आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानीला कोर्डे यांच्या "वृक्ष - अनुबंध' समवेत सुरू झालेला प्रवास नकळत लेखिकेच्या मनाच्या डोहाचा तळ डुचमळून गेला. वसंतातील निसर्ग शोभेने आजपर्यंत देऊ केलेला अनमोल ठेवा त्यांच्याबरोबर आपणही अनुभवू या.
आपल्याच सग्यासोयऱ्यांविषयी परिचयातल्या व्यक्तीने तितक्याच जिव्हाळ्याने व आत्मीयतेने बोलावं, त्यांचे गुणविशेष अभ्यासून आपल्यालाच त्यांची नव्याने ओळख घडवावी, आणि या देवाणघेवाणीत तिपेडी ऋणानुबंध दृढ व्हावा हा दुग्धशर्करायोग नीला कोर्डे यांचे "वृक्ष - अनुबंध' वाचून आला. या पुस्तकात त्यांनी आंबा, तिळवा, मोह, अशोक, कोरांटी, पळस, सावर, बहावा, सोनचाफा, बकूळ, शिरीष, औदुंबर, कदंब, पारिजात, वड, पिंपळ, सातवीण, आणि चंदन या अठरा वृक्षांशी असलेला भौगोलिक, वनस्पतीशास्त्रीय, साहित्यिक, सांस्कृतिक आणि मानसिक पट उलगडला आहे. बालपणापासून ज्याच्या अंगाखांद्यावर झोके बांधून झुलायचं किंबहुना आईच्या गर्भात असल्यापासूनच डोहाळे पुरवायच्या निमित्ताने या वृक्षांशी कळतनकळत सांधलं गेलेलं नातं किती प्रदीर्घ आणि अतूट असतं हे या वाचनातून जाणवत राहतं.
बालकविता या छोट्या दोस्तांसाठी खऱ्या, पण मोठेपणाच्या जोखडात रिवाइंडचं बटण नाही हे समजल्यानंतर हरवलेलं निरागसपण देणाऱ्या चिंचेच्या आंबटगोड बुटुक्यासारख्या. विंदा म्हणतात,
एटू लोकांच्या देशातही,
जर कुणी कविता केली
प्रथम पुरतात जमिनीखाली
मग कवितेतून रुजतो वृक्ष,
फुलं येतात नऊ लक्ष।।
असे हे वृक्ष आपलेसे न वाटतील तरच नवल. यातले वड नि पिंपळ हे वृक्ष तसे सर्रास दिसणारे आणि पटकन ओळखूही येणारे. वडाच्या पारंब्या जणू सिद्ध मुनीच्या वाढलेल्या जटादाढीसारख्या रुळणाऱ्या, पटकन त्यांच्या साधनेत व्यत्यय आला तर डोळे उघडून क्वचित आपल्याला धीर देणारं स्मितहास्य करणाऱ्या. वटवृक्षाचं आजूबाजूला असणं हेच घरी जाणत्या प्रेमळ वृद्धाच्या आधारासारखं भक्कम. वडाचा विस्तारही इतका विस्तीर्ण की, त्यावर पक्ष्यांचे किती मनोव्यापार जाणता अजाणता घडत असावेत.
'गाढव म्हणाले चाललास कुठे
कोल्हा म्हणाला तीन तिठे जिथे मिळतात
तिथेच एका वडाच्या झाडावर
एक म्हातारे राहते घुबड
त्याचा ज्योतिषाचा अभ्यास रगड’
या वडाची न्यग्रोध, रोहिन, महावृक्ष, वंशवृक्ष, बहुपात, जटिन्, शिरिन्, मंडलीन्, रक्तफल ही नामावली वाचूनही विस्मय वाटतो. तर अश्वत्थ, बोधीदृम, चलदल:, पिप्पल:, कुंजराशन म्हणजेच आपला पिंपळ. रेखीव, नीटस पानांनी अव्याहत सळसळणारा, चिरंतन. पिशीमावशीच्या भुतावळीत सापडणारा
‘आला आला पिंपळावरून
एक मुंजा संध्या करून
त्याची पोथी चालत येते
हळूच त्याच्या हातात जाते’
भीतीदायक वाटण्याऐवजी हा सवंगडी होतो त्याच्या द्वाड मित्रांना सावरून घेणारा! याच पिंपळाचे वर्णन इंदिरा संतांनी नाल या कवितेत फार मनोहारी केले आहे.
‘रस्त्याकाठी प्रचंड पिंपळ
पानांची अव्याहत सळसळ
गडद पोपटी हिरवट काळी
पिंपळपाने लाल कोवळी
ऐन दुपारी झगमग करती
जललहरींचा भास निर्मिती
त्या पानांचा दाट पिसारा
त्यातून झरती प्रकाशधारा
शोषून शीतलता रंगांची
कोमलता अन् पर्णांतरीची’
याच वडापिंपळाच्या आश्वस्त आधाराला आणि अम्लान चैतन्याला अनोखं परिमाण देणाऱ्या, कवी उमेश मोघे यांच्या दोन कविता द्यायचा मोहही अनावर होत आहे.
निजबोध
वडाच्या पारंब्या की पारंब्यांचा वड,
या कूट प्रश्नाचा उहापोह करून दमलो
नि थेट वडापाशी गेलो
तो त्याच्या सनातन छायेत
मला नीज आली प्रश्नासह!
आणि जेव्हा जाग आली
तेव्हा पूर्वेकडे तांबडं फुटलं होतं!
काहीबाही
पोक्त वडाच्या पारंब्या
भुरभुरता कोवळा पिंपळ
शहारती बाभुळ अल्लड
उंबराचा त्रिगुणात्मक डौल
काही साज निसर्गाचे
काही रिक्त मनाचे कौल!
वसंतशोभेला चहूबाजूंनी आलेला बहर वर्णिताना दुर्गाबाई भागवतांच्या शब्दांनाही तेजकळा लाभते ती अशी, ‘संयमाची बतावणी निसर्ग झुगारून देतो. नटूनथटून दुसऱ्याला आकर्षित करायचे आणि परस्परांच्या सहकारातून स्वत:चे चिमुकले क्षुद्र जीवनही विश्वाच्या भव्य नियतीत, एकरूप, एकतान होईल असा आनंद निर्माण करण्याचे प्रकृतीचे तंत्र सारी सजीव सृष्टी पाहा कशी मुक्त हस्ताने वापरीत आहे.’ याच मधुमासाचा सर्वात उत्कट आविष्कार आपल्या रंगातून उधळणारा पळस म्हणजेच किंशुक, आपल्या पोपटाच्या चोचीप्रमाणे लाल केशरी बाकदार फुलांनी एकाच वेळी नेत्रसुखद तर दुसरीकडे प्रेमीजनांच्या विरहाचा दाह सचेतन करणारा भासतो. न जाणो हा विरहदग्ध पलाश पाहूनच कदाचित जोश म्हणून गेला असेल,
‘कलियां झुलस गयी हैं, दहकने लगे हैं फूल, यूं भी चली है बादे-बहरां कभी-कभी
आंचों में गुनगुनाते है गुलजार गाह-गाह शोलों से पट गया है गुलिस्तां कभी-कभी’
या पलाशाचे अर्थात फ्लेम ऑफ द फॉरेस्टचे असंख्य औषधीय, याज्ञिक, पौराणिक गुण दुर्लक्षित करून जो वाचाहीन आहे, ज्याला फळ लागत नाही आणि ज्याच्या रंगशोभेला साजेसा वास नाही म्हणून उपहास करणारी संस्कृत सुभाषिते वाचून मन खिन्न होतं. अशात मराठीतील दोन भावगीतं आठवल्याशिवाय राहत नाहीत.
‘भग्न शिवालय परिसर निर्जन
पळस तरूंचे दाट पुढे बन
तरुवेली करितील गर्द झुला
जाईन विचारित रानफुला
भेटेल तिथे गं सजण मला’
हे किशोरीताईंचा दैवी आवाज लाभलेलं.
आणि श्रीकांत पारगावकरांनी गायलेलं
‘गगना गंध आला, मधुमास धुंद झाला
फुलले पलाश रानी, जळत्या ज्वाला'
या दावाग्नीचा दाह थोडा शमल्यावर ज्याच्या दर्शनाने डोळ्यांना आल्हाद वाटतं, कानात झुंबरं घातल्याप्रमाणे झुलणारा सोनसळी कृतमाल, दीर्घफल, कर्णिकार अर्थात बहावा
उमापि नीलालकमध्यशोभि विस्तंसयन्ति नवकर्णिकारम्
चकार कर्णच्युतपल्लवेन मूर्ध्ना प्रणाम वृषभध्वजाय
शिवपार्वती आणि कर्णिकार यांचं नातं सांगणारा कुमारसंभवातील श्लोक वाचून हा आनंद दुणावतो. बहाव्याचे झुपकेदार घोस पाहिले की, शांता शेळक्यांच्या भेट कवितेतील ओळी इथे चपखल बसतील असंही वाटतं.
‘झुकलेला घोस एक, आली वाऱ्यालाच फुले
भास तयाच्या स्पर्शाचा, माझ्या भाळावर हाले’
रंगरूप, आकार आणि गंध यांचा अद्वितिय संगम असलेला चाफा! नीलाताईंनी संस्कृत साहित्यातील दोहद वृक्षांची संकल्पना विशद करून वाचकांवर जणू सुवासिक ऋण केले आहे. ललनांच्या प्रसन्न स्मितहास्याने फुलणाऱ्या चंपकाची जन्मकथाही फार सुरस आहे. योगीराज शिवाला पार्वतीकडे आकर्षित करणारे मदनाचे प्रयत्न अपयशी झाले आणि शंकराच्या तिसऱ्या डोळ्यांनी बेचिराख होण्यापूर्वी मदनाच्या धनुष्याचे पाच तुकडे होऊन त्यापासून बकूळ, चाफा, मालती, पाडळ आणि मोगरा उत्पन्न झाले. चाफ्याचा उन्मादक सुगंध आणि शृंगारातले स्थान लक्षात घेता शास्त्रीय संगीतातील असंख्य बंदिशींतील त्याचे अस्तित्व यथार्थ असल्याचे दाखवतो. मला लगेच आठवली ती भूपनट रागामधली किशोरीताईंनी समृध्द केलेली बंदिश.
‘मालनिया लाई शेरा गूंद गूंद चुन चुन कलियां, बेल चमेली चंपा मालनिया, माथे धरे और डलिया’
चाफ्याप्रमाणेच मादक गंध असलेला पण रूपाच्या बाबतीत थोडासा डावा असा मधुगंध चिरपुष्प, सुरभि, केसर म्हणजेच बकूळ. बकुळीचं फूल लहान चणीचं असलं तरी त्याला नीटस कातर नक्षी. नाजूक पिवळसर तपकिरी बकूळ फुलांची ओंजळ हुंगत स्मरणरंजनाची नशा अनुभवणं आजही मुंबईच्या गजबजाटात मुलुंडसारख्या उपनगरात जतन केलेल्या बकुळीच्या झाडांमुळे शक्य आहे. तसंच या रंगरूपाचा, वासाचा बळीवार आपल्या आत्मबळानं दूर करत समुद्रमंथनातून आलेला व्रतस्थ पारिजात. एखादं अविरत चालणारं तप करून ज्याचा देठ आरक्त झालेला आहे, तो मोतिया पांढऱ्या रंगाचा विरागी पोशाख घालणारा प्राजक्त. याचा मंद सुवास मादक नसून स्नेहाळ वाटतो. देवभूमीतून मर्त्य लोकात आलेला हा, त्याच्या मौनातून सत्यभामा-कृष्णापासून अगदी आजपर्यंतच्या असंख्य विराण्या सांगतोय. त्याचपैकी
‘सख्या तुला भेटतील माझे
तुझ्या घरी सूर ओळखीचे
उभा तुझ्या अंगणी स्वरांचा
अबोल हा पारिजात आहे.’
हा सुरेश भटांनी काव्यबध्द केलेला तर
‘झडतो सखी पारिजात
बघ उन्हात पावसात
खंत न त्या
सुमने कुणी उचलील का
खंत न त्या
वा चिखली
भिजत भिजत कुजतील का
दात्यांचे घेत हात
हातांनी हाही रिता
सासुरास निघणाऱ्या
कन्येचा सजल पिता’
असा बा. भ. बोरकरांनी टिपलेला पारिजात, किंवा -
‘आज पहाटे श्रीरंगाने
मजला पुरते लुटले गं
साखरझोपेमध्येच अलगद
प्राजक्तासम टिपले गं’
असा हुरहुरणारा पारिजात.
तिळवा, मोह, अशोक, कोरांटी, शिरीष, सातवीण यांनीही ऋतुराज वसंताच्या वैभवाचा दिमाख आपल्या बहरण्याने वाढवलाच आहे. यांचं पौराणिक, आध्यात्मिक, पर्यावरण संतुलनात असलेलं योगदान आणि त्यांच्याशी निगडित संस्कृत साहित्यातले संदर्भ वाचून हर्षचकित व्हायला होतं. फुलं बिनवासाची असूनही सुगंधाची कुपी जो आपल्या खोडात साठवतो तो पिष्ठसौरभम्, मलयज म्हणजेच चंदन. नीलाताईंच्या म्हणण्याप्रमाणे चंदनाचे मलयचंदन व हरिचंदन (पिवळ्या रंगाचे) हे दोन प्रकार मानले जातात. मला माझ्या आजोळी रक्तचंदनाचे (लाल) खोड उगाळल्याचे स्मरणात आहे.
कस्तुरीतिलकम् ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभम्
नासाग्रे हरिमौक्तिकम् करतले वेणू करे कंकलम्
सर्वांगे हरिचंदनम् च सुविमलम् कंठे च मुक्तावली
गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपाल चुडामणी
कथ्थक नृत्यात सादर केल्या जाणाऱ्या या कृष्णवंदनेपासून छायानटातील ‘येरी मालनिया गुंदे लावो री चंदन अरगजा पिया गरे डारूंगी’ या बंदिशीपर्यंत चंदनाचे गारूड कायम आहे. चंदनाच्या उल्लेखासरशी आशाबाईंच्या आवाजातलं धर्मकन्या सिनेमातलं गाणं, ‘शृंगाराची प्रीत करता चिंतन, अनुराग त्याचा देता आलिंगन, चंदनाचा गंध होत असे, पंचप्राणा, सखी गं मुरलीमोहन मोही मना’ हृदयाचा ठाव घेतं. रामदासस्वामींनी म्हटल्याप्रमाणे ‘जंवरी चंदन झिजेना, तंवरी सुगंध कळेना, चंदन आणि वृक्ष नाना सगट होती.’ चंदनाच्या या शीतलता आणि सुगंध देण्याच्या झिजेचं यथोचित चीज साक्षात परमेश्वराकडून लेपन करून घेण्याने न होतं तरच नवल.
ज्यांच्या केवळ स्मरणमात्रांनी पापखंडन होऊन अभय लाभते, अशा श्री दत्तात्रयांच्या सानिध्याने पुनीत झालेला औदुंबर. गोलाकार छोट्या फळांच्या घोसांनी लगडणारा कल्पवृक्ष. ही फळं पिकून जणू वर्षाऋतूची रुजवात करणारा. ‘वसे उंबरा सन्निधी सर्वकाळ जनी काननी घालवी नित्यकाल, तया सद्गुरूंचे नाम कल्याणराशी, नमस्कार हा स्वामी दत्तात्रयांसी.’ औदुंबराप्रमाणेच वर्षाऋतूत फुलणारा कृष्णसखा कदंब. सख्याच्या भेटीने अंगभर रोमांच तरारावे तशी याची गोलाकार चेंडूप्रमाणे रोमांचित झालेली फुलं. हा कदंब प्राचीन संस्कृत साहित्यातच नव्हे तर आजही काव्यप्रतिभेला मोहित करत आहे. उपशास्त्रीय संगीतात ‘झमक झुकी आयी बदरिया कारी, कदंब की डार पे सुभग हिंडोला, रेशम लागी डोर, एक ओर डोले कुंवर राधिका, दुजे नंदकिशोर’ म्हणत चैतन्याचा शिडकावा करणारा कदंब अचानक गतस्मृतींचे वैभव आठवत ‘कदंब तरूला बांधुन डोला उंच खालती झोले, परस्परांनी दिले घेतले, गेले ते दिन गेले,’ म्हणताना मानवी जीवनातील सुखदु:खाची अपरिहार्यता दाखवतो.
एवढं वसंताख्यान झालं तरी ‘तो’ नसेल तर ती कसली बहार.
‘ऐसो कैसो आयो रिता रे,
अंबुवा पे मोर ना आयो,
कऱ्यो ना गुंजा रे,
भंवरा रे’
आम्रमंजिरी म्हणजे मोहोर ते सुमधूर आम्रफल हा वसंताचा प्राण आहे. हे सांगताना नीलाताईंनी कालीदासाच्या अभिज्ञान शांकुतलातील परभृतिकेच्या (कोकिळेच्या) तोंडचा उद्गार अचूक टिपलाय तो असा.
आताम्रपाण्डुर जिवितसर्वं वसन्तमासस्य
दृष्टोसि चूतकोरक ऋतूमंगलं त्वां प्रसादयमि
आंबा न आवडणाऱ्या मोजक्याच हातभागी जिवांना जिचं माहात्म्य कळणार नाही ती अकबर बिरबलाची गोष्ट इथे आठवते. अकबर, बिरबल व राण्यांसमवेत आंब्याचा आस्वाद घेत असताना, बिरबलाची चेष्टा करायच्या उद्देशाने आंबे खाऊन साली व कोयी बिरबलासमोर टाकत होता. जमलेल्या सालीकोयींच्या ढिगाकडे निर्देश करून अकबर म्हणाला, ‘अरे बिरबला, किती हा हावरटपणा!’ हजरजबाबी बिरबलाने तात्काळ, ‘खाविंद, मी सालीकोयी तरी सोडतोय, तुम्ही तर त्यासकट फडशा पाडत आहात,’ म्हणून हिशेब चुकता केला.
‘बांधीयो अांबा पे झूला रि
आवो रि सखिया मिल गावो रि'
अशा असंख्य बंदिशी, लोकगीतं, गाणी, कविता यांची अांब्यावर लयलूट झालेली दिसते.
एकूणच वृक्षअनुबंध ही प्राध्यापक नीला कोर्डे यांनी घडवलेली ही वृक्षयात्रा अवर्णनीय आनंद देऊन जाते. विंदा म्हणतात,
‘एक झाड फुलेना
वारा लागून डुलेना
मग त्याची सावली
परीकडे धावली
परीकडची तीट
तिने लावली नीट
उपाय नाही खोटा
बहर आला मोठा'
शहरीकरणाच्या रेट्यात जिथे या आनंदाला आपण दिवसेंदिवस पारखे होतोय तिथे हे वृक्षही आपल्यावर रुसले तर तो असहकार मोडायला परी कुठून शोधायची? थांबता थांबता असं बजावावसं वाटतं, वृक्षांच्या मौनाची ही कहाणी सुफळ संपूर्ण होण्यासाठी आपल्या प्रत्येकाने केलेली त्यांच्या जतन, संगोपन, संवर्धनाची छोटी कृती ही या समस्येची उकल होऊ शकेल. हे प्रश्नोत्तर सजीव करणारी कुसुमाग्रजांची मुक्तायनमधली कविता सांगून समारोप करते.
मौन
शिणलेल्या झाडापाशी कोकिळा आली
म्हणाली, गाणं गाऊ का?
झाड बोललं नाही, कोकिळा उडून गेली
शिणलेल्या झाडापाशी सुगरण आली
म्हणली, घरटं बांधू का?
झाड बोललं नाही, सुगरण निघून गेली
शिणलेल्या झाडापाशी चंद्रकोर आली
म्हणाली, जाळीत लपू का?
झाड बोललं नाही, चंद्रकोर मार्गस्थ झाली
शिणलेल्या झाडापाशी बिजली आली
म्हणाली मिठीत येऊ का?
झाडाचं मौन सुटलं
अंगांगातून होकारांचं तुफान उठलं.
- वृक्ष - अनुबंध
नीला कोर्डे
मॅजेस्टिक पब्लिशिंग हाउस
पृष्ठे २४६
मूल्य ३०० रुपये
- सारंगी आंबेकर, मुंबई
saarangee2976@yahoo.co.in
पुढील स्लाइडवर पाहा, फोटो...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.