Home | Magazine | Rasik | sanjay arvikar write on datta bhagat's book 'वाटा-पळवाटा’

मानव्याचे झाड

संजय आर्वीकर | Update - Jun 03, 2018, 01:00 AM IST

जगण्याच्या प्रवासात काही पुस्तके अशी भेटतात की, त्याने तुमचे विखंडित झालेले मन सांधले जाते. त्यातली माणसे तुमच्या मनोविश

 • sanjay arvikar write on datta bhagat's book 'वाटा-पळवाटा’

  जगण्याच्या प्रवासात काही पुस्तके अशी भेटतात की, त्याने तुमचे विखंडित झालेले मन सांधले जाते. त्यातली माणसे तुमच्या मनोविश्वाचा भाग होऊन जातात. वैचारिक भूमिकांना, रक्तामासांच्या माणसांचे रूप देऊन त्यात प्राणतत्व फुंकणारा निर्माता स्वतः चळवळीतला असेल, तर तो त्यापासून एक कलात्मक अंतर राखीत असतो. स्वतःचे जगणे ओलांडत ‘मानव्य’ आपल्या पात्रांमधून, अगदी नैसर्गिकपणे अभिव्यक्त करीत असतो...

  गोरा कुंभार, जसा आपण घडवत असलेल्या मडक्याशी एक-तान झालेला असतो, तसाच कलावंत हा आपल्या विषय-वस्तूशी एक-तान झालेली असतो. सगळे कुंभ आपलेच,मग त्यात डावा-उजवा कसा, असा मातृत्वभावनेच्या जवळ नेणारा प्रश्न सर्जकाला-एकाचवेळी मातृत्वाचे वात्सल्य आणि सहृदय विश्लेषकाचे शहाणपण देतो. आपल्या पात्रांना भूमिकांवर आधारित भक्कमपण देतानाच, वैचारिक द्वंद्वांमध्ये त्यावर येणारी झळाळीही सर्जकाने तिथे निर्माण केलेली असते. तुम्ही ‘सगळेजण आपापलं गाणं गा, पण सगळे मिळूनही गा. या समूह-गानात उद्याच्या उगवणाऱ्या दिवसाची दिशा असेल. ते तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्यासाठी म्हटलेलं गाणं असेल’, असं हा सर्जक आपल्या पात्रांना सांगत असतो. भूमिकांपल्याडचे शहाणपण असे उमलत असते!


  साऱ्या मराठी नाट्यसृष्टीचा विचार केला, तर अशी मोजकीच राजकीय-सामाजिक नाटकं आहेत, ज्यात असे भूमिका ओलांडून मानव्याच्या दिशेनं, गवसणारं शहाणपण आपल्याला, त्या कलाकृतीच्या पलीकडे नेतं. आजच्या संदर्भात विचार करायला लावतं, आत्मचिकित्सेच्या खोल दरीत उतरायला लावतं. विविध समाजघटकांच्या मनात, कित्येक वर्षांपासून रूतून बसलेले गैरसमज दूर करून एका स्वच्छ निर्भेळ दृष्टिकोनातून अवती-भवतीच्या परिस्थितीकडे पाहण्याचं शहाणपण या कलाकृती आपल्याला देतात.


  दत्ता भगत यांचं ‘वाटा-पळवाटा’ हे नाटक, अशीच एक लक्षणीय कलाकृती. ‘वाटा-पळवाटा’चा पहिला प्रयोग १० डिसेंबर, १९८६ ला झाला. जातीयता, भेदभाव, पिळवणूक यावर आधारलेल्या प्रस्थापित भारतीय समाजव्यवस्थेचे, दर्शन ही नाट्यकृती घडवतेच. पण अंतिमतः मानव्यावर आधारित समानतेचा उच्चारवही करते.


  ‘वाटा-पळवाटा’मध्ये आंबेडकरी प्रबोधनानं भारलेल्या तीन पिढ्यांच्या माध्यमातून, इतिहासातील एका ‘व्हायब्रंट’ कालखंडाचा वेध घेतला जातो. पण कुटुंब-समुदाय-समाज या भारतीय वास्तवाची, त्यातील बहुपेडी नात्याची, सखोल जाण ठेवत. चळवळीतल्या माणसाला खूप जवळचे मानणे-म्हणजे अगदी कुटुंबातील मानणे, हे अस्सल भारतीय वास्तवही यात सहजपणे अभिव्यक्त होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनकाळात, त्यांच्या चळवळीत प्रत्यक्ष भाग घेतलेले ‘काका’ आजही प्रत्येक बाब-कृत्य आणि जीवनरीत, त्यांच्या शिकवणुकीच्या कसोटीवर. तासून पाहताहेत असे वाटत असतानाच, नव्या पिढीतील काहीशा आक्रमक अर्जुनशी नाते जोडतात. त्यामागे पुस्तकी शहाणपणानं, दूरचा मार्ग स्वीकारणारा, कदाचित काहीसा बचावात्मक पवित्रा घेणारा, आपला पुतण्या-प्रा.सतीश गोडघाटे याच्या वागण्याबद्दलची प्रतिक्रिया-असमाधान मिसळलेले, असू शकते. पण वंचितांना न्याय मिळवून देण्याच्या या लढाईत, अर्जुनही अन्यायकारक-भ्रष्टाचारी व्यवस्थेचे कित्ते गिरवतो आहे-शेवंतासारख्या निराधार विधवेवर अन्याय करतो आहे, हे लक्षात येताच, ते चवताळून उठतात.काकांचा उद्रेक अर्जुनच्या पोटभरू युक्तिवादाचे सालटे काढत जाते.


  ‘वाटा-पळवाटा’तले काका म्हणतात, ‘पोट! आरं पोट का तुम्हालाच हाय? पोट कुत्र्या-मांजराला हाय. रस्यावरच्या रांडा बी भरतात पोट... आम्हाला नव्हतं का पोट?...बाबासाहेब म्हन्ले मेलेलं ढोर वढायचं न्हाई. आम्ही सोडलं. काय खात व्हतो? मुरदाडच खात व्हतो की!... भइस्कार घातला गावानं... लेकरंबाळं घेऊनशान कडीकपारीत लपलोत, देशोधडीला लागलोत.तरोठ्याचा पाला खाल्ला. शेतातले दाने येचून खाल्ले... आन काहीच नाही मिळालं त घटघट पानी पिऊनश्यानं पोटाची गार थंड केली. अन् तुमी मला पोट दावता. वर्गनीचे पैसे नुसते वर देवाला घेतले नाहीस. अर्जुन्या तू सोता खायालाही पैसे वापरलेस.’ इथं काकांनी स्वार्थाला व्यवहारवादाचं टेकू जोडणाऱ्यांचीही हजेरी घेतली आहे.


  ‘वाटा-पळवाटा’मध्ये दत्ता भगतांनी पात्रांना ‘भूमिका’चं वजन दिलं, पण त्याचं माणूसपण प्रस्थापित करुनच. प्रत्येक माणसाच्या तडजोडीचा संभाव्य अवकाशही त्यांनी सुचित केला आहे.


  समतोल विचार आणि सावध कृती यांची कास धरणारा, आंबेडकरी चळवळीतील मध्यममार्गी म्हणावा, असा प्रा.सतीश गोडघाटे जणू आत्मविश्लेषण केल्यासारखा नाटकाच्या शेवटी म्हणतो, ‘चुकतंय! कुठेतरी चुकतंय- काय चुकतंय? कुठं चुकतंय? काकांनी शिकवलं मला. शिकून सवरून मोठं केलं. विचार करण्यासाठी. पण मी, मी फक्त विचारच करत राहिलो.वांझ विचार. निरूपयोगी ठरलोय मी या व्यवस्थेत... हेमा, माणसातल्या चांगुलपणावरचा विश्वासच उडत चाललाय माझा.’ यावर हेमानं दिलेलं उत्तर केवळ ‘वाटा-पळवाटा’च्या नाट्यावकाशातच नव्हे, तर एकूण सामाजिक चळवळीच्या, सौहार्द-संस्कृतीच्या इतिहासाच्या दृष्टीनंही, मौलिक आहे. हेमा म्हणतेः ‘माणसातलं चांगुलपण मरत नसतं कधी... ठरवलं असतं. तर अर्जुननं सूड घेतला असता सोनलवर. पण त्यानं असं केलं नाही. तिला सुरक्षितपणे घरी पोचवली.’ सोनल ही दासराव या ब्राम्हण मुख्याध्यापकाची मुलगी. अर्जुन आणि सोनलमध्ये अव्यक्त प्रेमभाव आहे, पण जातिपातीचे बंधन तोडून सतीश-हेमासारखा संसार त्यांना करता येणार नाही, याचीही जाणीव दोघांनाही आहे.


  अर्जुनबद्दलच्या आपल्या प्रेमभावनेबद्दल ती हेमाला म्हणते. ‘तो एक वेडेपणा होता बाई. माझ्या पाठीवर दोन बहिणी आहेत.’ तर अर्जुन म्हणतो, ‘तिला सुखरूप पोचवताना खूप आनंद झाला. शहारून आलो... तिनं इच्छा व्यक्त केली असती, तरी मी लग्नाला तयार झालो नसतो. सोनल म्हणजे एक फुलपंखी वादळ होतं... तिनं मला माझ्या चळवळीपासून दूर नेलं असतं.मला चळवळ सोडायची नाही.’


  अर्जुनच्या हातून काही चुका झाल्या असल्या तरी तो वाया गेलेला मोहरा नाही, हे इथं स्पष्ट होतं. अर्जुन प्रा.सतीश गोडघाटेंचा ‘शागीर्द’ आहे-हे लक्षात घेऊनच, हेमा ‘माणसातलं चांगुलपण मरत नसतं कधी’ हे सुचित करते. अर्जुनचे कृत्य हे मानव्यावर आधारित विचारसरणी आणि प्रत्यक्ष जीवनातून उमललेलं उत्तर आहे. सतीशलाही एका-अर्थी माणसावरची श्रद्धा, जीवन-प्रयोजन गवसलं आहे, म्हणूनच तो म्हणतो’ ...त्या अंकुरालाच जपावं लागेल. असं काठावर राहून नाही. त्याच्या सोबत राहून... मी जामीन घेईन अर्जुनची...’


  या नाटकात पूर्वी अर्जुन-सोनल यांच्या संभाव्य प्रेमसंबंधाबाबत एक सहज आलेलं एक विधान बघू. हेमा म्हणते, ‘...केवळ गैरसमज. गैरसमजामुळे करपून गेला दोघांच्या प्रेमाचा ‘अंकूर’. इथेही नाटककार ‘अंकूर’ हाच शब्द वापरतात. ‘प्रेमाचा अंकूर’ या साचेबंद शब्दकळेला नाटकाच्या शेवटी अधिक व्यापक अर्थ प्राप्त होतो. त्यात प्रियकर-प्रेयसी प्रेम, सतीशचे (चळवळीच्या) काठावरती असणे, हे विसर्जित होऊन मोठा आशयप्रवाह खळाळत येतो. हेमा-सतीश हा ब्राम्हण-दलित विवाह-बंध (बंधन नव्हे) नाटककाराने त्यातल्या साऱ्या पेचांसह साकारलेला आहे.शिवाय हा भावबंध ‘अर्जुन-सोनल’साठी एकाचवेळी भविष्यकालीन आरसा-एक प्रकारचे सामाजिक ‘मॉडेल’ म्हणूनही काम करतो. हेमा ही अत्यंत महत्वाची व्यक्तिरेखा दत्ता भगतांनी मराठी रंगभूमीला दिली आहे.


  भिन्न सामाजिक-धार्मिक-आर्थिक पार्श्वभूमी असणाऱ्या व्यक्तीला लग्नानंतर नव्या कुटुंबात स्वतःचे ‘स्व’त्व राखत एकात्म-तत्व (युनिफाईंग स्पीरिट) होणे सोपे नसते. नाटककार भगत, हे सारे साधणारी हेमा त्यातले मानवीपण अभंग राखत साकारतात. हेमा-सोनल(गोल्डन) या नावांमधील आणि व्यक्तिरेखांमधील साधर्म्यभावही फार सूचक आहे. हे जाति-धर्मापल्याडचे झळाळते स्त्री-तत्व आहे.


  हेमा म्हणतेः ‘जे वास्तव मी उघड्या डोळ्यांनी स्वीकारलंय ते सहन करण्याचं आत्मबळही माझं मलाच मिळवावं लागेल. सतीश, माझ्या दुबळ्या क्षणी तू फक्त सावरून घे मला.’
  नाटकातील एका दृश्यात, हेमानं बुद्धमूर्तीची पूजा केली हे पाहून, सतीश तिला विचारतो,
  ‘तू खरंच मूर्तीची पूजा मनोभावे केलीस?’ त्यानंतर या दोघांमध्ये घडलेला संवाद फार अर्थगर्भ आहे; कारण तो धर्म, श्रद्धा,भाविकता, तर्क आणि या साऱ्यांना कवेत घेत चालत राहणारं मानवी जीवन या साऱ्यांना स्पर्श करतो.
  हेमा : बुद्धमूर्ती आणली, त्या दिवशीही वाहिली होती फुलं मी, पण केवळ काकांच्या भिडेखातर. आज नसती वाहिली, तर कुणाला वाईट वाटणार होतं?
  सतीश : म्हणजे खरंच भाविकतेनं केली तू पूजा... यू आर विक्रांदियन.
  हेमा : अलीकडे बरं वाटतंय मनाला, पूजा केल्यावर. ही जर तुला भाविकता वाटत असेल तर माझी हरकत नाही...
  सतीश : मला बरं वाटावं म्हणून तर करत नाहीस, हे सर्व?...
  हेमा : तुला वाईट वाटेल म्हणून गणपती समजून बुद्धमूर्तीची पूजा केली असं वाटतंय तुला?...अलीकडे खरंच सांगते, मनापासून वाटतं आपण पूजा करावी. मन भरून येतं...
  सतीश : खरंच बायकांना डोहाळे लागतात? आणि पुनर्जन्म?(जणू स्वतःशीच)
  हेमा : पुनर्जन्म?
  सतीश : काका घेताहेत का पुन्हा जन्म?म्हणून तुला लागले का असले डोहाळे?
  हेमा : किती विचार करतोस सतीश,जीवनातला सगळा गुंता तर्कानं कळलाच पाहिजे, हा तुझा हट्ट आहे ना! त्यामुळे होतं असं हे.’
  विजय तेंडुलकरांनी ‘वाटा-पळवाटा’चं वर्णन ‘दलित चळवळीची उध्वस्त धर्मशाळा’ असं केलं होतं. मराठी नाटकांची सामाजिकतेचा विचार करण्याची प्रवृत्ती’ ‘वाटा-पळवाटा’नं बळकट केलेली आहे, असं नाटककार- समीक्षक गो.पु.देशपांडे यांनी नोंदवून ठेवलं आहे.


  माझ्यादृष्टीने हे नाटक एक सामाजिक-सांस्कृतिक परिष्करण-संशुद्धी-संतुलन(रिफाईनमेंट-करेक्शन-इक्विलिब्रियन) साधणारं नाटक आहे आणि नाटककार हे मुख्यत्वे आपल्या पात्रांच्या वैचारिक द्वंद्वातून, जीवनशैलीतून साधतात. आपल्या भूमिकेपल्याही जीवन-सत्य असू शकेल. प्रेम मला हवे, त्याच स्वरूपात हवे, असा आग्रह धरणारे नसते. ते (नुसते) संरक्षक असू शकते. हे अर्जुन आपल्या कृतीतून सिद्ध करतो. म्हणूनच सतीश-हेमा यांनी अर्जुनच्या मनात रुजवलेला, मानव्यावर आधारित जीवनरीतीचा अंकूर आपणही जपला पाहिजे, त्याला पाणी घातलं पाहिजे... झाड होईपर्यंत.


  या झाडाला पाणी घालताना, मनात उमटत राहतात ओळी विजयदेव नारायण साही यांच्या ओळी

  दे दे या साहसी एकट्याला एक थेंब!
  हे सभोवारच्या झाडा झुडुपात असलेल्या आत्मीयते,
  कसं ? या धूसर प्रयोगात पंख फैलावून
  कसं जगावं?
  कसं सगळं हरून-हरवून
  पुन्हा पुन्हा जगण्यातून आत्मतत्व घ्यावं ?
  कसं, कुठल्या अमृतातून
  वाळलेली दारं चिरून
  मन निर्बंध करावं
  दे दे या साहसी एकट्याला -

  - संजय आर्वीकर
  arvikarsanjay@gmail.com

  लेखकाचा संपर्क : ८२७५८२००४४

 • sanjay arvikar write on datta bhagat's book 'वाटा-पळवाटा’

Trending