आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

द्रष्‍ट्याचे नाट्यात्‍म दर्शन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रंगमंचावरील नाटक संपते तेव्हा तो मंत्रित अवकाश आपण तिथेच विसरून येतो. पण ‘समाजस्वास्थ्य’ ही नाट्यकृती तसे होऊ देत नाही. म्हणूनच ही कलाकृती सामाजिक-सांस्कृतिक सुधारणेसाठी टाकलेले, ऐतिहासिक म्हणावे असे पाऊल ठरते... 


स्त्रीशिक्षणासाठी उत्तुंग कार्य करणारे महर्षी धोंडो केशव कर्वे(अण्णा) यांचे ज्येष्ठ चिरंजीव म्हणजे, र.धों. कर्वे. निरलसपणे काम करणाऱ्या अण्णांच्या कामाला लोकमान्यतेबरोबरच राजमान्यताही मिळाली. ‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी सन्मानाने १९५८ मध्ये त्यांना गौरवण्यात आले. मात्र आधुनिक भारताच्या इतिहासात ज्यांना आपल्या कार्यकर्तृत्वामुळे खरेतर द्रष्टेपणाचा मान मिळावा, ते र.धों. कर्वे अजूनही आपल्या सामाजिक-सांस्कृतिक इतिहासात दुर्लक्षितच राहिले आहेत. य. दि. फडके यांनी लिहिलेले ‘र.धों. कर्वे’ हे चरित्रात्मक पुस्तक त्यांच्या जन्मशताब्दीच्या अनुषंगाने ह. वि. मोटे प्रकाशनाने प्रकाशित केले. अमोल पालेकर यांनी ‘ध्यासपर्व’(२००१) या चित्रपटातून या लोकविलक्षण व्यक्तिमत्वाचा वेध घेतला. ‘पद्मगंधा प्रकाशना’चे ध्येयनिष्ठ संचालक-संपादक अरुण जाखडे यांनी, डॉ.अनंत देशमुख यांनी संशोधन-संकलन-संपादन केलेले र.धों.वरचे आठ खंड प्रकाशित केले. हे र.धों.चे कार्य अधोरेखित करण्याचे, त्यांचे विचार समाजमनात रुजवण्याचे काही महत्वाचे प्रयत्न; पण अजूनही या तत्त्वनिष्ठ, नि:स्पृह, विवेकनिष्ठ, विज्ञाननिष्ठ, प्रखर बुद्धिवादी, कर्तव्यकठोर, संस्कृती-चिकित्सक-समाज-सुधारक आणि मुख्य म्हणजे, इतिहासाला वळण देण्याचे क्रांतिकारक समतोल-तत्त्व अंगी असणाऱ्या व्यक्तिमत्त्वाची सुयोग्य दखल आपल्या समाजाने घेतलेली नाही. 


र.धोंचे लोकोत्तर कार्य, त्यातील द्रष्टेपण आणि त्यांची अनोखी जीवनकहाणी यांचे दर्शन घडवणारी अलीकडची कलाकृती म्हणजे, अजित दळवीलिखित आणि अतुल पेठे दिग्दर्शित-अभिनित नाटक-‘समाजस्वास्थ्य’. पन्नासहून अधिक प्रयोग झालेले, हे नाटक, जितके र.धों.च्या काळाचे आहे (नाटकाचा कथानक काळ साधारणतः १९३०-१९५३) तितकेच आजच्याही काळाचे आहे. संपूर्ण नाटकात एकाच वेळी दोन-तीन स्तरांवरचा संवाद (कम्युनिकेशन-डिसकोर्स) सुरू असतो. एका पातळीवर असतो, तत्कालीन काळ, तर दुसऱ्या पातळीवर कार्यरत असतो, आताचा काळ आणि त्याचा अन्वयार्थ, तिसरा (लेखक-दिग्दर्शकाचा) प्रज्ञेचा डोळा असतो, त्यातील कालातीत-मूल्यांवर. हे प्रत्येक प्रसंगात ‘घडवून’ आणणे कोणासही शक्य नसते. परंतु नाटकाची रचना करताना नाटककाराने - आणि त्यांची रंगमंचीय संरचना निश्चित करताना, दिग्दर्शकाने याचे हे प्रखर भान व्यक्त केले आहे. नाटकाची रचना निवडक-प्रसंग-मालिकेसारखी आहे, या प्रसंग निवडीतच कलात्मक सौंदर्य आणि समाज-भान दडलेले आहे, हे लक्षात येते. 


नाटकातलं पहिलंच दृश्य अनेक आशयप्रवाह रंगमंच-अवकाशात प्रस्थापित करतात.रंगमंच उजळतो तेव्हा पहिले येते दृक्-प्रतिमा. र.धों. टाइपरायटरवर काम करताहेत आणि त्यांच्या पत्नी मालतीबाई, सोबत समोरच्याच खोलीत बसून आपल्या कामात मग्न आहेत. तेवढ्यात वर्तमानपत्र-विक्रेत्याचा आवाज(ध्वनिप्रतिमा) ‘घ्या... केसरी... ज्ञानप्रकाश,’ र.धों.चा व्यक्तिगत पुस्तक-संग्रह, र.धों.ची वेशभूषा, मालतीबाईंचं आवाजाच्या दिशेनं बघत मनगटी घड्याळात वेळ बघणं यातून या दांपत्याची आधुनिकता प्रस्थापित होत असतानाच, अडाणी वाटणाऱ्या निर्मलाबाईंचं ‘ते मूलं न होऊ देण्याचं केंद्र हे ह्येच का? असं विचारत घरात प्रवेश करणं, त्यांना जणू शिक्षिकेच्या भूमिकेतून प्राथमिक माहिती देत असतानाच, ‘व्यभिचाराचा प्रश्न ‘या लेखाच्या  संदर्भात अटक करण्यासाठी, साक्षीदारांसह आलेले पोलिस इन्स्पेक्टर आचरेकर, त्यांच्या बरोबर पोलिस ठाण्यात एकटे निघतानाही, निर्मलाबाईंना मार्गदर्शन करण्यासाठी तू घरीच थांब, असे सुचविणारे  र.धों., ते पोलिसांबरोबर निघाले असताना त्यांच्या कामाची मौलिकता न समजल्याने, त्याची हुऽर्ये उडवत असल्यासारखे  माणसांचे आवाज आणि त्याच्या विरोधात्म वाटेल असा आमच्या बाई तर म्हनल्या होत्या, की लई चांगलं लिवतात अन् तरीबी अटक? यातून नाटकाचा गाभा सहजपणे प्रेक्षकंच्या-वाचकांच्या ध्यानात आणून दिला जातो. 


मालतीबाईचं आजारपण-आणि तरीही त्यांचं समाजकार्यात र.धों.बरोबर समर्पण-भावनेनं सहभागी होणं-हे सारं आशय-पेशींसारखं आहे, ज्याचे नाटकाच्या पुरोगतीबरोबर, समृद्ध आशय-शरीरात रुपांतर होते. विठ्ठल रामजी शिंदे यांचा शब्द वापरायचा तर, मालतीबाई र.धों. या ‘जन्ममैत्रीण’आहेत. पोलिस अटक करायला आले आहेत, हे कळल्यावरही अस्वस्थचित्त न होता, आपलं काम शांतचित्ताने करणारे र.धों यांची धीरोदात्त प्रतिमा या प्रसंगातून साकारते. र.धों.च्या या पहिल्या अटकेनं घाबरलेल्या मालतीबाई... आता...? असे अनेक प्रश्न सूचित करणारे उद््गार काढतात - तेव्हा-कधीतरी हे होणारंच होतं - असं सांगून - मोठ्या संघर्षाचा हा प्रांरंभ-बिंदू आहे, असं सूचित करतात. त्यात ओघात र.धों.नी एक भविष्यदर्शी विधान केले आहे. ते म्हणतात,’ कधीकाळी या कर्मठांच्या हातात सत्ता आलीच  नंतर प्रत्येकावर- प्रत्येकावर मठ्ठपणाचा काही थर असला पाहिजे, असा कायदाच करून घेतील.’ 


नाटककार अजित दळवी यांनी या नाटकात, एकेक प्रसंगांची रचना करताना, अनेक घटना त्यात गुं॑फून घेतल्या आहेत, पहिली प्रसंग-मालिका संपते, ती मालतीबाईंच्या आजाराचे, संभाव्य गंभीर स्वरुप सूचित करून; जिथे ज्यात त्यांचे रोजचे व्यवहारही प्रभावित होणार आहेत. 

 
दुसरी प्रसंग-मालिका सुरू होते,ती ‘व्यभिचाराचा प्रश्न’ या र.धों.च्या  लेखावरून, सरकारने त्यांच्या विरूद्ध दाखल केलेल्या खटल्याच्या सुनावणीच्या प्रसंगाने. मिशनरी संस्थेच्या, विल्सन कॉलेजात काम करत असताना संततीनियनन, गुप्तरोगासंबंधी कार्य केल्यावरून, संस्थेने ‘हे किंवा ते’ अशी परिस्थिती निर्माण केल्याने, र.धों.नी आपल्या समाजकार्यासाठी अध्यापकपदाचा राजीनामा दिला होता- हा सहा वर्षांआधीचा प्रसंग पूर्वस्मृती पद्धतीने(फ्लॅशबॅक) जोडून घेतला आहे. यावेळी रं. धों.भोवती चौकट तशीच ठेवल्याने महाविद्यालयाचे प्रशासन आणि धर्मसत्तेनंही त्यांना आरोपी मानलं असल्याचं सूचित होतं. राजीनामा देण्याचा आपला निर्णय सांगताना, ते जणू आपले ध्येय स्पष्ट करणारे विधान करतात - ‘गणित शिकवायला तुम्हाला अनेक लोक भेटतील, पण हे कार्य करायला समाजाला दुसरं कोणी भेटणार नाही’. फ्लॅशबॅक संपल्यानंतर, पुन्हा र.धों.च्या निवेदनाचे दृश्य पूर्ववत सुरू होते आणि र.धों. आपला ‘समाजस्वास्थ्य’ काढण्यामागचा हेतू स्पष्ट करतात.  


‘केवळ चरितार्थ चालवणे हा ‘समाजस्वास्थ्य’चा कधीच हेतू नव्हता. व्यक्तीच्या आणि समाजाच्या आरोग्याची चिकित्सा करणं आणि तत्संबंधीच्या उपायांची चर्चा करावी, या हेतूनं मी ‘समाजस्वास्थ्य’ मासिक काढलेलं आहे’. १५ जानेवारी १९३२ ला झालेल्या पुढच्या सुनावणीत, धर्माच्या बाबतीत सनातनी-कर्मठांचे प्रतिनिधी समजले जाणारे अहिताग्नी राजवाडे यांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. आपल्या विवेचनाच्या ओघात-राजवाडे-‘व्यभिचाराचा प्रश्न’ हा संपूर्ण लेखच अश्लील आहे, असे सांगून ‘या लेखामुळे आपल्या आर्यवंशाचा नाश होण्याची शक्यता आहे’ असे अतिरंजित विधान करतात. याच विधानाचा धागा पकडून - र.धों. आणि डॉ.आंबेडकर यांच्यातील महत्त्वपूर्ण चर्चा पुढे नाटकात येते. जात, धर्मव्यवस्था आणि भारतीय समाज हा आपल्या अभ्यासाचा विषय आहे, असे सांगणारे डॉ.आंबेडकर, ‘जातिभेद नैसर्गिक नसून सत्ता आणि हितसंबंधातून निर्माण झाला आहे, या र.धों.च्या ‘समाजस्वास्थ्य’मधील निरीक्षणाला ‘अत्यंत महत्त्वपूर्ण’ असे सांगून दाद देतात. 

 
नाटकात, या दोन थोर व्यक्तिंना परस्परांबद्दल असणारा आदरभाव संवादातून आणि त्यांच्या देहबोलीतून नेमकपणाने व्यक्त झाला आहे. र.धों. आणि डॉ. आंबेडकर यांच्या चर्चेत, लेखनामुळे लोकांच्या भावना दुखावणं,वर्णसंकर, परंपरेचा नीट अर्थ लावता येणं, मनुस्मृती,नाजूक भावनांच्या अतिरेकानं मिथकाचा अभ्यास करणं अशक्य होणं, मिथकांतील व्यक्तींना ऐतिहासिक व्यक्ती मानलं जाण्याची शक्यता या मुद्दयांवर उहापोह होतो.


‘एखाद्याची प्रकृती नाजूक आहे असं म्हटलं की तो व्यक्ती आजारी आहे,असा निष्कर्ष आपण काढतो…. या देशाचं दुर्दैव आहे, इथे विवेकाच्या आधारावर उभी केलेली कोणतीही चळवळ यशस्वीच होत नाही’ हे डॉ. आंबेडकरांचे विधान आपल्याला  समाजघटक म्हणून आत्म-चिकित्सेकडे नेते.


‘समाजस्वास्थ्य’च्या गुजराथी आवृत्तीमधील प्रश्नोत्तराशी निगडित दुसऱ्या खटल्यात तर खुद्द डॉ. आंबेडकर र.धों.ची बाजू मांडतात. पुन्हा र.धों.ना अटक करायला आलेले पोलीस इन्स्पेक्टर आचरेकर यांचे ‘समाजस्वास्थ्य’ वाचून झालेले मतपरिवर्तन, ‘सरकार दरबारी अक्कल गहाण पडलेली असते’ या त्यांच्या वाक्यातून व्यक्त झालेली त्यांची कुचंबणा, त्याकाळी उदारमतवादी समजल्या जाणाऱ्या इंद्रवदन मेहता सारख्या मॅजिस्ट्रेटसमोर झालेली सुनावणी आणि तरीही र.धों.वरचे आरोप सिद्ध होऊन त्यांना शिक्षा होणे, यातून परिस्थितीचे गांभीर्य अधोरेखित होते. 


‘समाजस्वास्थ्य’मधील प्रश्नोत्तरांचे प्रातिनिधिक वाटावे, असे सादरीकरण,  सुनावणीची वाट पहात बाकड्यांवर बसलेले-एकलेपण अविष्कृत करणारे र.धों. - शेवटच्या खटल्यात  वकील न घेणारे र.धों.- रंगमंचाच्या मध्यभागी आलेली आरोपीभोवतीची चौकट,तेथून एखादी ‘सोशल एन्क्वायरी’ करावी,असे व्यक्ती-विरूद्ध प्रस्थापित यंत्रणा असे त्यांच्या युक्तिवादाला आलेले व्यापक रूप ही या नाट्यात्म दर्शनाची काही बलस्थानं आहेत. ‘समाजस्वास्थ्य’ हे जितके व्यक्ती र.धों. यांचे नाटक आहे, त्यापेक्षा जास्त, त्यांच्यातील समाजसुधारकाचे-त्यातील-चैतन्यतत्वाचे आहे-कालाची चौकट भेदून जाणारे आहे. 


लेखक-कलावंतांसाठी र.धो. या नाटकात एक मूलमंत्र सांगतात- ‘लेखक- साहित्यिकाच्या  दृष्टीनं, माणूस-त्याचं जगणं-त्याचा सन्मान महत्वाचा’ आणि  समाजाप्रती त्यांचा दृष्टिकोन-सर्वेपि सुखिनः संतु  सर्वे संतु निरानयाः  सर्वे भद्राणि पश्यंतु  न कश्चित दुःखभाग भवेत- 
यात जणू त्यांचे जीवन-व्रत सांगत व्यक्त झाला आहे. 


रंगमंचावरील नाटकही इथेच संपते, एरवी तो मंत्रित अवकाश आपण तिथेच विसरून येतो, पण ‘समाजस्वास्थ्य’ ही नाट्यकृती तसे होऊ देत नाही. म्हणूनच ही कलाकृती सामाजिक-सांस्कृतिक सुधारणेसाठी टाकलेले, ऐतिहासिक म्हणावे, असे पाऊल आहे.  


- संजय आर्वीकर 
arvikarsanjay@gmail.com
लेखकाचा संपर्क : ८२७५८२००४४ 

बातम्या आणखी आहेत...