Home | Magazine | Rasik | Sandhya nare-pawar article in Rasik

आवलीची गाथा

संध्या नरे-पवार | Update - Jul 01, 2018, 07:44 AM IST

आवली हा समर्थ स्त्रीत्वाचा एक आविष्कार आहे. सर्वसामान्य स्त्रीमध्ये दडलेलं असामान्यपण म्हणजे आवलीची गाथा आहे.

 • Sandhya nare-pawar article in Rasik

  आवली हा समर्थ स्त्रीत्वाचा एक आविष्कार आहे. सर्वसामान्य स्त्रीमध्ये दडलेलं असामान्यपण म्हणजे आवलीची गाथा आहे. ही गाथा पाहताना, ऐकताना एक हुरहूर मनाशी राहतेच. कडेलोटाच्या सीमेपर्यंत जाऊन परत येणं नाकारत आणि चारी दिशांनी उतू जात तुकोबांप्रमाणेच विठ्ठलभक्तीत दंग व्हावं असं कधी आवलीला वाटलं तर...


  संत तुकारामपत्नी आवली आणि विठ्ठलदेवाची पत्नी रखुमाई यांच्या अंतरीच्या वेदनांचा सल हळुवारपणे उलगडत एक देखणा नाट्यानुभव ‘संगीत देवबाभळी’ हे नाटक देतं. जगण्याच्या दोन टोकांवर उभ्या असलेल्या दोन स्त्रिया अवचित एकत्र येतात आणि देवबाभळीच्या काट्यापेक्षाही खोलवर सलणारी आपली भळाळती दुःखं कधी चुलीपाशी, तर कधी इंद्रायणीकाठी मोकळी करतात. आपल्या वाट्याचा पाऊस दुसऱ्याच रानात बरसतोय म्हणून सवतीमत्सराच्या सनातन दुःखाने व्याकूळ झालेली रखुमाई मूक होत विठ्ठलाची पंढरी सोडून रानोमाळ हिंडतेय, तर तुमचा काळतोंड्या विठ्ठल माझ्या घराबाहेर ठेवा, असं आवली तुकारामांना ठणकावून सांगतेय. आपला संसार आपलाच असावा, अशी साधीसुधी आशा-अपेक्षा बाळगत जगणाऱ्या, या दोघींच्या वाट्याला येणारी वंचना म्हणजे, खोलवर ठसठसणारा देवबाभळीचा काटा आहे. पण या काट्याचंही संगीत करण्याची ताकद आवलीच्या जीवनोत्सुक आर्ततेत आहे.

  तुकारामांच्या आवलीला रंगमंचावर आणत एक सळसळणारी जीवनेच्छा प्राजक्त देशमुख या लेखकाने मांडली आहे. एरवी, सर्वसामान्य गृहिणी म्हणून जिची गणना केली जाईल अशा आवलीची गाथा लेखकाला मांडावीशी वाटली, हे हृद्य आहे. सॉक्रेटिसच्या झांटिपीची आठवण करुन देणारी आवलीची व्यक्तिरेखा मुळातच अनोखी आहे. विठ्ठलभक्तीत दंग झालेला आपला पती तुकोबा आणि आपल्या संसाराची विपन्नावस्था करणारा काळासावळा विठ्ठल या दोघांनाही उठता बसता कोसणारी, अद्वातद्वा बोलणारी, आपला रोष भीडभाड न ठेवता व्यक्त करणारी आवली, आपल्या वाट्याला आलेल्या संसारात पाय रोवून घट्ट उभी आहे. तोंडाने तुकारामबुवांना त्यांच्या विठ्ठलभक्तीबद्दल नावं ठेवत, हाताने ती त्यांच्यासाठी भाकऱ्या थापत आहे, भाकऱ्यांची टोपली डोक्यावर घेऊन रानोमाळ भटकत विठ्ठलनामात तल्लीन होऊन बसलेल्या तुकोबांना शोधत आहे. संसारसुखाचं पीक येवो न येवो, आपल्या वाट्याची जमीन ती नांगरत आहे, स्वकष्टाचं बी पेरत आहे. नवऱ्याची साथ लाभो न लाभो, स्वबळावर आपला संसार रेटणाऱ्या, तोंडाने आपला राग व्यक्त करत संसाराचा सारा डोलारा एकटीच्या डोक्यावर पेलणाऱ्या गृहिणी नामक कष्टकरी स्त्रियांची, आवली ही प्रतिनिधी आहे. विठ्ठलावर रुसून दिंडीरवनात निघून गेलेली रखुमाई आपल्या आयुष्याची गोळाबेरीज मांडत असताना आवली मात्र हाती आलेल्या शून्याला जाब विचारत, आपलं आयुष्य जगत आहे. या नाटकात आवलीचं वेगळेपण अधिक ठसठशीतपणे उठून दिसतं. तुकारामांना जेवढा विठ्ठल कळला असेल त्याहून अधिक आवलीला तुकाराम उमगले आहेत. म्हणूनच विठ्ठलाच्या रखुमाईप्रमाणे ती तुकारामांवर रुसून त्यांना सोडून जात नाही, मात्र त्याच वेळी गपगुमानही राहत नाही. तिचा क्रोधाग्नी सतत तेवता आहे. तिच्या क्रोधाग्नीत तुकोबांची विठ्ठलभक्तीही तावूनसुलाखून निघत आहे.

  क्रोधाग्नी हेच आवलीचं वेगळेपण आहे. कदाचित आजच्या काळातील आवलीची प्रस्तुतताही, तिच्या या क्रोधातच सामावलेली आहे. आपल्या या क्रोधातून आवली केवळ तुकोबांच्या विठ्ठलभक्तीलाच आव्हान देत नाही, तर बाईपणाचा ठराविक साचाही नाकारते. तुकोबांचे ज्येष्ठ बंधूही विठ्ठलभक्तीत दंग होऊन घरादार सोडून निघून गेले. त्यांच्या पत्नीने म्हणजे, आवलीच्या जावेने हे सारे मूकपणे सोसले. पण आवली मात्र तुकोबांना ठणकावून सांगते की, थोरल्या वन्सनी सहन केलं, तसं मी करणार नाही. मी गप्प राहणार नाही. आवलीचा क्रोध हाच आवलीचा विद्रोह आहे.
  बाईने घरासाठी राबावं, नवऱ्यासाठी झिजावं, पण ते तोंड बंद करुन. गृहिणी असलेल्या बाईकडून पुरुषप्रधान समाजाची ही परंपरागत अपेक्षा आहे. तिने सगळा त्याग करावा, आपल्या आनंदाची-सुखाची पर्वा न करता, घरादारासाठी राबावं, खपावं पण तोंडातून निषेधाचा एक स्वरही काढू नये. तिने कायम हसतमुख असावं. कितीही त्रास होत असला, तरी ते सारं लपवून तिने कायम आनंदीच दिसायला हवं, तिने कायम आनंदाचंच वाण वाटायला हवं. पुरुषप्रधान संस्कृती अशाच स्त्रीला आदर्श स्त्री मानते.

  स्त्रीने आपला त्रास लपवायचा, आपलं दुःख मूकपणे गिळायचं म्हणजे पुरुषप्रधान समाजाची सारी अव्यवस्था लपवायची. आपलं दुःख लपवायचं म्हणजे, पुरुषसत्तेची बेपर्वाई, कुटुंबाची-नवऱ्याची तिच्या सुख-दुःखाविषयी असलेली उदासीनता, तिच्या छोट्या छोट्या आनंदानाही मिळणारा नकार, तिच्या अधिकारांची होणारी पायमल्ली, असं सारं सारं तिने लपवायचं. स्त्रीचा राग, स्त्रीचा संताप याला, समाजाची मान्यता नाही. भांडखोर असणं, स्वतःचा संताप-क्रोध कोणालाही न घाबरता व्यक्त करणं, हे सगळं पुरुषप्रधान समाजाने ठरवलेल्या बाईपणाच्या व्य़ाख्येत न बसणारं आहे.
  कारण चिडीतून, संतापातून विद्रोहाचा, बंडाचा मार्ग खुला होतो. पदोपदी नाकारले जाणारे छोटे छोटे हक्क, अधिकार, अन्याय यांची स्त्रीला जाणीव नसते, असं नाही. पण अगतिक होऊन रडणं, हा तिचा चाकोरीतला उपाय असतो. रागावणं, स्वतःसाठी वेगळी वाट निवडणं, हा पर्याय समाजमान्य नसतो. यामुळेच स्वतःचे मतभेद ठामपणे व्यक्त करणारी स्त्री समाजाला नकोशी असते. पुरुषाचा संताप हे त्याच्या सत्तेचं, कर्तृत्त्वाचं प्रतीक मानलं जातं. याउलट स्त्रीचा संताप तिच्या बंडाचं, बेगुमानपणाचं प्रतीक मानलं जातं. शब्दांच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त करणारी स्त्री, आपल्या संतापातून न्यायाची मागणी करणारी स्त्री समाजमान्य चौकटीत ‘कर्कशा’ ठरते. कर्कशा म्हणत तिला नाकारली जाते.

  परंपरेत तुकारामांच्या आवलीची ओळख ‘कर्कशा’ अशीच आहे. तुकारामांना त्रास देणारी एक भांडकुदळ बाई अशा रंगातच आजवर आवली रंगवली गेली आहे. या नाटकातही आवली अशीच आहे - कर्कशा. तुकोबांना आणि त्यांच्या विठोबाला बोल बोल बोलणारी, नावं ठेवणारी, प्रश्न विचारणारी, त्यांच्या निष्क्रियतेवर बोट ठेवणारी. स्त्रीने कायम हसतमुख असायला हवं, ही समाजमान्य अपेक्षा ती धुडकावतेय. स्त्रीने डोळ्यातून आसवं गाळत रडायला हवंय, ही परंपरागत वहिवाट तुकोबाची आवली नाकरतेय. याउलट डोळे गरागरा फिरवत, कमरेवर हात ठेऊन ती तुकोबांना आपल्या नादी लावणाऱ्या विठोबाला, त्याच्या निष्र्कियतेला प्रश्न विचारतेय, संसाराकडे दुर्लक्ष करणाऱ्या तुकोबांनाही बोल लावतेय. आवलीच्या तोंडाचा पट्टा ऐकून नाटकातील रखुमाईही तिला - तुझं तोंड आहे का तुरटी - असा प्रश्न विचारते. पण नवऱ्याच्या विठ्ठलभक्तीमुळे संसारातला सगळा गोडवा हरवलेल्या आवलीला तुरटीचा तुरटपणाच प्रिय आहे. तिच्या कर्कशपणात एक शहाणीव सामावलेली आहे. पुरुषप्रधान समाजरचनेत बहुसंख्य स्त्रियांनी कायम आपल्या संसाराच्या सुबत्तेत समाजमान्य चौकटीतली आदर्श स्त्री बनण्याचा प्रयत्न केला. कुटुंबांतर्गत होणारा अन्याय आसवं गाळत सहन केला. क्वचित कधी उमटलेला तिचा निषेधाचा स्वर तिच्या माजघराच्या भिंतींमध्येच बंदिस्त राहिला. आवली मात्र आसवं गाळणं नाकारते. प्रत्यक्ष देवाचीही भीड ती बाळगत नाही. आवलीला चारजणींसारखं संसारसुख हवं आहे, नवऱ्याचा सहवास हवा आहे. तिची देवभक्ती जोडीने देवदर्शनाला जाण्यापुरती मर्यादित आहे. म्हटलं, ती तिला चारचौघांसारखं सामान्य आयुष्य हवं आहे. पण हे साधं सरळ सामान्य आयुष्यही वाट्याला येत नाही, तेव्हा आवलीच्या व्यक्तित्त्वातलं असामान्यपण बाहेर येतं. संतपदी पोहोचलेला नवरा आणि प्रत्यक्ष देव यांच्यासमोरही ती हार मानणं नाकारते.

  आपल्या वाट्याला आलेले आयुष्य ती स्वीकारते, त्या आयुष्यातले काबाडकष्ट ती सचोटीने करत राहते, पण त्याचवेळी त्या आयुष्याला प्रश्न विचारत बोलही लावते. त्यावेळी ती कुणाचाही मुलाहिजा बाळगत नाही. आपलं गळणारं घर, स्वैपाकघरातली रिकामी भांडी, विठूनामात हरवलेला नवरा, या साऱ्यांना ओढत नेणारी आवली हा एक न वाकणारा, न मोडणारा अभंग आहे. त्यामुळे प्रत्यक्ष रखुमाईच्या भेटीनेही ती विचलित होत नाही. आवली हा समर्थ स्त्रीत्वाचा एक आविष्कार आहे. सर्वसामान्य स्त्रीमध्ये दडलेलं असमान्यपण म्हणजे आवलीची गाथा आहे. पण तरीही ही गाथा पाहताना, ऐकताना एक हुरहूर मनाशी राहतेच. आवलीचं संपूर्ण जगणं तुकोबांच्या अस्तित्वाने वेढलेलं आहे, पतीछायेत दडलेलं आहे. पण या छायेतून बाहेर आलेली आवली नेमकी कशी असेल. कडेलोटाच्या सीमेपर्यंत जाऊन परत येणं नाकारत आणि चारी दिशांनी उतू जात तुकोबांप्रमाणेच विठ्ठलभक्तीत दंग व्हावं असं कधी आवलीला वाटलं तर... आपलं आभाळ आपणंच बांधावं आणि आपणंच आपला पाऊस व्हावं असं कधी आवलीने ठरवलं तर...
  तर निश्चितच त्या रूपातली आवलीही आपल्या वाट्याची जमीन असोशीने, सचोटीने नांगरत राहील. विठ्ठल भेटो न भेटो.

  sandhyanarepawar@gmail.com

Trending