आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मरण सुधाकर आगरकरांचं...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज सुधारणा, सुधारक हे शब्दही क्रांतिकारक वाटावेत इतका प्राचीन, सनातनी श्रेष्ठत्वाचा गंड आजूबाजूला पसरलेला आहे. टेस्ट ट्यूब बेबीपासून ते प्लास्टिक सर्जरीपर्यंत सारे काही आमच्या प्राचीन संस्कृतीत होते, यासारख्या विज्ञानाची सुरळी करणाऱ्या विधानांमधून तो वारंवार व्यक्त होत असताना गोपाळ गणेश आगरकरांचं स्मरण करणं खूप आवश्यक ठरावं...

 

चारी बाजूंनी सनातनी विचारांचा गलबला असताना आधी ‘केसरी’मधून (१८८१ ते १८८७) आणि नंतर ‘सुधारक’ हे स्वतःचे वर्तमानपत्र काढत त्यातून ‘इष्ट असेल ते बोलणार, साध्य असेल ते करणार’ असं सांगत विविध सामाजिक समस्यांवर, स्थितींवर व्यक्त होणाऱ्या  गोपाळ गणेश आगरकरांचा १७ जून हा स्मृतिदिन. ब्रिटिश अमलाखाली जगत असताना स्वातंत्र्य म्हणजे काय, सुधारणा म्हणजे काय, मनुष्याची उन्नतावस्था म्हणजे काय, हे ‘आमचे काय होणार’ या लेखात आगरकर सांगतात. ते लिहितात, “स्वातंत्र्याचा नित्य अनुभव घेणारा मनुष्य (केवळ) स्वहितपरायण असत नाही, तर बराच परोपकारी, निदान परहितचिंतक तरी असतो. आपल्या श्रमाचे सारे फळ आपल्यालाच उपभोगावयास मिळावे, ही मनुष्याच्या अंतःकरणाची पूर्णावस्था नव्हे. त्या फलाची हवी तशी व्यवस्था लावण्याची मोकळीक आपणास असावी, ही त्याची आकांक्षा असते. 


ती जसजशी पूर्ण होत जाते तसतशी त्याची स्वार्थबुद्धी क्षीण होत जाऊन तो पराकाष्ठेचा परहितैषी होत जातो. तात्पर्य काय की, बलात्कार, जबरदस्ती, बळजोरी, शक्ती इत्यादी शब्दांनी व्यक्त होत असलेल्या अर्थाच्या व्यवहारांपासून मनुष्यास पूर्णावस्था येण्याचा संभव नसल्यामुळे तसले व्यवहार नाहीसे होत असून त्यांच्याजागी संयम, संमती, अनुरोध, रुकार, पसंती इत्यादी शब्दांनी व्यक्त होत असलेल्या अर्थाच्या व्यवहारांचा प्रचार सर्वत्र पडत आहे. तेव्हा येथून पुढे राजा व प्रजा, कुलेश व कुलावयव, पती आणि पत्नी, माता-पिता व अपत्ये, स्वामी व सेवक, गुरु आणि शिष्य, विक्रेता आणि ग्राहक यातील व्यवहार आणि संबंध उत्तरोत्तर बलात्काराने न होता संमतीपूर्वक होत जाणार आहेत.”


आगरकर पुढे लिहितात, “जो जो मनुष्यांची सुधारणा होत आहे, तो तो त्यांच्या अन्योन्यव्यवहारातील बलात्काराचे तत्त्व लयास जाऊन त्याच्या जागी संमतीतत्त्व प्रस्थापित होते.” आगरकर मनुष्यातील सुधारणेचा संबंध लोकशाहीवादी व्यवहाराशी जोडतात. लोकशाहीवादी व्यवहाराचं साधंसोपं तत्त्व ते सांगून जातात. कोणत्याही नातेसंबंधाचा पाया जेव्हा बलात्कार किंवा जबरदस्तीवर आधारलेला नसून पंसती आणि संमतीवर आधारलेला असतो तेव्हाच समाजाची सुधारणा होते. परस्परसंबंधांमध्ये जेव्हा बलात्कार असतो, मी सांगेन तेच अंतिम सत्य ही धारणा असते तेव्हा समाजाची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेने होत असते. समाजव्यवहारात एक साचलेपण येतं. पण ज्यावेळी समाजव्यवहारात संमतीतत्त्व प्रस्थापित होतं त्यावेळी समाजात विचारांचं आदानप्रदान वाढतं. संमतीतत्त्त्वामध्ये दुसऱ्याचं जगणं, त्याचे वेगळे विचार, त्याची वेगळी संस्कृती समजून घ्यावी लागते. अगदी दुसऱ्या घरातून आलेल्या सूनेपासून ते दुसऱ्या शहरातून आलेल्या परप्रांतीय कामगारांपर्यंत साऱ्यांशी संमतीतत्त्वाच्या आधारे व्यवहार करायचा तर तो सहिष्णुतेच्या पायावरच शक्य असतो. समाजाची सुधारणा कशी होईल हे सांगता सांगता आगरकर राज्यशास्त्रातील काही महत्त्वाची तथ्य़ सांगून जातात. 


विशेष म्हणजे, पती आणि पत्नी, पालक आणि अपत्य या नात्यांमध्येही बलात्कार नको, प्रभुत्वाची भावना नको, असं आगरकर १८८८ च्या काळात सांगतात. बालविवाहांना विरोध करतानाही ते हा संमतीतत्त्वाचा मुद्दा अधोरेखित करतात. या देशात अजूनही ४० टक्के विवाह हे मुलींच्या वयाची १८ वर्ष पूर्ण व्हायच्या आत होतात म्हणजेच बालविवाह होतात हे वास्तव असताना त्या काळात संमतीतत्त्वाच्या मुद्द्याच्या आधारे बालविवाहांना विरोध करणं ही विशेष बाब होती. विवाहामध्ये वधूवरांची परस्पर संमती आवश्यक आहे, आईवडिलांनी लावून दिलेले सर्व विवाह हे बालविवाह असतात, असा आजच्या काळातही पूर्णतः अंमलात न आलेला विचार ते एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मांडतात.


मुळात व्यक्तीला विचारस्वातंत्र्य असणं, तर्कनिष्ठ पद्धतीने विवेकी विचार करणं ही गोष्ट आगरकर अत्यंत महत्त्वाची मानत होते. ब्रिटिश राजवटीत इंग्रजी भाषेच्या माध्यमातून पाश्चात्य विचारांशी, मानवी हक्कांसारख्या नवविचारांशी परिचित झालेले आगरकर आपल्या समाजाच्या स्थितीविषयी तत्कालिन परंपरेच्या बाहेर जाऊन विचार करत होते. स्वतंत्रपणे विचार करणे हे मनुष्यत्वाचे लक्षण आहे हे सांगताना ‘गुलामांचे राष्ट्र’ या लेखात आगरकर लिहितात, “अभ्यासाच्या खोलीचे दार लावून घेऊन  मनाच्या कपाटाची दारे खुली टाकण्यास व त्यातून पाहिजे त्या विचारांस बाहेर पडू देण्यास व पाहिजे त्यास आत शिरु देण्यास ज्याची छाती होत नाही तो मनुष्य कुजक्या कस्पटापेक्षाही नादान होय असे म्हणण्यास हरकत नाही.


पण असलेच मनुष्य जगाच्या सांप्रत स्थितीत फार आढळतात. निदान हिंदुस्थानात तरी ते असावे त्यापेक्षा फार फाजील (जास्त) आहेत आणि हा फाजीलपणाच आमच्या चिरकालीन दैन्यावस्थेस कारण झाला आहे...पृथ्वीवर आजपर्यंत जे जे स्वतंत्र व सुखी देश होऊन गेले आणि आजमितीस ज्या देशांत ती सुखे नांदत आहेत, त्या देशांत अधूनमधून स्वतंत्रपणे विचार करणारे अनेक पुरुष होऊन गेले व होत आहेत, हे स्पष्टपणे दाखविता येणार आहे. अशा पुरुषांकडून वेळोवेळी बऱ्यावाईटाची चर्चा झाल्याखेरीज कोणत्याही देशाची प्रगती होण्याचा संभव नाही.” 


ज्यावेळी संपूर्ण समाज रुढीपरंपरांच्या ओझ्याखाली दबलेला होता त्यावेळी आगरकर विचारस्वातंत्र्य, नव्या विचाराचं स्वागत करण्याची वृत्ती यांच्या बाजूने उभे राहतात. देव आहे का नाही, वेद पौरुषेय आहेत अपौरुषेय आहेत, जातिव्यवस्था कशामुळे निर्माण झाली, ती मोडून टाकली असता तिचे काय परिणाम होतील, यासारखे प्रश्न आपले आपणांस विचारण्याचीही अनेकांची तयारी नाही, हे सांगत आगरकर लिहितात, “कोणतीही गोष्ट अंमलात आणण्यापूर्वी तिचा हवा तितका खल करण्यास आमची बिलकूल हरकत नाही. इतकेच नाही तर तसे झाल्याखेरीज सामान्य लोकांनी कोणत्याही नवीन गोष्टीचा स्वीकार करु नये असे आमचे मत आहे. पण जेवढे जुने तेवढे निर्दोष व चांगले असा आग्रह धरुन बसून जर कोणी नवीन गोष्टींचे चिंतन व चर्चा करणार नाही, तर रुढ विचारांतले व आचारांतले प्रमाद दूर कसे होणार व नवीन विचारांचे व आचारांचे चांगुलपण प्रस्थापित होऊन ते रुढ होणार कसे? आपल्या देशातील लोकांस नवीन विचारांची जशी भीती वाटते तशी दुसऱ्या कोणत्याही देशातील लोकांस वाटत नसेल.”


गुरुभय, राजभय व लोकभय या तीन भयांमुळे लोकं नवीन, वेगळा विचार करायला घाबरतात, याकडे आगरकर लक्ष वेधतात. स्वतंत्र, वेगळा विचार करणाऱ्या मनुष्याला या तीन भयांच्या पलिकडे जावे लागते. विचारांती ठरवलेल्या नव्या मार्गावरुन वाटचाल करण्यासाठी प्रसंगी आईवडिलांचीही अवज्ञा करावी लागते. मातृदेवो भव, पितृदेवो भव या तत्कालिन रिवाजाला छेद देत आगरकर “शहाणपणाचा गड्डा आपल्याच हाती आहे असे समजून मुलाच्या स्थितीकडे न पाहता त्यावर सुलतानगिरी करु पाहतात,” अशा शब्दात पालकांच्या एकाधिकारशाहीचा समाचार घेतात. परंपरेपेक्षा वेगळ्या नवतेचा स्वीकार करण्याआड जे जे येईल ते सारे नाकारण्याचाच सल्ला आगरकर देतात. 

 

स्वतःच्या आयुष्यातही त्याचाच अवलंब करतात. १८८१ ते ८७ या काळात आगरकर ‘केसरी’चे संपादक होते, पण सामाजिक सुधारणा आधी की राजकीय हक्क आधी असा वाद केसऱीच्या संपादक मंडळात निर्माण झाल्यावर त्यांनी केसरीचे संपादक पद सोडले आणि स्वतःचे स्वतंत्र वृत्तपत्र काढले, त्याचे नावही ‘सुधारक’ असे ठेऊन आपल्या कार्याची दिशा स्पष्ट केली. आगरकर करत असलेली रुढीपरंपरांची चिकित्सा सहन न होऊन पुणे शहरातील सनातनी मंडळींनी आगरकर जिवंत असतानाच त्यांची प्रेतयात्रा काढली. आपल्या घरातून आगरकरांनी आपली प्रेतयात्रा शांतपणे पाहिली. लोकभयाची पर्वा न करता ते समाजाच्या रोषाला ठामपणे सामोरे गेले आणि ‘आमच्या निकृष्ट स्थितीस कारण कोण?’ यासारखे रुढीवादी, सनातनी लोकांना न आवडणारे प्रश्न उपस्थित करत राहिले.

 

- संध्या नरे-पवार
sandhyanarepawar@gmail.com

बातम्या आणखी आहेत...