला. कळपातील एका कोंबड्यान भांग दिली. आम्हीही तिथून निघालो. एका प्रसिद्ध कोंबड्याला पाहण्याचं समाधान आम्हालाही झालेलं.

 

संपत मोरे

sampatmore21@gmail. com

लेखकाचा संपर्क : ९४२२७४२९२५

बातम्या आणखी आहेत...