Home | Magazine | Rasik | sanjay arwikar writes article in Rasik

अमर खेळिया

संजय आर्वीकर | Update - Jul 01, 2018, 07:16 AM IST

आयुष्यभर स्वत:ची ओळख विसरून आपण फरफटत राहतो. बेसुमार. बेहद्द. विसरतो, स्वप्न आणि स्वप्नाच्या संगतीने भरारी घेणं.

 • sanjay arwikar writes article in Rasik

  आयुष्यभर स्वत:ची ओळख विसरून आपण फरफटत राहतो. बेसुमार. बेहद्द. विसरतो, स्वप्न आणि स्वप्नाच्या संगतीने भरारी घेणं. अखेरचा क्षण येऊन ठेपतो, पण फरफटत जाणं थांबत नाही, स्वप्नं काही डोळ्यांत पुन्हा तरळत नाहीत. अखेरच्या व्याख्यानात रॅण्डी पॉश नावाचा अमर खेळिया हेच आयुष्यभर निसटत राहिलेलं स्वप्न आपल्या मुठीत अलगद घेतो आणि ती मूठ प्रत्येकाच्या हातात थोडीथोडी रिती करत जातो...


  "समुद्रात काही संकट आल्यावर निरोप लिहून कागद बाटलीत बंद करून बाटली समुद्राच्या पाण्यात टाकून द्यायची. मग ती लाटांवर स्वार होते आणि कालांतराने अखेरीला समुद्रकिनाऱ्यावर वाळूत येऊन पडते. मग येणाऱ्या-जाणाऱ्याच्या नजरेला पडते. मदतीविषयीचा निरोप जातो आणि मदतीचा हात मिळू लागतो. या व्याख्यानाच्या निमित्तानं मी माझ्या मुलांना मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करणार आहे...'
  हे उद्गार आहेत, अमेरिकेतील पीट्सबर्ग इथल्या कार्नेजी मेलॉन विद्यापीठातील दिवंगत प्राध्यापक रॅण्डी पॉश (Randy Pausch) याचे! रॅण्डी संगणक-विज्ञान, मानव-संगणक-आंतरक्रिया आणि आरेखन या विषयाचा तज्ज्ञ. इमॅजिनियरिंग क्षेत्रातही कार्य करून जागतिक लौकिक मिळवलेला. मानवी स्वप्ने रूजवण्यासाठी नाट्य आणि तंत्रज्ञान यांचा संगम घडवून आणणारा. स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्येही वास्तवता आणि आशावाद याचा संगम-समतोल राखणारा.


  ज्या व्याखानाचा उल्लेख तो आपल्या भाषणात करतो, ती व्याख्यानमालिका कार्नेजी विद्यापीठातर्फे अनेक वर्ष आधीपासून सुरू होती. तिथले निमंत्रण हा मोठा सन्मान मानला जात असे. प्रज्ञावंतांनी आपले हे शेवटचे भाषण आहे असे कल्पून, जगाला कोणते-कसे शहाणपण द्यावेसे वाटते,या मुख्य-सूत्राभोवती हे व्याखान गुंफलेले असावे, अशी अपेक्षा असे.
  दैवयोग असा की, रॅण्डी पॉशला अशी कल्पना करावी लागली नाही की, हे त्याचे शेवटचेच व्याख्यान आहे. कारण व्याख्यानाच्या काही काळ आधी ४६ वर्षीय रॅण्डी आणि त्याची पत्नी - जे ग्लास्गो (Jai Glasgow), या दोघांनाही कळले होते की, रॅण्डीला अग्निपिंडाचा कर्करोग (पॅन्क्रियाटिक कॅन्सर) झालेला आहे, आता त्याचे आयुष्य आता ३-६ महिनेच उरलेले आहे. त्यामुळे डॉक्टरांच्या निदानानंतर कोलमडून पडलेली जे, रॅण्डीने आता सर्व काळ कुटुंबाबरोबर,तिच्याबरोबर ,त्यांच्या लहानग्या तीन मुलांसोबत घालवावीत असा आग्रह धरते. डिलन-५ वर्षं,लोगन-३ वर्षं आणि क्लोई-दीड वर्षं ही या मुलांची वयं लक्षात घेतली, तर जे ची अपेक्षा अगदीच रास्त आहे,असे कोणीही म्हणेल.

  त्यासाठी रॅण्डीनं आपलं ‘द लास्ट लेक्चर’ही रद्द करावं, कारण त्याच्या तयारीत रॅण्डी बुडून जाईल आणि उरलेला अत्यल्प वेळही कुटुंबाला देऊ शकणार नाही,असे जे ला वाटते.पण रॅण्डी जगावेगळा माणूस आहे, हे त्याच्या व्याखानाचा विषय- आणि त्याचे सादरीकरण यातून लक्षात येते. आतापर्यंत ‘न मरण्याच्या’ प्रयत्नात असणारा रॅण्डी आपल्या शेवटच्या व्याखानातून - सादरीकरणातून,आपल्या आयुष्याचा संक्षिप्त-प्रवास सांगताना माणसाची स्वप्नं,स्वप्नं साकारण्याचे मार्ग, त्याची महत्ता याचा एक अमृत-ठेवा निर्माण करतो. १८ सप्टेंबर २००७ ला दिलेले हे व्याख्यान पुढं पुस्तकरूपात आलं,तेव्हा त्याच्या लक्षावधी प्रती विकल्या गेल्या. मराठीसह जगभरातल्या ४५ भाषांमध्ये त्याचे अनुवाद झाले.  रॅण्डी आणि जे यांच्या मानसिक-सल्लागार डॉ.मिशेल यांना रॅण्डी सांगतो, ‘हे व्याख्यान म्हणजे माझ्या स्नेहींसाठी मला ‘हाडामांसाचा’ बघण्याची अखेरची संधी असणार आहे.त्यातून कदाचित भविष्यात मला त्यांच्या हृदयात - एखाद्या कोपऱ्यात का होईना, पण स्थान मिळू शकेल.शिवाय साऱ्यांचा निरोप घेताना काहीतरी सत्कृत्य माझ्याकडून होणार आहे, हेही मला खूप महत्वाचं वाटतं आहे. या व्याख्यानाचा साधन म्हणून वापर करून, मला न दिसणाऱ्या आणि आता माझ्या आयुष्यात नसलेल्या भविष्यातही मला फिरून यायचं आहे...'

  शेवटी, रॅण्डी पॉशनं आपल्या व्याख्यानाचा विषय ठरवला - “आयुष्यात साकार करण्याची बालपणीची स्वप्नं” (रिअली अचिव्हिंग युअर चाइल्ड हूड ड्रिम्स). या व्याखानात रॅण्डीच्या बालपणीच्या गोष्टी, त्याच्या आई-वडिलांनी दिलेली स्वप्न बघण्याची मुभा, आयुष्यात शिकलेले धडे, हे धडे देणारे विलक्षण गुरू, मुलांनी आयुष्यात शिकायचे धडे, आपल्या मुलांनी आपल्याबद्दल जे जाणून घ्यावे ते, या साऱ्यांचा अंतर्भाव आहे.
  रॅण्डी म्हणतो, ‘माझं हे शैक्षणिक स्वरूपाचं व्याख्यान माझ्या मुलांच्या भविष्यातील वाटचालीत त्यांना दीपस्तंभासारखं मार्गदर्शन करणारं, त्यांच्या गाभाऱ्यात ओम् सारखं घुमणारं, गाभाऱ्यातील समईसारखं त्यांच्या मनात सदैव तेवत राहणारं कसं होईल, ते ठरवायचं होतं. ते कठीण होतं म्हणूनच आव्हान होत. अर्थातच माझं व्याख्यान अखेरचं असूनही ‘जगण्याविषयी’ असणार होतं.’

  क्रेयॉन ही जणू बालपणात नेणारी जादुई कळ आहे, असं समजून व्याख्यानाला येणाऱ्या प्रत्येकाला क्रेयॉन देण्याची रॅण्डीची कल्पना होती. क्रेयॉनच्या स्पर्शानं - वासानं श्रोत्यांना बालपणात परतल्याचा आनंद नक्कीच मिळाला असता, अशी रॅण्डीची भावना होती. आपल्या बालपणाबद्दल सांगताना तो आपल्या आई-वडील-कुटुंबाविषयी काही आगळ्यावेगळ्या गोष्टी सांगतो. चांगले आई-वडील मिळणे म्हणजे लॉटरी लागण्यासारखे असते, आणि आपल्याला ही लॉटरी लागली होती, असं तो आनंदाने सुचित करतो.
  जेवतानाही शब्दकोश जवळ लागणाऱ्या आपल्या कुटुंबाबद्दल सांगताना - उत्साहाच्या ठिणगीचं भुईनळ्यात रूपांतर झालेलं आवडणारे, रॅण्डीसाठी चंद्रावर अवकाशयान उतरलं त्याचं छायाचित्र काढणारे, हवी तशी बेडरूम रंगवू देणारे, स्वतःच्या मोठेपणावर मात करू शकणारे वडील आपले ‘हिरो’ होते,याचा तो यात आवर्जून उल्लेख करतो.

  बालपणातील आपल्या स्वप्नांमध्ये, शून्य गुरूत्वाकर्षणामध्ये राहणं, राष्ट्रीय फुटबॉल संघात समावेश होणं, वर्ल्ड बुकच्या ज्ञानकोशात लेख लिहिणं, ‘स्टार-ट्रेक’च्या दूरचित्रवाणी-मालिकेतील कॅप्टन कर्क होणं, स्टफ्ड अ‍ॅनिमल जिंकणं, डिस्ने इमॅजिनर असणं, ही आपली बालपणीची स्वप्नं होती, असं रॅण्डी सांगतो.यातलं राष्ट्रीय फुटबॉल संघात समावेश होणं,हे वगळता त्याची बालपणीची सारी स्वप्नं पूर्ण झाली.मात्र फुटबॉलच्या पूर्ण न झालेल्या स्वप्नपूर्तीच्या प्रसंगातून आपण काय शिकलो, हे तो ‘मर्मबंधातली ठेव’ असल्यासारखे सांगतो.
  जिम ग्रॅहम हा रॅण्डीचा फुटबॉल कोच पहिल्या दिवशी फुटबॉल न आणताच प्राथमिक धडे द्यायला सुरुवात करतो.एकानं फुटबॉल नसण्याचा उल्लेख करताच, एका वेळी किती खेळाडू मैदानावरील फुटबॉलला स्पर्श करतो? असा प्रतिप्रश्न करून, ‘अर्थात फक्त एकच’ असं उत्तर येताच ‘आपण उरलेले एकवीस खेळाडू करतात तेच करणार आहोत’, असं विलक्षण उत्तर देतो. या प्रसंगाचा उल्लेख करत रॅण्डी म्हणतो, या निमित्तानं जिम ग्रॅहमनं आयुष्यभर पुरेल अशी महान भेटवस्तू दिली, ती म्हणजे वरवरच्या गोष्टीकडे न बघता गाभ्यावर लक्ष केंद्रित करायचं.

  “आपण मिळवलेलं यश कितीही मोठं असलं तरी त्या सत्याच्या अगदी खोलवर बालपणीची स्वप्नंच... (आहेत)अतिशय मोलाची, आयुष्याला आकार देणारी... मला घडवणारी... खूप अर्थपूर्ण ‘’ असं या प्रसंगी रॅण्डी म्हणतो. मोठी स्वप्नं बघा असं मुलांना सांगतानाच, मुलाबाळांच्या, तरूणांच्या स्वप्नांना खतपाणी देऊन जपा आणि वाढवा” असे तो प्रौढांना सांगतो.आपल्या स्वप्नपूर्तीच्या आड येणाऱ्या ‘भिंतींना’ अडथळे न मानता,उलट आपल्याला एखादी गोष्ट किती आतून मनापासून हवी आहे, याचा बोध करून देतात.याच‘भिंती’ दीपस्तंभाचं काम करीत असतात,मार्ग दाखवतात आणि सामर्थ्यशाली बनवतात, असं विलक्षण उमेदीनं-उत्फुल्लतेनं भारून टाकणारं, स्वतःच्या आयुष्यात जणू जगून दाखवलेलं विधान तो करतो.

  शून्य गुरूत्वाकर्षण प्रकल्पात शिक्षक म्हणून स्थान मिळणार नसेल तर राजीनामा देऊन वार्ताहर म्हणून त्यात सामील होऊ इच्छिणारा , डिस्नेच्या स्वप्नभूमीत इमॅजिनरचं काम मिळल्यावर आनंदाश्रूंनी आपलं बालपण त्या उत्कट क्षणाशी जोडणारा, मृत्यु काही महिन्यांवर उभा असतानाही “ जे, आज मी तुझ्याबरोबर आहे,जिवंत... बस्... आपल्या दोघांचा हा आत्ताचा क्षण मस्त आहे. या क्षणात मळभाला थारा देऊ नकोस,” असं म्हणणारा, अशाही परिस्थितीत कारचं छत उघडून वसंताच्या मंद झुळुकीबरोबर केसातून बोट फिरवत, संगीताचा ताल शरीरात मुरवून घेणारा, ‘मुले मोठी होतील आणि आपण नसू’ या विचारानं गलबलून गेलेला रॅण्डी जसा या पुस्तकात आपल्याला भेटतो; तसाच विद्यार्थ्यांना विद्यापीठात ‘व्हर्च्युअल रिअॅलिटी’, मानव संगणक संवाद शिकवणारा, ‘बिल्डिंग व्हर्च्युअल वर्ल्ड’सारखे कल्पक अभ्यासक्रम आखणारा, दी एन्टरटेनमेंट सेंटर-अर्थात ‘स्वप्न साकार करणाऱ्या कारखाना’साठी कला आणि शास्त्रशाखेतील तंत्रज्ञांना एकत्र आणणारा, सहजपणे अ‍ॅनिमेशनची निर्मिती करू शकेल अशा ‘अ‍ॅलिसची कहाणी’ हे सॉफ्टवेअरच्या निर्मितीमध्ये गुंतून गेलेला प्रज्ञावंतही आपल्याला दिसतो. आणि मरणसमयी ‘अ‍ॅलिस’माझी व्यावसायिक वारसा असणार आहे याचे मला मनस्वी समाधान आहे,असं म्हणणारा रॅण्डी जगातील बाल-गोपालांचा ‘अमर खेळिया’ होऊन जातो.

  रॅण्डीच्या ज्या ‘अखेरच्या व्याखाना’नं साऱ्या जगासाठी,एक सळसळता ज्ञानवृक्ष,तंत्रज्ञानाच्या मदतीनं साकारला. त्या व्याखानाच्या आधीच्या दिवशी, त्याची पत्नी जे चा वाढदिवस होता. कदाचित दोघांनी मिळून साजरा केलेला हा शेवटचा वाढदिवस असेल, या जाणीवेनेही जे ला, रॅण्डीने या व्याखान-निमंत्रणाचा स्वीकार करू नये, असं वाटत होतं. पण व्याखानासाठी जमलेल्या ४००-५०० प्रेक्षकांच्या आणि नंतर हा प्रसंग बघणाऱ्या सगळ्यांच्या साक्षीनं जे चा वाढदिवस या व्याखानाइतकाच संस्मरणीय होतो.
  रॅण्डी सांगतो, ‘जे खूप हिरमुसली होती. म्हणून मी एका ढकलत्या टेबलावर मोठ्या केकची व्यवस्था केली. श्रोत्यांना ‘’बर्थ-डे-गीत’ म्हणण्याची विनंती केली. चारपाचशे मंडळींनी उभं राहून बर्थ-डे-गीत गाऊन जे ला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सारा परिसर भारावून गेला. या अनपेक्षित,धक्कादायक आणि आश्चर्यकारक घटनेनं जे चक्रावली होती. तिच्या चेहऱ्यावर भांबावलेल्या आश्चर्याचं हसू होतं. जणू सौंदर्याचं इंद्रधनुष्य माझ्यासमोर बसलं होतं...’

  डॉक्टरांनी भाकित केलंं, त्यापेक्षा सहा महिने जास्त रॅण्डी जगला आणि नंतर दूर अवकाशात निघून गेला. पण आपली स्वप्नं तुमच्या-आमच्या मनात रूजवून. रॅण्डी आपल्या मुलांबरोबरच त्या प्रत्येकाचा पालक होता, ज्याच्या पापण्यांवरती स्वप्नांचे जग तरळत राहते...
  रॅण्डी, तुझं मन आमच्या कवी हेमंत जोगळेकरांसाररखं आहे. तुझ्या वारसदारांना सांगशील, त्यांच्या या कवितेवर चैतन्यपट करायला? कारण, या कवितेत निसर्ग आणि स्वप्न एकमेकांना अलगदपणे बिलगून आहेत.

  बाहेर जेव्हा पाऊस
  पानपानाने भिजत होता
  मी त्याला पाहिला
  छोटाश्शा पानावर बसून बासरी वाजवताना...
  चालता चालता जेव्हा
  मी वरच्या झाडीतून
  आकाशाकडे पाहिले
  तो माझ्याकडे बघून हसला
  किरणांना धरून सूर्रकन घसरताना.
  ओळीमागून ओळी
  - पानांमागून पाने
  मी जेव्हा धावत चाललो होतो
  मी त्याला ऐकला
  माझ्याच कानात कुर्र करताना...

  arvikarsanjay@gmail.com

  लेखकाचा संपर्क : ८२७५८२००४४

Trending