आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योनिपुजा ते योनिशूचिता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज भारतातूनच नाही, जगभरातून योनिपूजा हद्दपार झाली आहे. स्त्रीसत्तेच्या जागी पुरुषसत्ता रुजताना पुरुषप्रधान धर्माने सगळ्यात आधी नवरा नावाच्या पुरुषाशिवाय स्वतंत्र असलेल्या देवतांवर हल्ला केला. स्त्रीची योनी एका पुरुषाच्या मालकीची करत, योनिपूजेच्या जागी योनिशूचितेचं मूल्य रुजविण्यात आलं आहे. 


पुरुषसत्तेचा इमला योनिशूचितेच्या पायावर उभा आहे. आज एकविसाव्या शतकातही या वास्तवात बदल झालेला नाही, हे कंजारभाट समाजातील कौमार्यचाचणी ते ‘पद्मावत’ सिनेमाला करणी सेनेने केलेला विरोध, सिनेमात संजय लीला भन्साळीने केलेले जोहार प्रथेचे उदात्तीकरण यासारख्या घटनांमुळे स्पष्ट झालं आहे... करणी सेनेला किंवा कंजारभाट समाजाला मागास ठरवून या सापळ्यातून कोणाचीही सुटका होणार नाही. आज युरोप-अमेरिकेत स्थायिक झालेले भारतीयही जेव्हा भारतात वधू संशोधनासाठी येतात तेव्हा त्यांची अपेक्षा कौमार्य अबाधित असलेली वधू शोधणं हाच असतो. प्रत्यक्ष कौमार्य चाचणी नसली तरी सुशिक्षत उच्चभ्रू पुरुषालाही पहिल्या रात्री आपली पत्नी ‘व्हर्जिन’ - कौमार्य अबाधित असलेली आहे की नाही याची शंका असतेच. प्रत्येक जण या शंकेचा उच्चार करतोच असं नाही, पण मनाच्या तळाशी ही शंका ठेवूनच अनेक संसार पार पडतात. पुरुषसत्तेला बाईची योनी केवळ लग्नापर्यंत एकसंध असून चालत नाही तर नंतरही तिच्यावर नवरा नामक एकमेव पुरुषाची मालकी असावी लागते. ही मालकी अबाधित राहावी यासाठीच ‘पती परमेश्वर’सारख्या संकल्पना ते सौभाग्याशी संबंधित अनेक व्रतवैकल्ये यांचा पसारा, स्त्री जगण्याभोवती उभारण्यात आला. स्त्रीचं तन अंकित करायचं असेल तर ती आधी मनाने पुरुषसत्तेची गुलाम व्हायला हवी. यासाठी योनिशूचितेची संकल्पना वलयांकित करण्यात आली. आपल्या योनीला आपला नवरा नामक पुरुषाखेरीज इतर कोणाचा स्पर्श होणं म्हणजे आपण स्वतः भ्रष्ट होणं, अपवित्र होणं हे जेव्हा स्त्रीमनानेच स्वीकारलं तेव्हाच पुरुषसत्तेचा पाया भक्कम झाला. 


हे सहज घडलेलं नाही. स्त्रीवर्गाच्या दमनासाठी, स्त्रीवरच्या नियंत्रणासाठी पुरुषसत्तेने योनिशूचितेचा सापळा रचला. संस्कृतीच्या चलनवलनात, काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर सती, जोहार, पडदापद्धत, लैंगिक अवयवांचं विच्छेदन, योनीला कुलूप ठोकणं (चॅस्टिटी बेल्ट), लैंगिक अवयवांचं विच्छेदन (फिमेल जेनिटल म्युटिलेशन), ऑनर किलिंग, शत्रूपक्षातल्या स्त्रियांवर बलात्कार करणं असे वेगवेगळे उपाय वापरत पुरुषसत्तेने समाजात योनिशूचिता एक मूल्य म्हणून रुजवली, वाढवली. जगाच्या पाठीवर आजही अनेक भागात मुलगी लहान असतानाच तिच्या बाह्य योनीभागाचं, शिश्निकेचं विच्छेदन केलं जात. तिला लैंगिक भावना होऊ नयेत हा यामागचा उद्देश असतो. पशुपालन संस्कृतीत जनावरं पाळताना, माजावर आलेलं जनावर बेलगाम होऊ नये यासाठी त्याचं लिंग ठेचण्याचा मार्ग मानवाने शोधला. पुरुषसत्ताक व्यवस्थेत स्त्रीपालक झालेल्या पुरुषानेही स्त्री बेलगाम होऊ नये यासाठी वेगवेगळे उपाय योजले. त्यात जाळून मारण्यापासून ते लैंगिक अवयव कुलूपबंद करणं या सगळ्या गोष्टी होत्या आणि आहेत. यातली एकही प्रथा आजही जगाच्या जगण्यातनं पूर्णपणे नाहीशी, नष्ट झालेली नाही. यातली प्रत्येक कडी काळाच्या वेगवगेळ्या टप्प्यांवरची, वेगवेगळ्या संस्कृतीत घडलेली, घडवलेली असली आणि प्रत्येकीचं बाह्य रूप वेगवेगळं असलं तरी आतला गाभा एकच आहे. तो आहे, विकसित स्त्रीत्वाला नाकारणारा, स्त्रीत्वाच्या बहराला घाबरणारा आणि म्हणूनच अधिकाधिक आक्रमक होणारा. एखादी दमनयंत्रणा काळाचे वेगवेगळे टप्पे ओलांडताना, विविध संस्कृतींचे चढउतार पार करताना आपलं लक्ष्य कसं कायम ठेवते याचं पुरुषसत्ता हे प्रमुख उदाहरण आहे. 


आर्थिक, सामाजिक आणि राजकीय संरचनांनुसार वेगवेगळे सत्तासंघर्ष त्या त्या संरचनांच्या अवकाशात तयार झाले तरी मुळातल्या सत्ता दोनच. स्त्री आणि पुरुष. आधुनिकीकरणानंतर, प्रबोधनाच्या युगानंतर काही चळवळ्या स्त्रियांना जे प्रश्न पडू लागले, तेच प्रश्न एकोणिसाव्या शतकात अभ्यासाच्या क्षेत्रात मानववंशशास्त्रज्ञांना, समाजशास्त्रज्ञांना पडू लागले. मानवी संस्कृतीच्या आदिम काळी मानव समूह स्त्री आणि पुरुष यापैकी कोणत्या तत्त्वाभोवती आपल्या जगण्याची गुंफण करत होता? प्रारंभापासून मानवी जगण्यात पुरुषतत्त्व प्रभावी होते का? मानववंशशास्त्रज्ञांनी, समाजशास्त्रज्ञांनी याचं उत्तर-नाही-असं देत आदिम मानवी जगणं, स्त्रीतत्त्वाभोवती गुंफलेलं होतं, दैनंदिन जगण्यात मातृसत्ता होती, तर समूहाच्या धार्मिक, पारलौकिक जगण्यावर स्त्रीदेवतांचा प्रभाव होता, असं सांगितलं आहे. भूमीच्या ठायी असणारी निर्मितीक्षमता, सजर्नशीलता आदिम मानवाला स्त्रीच्या ठिकाणीही दिसली. मानवाचं धारणपोषण भूमाता करत होती, तर मानवी अपत्याचं पालनपोषण माता करत होती. मानवाने दोघींच्या ठिकाणी देवत्व कल्पिलं. मानवाने देवत्त्वाची पहिली कल्पना स्त्रीरुपात पाहिली.  


अर्थात, स्त्रीदेवतांचं हे आदिम रूप आजच्या संगमरवरी मंदिरांमध्ये सजलेल्या अलंकृत देवींसारखं नव्हतं. ज्या कारणासाठी स्त्रीला देवत्व दिलं गेलं, त्या कारणातच तिचं प्रतीक उभारलं गेलं. साहजिकच आबडधोबड दगडाला योनीचा आकार देण्यात आला. योनी अपत्याला जन्म देत होती, तर स्तन त्या अपत्याचं पालनपोषण करत होते. त्यामुळे काही ठिकाणी केवळ योनिरूपी शिल्पं बनली, तर काही ठिकाणी योनी आणि स्तनरूपी शिल्पं बनली. ही शिल्परूपी योनिदेवता म्हणजे साऱ्या चराचराला प्रसवणारी महायोनी होती. थोडक्यात, स्त्रीप्रधानता असणाऱ्या समाजव्यवस्थेत मानवाने देवत्वाची पहिली कल्पना स्त्रीच्या जननेंद्रियांमध्ये केली. जगाच्या वेगवेगळ्या भागात ही योनिशिल्प सापडलेली आहेत. प्रसिद्ध संशोधक रा.चिं. ढेरे यांनी आपल्या ‘लज्जागौरी’ या पुस्तकात या योनिपूजेच्या प्रथेचा मागोवा घेतला आहे.  महाराष्ट्रात महुरझरी, तेर, नेवासे या ठिकाणी योनिशिल्पं सापडलेली आहेत. आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश याठिकाणीही योनिशिल्प सापडलेली आहेत. या योनिशिल्पांमधल्या काही मूर्ती शिरोहीन आहेत. म्हणजे मानेपासून खालचा भाग दगडामध्ये कोरलेला आहे. यातही पाय खाली दुमडलेल्या स्थितीत दाखवून मध्ये योनीभागाला उठाव देण्यात आला आहे. वरच्या भागात स्तन उठावदार आहेत. काही शिल्पामध्ये स्तनमंडलही नाही. ती फक्त नाभी प्रदेशापासून खालच्या भागाची योनिशिल्पं आहेत.

 
योनिशिल्पांच्या या वाटेतूनच पुढे स्त्रीप्रधान व्यवस्थेत, स्त्रीच्या इतर कार्यकर्तृत्वानुसार स्त्रीदेवतांची विविध रूपे जगभरच्या स्त्रीप्रधान-मातृप्रधान संस्कृतीत निर्माण झाली. आधी केवळ योनिरूप असणारी देवता पुढे युद्धदेवता (बोल्हाई), रोगनिवारक देवता (साती आसरा), अन्नदेवता (याह्यामोगी) अशा रूपात व्यक्त होऊ लागली. स्त्रीने लावलेला शेतीचा शोध, त्यातून उदयाला आलेली स्त्रीप्रधानता आणि मातृसत्ता व या सगळ्याचा अपरिहार्य परिणाम असणारा देवतासंप्रदाय अशी ही साखळी आहे. 


मातृसत्तेतल्या या देवता कोणत्याही पुरुषाच्या पत्नी नाहीत. त्या सहचराशिवाय आहेत, स्वसाधीन आहेत. त्यांची पूजा करण्याचा मानही स्त्रियांकडे, पुजारणींकडे होता. ज्या समाजात पितृत्वापेक्षा मातृत्व महत्त्वाचं होतं, योनिशूचितेपेक्षा योनिपूजा महत्त्वाची होती, त्याच समाजात अशा स्वतंत्र देवतांचा संप्रदाय उदयाला आला. भारतासह इजिप्तपासून ग्रीकपर्यंत जिथे-जिथे मातृसत्ताक समाजव्यवस्थेचे अवशेष सापडतात त्या प्रदेशांमध्ये झालेल्या उत्खननात स्त्रीदेवतांच्या, योनिशिल्पांच्या शिल्पाकृती सापडलेल्या आहेत. 


आज विचित्ररूपी वाटणारी ही योनिशिल्प, आपापल्या क्षेत्रात दुर्लक्षित पडून आहेत. योनिशिल्पाचं विश्लेषण करताना रा.चिं.ढेरे भूदेवीच्या या स्वरूपाची उपासना कमीतकमी तीन हजार वर्षांपासून भारतात प्रबळ होती, असं सांगतात. मात्र आज भारतातूनच नाही, तर जगभरातून योनिपूजा हद्दपार झाली आहे. स्त्रीसत्तेच्या जागी पुरुषसत्ता रुजताना पुरुषप्रधान धर्माने सगळ्यात आधी नवरा नावाच्या पुरुषाशिवाय स्वतंत्र असलेल्या देवतांवर हल्ला केला. त्यांना शूद्र देवता ठरवण्यात आलं. त्यासाठी त्यांच्या पुजारणींना चेटकीण, डाकीण ठरवून ठार मारण्यात आलं. स्त्रीची योनी एका पुरुषाच्या मालकीची करत, योनिपूजेच्या जागी योनिशूचितेचं मूल्य रुजविण्यात आलं आहे. बाईची योनी कडीकुलपात, नाना प्रथा परंपरांच्या पहाऱ्यात बंदिस्त झाली आणि पुरुषदैवतांच्या, पुरुषलिंगाच्या पूजेला सुरुवात झाली. स्त्रियांचे घरंदाज बाई आणि वेश्या असे दोन प्रकार झाले. बलात्कार हे पुरुषलिंगाचं शस्त्र आणि स्त्रीच्या सर्वव्यापी दुय्यमत्त्वाचं प्रमुख कारण बनलं. एकीकडे योनिशूचितेच्या मूल्याचा पगडा आणि दुसरीकडे बलात्काराचं कायमस्वररूपी भय या दोन गोष्टींनी बाईच्या सार्वजनिक वावरावर तर बंधनं घातलीच, पण तिचं खासगी जीवनही पातिव्रत्याच्या सजावटीत बंदिस्त केलं. या बंदिस्त सजावटीतच स्त्रीगर्भांची हत्या होते, मुलींची शाळा अर्ध्यावरच सुटते आणि त्यांचे बालविवाह होतात. या अशा वातावरणात बायांना एकेक मोकळा श्वास मिळवण्यासाठी एका वेळी विविध व्यवस्थांशी झगडावं लागतं. प्रश्न विचारावे लागतात. असे प्रश्न विचारले की, त्यांच्यावर कर्कश, उठवळ स्त्रीवादी असे शिक्के बसतात. जसे आज स्वरा भास्करवर बसत आहेत. 


प्रश्न कंजारभाट समाजाचा किंवा करणी सेनेचा नाही. त्यांनी उघडपणे आपले पुरुषसत्ताक हिंस्त्र चेहरे समोर आणले आहेत. या सगळ्यांना उघडपणे विरोध करता येईल आणि तो केला जातोय. प्रश्न आजही योनिशूचितेचं मूल्य मनोमन जपत स्वतःला आधुनिक, सुसंस्कृत समजणाऱ्या उर्वरित समाजाचा आहे आणि म्हणूनच आज संजय लीला भन्साळीचा गुन्हा मोठा आहे. 


- संध्या नरे पवार 
sandhyanarepawar@gmail.com 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटो... 

 

बातम्या आणखी आहेत...