आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फाशी दिलं गोळी घातली

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

निष्पाप, निरागस जगण्याचं प्रतीक असलेला तारकोव्हस्कीचा इव्हान एका क्षणी युद्धज्वराने पछाडलेला तरुण बनतो. ज्वरातून कधीच न सावरल्याने कालांतराने फाशी जातो. मानवी प्राक्तनाच्या या टप्प्यावरच आपल्याला अरुण कोलटकरांची कवितासुद्धा भेटते. जणू तारकोव्हस्कीने कोलटकरांच्या कवितेवरच सिनेमा केला असावा, अशी भावना देणारी...


धी येतो कोकिळेचा आवाज. मग दिसतो, झाडावर असलेल्या कोळ्याच्या जाळ्यामागून एका १०-१२ वर्षांच्या मुलाचा सुकोल चेहरा. त्याचे भुरभरणारे केस, मग पडद्यावर नजरेस पडतात खूप मोकळ्या जमिनीवर पसरलेली नानाविध झाडं, देवदार वृक्षाचे जंगल, मुलाच्या डोळ्यात अपार औत्स्युक्य. हालचालीत अपार उत्साह. तो थांबतो, जणू जंगलाची शांतता ऐकतोय-अनुभवतोय. मग दूरवर कच्चा रस्ता दिसू लागतो. जमिनीचा क्लोज-अप... प्रकाशकिरणांत न्हाऊन निघालेला इव्हान...आता घराजवळ पोहोचलाय. कोकिळेचा आवाज अजूनही येतोच आहे, इव्हान या आवाजाचा वेध घेतोय, मान वळवून बघतोय, तर पुढे समोर आई उभी. पाण्याची बादली घेऊन, इव्हान पाण्यात चेहरा बुडवतो... आईला सांगतोय, तिथे कोकिळ आहे. आईच्या चेहऱ्यावर स्नेहाळ हसू. अचानक तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलताहेत, तोच इव्हानची भयप्रद किंकाळी ऐकू येतेय. एकदम दृश्यबदल...


इव्हान एका लाकडी घरात एकटा अचानक जागा होतो. तो जमिनीवरून उठून उभा राहतो. आता पूर्णपणे बदललेला. चेहरा शोधक, तणावाने भरलेला. तेवढ्यात दार करकरते. तो वेगानं बाहेर पडतो, बाहेर कुणीच नाही. खूप दूरवर चालत जातो. अगदी क्षितिजापर्यंत चालत गेल्यासारखा. आसमंतही बदललेला. आता त्याच्यात पूर्वीचे उत्फुल्लपण नाही.  दिसताहेत  पालापाचोळ्यात पडलेली  माणसांची प्रेतं...


नजीकच्या नदीच्या पाण्यावर रॉकेटस् सरसरत गेल्याचा आवाज. आकाशात अचानक चमकून जाणारे अग्निगोल. इव्हान तारांचं कुंपण ओलांडून जर्मन सैनिकांची नजर चूकवून, माणसासारख्या दिसणाऱ्या मृत झाडापर्यंत पोहोचतो, तिथून कशीबशी नदी ओलांडून इव्हान रशियनांच्या ताब्यातील प्रांतात पोचतो.


पडद्यावर अक्षरे उमटू लागतात... इव्हान्स चाइल्डहूड... दिग्दर्शक-आंद्रे तारकोव्हस्की! पुढे जगमान्यता मिळवणाऱ्या तारकोव्हस्कीचा, हा  पहिलाच पूर्ण लांबीचा कथात्म चित्रपट. दुसऱ्या महायुद्धात पूर्व आघाडीवर आक्रमण करणाऱ्या जर्मनांशी झालेल्या युद्ध-काळात इव्हानची आई, बहीण आणि संभवतः गार्ड असलेले, वडीलही मारले गेले. युद्धकाळात जर्मनांनी केलेल्या अत्याचाराने लहानग्या इव्हानची दोन शकलं केली, आधीचा होता, निष्पाप, निरागसतेनं मुसमुसलेला बालक आणि नंतरचा होता एक सूडानं पेटलेला अकालीच प्रौढ झालेला-सतत धुमसता इव्हान. रशियन सैन्याधिकारी वारंवार त्यानं शाळेत जावं, यासाठी प्रयत्न करतात. पण हा मला जर्मनांचा सूड घ्यायचा आहे, असे निक्षून सांगतो, तारकोव्हस्कीनं त्याचा मनात दडलेला हा  कोवळा भाग स्वप्नदृश्यांच्या द्वारे असा साकारला, की स्मृती आणि स्वप्नाचं एक संयुग होऊन नवीनच  चित्रपट-भाषा आकारास यावी.  


रशियन लेखक व्लादिमिर बगमालव यांच्या १९५७ मध्ये प्रकाशित झालेल्या मूळ पुस्तकावर आधारित चित्रपट तारकोव्हस्की नावाच्या तेव्हा अगदीच नव्या दिग्दर्शकाकडे देण्याचं ठरलं, तेव्हा  चित्रपट संस्थेतील शिक्षक मिखाइल रोम यांच्याकडे तो गेला. म्हणाला, ‘मला या कथेवर चित्रपट करण्याचा मार्ग सापडला आहे, स्टुडिओने मला पाठिंबा दिला, तर मी त्यावर चित्रपट करेन.’ मिखाइल रोमनं त्याला विचारलं, काय आहे तुझा तोडगा? तारकोव्हसी उत्तरला ‘इव्हानची स्वप्नं.’ पुढे आपल्या ‘स्कल्प्टिंग इन टाइम’ या चित्रपटकलेविषयक पुस्तकात तारकोव्हसी म्हणतो,’ ‘इवान्स चाइल्डहूड’मधील चारही स्वप्न वैशिष्ट्यपूर्ण साहचर्यावर आधारलेली होती... अगदी ‘आई, तिथे कोकिळ आहे’ ही स्मृती मी चार वर्षाचा होतो, तेव्हाची आहे.’


खरं तर युद्धग्रस्त असतानाही माणूसपण जपून असणारे काही सैन्याधिकारी एकाअर्थी त्याला पुनःपुन्हा  बालपणात परतायला सांगत असूनही, त्याला ठाम नकार देत, आघाडीवर राहून युद्धात त्यांनाच मदत करू पाहणारा आणि शेवटी प्राण गमावणारा, इव्हान युद्धज्वरानं पोरक्या झालेल्या, होरपळून गेलेल्या विश्वाच्या बालपणाचं प्रतीक आहे. 


इव्हानची हृदयद्रावक जीवनकहाणी ऐकून आणि सहवासातून त्याच्याबद्दल प्रेम वाटू लागलेला ग्लात्सेव्ह अचानक सुरू झालेल्या बॉम्बवर्षावानं त्याची काळजी करत इव्हान... इव्हान करत ओरडत येतो तोः एका कोपऱ्यात इव्हान उभा डोळ्यात चमक अन् गालवर सुकलेले अश्रू. त्यांच्या दोघांतला हा संवाद पहाः


‘घाबरू नकोस (इव्हान), ते लवकरच (बॉम्बवर्षाव) थांबवतील.’ (इव्हान शांत)
‘काय झालं इव्हान,’
‘मी घाबरलेलो नाही’...
‘तुझ्यासमोर खूप काही घडलं आहे. तुला आता विश्रांती आणि शांती हवी. (इव्हान)’
‘युद्ध सुरू असताना  तेच लोक विश्रांती घेऊ शकतात, ज्यांना लढता येत नाही,’ (इव्हान ठामपणे उद््गारतो.)
‘खरं आहे, पण युद्ध तुझ्यासाठी नाही’
‘माझ्यासाठी नाही?’ तो पुनरुउच्चार करतो. इव्हान अचानक ग्लात्सेव्हला विचारतो.
‘तू कधी मृत्युछावणीत होतास?’ ग्लात्सेव्ह हातातल्या सूपच्या कपसह थिजून जातो. ‘आपण जे स्वप्नातही बघितलं नाही, त्यापेक्षा जास्त या मुलानं बघितलं, या खोलिन नावाच्या सैन्याधिकाऱ्याच्या विधानाचा अर्थ आता  लागतोय.’
‘तू मला चिथवू नकोस’ ...तुला काही माहीत नाही. आता (मी इथेच राहण्याबाबत सगळेच) सहमत झालेत’ पुढे नदी पार करून जाण्याच्या वेळी ग्लात्सेव्ह - खोलिन - इव्हान या तिघांनी जाण्याचे ठरते, त्यातही बोट सोडून एकटेच पुढे जाण्याची वेळ येताच, इव्हान अपार यातनाभोग आणि असीम धैर्यातून मिळवलेल्या काहीशा प्रभुत्वभावनेनं, तुमची शरीरं मोठी आहेत, हालचाल लक्षात येऊन मारले जाल, असं सुनावत एकटा पुढे जातो. प्रतिभावंत तारकोव्हस्की त्या छोटाश्या निरोप-प्रसंगातही अपार मानव्य गुं॑फून टाकतो. पुढे जर्मनांचा पाडाव झाल्यावर, युद्धोन्मादाने विजयोत्सव साजरा होण्याची दृश्ये चित्रपटात काही काळ येतात...


 आता पडद्यावर भल्यामोठ्या अनेकमजली इमारतीमध्ये एकीकडे पुस्तकं बांधून दुसरीकडे पाठवली जाताहेत. त्याच वेळी युद्धकाळात मारल्या गेलेल्याचा तपशील नोंदवला जातोय. ग्लात्सेव्हच्या निगराणीखाली. तो धीरगंभीर आवाजात उच्चारतो- हे पृथ्वीवरचे शेवटचेच युद्ध असेल का? साऱ्या मानववंशाच्या मनात असलेल्या चिंतेला, त्याच्या या प्रश्नात उद््गार मिळतो...
 
 
पुन्हा मृत्यू-तपशिलाच्या नोंदींचे काम सुरू... फाइल्सवरून कॅमेरा फिरतोय. मानवी स्वर फक्त मृत्यूची तऱ्हा सांगतो... "फाशी दिलं... गोळी घातली... फाशी दिलं. गोळी घातली... फाशी दिलं... गोळी घातली...’ ग्लात्सेव्हला खोलिनची आठवण येतेय. ती त्याच्या आवाजातून जागवली जाते. तो ग्लात्सेव्हला म्हणायचा ‘युवर नर्व्हज् आर शॉट्. यु शुड सी डॉक्टर फॉर दॅट’ खोलिन तू मारला गेला, मी वाचलो. या साहचर्यातून अंतर्मनात जुन्या आठवणी - कदाचित इव्हानचीही आठवण जागी झाली असेल, पुन्हा मृत्यूची तऱ्हा सांगणारा आवाज ‘फाशी दिलं... फाशी दिलं गोळी घातली... फाशी दिलं... गोळी घातली...’ अचानक एका फाइलच्या फोटोवर  ग्लात्सेव्हची नजर पडते, फाइल घरंगळून खाली पडते. ग्लात्सेव्ह तिथे जाऊन खात्री करून घेतो. तो इव्हानच्या मृत्यूचा तपशील असतो ...कोरडे सत्य... फाशी दिलं!


पुन्हा एक नवी दृश्यमालिका... इव्हानचा फाइलवरचा भयावह चेहरा... ग्लात्सेव्ह जणू इव्हानच्या  फाशीआधीचे  दृश्य बघतोय ‘कुठे आहे तो छोटा ‘बास्टर्ड’? तो तिथे आहे. ये लहान्या राक्षसा, तुला धडा शिकवण्यासाठी आमच्याकडे एक-दोन गोष्टी आहेत. घाई करा...पुढे...’


आतल्या खोलीत आठ-दहा फास अडकवलेले... खाली अचानक घरंगळलेलं इव्हानचं मुंडकं... डोळ्यात अजून तोच विखार. तिथून पुन्हा एक विलक्षण दृश्यमालिका सुरू होते, अगदी प्रारंभीच्या प्रसंगांची आठवण करून देणारी. हसऱ्या चेहऱ्याने इव्हानची आई पुढे येते. इव्हान पाण्यात चेहरा बुडवतो. हसतोय, आईकडे बघून. हसतहसत पाण्याकडे जात त्याला टाटा करते. एकाच वेळी खूप सारे मुलं-मुली इव्हानबरोबर पाण्यात खेळताहेत जणू स्वनच वाटावे. अशी उमलून येणारी जाणीव... त्याची खास मैत्रीणही दिसते, तिला आधी त्यानं सफरचंद दिलेलं... पाऊससरी कोसळत असताना...


तारकोव्हस्कीचा इव्हान केवळ युद्धातीलच नाही, तर साऱ्या अनाथ बालकांशी नातं जोडतो. युद्धाचे गौरवीकरण करणाऱ्या उन्मादी प्रवृतीला छेद देतो. प्रत्येकातील ममत्व जागे करून. प्रेम-वात्सल्य संस्कृतीच्या मध्यभागी आणतो. स्मृती-स्वप्न-काल्पनिकता-कल्पकता याचा मेळ घालत  तर्काच्या करकच्च गाठीतून चित्रपटाची नवी भाषा तो घडवतो. जी विश्वात्मक असते. त्यानंच सांगून ठेवलंय, ‘विषय चित्रपटाला महानपण देत नाही. मानवी प्राक्तनाशी तो जे नाते जोडतो,त्या नात्याने विषयाला मोल येतं. हे सारे घडत असताना मला रशियन-इंग्रजी बरोबरच मराठीपण ऐकू येत होतं.. आवाज तुम्हालाही ओळखीचा वाटेल...


ही सगळी घाण वाहून गेली
तुझ्या डोळ्यातली
की विशुद्ध अश्रू 
एकच फक्त
शिल्लक राहील शेवटी
तेवढा मात्र जपून ठेव डोळ्यात 
तोच कामाला येईल 
पुन्हा नव्यानं सृष्टी 
निर्माण करण्यासाठी 
अगे 
विश्वात्मके

तारकोव्हस्की भेटता, तर विनवलं असतं मी त्याला. मला आमच्या अरुण कोलटकरांच्या कवितेवर तू केलेला सिनेमा बघायचा आहे. पुन्हा कधी येतोस?


- संजय आर्वीकर
arvikarsanjay@gmail.com
लेखकाचा संपर्क : ८२७५८२००४४

 

पुढील स्‍लाइडवर पाहा,  फोटो...