आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेळी शब्दांची ...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रबोधनाच्या युगामधील वैचारिक घुसळणीतून अनेक नव्या संकल्पना शब्दांच्या माध्यमातून जन्माला आल्या. हक्क, स्वातंत्र्य, समता, अल्पसंख्याक, बहुसंख्याक आदी नवे शब्द घडवतच मानवी समाज विकसित झाला.इतिहासाच्या विविध टप्प्यांवर प्रचलित झालेले हेच वेगवेगळे शब्द आपल्या समाजाचा उभा- आडवा छेद दाखवतात. त्यामागची विचारसरणी स्पष्ट करतात...

 

‘चांगले- वाईट, सुंदर- कुरूप असे शब्द निर्माण झाले, कारण हे काळे तरी आहे किंवा पांढरे तरी आहे, हे चांगले तरी आहे किंवा वाईट तरी आहे, असा विचार करणे सोपे असते. म्हणून मानवी मेंदू तो मार्ग स्वीकारतो. चांगले आणि वाईट यांच्या मध्येही काही असते, असा विचार करणे कठीण असते. कारण त्यासाठी प्रयत्न करावा लागतो. मन विशाल आणि उदार करावे लागते. त्याकरिता निराळी भाषा विकसित करावी लागते. आपल्या विचारापेक्षा विरोधी  विचार असतात, हे मान्य करावे लागते. यात मानवी मेंदूची  म्हणजे मानवी स्वभावाची उत्क्रांती दडलेली असते.

 

यामुळे सहिष्णुतेचा परीघ रुंदावतो. भाषा बदलते म्हणजे विचार बदलतात, व्यवहारही सुधारतो.’
‘आशय परिवार’ या खासगी वितरणासाठी असलेल्या अंकात डॉ. आनंद जोशी यांनी ‘अक्षर पाविजे निर्धारे’ हा अतिशय चिंतनशील लेख लिहिला आहे. ‘मोबी डिक आर दि व्हेल’  ही कादंबरी  वाचताना मनात आलेले विचारतरंग त्यांनी या लेखात अक्षरबद्ध केले आहेत. ते करताना या वरील परिच्छेदात भाषा आणि विचार, विचार आणि शब्द यांचा आंतरसंबंध, समाजाच्या चलनवलनातील भाषेचे स्थान यांचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

 

वेगळा विचार करण्यासाठी निराळी भाषा विकसित करावी लागते, असं महत्त्वाचे आशयसूत्र ते मांडतात. हा परिच्छेद वाचताना काही काळ तिथेच थबकायला झाले. विविध शब्द आपल्या बहुविध अर्थांसह सामोरे  येऊ लागले.  वेगळा विचार करायचा, तर निराळी भाषा विकसित करायला हवी, नवे शब्द घडवायला हवेत, हे त्यांचे म्हणणे आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचे आहे. असे नवे शब्द घडवतच मानवी समाज विकसित झाला आहे.

 

‘मानवी हक्क’ हा शब्द एकोणिसाव्या शतकाने दिला. या शब्दाने मानवाच्या सामाजिक उत्क्रांतीमध्ये नवी भर घातली. माणसाच्या जगण्याचे स्वतंत्र अस्तित्व, त्याच्या आशा, आकांक्षा यांना समाजात मान्यता मिळू लागली. स्वातंत्र्य, समानता या शब्दांनी मानवी उत्क्रांतीचा परीघ अधिक रुंदावला. ‘दास’ या शब्दाचे सगळे संदर्भ घृणास्पद ठरू लागले. स्त्रिया आणि समाजातले सर्व शोषित घटक ‘हक्क’ या नव्या शब्दाच्या आधारे समाजातील आपले स्थान शोधू लागले. त्याविषयी प्रश्न विचारू लागले. नवे शब्द घडवण्याचा आग्रह धरू लागले. ‘कुमारी’ आणि ‘सौभाग्यवती’ या दोन शब्दांमधून व्यक्त होणारी आपली ओळख नाकारत माणूस म्हणून आपल्याकडे पहिले जावे, असा आग्रह स्त्रियांनी धरला. जुने शब्द नाकारण्याची प्रक्रिया सुरू झाली. निग्रो, निग्गर, ब्लॅक या शब्दांना आक्षेप घेत अमेरिकेतल्या काळ्या वर्णाच्या समुदायाने स्वत:ला ‘आफ्रो-अमेरिकन’ म्हणवून घ्यायला सुरुवात केली.

 

भारतीय जात व्यवस्थेतील ‘अतिशूद्र’ या शब्दानेही असाच मोठा प्रवास करत नव्या विचारांच्या आधारे नव्या ओळखीचा आग्रह धरला. ब्रिटिशांच्या काळात या जातींचा उल्लेख ‘डिप्रेस्ड क्लास’ असा होऊ लागला. नंतर ‘शेड्यूल्ड कास्ट’ असा  होऊ लागला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरही शेड्यूल कास्ट-अनुसूचित जाती हा शब्द कायम राहिला. मात्र, अनुसूचित जाती या शब्दातून अतिशूद्रांचे शतकानुशतकाचे शोषण शासकीय शब्दकोशात बंदिस्त करण्यात आले. त्याला शह देत ‘दलित’ या शब्दातून अन्यायाची दाद मागण्यात आली. दलित या शब्दाने अतिशूद्रांचे दुखणे आंतरराष्ट्रीय पातळीवर नेले.

 

जातव्यवस्थेने शूद्र ठरवलेल्या जाती आज ‘बहुजन’ या शब्दाच्या माध्यमातून स्वत:च्या अस्तित्वाचा वेगळा अर्थ शोधू पाहत आहेत. वन्य जमाती, अनुसूचित जमाती, आदिवासी, वनवासी या शब्दांमधून आदिवासींच्या अस्तित्वाचे राजकारण खेळले जात आहे. अल्पसंख्याक - बहुसंख्याक या शब्दांच्या माध्यमातून धर्मश्रद्धांना संख्याबळाच्या आधारे आमने-सामने उभे केले जात आहे. हे असे वेगवेगळे शब्द आपल्या समाजाचा उभा- आडवा छेद दाखवतात. त्यामागची विचारसरणी स्पष्ट करतात.


प्रबोधनाच्या युगामधील वैचारिक घुसळणीतून अनेक नव्या संकल्पना विविध शब्दांच्या माध्यमातून जन्माला आल्या. यातील आधुनिक काळातील एक अत्यंत महत्त्वाची संकल्पना म्हणजे राजसत्ता आणि धर्मसत्ता यांची फारकत करणे. धर्मसत्तेच्या अंकुशातून राजसत्तेची मुक्तता करणे. राजसत्तेने लिखित घटनेच्या आधारे काम करणे. सेक्युलरिझम - निधर्मीवाद या शब्दांमधून ही संकल्पना व्यक्त करण्यात आली. धर्मसत्ता आणि राज्यसत्ता यांना विभागणारा निधर्मीवाद हा शब्द नव्या विचारांनी घडवला आणि नवा सामाजिक आचार निर्माण केला. पण  आज धर्मसत्तेचे, धार्मिक कट्टरतावादाचे प्राबल्य वाढत असताना निधर्मीवाद या शब्दाला लक्ष्य केले जात आहे.

 

कारण, या शब्दामागचा विचार आज दुबळा झाला आहे. राज्यसत्तेमधील धर्मसत्तेचा हस्तक्षेप मान्य असणारा विचार प्रबळ झाल्याने निधर्मीवाद हा शब्द आज आपले महत्त्व गमावून बसला आहे. साहजिकच सहिष्णुतेचा परीघ अरुंद होत चालला आहे. आज वेगवेगळ्या समाजमाध्यमांवरील सातत्याने दुसऱ्याचा अधिक्षेप करणारी भाषा,जहाल शब्दप्रयोग पहिले की सहिष्णुता या शब्दामध्ये असणाऱ्या सर्वसमावेशकतेच्या विचारांवर होणारा आघात स्पष्ट होतो.  शब्द शस्त्राचे काम करतात तसेच ते समाजाला, व्यवस्थेला  नको असलेल्या गोष्टी लपवण्याचे कामही  करतात. उदाहरणार्थ, ‘फिटनेस’ हा शब्द असाच घोळ घालणारा आहे. या शब्दाचा वापर सध्या खूप वाढला आहे. ते पाहून समाजाचे आरोग्य अगदी ठणठणीत असल्याचा निष्कर्ष कोणी  काढेल. पण वास्तव पाहिले, तर फिटनेस या शब्दाच्या वाढत्या प्राबल्यातून समाजाचे आरोग्य अधिकाधिक खालावत असल्याचेच सामोरे येते. म्हणजे, आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत म्हणून फिटनेसचा जप सुरू आहे, असे दिसते. आरोग्य व्यवस्थेत कुपोषण हा शब्द भूकबळी लपवण्याचे काम करतो.  समाजाने कसा विचार करावा, हे ठरवण्याचे काम अनेकदा राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था करत असतात.

 

यातूनच शोषित समूहांना ‘वंचित’ म्हणून संबोधले जाते. शोषित या शब्दातून कोणी तरी एक शोषणकर्ता समोर येतो, आपल्याला अन्यायाविरोधात लढायचे आहे, याची जाणीव निर्माण होते. आपले शोषण कोण व का करते आहे, याचा शोध घेतला जातो. पण वंचित हा शब्द शोषणाचा हा संदर्भ तर नाकारतोच, पण समूहांच्या वंचित असण्याची जबाबदारी पण त्यांचावरच ढकलतो. तुमच्या आयुष्यात वंचितता का निर्माण झाली कारण तुम्ही आवश्यक ते कष्ट घेत नाही, असा याचा अर्थ होतो. हेतुविशिष्ट  शब्दांच्या माध्यमातून विचारांची दिशा बदलण्याची खेळी खेळली जाते. चांगले आणि वाईट यांच्या मध्ये अनेक प्रकारच्या वंचितता असतात. पण त्या समजून घेण्याचे प्रयत्न केले जात नाहीत. त्यासाठी आवश्यक असणारी उदारता लोप पावत आहे. शब्द ज्याप्रमाणे सहिष्णुतेचा परीघ रुंदावू शकतात, त्याप्रमाणे ते असहिष्णुतेचे वादळही आणू शकतात. डॉ. आनंद जोशी यांचा लेख वाचत असताना विचार-शब्द-भाषा या साखळीत अडकायला झाले. समाज म्हणून  आपल्याला कोणता शब्द महत्त्वाचा वाटतो, यावरून समाज म्हणून असणारी आपली यत्ता ठरते. भाषा बदलली, की व्यवहार बदलतो म्हणूनच आपल्या भाषेबाबत, त्यातील शब्दांच्या वापराबाबत आपण जागरूक असले पाहिजे. कोणता शब्द का वापरला जातोय, त्यातून नेमके काय सांगितले जात आहे, याबाबत सजग असणे आवश्यक आहे. आपली सामाजिक उत्क्रांती होतेय का, आपण अवनतीच्या दिशेने जात आहोत, हे तपासायला हवे. 

 

- संध्या नरे-पवार

sandhyanarepawar@gmail.com

बातम्या आणखी आहेत...