आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनेरी प्रकाशाची दिशा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकिरा कुरोसावांचा प्रत्येक चित्रपट हे एक जीवनभाष्य आहे. याच जीवनभाष्यातली एक ओळ कुरोसावा ‘मादादायो’मध्ये चितारून जातात. आपापल्या खजिना शोधासाठी प्रेरणा देऊन जातात...

 

उत्फुल्लपणे आयुष्य जगणारे सत्त्याहत्तर वर्षांचे सेवानिवृत्त प्राध्यापक ह्याकेन उचिदा विद्यार्थी आणि कुटुंबीयांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पार्टीहून प्रकृती अस्वस्थ होऊन परतलेत. जमिनीवरच टाकलेल्या गादीवर शांतपणे झोपलेत. बाजूला नाइट लॅम्प, पुस्तके आहेत. त्यांना घरी सोडायला आलेले, एकेकाळचे त्यांचे विद्यार्थी, ते झोपलेत याची खात्री करून घेऊन, तिथेही आपल्या अर्धवट उरलेल्या दारूच्या पार्टीचा पुन्हा ‘रंग’ जमवतात. दबक्या आवाजातील हास्यविनोदाला पुन्हा सुरुवात होते, न होते, तोच परत  प्राध्यापकांचा गाणं म्हणावं, तशा सुरात आवाज येतो... मादाऽऽदाऽऽयो... (नॉट येट). सगळे जण पुन्हा काळजीने- लगबगीने त्यांच्या खोलीत जातात, तर प्राध्यापक शांतपणे झोपलेले. एक जण म्हणतो, गुरुजी बहुतेक स्वप्न बघताहेत.


आता दृश्यबदल, पडद्यावर जपानचा ग्रामीण भाग, हिरवेगार कुरण, काही अंतरावर गवताचे छोटे छोटे ढीग रचलेले. ५-६ लहान मुलांचा घोळका, लपाछपी खेळतोय. खेळणाऱ्यांपैकी एकाचा आवाज... ‘मादा ऽऽ काई?’ (रेडी?)... गवताच्या ढिगाऱ्यात लपत असलेल्याचे उत्तर- ‘मादाऽऽ दायो...’(नॉट येट). याची आणखी आवर्तनं होत असतानाच ‘मादा ऽऽ दायो’ या शब्दांना सुंदर सुरावटीमध्ये गुंफत, भव्य अवकाशाला जीवनासारखे बहुरंगी करत, पडद्यावर नामश्रेयावली. आपणही त्या सूर आणि रंगाच्या मैफलीत सामील होत, ‘मादादायो’ या चित्रपटाच्या अर्थच्छटा, या बालपणीच्या दृश्यमालिकेच्या, पार्श्वभूमीवर शोधू लागतो...


‘मादादायो’ हा सुप्रसिद्ध जपानी चित्रपट दिग्दर्शक अकिरा कुरोसावा यांचा तिसावा आणि त्यांच्या कारकिर्दीतला अखेरचा चित्रपट. ह्याकेन उचिदा यांच्या जीवनातील प्रसंग आणि लेखन यातून या चित्रपटाची संहिता साकारलेली आहे. बालपणी लपाछपीच्या खेळात ‘रेडी?’ या सवंगड्यांच्या प्रश्नाला ‘अजून नाही’ (नॉट यट्) असे उत्तर देणाऱ्या या नायकाने, मृत्यूलाही तेच उत्तर दिले आहे. पण ते मृत्यूबद्दलच्या भीतीने नव्हे, तर जीवनाचा प्याला काठोकाठ भरून प्यावा, या इर्षेमुळे. सेवानिवृत्तीनंतरच्या पहिल्या, वाढदिवसाला, विद्यार्थी आपल्या प्राध्यापकांना भलाथोरला बिअरचा ‘सेरेमोनिअल्’ ग्लास देतात, आणि त्यांनी तो एका दमात न थांबता संपवावा, असे प्रेमळ आव्हान दिलं जातं. प्राध्यापक आव्हान स्वीकारून सगळी बिअर संपवूनच, जणू श्वास घेतात आणि पुढे भविष्यातल्या त्यांच्या सर्व वाढदिवसासाठी हा परिपाठ ठरून जातो. माजी विद्यार्थांबरोबर असणारा प्राध्यापक महोदयांचा स्नेहबंध इतका दृढ आहे, की त्यांच्या कुटुंबाचा ‘योगक्षेम’ चालवण्याची जबाबदारीही आपलीच आहे, असे समजून विद्यार्थ्यांची कृती ठरते. आपले हे प्राध्यापक म्हणजे शंभर टक्के शुद्ध सोनं आहे (सॉलिड गोल्ड) अशी या विद्यार्थ्यांची श्रद्धा आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी नागरी वस्त्यांवर झालेल्या बॉम्बवर्षावात प्राध्यापकांचे सारे घर नष्ट होऊन जाते, तेव्हा अवशेषरूपात उरलेल्या, आऊटहाऊससारख्या खोलीत प्राध्यापक आणि त्यांची प्रेमळ पत्नी संसार मांडतात. तिथेही काव्य-शास्त्र-विनोदाची, खाण्याची-पेयपानाची मैफल रंगते; ती या विद्यार्थी-प्राध्यापक यांच्यातील अतूट नात्यामुळे आणि या नात्यातील सौंदर्य समजून ते वृद्धिंगत करण्यासाठी झटणाऱ्या प्राध्यापक-पत्नीमुळे. बॉम्बवर्षावात नष्ट झालेल्या घराऐवजी हे विद्यार्थी आपल्या गुरूजींना, त्यांच्या स्वप्नातलं घर साकारून देतात. 


या दांपत्याला मूलबाळ नाही, पण नव्या घरात त्यांचे अगदी मुला-बाळासारखे प्रेम करावे असा ‘नोरा’ नावाचा बोका सापडतो. ‘नोरा’ आता दोघांचंही लाडकं बाळंच होऊन जातो. हे ‘बाळ’ हरवून गेल्यावर प्राध्यापक मानसिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडून पडतात. काही बाबतीत अगदी लहान मूल असणाऱ्या या ‘प्राध्यापक-बाळाला’ सांभाळणाऱ्या, त्यांच्या पत्नीही काही वेळा धैर्य ओसरल्याने अश्रूंना वाट करून देतात. ढगांचा गडगडाट होताच रजई संपूर्ण अंगावर घेत, त्यात स्वतःला दडवून घेणारे प्राध्यापक, आपल्या मनातही लहान मुलासारखे घर करतात.


 ‘नोरा’ला शोधण्याच्या कामात शाळेतल्या मुलांची मदत घेण्याचे ठरल्यावर ‘नोरा’चे चित्र असलेले पत्रक मुलांना वाटत असताना, एक सात-आठ वर्षाचा मुलगा आणि प्राध्यापक यांच्यात घडलेला हा संवाद पहा.
 लहान मुलगा : आजोबा, आपल्या अवतीभवती, सगळीकडे, शेकडो मांजरं आहेत.
प्राध्यापक : पण मला हेच मांजर हवं आहे.
लहान मुलगा : का पण?
प्राध्यापक : तुला भाऊ आहे?
लहान मुलगा : हो आहे, पण तो अजून बाळ आहे -
प्राध्यापक : तुला तुझ्या भावाऐवजी दुसरं बाळ दिलं तर चालेल...
लहान मुलगा : हे तर भयंकर...(वाटतं)
प्राध्यापक : हे मांजर माझं बाळ आहे... मी त्याची स्वतःच्या मुलासारखी काळजी घेतो...म्हणून मला हेच मांजर हवं आहे. इथं प्राध्यापक  आणि लहान मुलगा अगदी एकाच पातळीवरून बोलतात. नंतर प्राध्यापक सगळ्या मुलांनी ‘नोरा’ला शोधण्यात मदत करावी, यासाठी त्याचं गुणवर्णन करतात... सगळ्यांनी त्यांना मदत करावी, म्हणून त्या लहानग्यांना कमरेत वाकून नमस्कार करतात. पुढं नोरासंबंधीची पत्रकं वृत्तपत्रात टाकून लोकांपर्यंत पोचवावीत, असं एक माजी विद्यार्थी सुचवतो. प्राध्यापक या कल्पनेनं हरखून जातात, आणि जणू नोरा परत येऊन स्वतः बोलतोय, असं नोराचं काल्पनिक आत्मकथन वाचतात.


‘मी काही काळ घरापासून दूर होतो. मला माझ्या (प्राध्यापक) मालकांची खूपच काळजी वाटत होती... मी  तुम्हाला खूप त्रास दिला... आता मी परत आलो आहे, तर तुम्ही शांत्तचित्त व्हा बरं! माझा चेहरा बघून माझ्या मालकांना(अगदी) रडूच कोसळलं...(म्हणून) त्यांच्याऐवजी मीच हे पत्र लिहितो आहे... माझं परत येणं, साजरं करण्यासाठी माझ्या मालकांनी तुम्हा सगळ्यांना ‘ड्रिंक्स’साठी आमंत्रित केलं आहे.’


अगदी लहान मुलासारखं मन असणाऱ्या प्राध्यापकांना नोरा परत मिळतंच नाही, पुढं त्यांची पत्नी स्वतःहून घरी आलेल्या एका  काळ्या-पांढऱ्या मांजराला जवळ करते. प्राध्यापकही नव्या परिस्थितीशी जुळवून घेतात. अजूनही जीवनावरच्या प्रेमामुळे मृत्युला नकार देणाऱ्या, ‘मादादायी’वृत्तीच्या प्राध्यापकाप्रती आदर-प्रेम व्यक्त करण्यासाठी विद्यार्थी आपल्या क्लबला ‘मादा काई - क्लब’ असं नाव देतात. बघता बघता प्राध्यापकांचा ७७ वा वाढदिवस येतो. सगळे विद्यार्थी आपल्या मुला-नातवंडांसह त्यांना शुभेच्छा द्यायला एकत्र जमतात. प्राध्यापक एका दमात बिअरचा ग्लास संपवून पुन्हा ‘मादादायो’च्या विजयोल्हासाची घोषणा करतात. आपल्याला केक देणाऱ्या नातवंडांना एक नितांतसुंदर जीवनसार सांगतात, ‘या केकशिवाय मला तुम्हाला आणखीही काही द्यायचं आहे. आयुष्यात तुम्हाला मनापासून आवडलं, असं काहीतरी शोधा... असं काहीतरी शोधा  जे तुम्हाला साठवता येईल... आणि या भांडारासाठी खूप कष्ट करा... जोपर्यंत हा साठा जमत नाही तोपर्यंत तुम्हाला श्रम केलेच पाहिजे... ज्यात तुम्ही तुमचं हृदय गुंतवाल, असं ते ‘करिअर’ असेल... तो तुमचा खरा खजिना असेल.’एक मोठ्ठा विराम घेऊन लहानग्यांना ते म्हणतात, कदाचित हे(मी बोललो) ते खूप कठीण होतं. आय ऑम सॉरी’ आता सारा हॉल हास्यकल्लोळात बुडून जातो.


प्राध्यापक विद्यार्थ्यांच्या सगळ्या पिढ्यांना इथे संबोधत आहेत, असं वाटत राहतं. पुन्हा पार्टीला-नाच-गाण्याला सुरूवात करू, असं म्हणत असतानाच प्राध्यापक महोदयांना भोवळ येते... शेजारीच त्यांचे नेहमीचे डॉक्टर आहेत. ‘...नाडी अनियमित चालत असल्यानं, त्यांना त्रास झाला, घरी जाऊन विश्रांती घेतली की बरं वाटेल,’ असा दिलासा ते देतात. अगदी पुन्हा भोवळ येत असतानाही मी ठीक आहे... काळजी नसावी, असं सांगत, पुन्हा ‘मादादायो...’ची घोषणा प्राध्यापक करत राहतात.


घरी निघालेल्या गुरूच्या आदरार्थ अगदी गुरूवंदना म्हणावी, अशी प्रार्थना सारे गाऊ लागतात. अभिवादन स्वीकारत- स्वीकारत- प्राध्यापक आणि त्यांच्या पत्नी निरोप घेतात. अर्थातच, त्यांचे काही लाडके विद्यार्थी घरापर्यंत निरोप द्यायला आलेले असतात. 
‘मादादायो’ कुरोसावानं १९९३ मध्ये निर्माण केला, त्या वेळी ते ८३ वर्षांचे होते. म्हणजे या वयातही, अजूनही निर्मितीच्या वाटेवरूनच चालणारे.     ‘मादादायो’ मला ‘पंचरंगी’ वाटतो, कारण त्यात ह्याकेन उचिदा या प्रत्यक्षातील विलक्षण जपानी लेखकाचे, ‘मादादायो’मधील नायक प्राध्यापकाचे, खुद्द अकिरा कुरोसावाचे आणि कुरोसावाच्या शाळेतील शिक्षक ताचिकावा आणि चित्रपटकलेतील गुरू यामामाटो काजिरो यांचे रंग मिसळलेले आहेत. गुरूशिष्यातील मैत्रभावामध्ये एक समतोलही अनुस्यूत असतो.  हे गुरू शिष्याला स्वतंत्र वाट दाखविण्यात, विजेरी होऊ पाहणारे आहेत. आपापल्या खजिना-शोधा’साठी प्रेरणा देऊ पाहणारे आहेत, अशा स्वतंत्र शोधाची सम्यक वाट, हीच संस्कृती-समृद्धीची उजळणारी, सोनेरी प्रकाशाची  दिशा असते.
आणि आपल्या म.म.देशपांडे यांची कविता अशा अंतर्बाह्य खजिना-शोधाचे दर्शन घडवते.
नाना पातळ्या मनाच्या
आणि चढायाला जिने ः
वर वर जावे तसे
हाती येतात खजिने
नाना पातळ्यांवरती
नाना लढतो मी रणे
होता विजयी, बांधितो
दारावरती तोरणे

 

 

- संजय आर्वीकर
arvikarsanjay@gmail.com
लेखकाचा संपर्क :  ८२७५८२००४४

 

बातम्या आणखी आहेत...