आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवणीतल्‍या होडीतून निरागस नंदनवनाकडे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपण ज्याच्यापासून दूरदूर चाललोय तो निसर्ग निरागसतेचा, निर्मळतेचा संस्कार देतो. हा संस्कार हाडीमांसी रुजला की अवघं जगणंच नितळ होऊन जातं - हेमंत जोगळेकरांच्या कवितेतून, माजिद माजिदीच्या सिनेमातून डोकावत राहतं...माणूस म्हणून समृद्ध करत जातं... 


मी नवा-नवा बाबा झालो, त्यानंतरच्या काही वर्षातली गोष्ट. माझी लेक थोडी-थोडी बोलू लागली होती. तिला आपल्या आई-बाबांच्या लहानपणाबद्दल खूप उत्सुकता होती. नंतर या उत्सुक-कुतुहलात तिचा लहानगा भाऊपण सामील झाला. स्वतःसाठी मर्ढेकर-चित्रे-ग्रेस-आरती प्रभु-कोलटकर-कुसुमाग्रज-केशवसुत-बालकवी आधीच वाचून झाले होते. माझा ‘बालकवी’ मात्र मला अचानक वेगळ्याच पुस्तकात सापडला होता. ते पुस्तक होतं ‘कविता दशकाची’. ‘ग्रंथाली’नं १९८० मध्ये काढलेलं. मी १९८५-८६ मध्ये कधीतरी वाचलं. त्यात मला माझा हा बालकवी भेटला. त्याचं नाव - हेमंत जोगळेकर. त्यानं माझं बाबापण खूप सोपं केलं होतं. 


माझे लहानगा-लहानगी मला विचारायचे. तुमच्या लहानपणी ‘बाबा, असंच असायचं सगळं.’ मी विचारायचो-म्हणजे? झाडं-पक्षी-पाऊस-रस्ते-घरं-आकाश-चांदण्या... अशाच ट्विंकल... ट्विंकल... माझं उत्तर हा माझा बालकवी द्यायचा - 


तेव्हा ना, 
धूळ, गवत आणि खडे माझ्या पायांना थेट गुदगुल्या करीत. 
आमचे सिंहासन, तेव्हा पेरूच्या झाडावर होते 
सगळ्या पानांची चव मला तोंडपाठ होती 
सहज मी फुलांच्या आत हिंडून येत असे 
शिकवलेले सगळे कसे  समजत असे ताबडतोब 
सगळे रंग तेव्हा कसे छान वेगळे निघत असत 
इतिहासातल्या सगळ्या राजांना मिशा असत. 
तेव्हा ना, धनुष्यबाण घेऊन मी लढाईवर जात असे 
तेव्हा ना, मुठीमध्ये आईचे बोट बंद असे. 


लहानगा-लहानगीच्या या वयात माझी दौऱ्याची नोकरी होती. आणि ते आईच्या सोबतीनं शहरात. मी ऑ॑फीसच्या कामानं खेड्यापाड्यात - डोंगरावरच्या पाड्यांमध्ये - आदिवासींच्या गावांमध्ये. एकदा मी नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी-सुरगणा भागात दौऱ्यावर होतो. सलग एकवीस दिवस. भारत सरकारची ग्रामीण जनजागृती मोहीम होती. घरचा फोन-मोबाइल वगैरे माझ्यासाठी आणि मुलांसाठीपण यायचाच होता. तेवीस दिवसांनी घरी पोहोचलो, तो मुलांनी ताप काढलेला होता. मी आदिवासी पाड्यावरून खरेतर त्यांच्यासाठी एक ‘जिक्कण’ आणली होती. पण त्यांचा ताप बघून माझा धीरच झाला नाही, ते बाहेर काढायचा. 


डॉक्टरांकडे गेलो तर म्हणाले ‘फार काही झालेलं नाही. दोन-तीन दिवसात होतील ठीक...   बहुतेक बाबा खूप दिवस भेटले नाहीत म्हणून काढलाय ताप पोरांनी... पुन्हा इतक्या दिवसांसाठी एकदम जाऊ नका असंही सांगायचं असेल त्यांना तुम्हाला...’ डॉक्टर हसत म्हणाले. मुलं दोन-तीन दिवसात खरंच बरी झाली. ...बाबांनी आमच्यासाठी काय आणलं, ते शोधू लागली. मी त्यांची ‘जिक्कण’ त्यांना देणार; त्याआधीच त्यांनी हुडकून काढली. आणि एकदम पसार. त्याच्या हातात होतं, मी आदिवासी पाड्यावरून आणलेलं धनुष्यबाण भात्यासह - मी त्यांच्यासाठी आणलेली ‘जिक्कण’. मुलांच्या भोवती त्यांच्या मित्र-मैत्रीणींची गर्दी जमली होती... 


बहुतेक त्यांच्या मनात जोगळेकरांच्या कवितेतला नायक शिरला होता. तेव्हा ना, धनुष्यबाण घेऊन मी लढाईवर जात असे लहानग्यांनी विचारलेल्या प्रश्नांना माझ्याकडे बरेचदा उत्तर नसायचं. आणि काय सांगावं या पेक्षाही कसं सांगावं, हा प्रश्न माझ्यासाठी जास्त मोठा होता. पालकत्वाच्या पातळीवर हा प्रश्न सगळ्याच आई-बाबांना पडत असतो.  माझ्यातल्या बाबाचा हा प्रश्न खूपदा हेमंत जोगळेकरांच्या कवितेनं सोडवला आहे. 


माझ्या लहानशा सदनिकेचं काम सुरू होतं.मी आणि माझी लहानगी रोज ते काम बघायला  रमत-गमत जायचो. पहिल्या घराचं आपलं नातं दुहेरी असतं. ते व्हायचं असतं, तोपर्यंत ते आपलं मूल असतं. ते पूर्ण होऊन आपण तिथे राहायला गेलो की आपण त्याचं मूल होतो.  १९९७ मध्ये एकदा हेमंत जोगळेकरांची प्रत्यक्ष भेट झाली. खूप वर्षांची ओळख असल्यासारखे आम्ही बोलू लागलो. त्यांचा ‘होड्या’ हा कवितासंग्रह माझ्यासाठी - माझ्या लहानग्यांसाठी कसा अगदी जिवाभावाचा सखा आहे, मी ‘शिडाची होडी’ नावाची कथा ‘अभिरूची’त लिहिली आहे... हे सगळं मी त्यांना सांगू लागलो... कपाळावर रूळणारे त्यांचे केस आणि ते स्वतःही, माझ्याकडे बघून हसताहेत, असं मला वाटलं. त्यांनी हळूच खांद्यावरच्या बॅगेतून त्यांचं एक पुस्तक काढलं. काहीतरी लिहून माझ्या हाती दिलं... 


‘प्रिय संजय आर्वीकर यांस  
होड्यांच्या आठवणींसाठी - 
- हेमंत      
०५ /०१/९७  
घरी आल्यावर मी त्यांचा हा नवा कवितासंग्रह वाचू लागलो. 


‘मनातलं घर’ 
त्यांना कळलं होतं, माझं घर कसं होतं ते! 
मी घरी आल्यावर 
दारामागे घर माझं लपून बसतं 
एकदम मला भ्भो करतं 
खोटा खोटा मी दचकतो 
तर लुच्च घर माझं केवढ्यांदा हसतं .... 
झोपायच्या खोलीत किती वेळ मी वाचत बसलो म्हणून 
घर माझं रूसून बसतं 
डोक्यावरून पांघरूण ओढतं 
मी जवळ जाऊन पांघरूण दूर करून पाहेपर्यंत 
आतमध्ये घर वेडुलं झोपून सुद्धा गेलेलं असतं. 
मी कामावर निघाल्यावर... 
शांत शांत घर माझं एकटं एकटं घर घर खेळत राहतं. 


हेमंत जोगळेकरांनी जसं माझं बाबा-पण सोपं केलं होतं जसं माझं बालपण सतत जागं ठेवलं होतं, नव्हे त्यांची कविता माझं बालपण-माणसाची निरागसता जपणारी ‘नर्सरी’ होती. या नर्सरीची एक चित्रपट-शाखा होती... तिथं भेटला, मला इराणचा माजिद माजिदी. चित्रपट-दिग्दर्शक. ही आमची निरागसतेची शाळा रवींद्रनाथांच्या शांतिनिकेतनसारखी होती. तिथं जगभरातल्या लोकांना प्रवेश होता. माजिदीच्या या जगात मला ‘चिल्ड्रन ऑफ हेवन’ ‘साँग्ज ऑफ स्पॅरो’ ‘बरान’आणि ‘कलर्स ऑफ पॅराडाईज्’ भेटले. आज ‘कलर्स ऑफ पॅराडाइज्’चा खेळ आमच्या चित्रपटशाखेत असल्यानं मी त्याचीच गोष्ट सांगतो. 


महमंद हा तेहरानमधल्या दृष्टिहिनांच्या शाळेत शिकणारा, दहा-बारा वर्षाचा मुलगा. शाळेला तीन महिन्यांची सुटी म्हणून सगळेजण आपल्या पालकांची वाट पाहताहेत. महंमद आपल्या तीन-चार मित्रांसह बाकावर बसलेला. त्याचा मित्र छातीवर ठेका आणि तोंडाने आगगाडीचा आवाज काढतोय. जणू सगळ्यांनाच घरी परतण्याची निकराची घाई त्यातून अभिव्यक्त होतेय. शेवटी बाबाची वाट बघणारा महंमद एकटाच शाळेत उरतो. त्याच्या आईचा आधीच मृत्यु झाला असल्यानं त्याच्या साऱ्या आशा बाबावर एकवटलेल्या. तेवढ्यात शाळेच्या आवारात असलेल्या झाडांवरून पक्ष्याचा आवाज येतो. आर्त...काहीतरी हरवलेलं आहे, असं सूचित करणारा. दुसरीकडून मांजरांचा आवाज. दृष्टिहिन महंमद मनाच्या डोळ्यांनी जाणतो. पक्ष्याचं चिमणं पिलू पडलं आणि आपण वाचवलं नाही, तर ते मांजराचं भक्ष्य ठरणार. पहिल्यांदा तो मांजराला दूर हाकलतो. आवाजाच्या रोखानं जात जात झाड्याच्या पाचोळ्याखालच्या पिलाला शोधतो. अलगद त्याला उचलून शर्टाच्या खिशात ठेवतो. त्याच्या  चेहऱ्यावर विलक्षण ‘कृतार्थ’ स्मित ...आणि झाडावर चढू लागतो. घरटयापाशी... आपल्या चुकीनं ते पडणार नाही, त्याची काळजी घेत... हळूच पिलू घरट्यात ठेवतो, त्यांच्या चोंचींशी थोडे लडिवाळ खेळतो आणि चेहऱ्यावर पुन्हा ‘संरक्षकाचे’ हसू खेळवत खाली उतरतो, पक्षांच्या आवाजाशी महंमदचे असे आत्मीय नाते जुळून गेलेले असते, त्यांची भाषा त्याला समजत जाते... 


महंमद पुन्हा आपल्या बाबाची वाट पहात. अखेर बाबा येतो. त्याला बिलगून महंमद  स्फूंदत- स्फूंदत उद््गारतो. ‘मला वाटलं तू येणारच नाही...’  


महंमदला दुसऱ्या दृष्टिहिन, पण आता स्वावलंबी झालेल्या सुताराकडे सोपवून, विधूर हाशेमला दुसरे लग्न करायचे असते, संभवतः स्वतःसाठी-कुटुंबासाठी, हाशेमच्या आईला वाटतं, तो महंमदची जबाबदारी टाळतोय, ती घराचा त्याग करून निघून जाऊ लागते. अगदी थोड्याच अंतरावर पाण्याबाहेर आलेला मासा तडफडत असतो. घर सोडून निघालेली वृद्ध आजी माशाला उचलून खोल पाण्यात सोडते. त्याचा जीवनप्रवाह पुन्हा वाहू लागतो. आपल्याला आठवते महंमदनं वाचवलेलं पक्ष्याचं पिलू, त्याचा बाबा घ्यायला येणार की नाही याची शाश्वती नसतानाही. साऱ्या मानवतेनं इथं जणू पक्षी आणि माशाचं रूप घेतलेलं आहे आणि तिला वाचवणारे आहेत ‘निरागस’ महंमद आणि जगण्याच्या व्यथांनी सुरकुत्यांचं जाळ पांघरून मुला-नातवासाठी कर्तव्यबुद्धीनं झटणारी आजी. मुलाच्या हट्टाखातर आजी घरी परतते पण तिचा जीव घुटमळत असतो सुताराकडे शिकायला गेलेल्या महंमदपाशी. म्हणूनच मृत्युच्या आधी आजी आणि महंमदमध्ये निःशब्द -अपार्थीव-दूरस्थ संवाद झाल्याचे सूचित केले जाते. 


 मृत्युआधी आजीनं व्यक्त केलेली इच्छा लक्षात घेऊन, विधूर हाशेम महंमदला परत घरी आणायला निघतो. त्याचा नवा विवाहही होण्याआधीच मोडलेला असतो. परतीच्या वाटेवर नदीला जणू महापूर यावा,इतका पाऊस  येतो. नदीवरचा कच्चा पूल तुटून हाशेमच्या मागून येणारा-घोड्यावर बसलेला महंमद घोड्यासहित नदीत कोसळतो. क्षणभर हाशेमच्या चेहऱ्यावर उमटलेलं प्रश्नांचं जाळं. अखेर पितृभाव-माणुसकी-वात्सल्य साऱ्यांचा विजय होतो. महंमद... अशी हृदय  पिळवटून टाकणारी हाक देत, हाशेम पुराच्या पाण्यात स्वतःला झोकून देतो...  
 
 
खूप वेळानं हाशेमला कुठल्याशा तिरावर जाग येते, पक्षाच्या कुजनानं... दूरवर बघतो, तर महंमदपण तिरावर पडलेला. हाशेम त्याला बिलगून उरी फुटून रडू लागतो, तर थोड्याच वेळात आकाशात पक्ष्यांचा थवा. महंमदसाठी जीवनगीत गात... महंमद जणू त्यांच्या गाण्याला शब्द देत  ब्रेलमध्ये काहीतरी वाचल्यासारखी बोटांची हालचाल करतोय...आपला प्राणस्वर असणा-या ब्रेल भाषेची अक्षरं अवकाशावर उमटवत जीवनाकडे परत येतोय. 

 
मी पण आलो, या निरागसतेच्या नंदनवनात, तेव्हा माझ्याकडे होती हेमंत जोगळकरांची नांगर-होडी!  मला आता इथंच थांबायचं आहे या नंदनवनात... कारण हा संस्कृतीचा निरागस, चेहरा आहे. निरागसतेची, निर्मळ मनाची  संस्कृतीच सृष्टीतला समतोल राखत असते. आता मला समजले आहे- कुठून येतात तुझ्या कवितेतले शब्द? दूरहून उडून येणाऱ्या पक्षासारखे... त्यांनी पंखांवरून आणलेलं आकाश... तुझ्याच कवितेतले पक्षी आणि आकाश महंमदच्या गोष्टीतही आहे. 


- संजय आर्वीकर 
arvikarsanjay@gmail.com
लेखकाचा संपर्क : ८२७५८२००४४ 

बातम्या आणखी आहेत...